तुम्ही दही वडा कसा बनवता?
उडदाच्या दाळीचा / मूग दाळीचा / हरभर्याच्या दाळीचा की मिक्स?
मी बघितलेल्या रेसिपी नुसत्या उडदाच्या दाळीच्या किंवा फार तर थोडीशी मूग दाळ मिक्स अश्या आहेत.
माझी आजी हरभरा दाळीचे करायची. आई पण तेच. लहान पणापासून तेच खात आलेय त्यामुळे नुसत्या उडदाच्या दाळीचे पहिल्यांदा खाल्ले, तर हे तर दह्यात घातलेले मेदुवडे अशीच प्रतिक्रीया होती. पण नंतर बाहेर सरसकट तसेच असतात असं लक्षात आलं. घरीही तसेच बनवतात का सरसकट असा प्रश्न पडला. म्हणून म्हंटलं इकडे विचारावं!
धारा ने धागा काढलाच आहे माझ्या नावाचा, तर माझी रेसिपी पण टाकून ठेवते. माझी म्हणजे माझी नाहीये. आजी-आई अशी पास ऑन होत आलेली आहे.
रेसिपी इन्स्टंट नाही. आधीपासून डोक्यात ठेवून प्लॅन करावी लागते. आधीपासून दाळ भिजवून ठेवणे वगैरे.
साहित्य -
वड्यांसाठी - २ वाट्या हरभरा दाळ, १/२ वाटी उडीद दाळ, १/४ वाटी तांदूळ, ४ / ५ मिरच्या, १ इंच आले, मीठ, आवडत असल्यास ४ / ५ काळे मिरे आणि ८ / १० ओल्या नारळाचे बारीक तुकडे, तळण्यासाठी तेल,
दह्यासाठी - २ वाट्या घट्ट दही, चमचा भर साखर, मीठ,
वरून सजावटीसाठी + चवीसाठी - बारीक चिरलेली कोथींबीर, चमचाभर लाल तिखट, मिरपूड
कृती -
वडे -
१. प्रथम २ वाट्या हरभरा दाळ, १/२ वाटी उडीद दाळ, १/४ वाटी तांदूळ पाण्यात ५-६ तास भिजवून ठेवा.
२. ५-६ तासांनी दाळी+ तांदूळ उपसून सगळं पाणी काढून टाकावे. (वाटताना अजिबात पाणी नको.)
३. आलं, मिरच्या वाटतानाच घालून सगळं जाडसर रवाळ वाटून घ्यावं.
४. त्यात मीठ घालावं, थोडे मिरी दाणे भरड कुटून टाकावे. ओल्या खोबर्याचे तुकडे करून घालावे. सगळं मिसळून घ्यावं.
५. तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवावं.
६. तेल गरम होईपर्यंत वड्यांचं पीठ हाताने चांगलं फेटून घ्यावं. हे वडे हलके होण्यासाठी करायचं.
७. चपटे थापून वडे तळून घ्यावे. तळल्या-तळल्या लगेच पाण्यात टाकावेत. पाण्यात टाकल्याने वडे मुरतात आणि जास्त तेल राहत नाही.
८. दही घुसळून घ्यावे. थोडेसे पातळ ठेवावे. त्यात चवीनुसार मीठ, साखर घालावी. साखर बेताने घालावी. रेस्टॉरंट्स मधल्या दही वड्यासारखं दही गोडसर नको आहे.
९. वडे पाण्यातून काढून ह्या पातळ दह्यात मुरत ठेवावे. १-२ तास तरी मुरत ठेवले म्हणजे छान मुरतात. घाई करायची नाही. नाहीतर वडे कडक लागू शकतात.मधून एखादे वेळी वडे हलवून खाली-वर करून घ्यायचे.
१०. वाढून घेताना जरूर असल्यास अजून घट्टसर दही-मीठ-साखर घालून हलवून घ्या. वाटीत वाढल्यावर वरून कोथिंबीर, लाल तिखट, मिरपूड वगैरे टाकून घ्या.लाल ,पांढरा ,हिरवा असे रंग छान दिसतात आणि चव एकदम छान लागते.
आता तुमच्या रेसिप्या सांगा!