हिंजवडी चावडी: गोंधळ दिवस

असेच लेख चाळत होते तर दिसलं की हे इथे आणलं नाहीये.त्यामुळे उगीच नेहमीचाच टाईमपास आचरटपणा.
.
(डिस्क्लेमर: सर्व घटना व व्यक्ती काल्पनीक. विश्वंभर भाटवडेकर ला गुगल केल्यास दात पाडून हातात ठेवण्यात येतील.)
.
मांजरीण मीटिंग रूम मधून कोरी डायरी घेऊन बाहेर आली.मीटिंग च्या आधी मीटिंग मध्ये काय बोलायचं याची खाजगी मीटिंग, मीटिंग नंतर मीटिंग मध्ये काय बोललं गेलं याचे मिनिट ऑफ मीटिंग लिहायला अजून एक मीटिंग(म्हणजे खापर कोणाच्या डोक्यावर फोडता येईल याचे पुरावे गोळा करणे) इतका मुद्द्यांचा भुसा होईपर्यंत काथ्याकूट झाल्यावर त्या डायरीत लक्षात ठेवायला लिहायला काय शिल्लक राहणार? पण साडी नेसल्यावर छानसं रंगीत गळ्यातलं घालायचं असतं गळा भुंडा नको म्हणून.तसेच मीटिंग ला जाताना हातात डायरी ठेवायचीच असते हात भुंडे दिसू नये म्हणून.
.
तर दुसऱ्या विंग मध्ये जायला कार्ड स्वाईप करणार तोवर फोन आला.
"हॅलो, मी विश्वंभर भाटवडेकर बोलतोय.ओळखलं का?"
मांजरीण मीटिंग नंतर डोक्याने इतकी हलकी झाली होती की समोरून "मै मोदी बोल रहा हुं" आलं असतं तरी तिने "फ्रॉम व्हिच कंपनी?" विचारलं असतं.तिने "हाऊ आर यु?कसं चालू आहे?" वगैरे ओळख पटली नाही तरी फार गंडणार नाही असे संभाषण चालू केले.
"इंटरव्ह्यू झाला तो वेगळा विषय.पण आपण भेटूया का, मला तुमच्या बिल्डिंग मध्ये 9व्या मजल्यावर नवं कँटीन आहे ते पण बघायचं आहे.मी या बिल्डिंग पाशी आलो की फोन करतो."
'इंटरव्ह्यू' म्हटल्यावर मांजरीणीने ठेवणीतला आदराचा स्वर लावला.
"हो हो, नक्की भेटू.मला माहित नाही ते कँटीन कुठे आहे.पण सापडेल.आपण बघू."
बोलत बोलत स्वाईप करून दार का उघडत नाहीये म्हणून तिने वर पाहिलं तर कार्ड ऐवजी डायरी स्वाईप करत होती आणि समोर बसलेले सिक्युरिटी वाले दात विचकत होते.
.
जागेवर येऊन बसल्यावर पण मांजरीच्या डोक्यात ट्यूब पेटेना.सॉफ्टवेअर उघडेपर्यंत तिने पटकन 4 विचार करून वेळ सत्कारणी लावला.इतक्या जुनाट लांबलचक नावाच्या माणसाने इंटरव्ह्यू घेतला असता तर आपल्याला कळलं असतं ना?शिवाय याला का भेटायचं आहे?आपल्या बिल्डिंग मध्ये कँटीन आहे आणि आपल्याला इतके दिवस माहिती कसं नाही?हा माणूस फॉर्म भरताना याला कागदावरचे चौकोन पुरतात का? मुळात विश्वंभर भाटवडेकर या पुरातन नावाचा गृहस्थ आपल्याला का भेटणारे यापेक्षाही आपल्याच बिल्डिंगमध्ये नवव्या मजल्यावर कँटीन असून आपल्याला कळलं कसं नाही ही बोच जास्त मोठी होती.
.
मांजरीने कामात डोकं घातलं.बरीच(म्हणजे मीटिंग मध्ये किमान 8 सलग वाक्यं बोलता येतील इतकी) कामं उरकली.तेवढ्यात पमी चा फोन आला.पमी ही मांजरीची चुलत मावस बहीण आणि वर्ग मैत्रीण.
"अगं तू माझ्या नव्या युट्युब रेसिपी ला लाईक केलं नाहीस?पाहिलीस तरी का?"
पमी इतरांनी कधीही बनवले नाही असे पदार्थ बनवते.तिचे 'सुरणाची सुशी' वगैरे पदार्थ लहान मुलांना भीती घालायला अत्यंत मोठ्या प्रमाणावर सर्च होतात.
.
"नाही गं वेळ नाही झाला.काय बनवलंस तू?"
"अगं खूप मस्स्त पदार्थ आहे.घरी इतका आवडला ना, तुला थोडक्यात सांगते.नंतर रेसिपीला लाईक करशीलच।
फणसाचे ताजे पिकलेले गरे घ्यायचे."
इथे मांजरिणीच्या डोळ्यापुढे रसरशीत कापा फणसाचे गरे आले.आज उपास होताच.काल्पनिक फणस चालणार होता.पमीने पुढे रेसिपीची गाडी चालू केली.
"मग ना, गरे बिया काढून छान मऊसूत उकडून मॅश करायचे.एकीकडे कढईत तेल घालून त्यात कांदा पात, लसूण, बटाटा आणि टोमॅटो शेजवान मसाला घालून परतायचे, मिरची मीठ घालायचं आणि त्यात हे मॅश गरे मस्त गरगटून मिक्स करायचे.कोकणी बाबागनोश विथ चायनीज ट्विस्ट."
.
मांजरीच्या डोळ्यासमोर आता रेसिपी मनात बघून मोठे काळे पंखे फिरायला लागले.मनात 'का?? का?? का??' असे प्रश्न घुमायला लागले.तिने सफाईने विषय बदलला.
"हो मी लाईक करीन. मला एक सांग आपल्या ओळखीत कोणी विश्वंभर भाटवडेकर आहे का?"
तितक्यात फोनवर विश्वंभर भाटवडेकर चा मेसेज चमकला 'ऍट लिफ्ट लॉबी'.पटकन लिफ्ट मध्ये शिरत शिरत मांजरीने संभाषण चालू ठेवलं.
"विश्वंभर... नाही गं.कोण हा?मराठी सिरियल्स मध्ये आहे का?"
"अगं मी त्याला भेटायला चाललेय आता."
तिकडून पमी किंचाळली. "म्हणजे डेट?"
"डेट काय अगं..अर्ध्या गोवऱ्या मसणात गेल्या माझ्या.विश्वंभर नाव आहे म्हणजे त्याच्या पाऊण तरी गेल्या असतील." मांजरीने आपल्याला ओळख न आठवल्यामुळे सूडबुद्धीने विश्वंभर ला 20-25 वर्षं म्हातारं करून टाकलं.
"जा बाई तू डेटवर जा.मी नवा रेसिपी व्हिडीओ बनवतेय.ब्रोकोली गुळाचा पौष्टिक शिरा.फोन ठेवते गं, मला सांग नंतर काय झालं ते".
.
मांजरीने पटकन फेसबुक लिंकडईन उघडलं.अर्र. हा प्राणी आपला फेसबुक मित्र आहे.शिवाय आपण जिथे फोन इंटरव्ह्यू दिला त्या कंपनीत बऱ्याच मोठ्या जागी आहे.हे म्हणजे फार फार फार वाईट कॉम्बिनेशन. फेसबुकवर आपण तोडत असलेले तारे याला माहीत असणार.लिंकडईन वर एकाच कंपनीत 7 वर्षं मिळाली.युरेका.म्हणजे याला 'कोण कुठे आहे सध्या' वाल्या गॉसिप साठी भेटायचंय.म्हणजे इंटरव्ह्यूरुपी कांदेपोहे कार्यक्रमाचे चे ऑफररुपी कॉर्पोरेटलग्नात रूपांतर न होता 'एक बहुत अच्छा सा दोस्त' या निर्णयामध्ये रूपांतर झालेले आहे.
.
दुःखाचा निश्वास पूर्ण करेपर्यंत लिफ्ट लॉबी आली.
विभा(विश्वंभर भाटवडेकर) लिफ्ट पाशी उभा होता.त्याच्या चेहऱ्यावर 'आपल्याला भेटायला योगायोगाने सुंदर बाई आली नाही' याची खंत 10 सेकंद तरळली आणि मग त्याने दिलखुलास हसून हाय हॅलो केले.
.
नवव्या मजल्यावर गच्चीचं दार,5 झाडू, व्हॅक्युम क्लिनर आणि एक रखवालदार होता.मांजरीने पटकन वि. भा. कडे पाहिलं.1 एप्रिल पण नव्हता.वि. भा. च्या चेहऱ्यावर प्रचंड बावळट भाव आणि आश्चर्य दिसायला लागलं.
"इथे नवं कँटीन होतं ना?"
(आता मांजरीला ग्रहण मालिकेतल्या सारखं वि. भा. कोणत्यातरी समांतर विश्वातून आल्याचा भास झाला.)
"कँटीन?? असं काही नाही इथे.4 नंबर ला जा."
"मी 4 नंबर मधूनच आलोय.इथे एक कँटीन आहे असं मला तिथल्याच माणसाने सांगितलं."
"हां ते!! आता ध्यानात आलं. ते इथे नाय, बिल्डिंग 5 ला.हिथनं चालत जाता येतं.ते अजून 15 दिवसाने सत्यनारायण पूजा झाल्यावर उघडणार. आता प्लॅस्टिक आहे सगळीकडे."
.
ही एक या बिल्डिंग ची गंमत आहे.शिवकालीन किल्ल्याच्या वाटा एकीकडून निघून एकदम वेगळ्याच दुसरीकडे बाहेर पडतात तसे इथे कोणतेही रस्ते कुठेही बाहेर पडतात.बेसमेंट पार्किंग मध्ये चुकीचं वळलं की थेट सिगारेट टपरी समोर, चौथ्या मजल्यावरच्या गनिमी वाटेने थेट प्रतिस्पर्धी कंपनी च्या गेटसमोर, कँटीन च्या भांडी घासायच्या खोलीतून उतरून थेट आग विझवण्याच्या बंबा समोर प्रकट होणे असे विविध चमत्कार करता येतात.त्यामुळे मांजरीने 'गच्चीवरून बिल्डिंग 5 च्या कँटीन ला जाता येईल' ला मान डोलावली.
.
वि. भा. आणि मांजर परत 1-2 लिफ्ट बदलून आणि पार्किंग मधून येणाऱ्या गाड्यांशी बुवा कुक करत 4 नंबर कँटीन ला गेले.
"मी ना, गेली अनेक वर्षं ग्रीन टी पितो.तुम्ही पण पिऊन बघा.आयुष्यभर इंडियन चाय टी चं नावही काढणार नाही."
(या वाक्यावर मांजरीने मनातल्या मनात वि. भा.चे दात पाडले..इतके मजले वर खाली आणि इतक्या बिल्डिंग चाली-चाली करून मेला ग्रीन टी प्यायचा?व्यर्थ हे जीवन.)
"आज नको ग्रीन टी.मला साधाच चहा चालेल."
.
'अमका आता कुठे आहे, ती नवी उघडलेली कंपनी कोणा तमक्याची आहे' चौकशी आणि चहा एकत्रच संपला.
.
वि. भा. आता चौकशी मोड मध्ये होता.
"मग सध्या कोणते नवे प्रोजेक्ट आले तुमच्याकडे?"
"मी अजून नवीन आहे.मला फार काही माहीत नाही."
"तुम्ही कोणत्या प्रोजेक्ट वर काम करता?"
"हॅ हॅ हॅ.. आय पी आर आहे ना. नाहीतर सांगितलं असतं.मी त्या तिकडे पॅसिफिक समुद्रापार असलेल्या एका खाणीत काम करते."
"खाणीत काय बनतं?"
"तसं बरंच काही बनतं. त्यामुळे अमुक एक असं सांगता येत नाही.तुमच्या इथे कोणती प्रोजेक्ट येतायत?"(एरवी मांजरीने एखादं नाव सांगितलं असतं.पण 'आयुष्यभर ग्रीन टी पी' असं सुचवणाऱ्या दुष्टाला इतके साधेपणाने हवी ती माहिती अजिबात द्यायची नसते.)
"आहेत एक दोन.मीच बोलणी करतोय.पण सध्या आय पी आर मुळे सांगता येत नाही.हॅ हॅ हॅ.पण तुम्ही रिझ्युम मध्ये क्लायंट ची नावं का लिहीत नाही?"(वि. भा.ने लगेच वचपा काढला.)
"एखाद्या ब्रॅण्ड च्या नावा पेक्षा आम्ही त्यांना काय करून दिलं, काय टेक्नॉलॉजी वापरल्या हे जास्त महत्वाचं असतं.नाव लिहिलं की त्या नावाच्या ग्लॅमर वर नोकरी मिळणार, स्किल्स न बघता.किंवा त्या ब्रँड मधल्या काही सिक्रेट गोष्टी कामाच्या ओघात सांगाव्या अशी अपेक्षा असणार.दोन्ही मुळे मूळ पर्पज पासून फोकस जातो."
"पण जर मी इंटरव्ह्यू घेत असेन आणि ज्या प्रोजेक्ट साठी आहे त्याने 'इंडक्शन वर वेळ न घालवता जो माणूस आमच्या प्रोजेक्ट मध्ये काम करतो किंवा केलेला आहे तो जॉब मार्केट मधून उचल' सांगितलं असेल तर तुम्ही क्लायंट नेम न लिहिल्याने रिजेक्ट व्हाल आणि या लॉजिकमधलं भंपकत्व तुम्हाला पटेल."
"पटेल.पण तरीही मी रिझ्युम मध्ये क्लायंट कंपनीची नावं लिहिणार नाहीये."
(आता मांजर आणि वि. भा. हे दोघेही एकमेकांचे मनातल्या मनात दात पाडत बसले होते. ही भेट गुंडाळणे लवकरात लवकर गरजेचे होते.)
.
फोनची घंटी वाजली आणि या संभाषणातून सुटका झाली.फोनवर मांजरीची लहान टीममेट सुमी होती.सुमीचा आवाज घाबरा घुबरा होता.
"अगं आपल्या सॉफ्टवेअर वर सगळी स्पॅनिश अक्षरं चौकोन चौकोन दिसतायत.मेनू वर चौकोन, एरर मेसेज चौकोन.तू कुठे आहेस?"
"जरा बघ, शेवटची मेसेज फाईल कोणी बदलली?युटीएफ ऐवजी आस्की फॉरमॅट मध्ये चेकइन झाली असेल."
"तुझंच नाव आहे."
(इथे मांजरीने मनात कपाळावर हात मारला.पमीचा फोन आल्यावर बोलत बोलत बाहेर जाताना युटीएफ फॉरमॅट न निवडता बटन दाबलं होतं.)
"ओह.मी 5 मिनिटात आले हां.तोवर सर्व्हर स्टॉप करून ठेव."
.
"मला जायला पाहिजे.आपण नंतर बोलू.पण माझ्या इंटरव्ह्यू चं काय झालं?"
"ते ना..जरा सिनियर पडतं ना प्रोफाइल.आम्ही लहान मुलं बघतोय."
"हरकत नाही.सिनियर प्रोफाईल ची गरज असेल तेव्हा आठवण ठेवा.बाय!!"
.
जागेवर येऊन सर्व गोंधळ निस्तरून सर्व्हर परत चालू केला.या गडबडीत इतर मांजरी जेवणाला बोलावून गेल्या.आता डोळ्यासमोर अजून मोठे पंखे फिरत होते.पटकन कँटीन ला डबा घेऊन एका प्रोजेक्ट मधल्या चिंटू बरोबर बसली.
.
"अरे वाह, आपका फास्ट है क्या? क्या डेलीकसी लाया है आपने?"
"पंपकीन का सबजी और ग्राऊंडनट लड्डू.खाओगे?"
"नही, थँक्स. मै पंपकीन नही खाता.पिछले छब्बीस साल मे खाया नही है और कभी नही खाऊंगा."
(मांजरीने मनात खुनशी हसत 'याला नक्की लाल भोपळा प्रचंड आवडणारी बायको मिळणार' अशी आकाशवाणी केली.)
.
तितक्यात सगळीकडे फायर अलार्म वाजायला लागले आणि सिक्युरिटी वाले पळवायला आले.
"पटकन खाऊन घेते"
"मॅडम इमर्जन्सी फायर ड्रिल आहे.संक्रांत हळदीकुंकू नाही.पटकन जावं लागेल."
.
तिकडे निम्मी मीटिंग रूम मध्ये एका परदेशी माणसाशी बोलत होती
"मायकेल, आय गॉट टू लिव्ह नाऊ.देअर इज अनप्लॅनड फायर ड्रिल."
"ओह, कॅन फायर वेट?आय विल टेक 5-10 मिनिट्स मोअर देन आय हॅव टू टेक किड्स टू स्कुल."
हा मायकेल म्हणजे एक नंबर चा चेंगट माणूस आहे.परवा पूर आला म्हणून ऑफिस बंद होतं तेव्हा 'तुम्ही पाचव्या मजल्यावर, तुम्हाला कशाला हवी पुरासाठी सुट्टी' म्हणून वाद घालत बसला होता.'ऑफिस ला बोटीतून येऊ का' म्हटल्यावर गप्प बसला.तिकडे सिक्युरिटी वाली माणसं बाहेर हाका मारत होती.
"मायकेल आय रियली हॅव टू गो.यु कॅन मेल मी."
निम्मिने "जाती हूँ मै" चा राग परत आळवून फोन कट केला.
.
फायर ब्रिगेड ड्रिलवाले कंपनीत 60% लोकांना ऑफिस मधून खाली जाणारा जिना कुठे आहे माहीत नाही हे बघून आश्चर्याने बेशुद्ध पडायला आले होते.त्यात मीटिंग रूम न सोडणारी, प्रोग्राम कंपाईल झाल्यावर निघतो म्हणून जागा न सोडणारी, जाता जाता कॉफी मशीन ची कॉफी घेऊन मग आगीसाठी खाली जाणारी, आगीच्या ऑकेजन साठी कंगवा आणि आयलायनर घेऊन पटकन वॉशरूम मध्ये जाणारी बिनडोक जनता पाहून 'खरी आग लागू दे' असं त्यातल्या फयर ब्रिगेडच्या बऱ्याच जणांना वाटायला लागलं.
.
मांजर आणि टीम मधला मुलगा बाहेर येऊन गर्दीत एका ओंडक्यावर बसले.मांजरीने डबा उघडला.आता आणि काही व्यत्यय यायच्या आत चार घास पोटात जाणं गरजेचं होतं.
"लो ना, ग्राउंडनट लड्डू लो."
"थॅंक्यु मॅडम.वैसे तो हमारे यहां नॉर्थ मे बिना खाये फास्ट करते है."
तितक्यात फायर ड्रिल चा माणूस आला.
"ओ तुम्हाला गंमत वाटते का सगळी?इथे फायर ड्रिल चालू आहे आणि तुम्ही इथे बसून लाडू पेढे खाताय? खरी आग लागल्यावर पळायला वाट तरी आठवेल का? माने, इथे या, हे बघा लोक सिरीयसनेस न दाखवता आरामात लाडू खात बसलेत."
"पण तुम्ही अजून तयारी करताय ना?तोपर्यंत खाऊन होईल.उपास आहे हो."
"मॅडम, कृपा करून उभं राहून खा.इथे असं बसलेलं पाहिलं तर लोक सिरीयसली घेणार नाहीत फायर ड्रिल.इमर्जन्सी मध्ये तुम्हा लोकांची जबाबदारी आमच्यावर असते."(माने नी 'इथे किल्ल्यावर दारू पिऊ नका, किल्ल्याचं पावित्र्य भंग होतं' सारख्या सुरात सुनावलं.)
.
आपण बसून 5 मिनिटात 5 चमचे भोपळा भाजी खाल्ल्याने फायर ड्रिल च्या गांभीर्यात अडथळा कसा येतो हे मांजरीला अजूनही कळेना.हे लोक दरवर्षी येतात, लोकांना तितक्याच गंभीरपणे भाषण देतात, मणभर पाणी वापरून काटक्याना लावलेली आग विझवून दाखवतात.आणि दर वर्षी लोक जिना कुठेय ते विसरतात.
.
आता चालत चालत भोपळा खाण्याशिवाय पर्याय नाही.टीम मधला मुलगा 'हमारे नॉर्थ मे' च्या गुजगोष्टी करायला एका फ्रेशर मुलीबरोबर सटकला.
.
4 नंबर कँटीन मध्ये इतर मांजरी कॅडबी चा चॉकलेट मिल्कशेक पित बसल्या होत्या.फायर ड्रिल संध्याकाळी झालं असतं तर ते झाल्यावर लगेच घरी जाता आलं असतं.आता फायर ड्रिल झाल्यावर परत जाऊन उशिरा पर्यंत काम करावं लागणार.अश्या तीव्र दुःखावर चॉकलेट हे एकमेव सोल्युशन असतं.हळूहळू आपल्याला ऑफर मिळाली नाही याचं दुःख मांजरीवर नव्याने पसरायला लागलं आणि तिने थिक डार्क चॉकलेट कॅडबी विकत घेतलं.पलीकडे लक्ष गेलं तर विश्वंभर भाटवडेकर मित्रांबरोबर आईस्क्रीम खात बसला होता.मनात 'ग्रीन टी, होय रे चोरा' म्हणून मांजरीने खुनशी हास्य केलं.
.
निम्मी आकाशाकडे बघत आईस्क्रीम वरचं चॉको सिरप खात होती.
"काय गं, काय झालं?"
"मायकेल वेडा आहे."
"त्याला असं नसतं हँडल करायचं.नेटवर्क मध्ये डिसरप्शन आहे असं सांगून हळूहळू हेडफोन वर घासून कागदाचा खरखर आवाज करत बाहेर सटकायचं."
तितक्यात मांजरीचा फुटका फोन वाजला.साहेबांनी सर्वाना व्हॉटसॅप ग्रुपवर फायर ड्रिल ला लवकर बाहेर न निघाल्याबद्दल झापलं होतं.
"काय गं फोन कसा फुटला?"
"कव्हर लावून चार्ज करत होते तर होत नव्हता.म्हणून कव्हर काढून पॉवर बँक लावली होती तर बागेत चालताना दगडावर उलटा पडला."
"बापरे!!"
"तो रिपेअर केला गं.पुढे ऐक.1500 देऊन रिपेअर केला तर नवऱ्याबरोबर बाईकवरून जाताना स्पीड ब्रेकर वर उपडा पडला आणि त्याच्यावरून सायकल गेली."
"पण मग कशाला वापरतेस?तो दुसरा चांगला फोन आहे ना?"
"चांगला फोन फोन कॉल्स ना.आणि फुटका फोन डिजिटल डीटॉक्स ला."
"उपासाला चालतं कॅडबी?"
"सासूबाईनी सांगितलं बाहेरचं मीठ खायचं नाही उपासाला.ते खरकटं असतं.अजून बाहेरची साखर किंवा बाहेरचं चॉकलेट याबद्दल कोणी काही सांगीतलं नाहीये."
.
सर्व मांजरी आपली दुःखं कॅडबीत बुडवून परत नव्याने काम करायला निघाल्या.पुढच्या वेळी 2-3 तासाचं फायर ड्रिल असावं असं मनात प्रत्येकाला वाटत राहिलं.

(समाप्त)

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle