वीपिंग चेरीचं झाड

वीपिंग चेरीचं झाड

शाळा कॉलेजात जसं इंग्रजी साहित्य वाचत गेले...."वीपिंग विलो"बद्दल एक विचित्र आत्मीयता, फॅसिनेशन वाटत गेलं. फुलांचे अश्रु ढाळणारे झाड! अर्थातच तेव्हा हे झाड फक्त चित्रातच पाहिलं होतं.

प्रख्यात टीकाकार म.द. हातकणंगलेकर सर आम्हाला कॉलेजमधे इंग्रजी शिकवत. इंग्रजी शिकवताना जोडीने येणाऱ्या ग्रीक पुराणातल्या कित्येक इन्टरेस्टिन्ग कथांनी आणि त्या ग्रीक देवी देवता आणि योध्यांनीही तर अगदी कायमची भुरळ पाडली होती. अर्थातच ही जादू सरांच्या शिकवण्यातल्या हातोटीची! तेव्हाच या वीपिन्ग विलोशी जानपछान झाली होती.
ग्रीक कवी संगीतकार ऑर्फ़ियस आणि त्याची ती युरीडाइस! आणि हा ऑर्फ़ियस कुठे धाडसी मोहिमेवर जाताना या विलोच्या फ़ांद्या घेऊन जायचा. त्याला ग्रीक देवता अपोलोने दिलेलं वाद्यही या विलोच्या खोडापासून बनवलेलं होतं. या विलोबद्दल असं काही काही अंधुक आठवतंय!

अगदी परदेशातल्या 'विलो'ला भेटण्यापूर्वी भारतातच एकदा उटीला बोटॅनिकल गार्डनमधेही विलोची बरीच झुडुपं पाहिल्याचं आठवतंय. पुढे परदेश वार्या घडत गेल्या, वीपिंग विलोचं अनेकदा दर्शन झालं. हळू हळू लक्षात आलं की या विलोंचेही अगणित प्रकार आहेत. मग थोडी अतिपरिचयात अवज्ञा होतेच ....असो...

तर आताच्या अमेरिका वारीत एकदा एके ठिकाणी काही कामानिमित्त निघालो होतो. वसंत ऋतुची नुक्ती सुरवात झालेली. संध्याकाळची वेळ.......रस्त्याच्या डाव्या बाजूला अचानक संध्याकाळच्या प्रकाशात झगमगणारं एक अद्भुत दृश्य नजरेस पडलं आणि तितक्याच झर्र्कन मागे गेलं. म्हणून चालत्या गाडीतून मागे पाहिलं तर दोन झाडं दिसली. तेवढ्यात आमचं गंतव्य ठिकाण आलंच. काही कारणाने इथे अजून दोन तीन दिवस तरी यायला लागणार होतं. लगेच मनात ठरवलं ....उद्याच वेळात वेळ काढून त्या झाडाला भेटायला जायचंच.

दुसर्या दिवशीचं काम झाल्यावर लगालगा आधी त्या झाडाचा पत्ता काढला आणि चालतच निघाले. अंदाजे शोध घेत चालत राहिले. जवळच होतं ते. पाचेक मिनिटं चालल्यावर ..........
IMG_7637 (1).JPG
ओ माय गॉड...समोर ही दोन झाडं....मी अवाक होऊन पहातच राहिले. स्वता:च्या डोळ्यावर विश्वासच बसेना! ते दोन वृक्ष संध्याकाळच्या उतरत्या उन्हात सोनेरी चंदेरी प्रकाशात अंगोपांगी निथळून झळाळून निघाले होते!
सर्वात मनोहर दृश्य काय होतं तर ....या दोन्ही झाडांच्या असंख्य अगणित सडपात़ळ लवचिक फांद्या, अगदी टोकापर्यंत नाजुकसाजुक पांढर्या फुलांनी नखशिखान्त डवरलेल्या, बहरलेल्या! प्रत्येक सडपातळ फांदी बुंध्यापासून खाली अगदी कमनीयपणे लवलेली! जणु एखादी नृत्यांगना आपल्या नर्तनात अगदी सहजपणे, ग्रेसफुली खाली वाकून नमस्काराची किंवा तत्सम मुद्रा अगदी लोभसपणे दाखवत आहे!
IMG_7686.JPG

एखाद्या सुकुमार षोडशेने आपल्या सळसळत्या घनदाट लांब सडक केशसंभारातली प्रत्येक बट अगदी टोकापर्यंत नाजुक शुभ्र फुलांनी सजवावी तशीच ही दोन्ही झाडं नटलेली! जणु त्या कोमल सुकुमार फांद्यांनी त्या जून तपकिरी रंगाच्या खोडाभोवती चहुबाजूंनी रिंगण घातलंय!
छे....वर्णन करायला शब्दच नाहीयेत!

वार्याच्या झोताबरोबर या सगळ्या फांद्यांचा गोतावळा अगदी मंद तालात आत्ममग्न अवस्थेत झुलायला लागला तेव्हा तर अगदी नजरबंदीच !
https://youtu.be/jBHv3ps_3UQ

वाऱ्यावर आत्ममग्न झुलणाऱ्या, शुभ्र फ़ुलांनी नटलेल्या त्या फ़ांद्या बघून सूफ़ी संगीतात तल्लीन झालेले, शुभ्रधवल घोळदार कपड्यातले, गूढ पण अगदी कसल्याश्या अत्यानंदात स्वता:भोवती गोल गोल घुमणारे सूफ़ी गायक नर्तकच डोळ्यापुढे आले.
आणि हे सगळं नृत्यनाट्य उतरत्या उन्हाच्या चमकदार पार्श्वभूमीवर! संधीप्रकाशात काहीतरी जादू नक्कीच असते. विशेषतः सायंकाळच्या!

या फुलांबरोबर एकही हिरवं पान नसल्याने लांबून एक नुसता विस्तीर्ण असा पांढरा गुच्छच आहे असं वाटत होतं. कुण्या कुशल चित्रकाराने निळ्या आकाशाच्या निळाईवर ओढलेले शुभ्र फटकारे! वरून खालच्या दिशेने जोरकसपणे जाणारे!
तर उत्सुकता होतीच की या झाडाचं नाव काय? तर हे वीपिंग चेरी!
हं.....वीपिंग विलोप्रमाणे या झाडाच्या फांद्याही ड्रूपिंग…खाली वाकून लोंबलेल्या, म्हणून वीपिंग आणि फुलं चेरी ब्लॉसमच्या फुलांसारखी...म्हणून चेरीही! .....वीपिंग चेरी! अर्थातच लोंबणे हा शब्द इथे अगदीच विसंगत!! कारण जे काही दिसत होतं ते इतकं कमनीय आणि विलोभनीय होतं........!!
तरीही इतक्या सुंदर झाडाचं हे असलं रडकं नाव....जरा नाहीच पट्लं. पण शेवटी कवी कल्पना! ती कल्पना मात्र आवडलेली होतीच! फुलांचे अश्रु ढाळणारे झाड!

किती वेगवेगळ्या अँगलने फोटो घेतले पण समाधानच झालं नाही. किती वेळ तिथे घालवला पण पाय निघेना!
आणि लक्षात आलं की हे दृश्य, ही निसर्गाची करामत अशी आहे की हे दृश्य आपल्या त्या यंत्रात(कॅमेर्यात) बंदिस्त नाही करू शकणार! खरं म्हणजे तेवढी क्षमताच नाही आपली!
पण मनःपटलावर कायमचं कोरलं गेलं आहे!
आता हे दृश्य मनःपटलावर असं कोरलं गेलंय ....आठवण आली की लगेच पाहू शकते! त्या फुलांनी नखशिखान्त लगडलेल्या, वार्यावर मनमोकळेपणाने झुलणार्या आत्ममग्न फांद्या!
ते पहाण्यासाठी ना कोणत्या अल्बममधल्या फोटोच्या हार्ड कॉपीची गरज, ना कोणत्या आय पॅड्ची गरज, ना गुगल फोटो अल्बम उघडण्याची गरज!
डोळे मिटा.....जरासं डोकावून पहा तुमच्या अंतर्मनात...इतकं साधं सोपं आहे हे!

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle