जर्मनीतलं वास्तव्य - भाग ३ - घर लागताना

फोन वर सहसा कुणाशीही बोलताना काय चाललंय असं कुणी विचारलं की माझं नकळत उत्तर असतं 'रुटीन'. आता याचीही प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते, पण पुण्यात माझं खरंच एक रोजचं ठरलेलं वेळापत्रक होतं. सकाळी स्वयंपाक, मग ऑफिस, घरी येताना भाज्या, दूध आणा, स्वयंपाक आणि झोप. शनिवार रविवार मित्र मैत्रिणी नातेवाईक असे अनेक जण आणि वेळांमधले बदल सांभाळून सुमेधशी फोन वर बोलणे. आणि इथे आल्यावर हे सगळं पूर्ण १८० डिग्रीत ते बदललं, कुणाशीच ओळख नाही, दिवसभर करायला सुरुवातीला घरात आवरा आवरी, स्वयंपाक, त्यात त्या हॉट प्लेट्स वरचं तंत्र शिकणे हे एक नवीन चॅलेंज होतं, सुपर मार्केट्स मधून नवीन काही मिळालं तर ते घेऊन येणे असे अनेक उद्योग असले तरी बराच वेळ आहे असं वाटायचं. त्यात अंधार व्हायचा रात्री दहा नंतर. नेटचा स्पीड फारच सुखावणारा होता, त्यामुळे ते एक खूप बरं होतं, पण तेव्हा स्मार्ट फोन तेवढे प्रचलित नव्हते, त्यामुळे सगळं लॅपटॉप वर आणि एका जागी बसून बघा, सकाळी उठून पहिले चहा ठेवण्यासोबतच एकीकडे लॅपटॉप चालू करायचा हे न चुकता व्हायचं.

सुरुवातीला परदेशात येणाऱ्या प्रत्येकाप्रमाणे आधी Ikea या दुकानाच्या भेटी झाल्या, या घरात थोडं फर्निचर होतं, पण तरी लहान सहान काहीतरी आठवायचं, मग कधी ते शोधायला मी एकटी किंवा ते सगळं घेऊन आधी एका बसने ट्राम स्टेशन वर आणि मग तिथून ट्राम ने घरी. सगळ्यात पहिली गरज होती स्टूलची. कारण स्वयंपाक घरातली कपाट इतकी उंच की आपण कसं काढायचं सामान आणि ठेवायचं तरी कसं? म्हणून पहिला स्टूल आणला, तो आपणच असेम्बल करायचा म्हणून पहिल्या टूलबॉक्स ची खरेदी पण झाली. मग ते मॅन्युअल वाचून सगळे तुकडे जोडून तो स्टूल तयार झाला, उंच कपाटातल्या वस्तू काढता आल्याच, शिवाय ही अशी असेम्ब्लीची कामं आवडली सुद्धा. थोडं फार सामान प्रत्येक भेटीत घरी येत गेलं. खरंतर खूप काही घ्यावंसं वाटायचं, पण रुपये ते युरो हा डोक्यात चालणारा हिशोब आणि सामान ठेवायला लागणारी जागा नाही म्हणून मग प्रत्येक वेळी थोडी थोडीच खरेदी व्हायची.

इथे येताना इथे काय मिळतं, काय मिळत नाही याची थोडीफार माहिती होती. सुमेधच्या थोड्या वस्तू होत्या, आणि माझ्या पुण्यातल्या पण होत्या. सगळ्याचा अंदाज घेऊन इथे येताना काही सामान आणलं, त्यातलं काही अगदीच योग्य होतं, पण तरीही मी काही वस्तू भारतातून का घेऊन आले, असा प्रश्न आता मला पडतो. मग दुकानात अशा वस्तू अगदीच माफक किमतीत दिसल्या, की मला त्या ऐवजी हे दुसरं आणायला हवं होतं असं काही सुचायचं. म्हणजे सोलकाढणी कशाला आणावी? इथे ही लोक जेवतात, स्वयंपाक करतात, त्यातून सतत बटाटे खातात तर मग हे काय मिळणार नाही का? पण नाही तेव्हा सुचलं.

त्या घरमालकाचं सामान असलं तरी त्यातल्या ताटल्या, पेले आपण नको वापरायला असा विचार करून ते आम्ही आपापले आणले. पण इथे वाट्या मिळेना, खूप मोठ्या आकाराचे बाउलच जास्त . पण आपल्या आमट्या, वरण याच्यासाठी वाटीच हवी असते. मी तेव्हा कित्येक दुकानांमध्ये त्या वाट्या शोधायचे. एका दुकानात जेव्हा काचेच्या लहान वाट्या दिसल्या तेव्हा मला फारच आनंद झाला होता. इतर भांडी पण आपली स्टीलची नाही, रोज सगळं काचेचं वापरणं थोडं सुरुवातीला त्रासदायक वाटतं, नंतर तेच सवयीचं झालं. आता सोलकाढणीने वजन वाढलं नाही बॅगचं, पण तरी दोन वाट्या आणायला हव्या होत्या असं वाटायचंच. अशा काही गमती पुढे बरीच वर्ष होत राहतात.

सुपरमार्केट मधून सामान आणायला गेलो की तेव्हा फार कुतूहल असायचं. अक्खा ओला नारळ बघून मी इथे नारळ पण मिळतात, तेही इथल्या सुपर मार्केट्स मध्ये हे बघून आ वासला होता आणि मग लगेच उत्साहाने तो घरी आणून, नवीन आणलेल्या स्टूलवर तो फोडून त्याचा नारळीभात पण केला होता. भारतातून मिक्सर आणला नाही म्हणून इथे एक लहानसा ग्राइंडर घेतला, तो खरंतर आपल्या वाटणांना फार काही योग्य नव्हता, पण तेव्हा उत्साह जास्त असल्यामुळे त्यातच चटण्या, पुरण असे कितीतरी पदार्थ विनातक्रार आणि उत्तम जमले, मग काही वर्षांनी मिक्सर आणल्यावर काम अजून सोपं झालं तेव्हा इतके दिवस काय काय उद्योग केले त्या लहानशा भांड्यात सगळं वाटताना हे आठवायचं आणि मजा वाटायची.

दुकानात दुधाचे, दह्याचे कितीतरी प्रकार, त्यातले आपल्याला आवडतील असे शोधण्यासाठी मग प्रत्येक वेळी नवीन ब्रॅण्ड आणून बघायचा, आपल्या चहाला जेव्हा चांगली आणि भारतातली चव येईल तेव्हा ते चांगलं दूध असं वाटायचं पण हे ट्रायल अँड एरर पद्धतीने शोधण्यात बरेच दिवस गेले, किंवा कदाचित ती नेमकी घरची चव मिळाली नाहीच, इथलं आणि आपलं याच्या मधल्या चवीला जीभ सरावली असेल.

घराजवळ जे एक मोठं सुपर मार्केट होतं तिथे जाऊन नुसतं विंडो शॉपिंग करायला जाणे हा मस्त टाईमपास होता. यातल्या बेकिंग सेक्शन मध्ये तर फारच रमायला व्हायचं आणि सगळंच घ्यावंसं वाटायचं. घरभर कार्पेट असल्यामुळे काहीही सांडलवंड होणे आणि त्याची स्वच्छता हे खूप त्रासदायक वाटायचं. हॉटप्लेट्स वर चहा उतू जाणे हे तर भयंकर मोठं संकट वाटायचं. बेकिंग इतकाच स्वच्छतेच्या वस्तूंचा सेक्शन पण खूप बघितला जायचा. ग्लास क्लीनर वेगळं, प्रत्येक प्रकारच्या फरशांचे वेगळे क्लिनिंग, हॉटप्लेट्स साठी एक, त्यात अजून सिरॅमिक हॉब साठी एक, प्रत्येकाची वेगवेगळी फडकी, दहा प्रकारच्या घासण्या, पन्नास प्रकारचे हॅन्डवॉश, भांडी घासायचे साबण आणि अजून बरेच प्रकार. त्या प्रत्येकावर ते कोणत्या मटेरियल साठी चालू शकतं हेही लिहीलेलं असायचं. भाषा सम्जावी म्हणून कधीकधी इतके बारीक तपशील पण वाचले जायचे, पण त्याचा बरेचदा फायदाच व्हायचा.आणि तरी "कशाला हवेत एवढे सतराशे साठ प्रकार" असेही विचार मनात यायचेच.

नेहमीच्या भाज्यांबाबत किती लागेल, किती टिकेल याचे अंदाज पण नसायचे. त्यात इथे टिन मधले राजमा, छोले हे प्रकार सुरुवातीला फारच इंटरेस्टिंग वाटायचे, शिजवलेले असल्यामुळे फक्त फोडण्या दिल्या, मसाले घातले की झालं काम. इन्स्टंट!! आणि सुमेधने मात्र ते अजिबात आणायचे नाहीत अशी ताकीद दिली होती. विद्यार्थी दशेत त्यांचे हे नेहमीचे ठरलेले प्रकार होते आणि आता त्याला वीट आला होता. मला मात्र हे सगळं नवीन असल्यामुळे आणि मुख्य सोपं असल्यामुळे सकाळी मी एकटी असले जेवायला की माझे जेवणाचे बेत हेच असायचे. आता मी सुद्धा या कशाचाच वाटेल जात नाही ही गोष्ट वेगळी. टिन फूड शिवाय अजून एक म्हणजे फ्रोझन फूड. आता जगभर प्रस्थ वाढलं आहे याचं आणि कदाचित काही वर्षांनी इथे नवीन येणार्यांना तेवढं नावीन्य नसेल, पण हे प्रकारही खूप आवडायला लागतात.सुमेध शिकत असताना त्यांच्या मित्र मंडळींमध्ये काही करायचं असेल तर तो नेहमी म्हणायचा पाव भाजी किंवा मिक्स व्हेज. यासाठी मोठ्या प्रमाणात भाज्या चिरणे वगैरे भानगडी नाही, फ्रोझन मिक्स भाज्यांची पाकिटं आणायची आणि मग त्याचेच हे विविध प्रकार. अगदी ब्रेड, पिझ्झा हे ही सगळे फ्रोझन, गरम केले ओव्हन मध्ये की झालं. हे तेव्हा मुख्य नवीन म्हणून सगळ्याचं आकर्षण. पण सगळं सोपं, इन्स्टंट हे तेवढं चांगलं नाही हे ही नंतर जाणवलंच आणि या सवयी पण बदलत गेल्या.

फार्मर्स मार्केट किंवा आठवडी बाजार हा पण एक खूप मोठा खजिना हाती लागला होता. पण त्याबद्दल नंतर स्वतंत्र एखाद्या लेखात लिहायला हवं.

असंच पहिल्यांदा भारतीय दुकानात गेलो तेव्हा मी अगदीच काही अपेक्षेने गेले नव्हते, त्यामुळे तिथे भेंडी, कारली, दुधी, कढीपत्ता आणि मुख्य कोथिंबीर अशा भाज्या बघून जीव भांड्यात पडला होता. तिथे टिकल्या आणि गंगावन आणि इतर भारतीय सौंदर्य प्रसाधने बघून आश्चर्य वाटलं होतं आणि तिथलं तूप मात्र आणून इतका पश्चाताप झाला की पुढे काही महिने तुपाचं नाव पण नको वाटायचं, इतका असह्य वास होता. त्यावरचे पर्याय मग हळूहळू सापडत गेले.

एक हॉल आणि तिथूनच चार बाजूंना एक स्वयंपाकघर, एक बेडरूम, एक टॉयलेट ही घराच्या ले आउटची विभागणी हे अगदीच विचित्र वाटत होतं, पण त्याबाबत तक्रार करण्याचा प्रश्नच नव्हता, घर मिळतंय राहायला एवढंच महत्वाचं होतं. घरातून बाहेर दिसणारी हिरवळ फारच सुखद होती. अगदी स्वप्नवत वाटावी अशी बाल्कनी होती. म्हणता म्हणता घरातल्या वस्तू हळूहळू आपल्याशा होत गेल्या. घरमालकाचा सोफा जरा बरा दिसावा म्हणून आम्ही त्यावर चार उशा आणल्या. मग जरा बरं दिसावं म्हणून पडदे घेतले. फार्मर्स मार्केट मधून झेंडूची दोन झाडं आणून ती बाल्कनीत लागली होती. कुणी मैत्रिणीने दिलेलं गिफ्ट, मीच कुठूनतरी केलेली खरेदी, अशा सगळ्या खास बॅगेत जपून आणलेल्या वस्तू या खिडकीत शो केस सारख्या विराजमान झाल्या होत्या. घरमालकाचं एक जुनं लाकडी टेबल आमच्या देवांना स्थानापन्न व्हायला अगदी सुयोग्य ठरलं होतं, आणि फारशी धार्मिक पृवृत्तीची नसूनही, ते सगळं बघून मला घराला घरपण आल्यासारखं वाटत होतं.

.

..

...

..

..

घरातले पिवळे दिवे बदलायलाच हवेत म्हणून पांढर्‍या दिव्यांचा शोध चालू केला होता. त्यात पण नावं आणि भाषेच्या गोंधळामुळे नेमके दिवे सापडेपर्यंत हा शोध चालूच राहिला. इथे जे मिळत नाही, सापडत नाही ते लक्षात ठेवून, पुढच्या भारतवारीत काय काय आणायला हवं याच्या नोंदी मनात, कधी मोबाइलवरच्या नोटस मध्ये होत गेल्या.

हे सगळं अगदी सुरुवातीला घर लागताना आलेले अनुभव आणि बाहेर मिळणाऱ्या गोष्टीबाबत. याशिवाय इथल्या बेकरी, ज्या जर्मन खाद्यसंस्कृतीचा खूप महत्वाचा भाग आहेत, इथले रेस्टॉरंट्स यांचे अनुभव, ट्राम आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर, सुरुवातीला आवश्यक असणाऱ्या सरकारी नोंदी हेही सगळे नवीन अनुभव होते, त्याबद्दल पुढच्या भागात...

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle