इथे येऊन एकेक अनुभवत असताना इथली कमालीची शांतता हा एक मोठा फॅक्टर असतो. भारतातले गाड्यांचे हॉर्न, सकाळी सकाळी वाजणारे रिव्हर्स हॉर्न, कुत्र्यांचे आवाज, लिफ्टचे आवाज, असे कितीतरी आवाज आपल्याला रोज सकाळपासून ते रात्रीपर्यंत इतके सवयीचे असतात, की अचानक यातलं काहीच ऐकू येत नाही हे खूप वेगळं जाणवतं. नवीन कुणीही इथे आल्यानंतर "किती शांतता आहे इथे" असा उल्लेख समोरच्यांशी बोलताना येतोच.
फोन वर सहसा कुणाशीही बोलताना काय चाललंय असं कुणी विचारलं की माझं नकळत उत्तर असतं 'रुटीन'. आता याचीही प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते, पण पुण्यात माझं खरंच एक रोजचं ठरलेलं वेळापत्रक होतं. सकाळी स्वयंपाक, मग ऑफिस, घरी येताना भाज्या, दूध आणा, स्वयंपाक आणि झोप. शनिवार रविवार मित्र मैत्रिणी नातेवाईक असे अनेक जण आणि वेळांमधले बदल सांभाळून सुमेधशी फोन वर बोलणे.
"आजवर कितीतरी वेळा विमानाचा प्रवास झाला, अनेक देशातली विमानतळं पाहिली, पण फ्रँकफर्ट एअरपोर्ट म्हणजे नुसता सावळा गोंधळ, इतका बिझी एयरपोर्ट म्हणवला जातो पण बाकी अजिबात काही धड व्यवस्था नाही" अशा अर्थाचं काहीतरी माझा एक जुना सहकर्मचारी एकदा बोलला होता. तेव्हा माझ्यासाठी फ्रँकफर्ट (आता मी फ्रांकफुर्ट म्हणते, या सहज घडणार्या बदलांबाबत लिहीन एखाद्या भागात नंतर) म्हणजे माझ्या मनातल्या जर्मनीच्या इमेजला तेव्हा धक्का होता. होणारा नवरा जर्मनीत या एकाच गोष्टीमुळे मला फ्रँकफर्ट बद्दल सॉफ्ट कॉर्नर होता. अर्थातच तेव्हा मला हे फ्रँकफर्ट बद्द्लचं मत तेवढं पटलं नव्हतं.