जर्मनीतले वास्तव्य - भाग ५ - जर्मन रविवार

इथे येऊन एकेक अनुभवत असताना इथली कमालीची शांतता हा एक मोठा फॅक्टर असतो. भारतातले गाड्यांचे हॉर्न, सकाळी सकाळी वाजणारे रिव्हर्स हॉर्न, कुत्र्यांचे आवाज, लिफ्टचे आवाज, असे कितीतरी आवाज आपल्याला रोज सकाळपासून ते रात्रीपर्यंत इतके सवयीचे असतात, की अचानक यातलं काहीच ऐकू येत नाही हे खूप वेगळं जाणवतं. नवीन कुणीही इथे आल्यानंतर "किती शांतता आहे इथे" असा उल्लेख समोरच्यांशी बोलताना येतोच. पण ही तर सोमवार ते शनिवारची कथा, म्हणजे किमान बाहेर गेल्यावर लोक दिसतात, दुकानं उघडलेली असतात, बास ट्राम मधली लोक दिसतात, आवाज, कमी असला तरी थोडा गजबजाट जाणवतो, भारतापेक्षा कमी असली तरी गर्दी असतेच, लहान मुलं शाळेत जाताना दिसतात, ऑफिसची मंडळी असतात...
आणि मग उगवतो रविवार..
कितीही उशीरा उठलो तरी तेवढीच शांतता..सगळ्या गाड्या आपापल्या जागी..पक्ष्यांचे आवाज असतात फक्त..पण त्या पलीकडे कोणताच आवाज नाही. कारण रविवारी स ग ळं बंद...बंद म्हणजे फक्त सरकारी कार्यालयं, काही दुकानं असं नाही..एकूण एक दुकान बंद. ..दूध दही अंडी ब्रेड, भाज्या यांची अगदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने/सुपरमार्केट्स ते मोठे मॉल्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुकानं, टेलर, हेअर सलोन, कपड्यांची दुकानं अशी न संपणारी यादी...आणि हे एवढंच नसतं, रविवारी काय करायचं नाही याचे अनेक नियम कळायला लागतात, रविवारी व्हॅक्यूम क्लिनर लावायचे नाही...मित्र मैत्रिणींना बोलावून मोठी पार्टी नाही, घरात काही फर्निचर लावायचे असेल, ड्रिलिंग मशीन वापरायचं असेल तर ते ही करायचं नाही असे नियम ऐकून आपल्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं.

रविवार सकाळ उजाडते तीच मुळात उशीरा. कुठेही रहात असू तरी एखादं चर्च असतंच जवळपास, तिथून मग थोड्या वेळाने घंटांचे आवाज चालू होतात. त्या आधी फार तर स्ट्रोलर मधून लहान मुलांना फिरवायला नेणारे पालक, कुत्र्यांना फिरवायला घेऊन जाणारे मालक, व्यायामासाठी बाहेर पडणारे लोक असे फक्त दिसतात, तेही नेहमीपेक्षा खूप कमीच आणि आपापले अगदी शांततेत, आवाज नसतो काही. चर्च मध्ये लोक जाऊन आले की नंतर मग थोडी वर्दळ दिसू लागते. उन्हाळ्यात किमान सायकल वर रपेट मारायला निघणारे लोक, आईस्क्रीम खायला बाहेर पडलेले, नदीकाठी नुसते ऊन खायला आलेले लोक अशी गर्दी दिसते. आजी आजोबा आणि नातवंडं यांच्या भेटी असतात रविवारी बरेचदा, त्यामुळे आज्या केक बेक करतात त्याचे वास येतात. कडाक्याच्या थंडीत रविवारी सकाळी सहा वाजता उठून जॉगिंगला जाणारे एखादे आजोबा सुद्धा दिसू शकतात..या बाबतीत यांचं डेडिकेशन अगदी कमाल असतं. पण हिवाळ्यात ही शांतता जास्तच उठून दिसतं. उजाडतंच उशीरा, आणि मग बाहेर जाण्याचेही काही वेगळे उद्योग नाहीत. मोठे ट्रक्स पण हायवेवर रविवारी कमी असतात. कारण त्याचेही काही ठराविक नियम आहेत. जीवनावश्यक वस्तू वगळता बाकी जड मालवाहतूकीला परवानगी नसते. पोस्ट, कुरियर सेवा सगळ्यांना या दिवशी आराम. कपड्यांची खरेदी करायची..रविवार बंद. केस कापायचे तरी शनिवारीच किंवा आठवड्यात कधीतरी (तेही बरीच दुकानं लवकर बंद होतात, पण तो वेगळ्या लेखाचा विषय आहे). ऑनलाइन मागवलेली वस्तू परत करायची आहे, मुलांच्या शाळेत सोमवारी कोणती वस्तू हवी आहे तर ती पण आधीच आणून ठेवायची. घराचं शिफ्टिंग करायचं आहे, रविवारी सगळ्या मुव्हर्स पॅकर्स सारख्या कंपन्या बंद. नवीन किचन इन्स्टॉलेशन पण सुट्टीच्या दिवशी नाही. गार्डनमधलं गवत काढायचं असेल तर त्या मशीनचा पण खूप आवाज होतो, हे ही नाही. असं कोणतंच काम, 'करू विकेंडला' म्हणून ठरवलं तर विकेंड म्हणजे फक्त शनिवारच.

मग काय उघडं असतं फक्त तर रेस्टॉरंट्स, पिझ्झा शॉप्स, आइस्क्रीम शॉप्स असे आयते खायला मिळेल अशा जागा. आणि अडीनडीला मीठ, साखर, बिस्किटं, स्नॅक्स आणि टॉयलेट पेपर्स, डायपर्स अशा वस्तू पेट्रोलपंपावर मिळू शकतात. किंमत जास्त असते थोडी, पण पूर्ण अडवणूक होत नाही. पेट्रोलचे भाव सुद्धा रविवारी जास्त असतात. मोठ्या शहरात प्रमुख रेल्वे स्थानकावर एखादं सुपरमार्केट असू शकतं जे रविवारी पण उघडं असतं.

हा दिवस सगळ्यांसाठी चर्च मध्ये जाण्याचा दिवस. तिथे प्रार्थनेच्या वेळेत कोणत्याही अनावश्यक आवाजाचा त्रास होऊ नये ही एक महत्वाची भावना. चर्च मध्ये बरेचदा मग त्यानंतर आजी आजोबा भेटतात, कुटुंबासोबत वेळ घालवता येतो. त्यामुळे धार्मिक आणि त्यानिमित्ताने कौटुंबिक भेटी ही एक आधीपासूनची चालत आलेली पद्धत.

पण बाकी हे रविवार असे..
सोमवार ते शुक्रवार ऑफिस, घरकाम यात बिझी दिवस जातात, मग शनिवार हा आरामाचा दिवस असावा असं वाटतं, मग आठवड्याची स्वच्छता, घरातली कामं, बाहेरची सगळी खरेदी यासाठी एकच दिवस उरतो. उशीरा उठून बाहेर पडायलाच उशीर झाला तर मग पुन्हा घाई सगळी कामं संपण्याची. काय आराम करायचा आहे तो दुसऱ्या दिवशी करा. पण रविवारी अचानक काही वेगळं खायला करू, केक करू असा काहीही विचार मनात आणायचा नाही. खरंतर बहुतांशी कोणतंही सामान घरी असतंच, पण नेहमीपेक्षा वेगळे पदार्थ युट्यूब - फेसबुक
वर बघून काही सुचलं, करावं वाटलं, तर वेळ आहे पण एखाद्या पदार्थासाठी गाडी अडते. आणि बाकी कशाहीपेक्षा दुकानं बंद आहेत या कल्पनेनीच वेगळं वाटतं आणि मानसिक शांतता बिघडते. सतत मग आहे ना सगळं सामान घरात याकडे नीट याकडे लक्ष ठेवावं लागतं.

अगदी जुन्या बिल्डिंग जिथे वॉशिंग मशीनचे आवाज पण त्रासदायक होऊ शकतात, तिथे रविवारी वॉशिंग मशीन वापरायचे नाही हा ही मुद्दा नियमात असण्याबद्दल ऐकलं आहे. पण आता नवीन बांधकाम आणि आधुनिक वॉशिंग मशीनचे आवाज पण कमी झालेत, त्यामुळे आता हा नियम कालबाह्य होतो आहे.

काचेच्या वस्तू फेकण्यासाठी गावागावात जागा असतात, जिथे फक्त काच फेकण्याचे कंटेनर्स असतात. तिथे सुद्धा रविवारी काच फेकता येत नाही, कारण आवाज होतो.

सार्वजनिक वाहतूक पण त्या दिवशी निवांत, एरवी दर दहा मिनिटांनी धावणाऱ्या ट्रेन या रविवारी वीस मिनिटे किंवा अर्ध्या तासाने एक अशा धावतात..मग बाहेर कुठे फिरायला गेलो तर हे टायमिंग पाळावे लागते पण हा तेवढा मोठा प्रश्न नाही वाटत. कारण या दिवसात लांब जायला स्वस्तातली तिकिटं पण मिळतात.

सगळे दवाखाने शनि-रवि बंद. फक्त इमर्जन्सी साठी काही दवाखाने चालू असतात. औषधांची दुकानं शनिवारी चालू असतात, ती ही रविवारी बंद. प्रत्येक गावात किंवा ठराविक एरिया प्रमाणे कोणत्या रविवारी कोणतं औषधांचं दुकान उघडं असेल हे ठरलेलं असतं. त्याची माहीती दवाखान्यात/ऑनलाइन मिळू शकते, मग तिथून आपण औषधं घेऊ शकतो. वैद्यकीय सुविधांबाबत लिहीताना याबद्दल सविस्तर लिहेन.

अग्निशामकदलाच्या गाड्या, पोलीस आणि रुग्णवाहिका यांचे आवाज मात्र रविवारीही असतात. त्यासाठी कोणताही दिवस आणि वेळ अपवाद नाही.

पूर्वी म्हणजे पंधरा वीस वर्षांपूर्वी राहणारे लोक जे सांगतात, त्या प्रमाणे तेव्हा तर शनिवारी पण दुपारी एक किंवा दोनलाच दुकानं बंद व्हायची. हळूहळू मग शनिवारी जास्त वेळ उघडायला सुरुवात झाली, हाही खूप मोठा बदल आहे. आता तर बऱ्याच बेकरीज, म्हणजे मुख्य विविध प्रकारचे ब्रेड जिथे मिळतात, त्या रविवारी सकाळी ठराविक वेळ उघडतात म्हणजे लोकांना ब्रेड घ्यायला मिळेल. आणि अशा वेळी खूप गर्दी पण होते. म्हणजे लोकांना चालेलच सात दिवस दुकानं उघडली तर..पण हे होत नाही..

वर्षातून एक किंवा दोन वेळा गावागावाप्रमाणे एखादा शॉपिंग Sunday असतो, त्या दिवशी दुपारी एक ते पाच या वेळेत दुकानं उघडतात आणि मग त्या चार तासांसाठी अनेक ऑफर्स असतात, तिथे मग सगळ्या पार्किंगच्या जागा संपतात, ऑफर खऱ्या आहेत की दिखावा हे कळलं नाही तरी लोक मोठमोठ्या पिशव्या घेऊन बाहेर पडतात. म्हणजे असा एखादा रविवार पण दुकानांसाठी फायदेशीर ठरत असावा असं म्हणू शकतो.

आता कोरोना नंतर आपल्याला हे सगळं वेगळं वाटलं तरी थोडं रीलेट करता येईल. पण सुरूवातीच्या कल्चर शॉक यादीत हा मुद्दा महत्वाचा असतो. आणि नकळत काही वर्षांत रविवारचं हे आयुष्य मग सवयीचं होतं. याचा त्रास होत नाही. डेडलाइन असल्यासारखी बाकीची सगळी कामं संपवून मग रविवार निवांत असतो. वेळ पडलीच तर पेट्रोल पंपा वर काय सामान मिळू शकतं हे माहीत असतं. व्हॅक्यूम क्लीनरचे आवाज हा मुद्दा पण नियमात असला, तरी तेवढा कडक नाही याची जाणीव होते. मात्र बाकीचे नियम अपवाद वगळता पाळले जातातच. ऑनलाइन शॉपिंग चे पर्याय आता खूप उपलब्ध असल्यामुळे, रविवारी घरी बसून ऑर्डर करा आणि मग आठवडाभरात ते सामान घरपोच मिळवणे हा पर्याय आहे. नवीन रेसिपी ट्राय करायच्या असतील तर आधीच ठरवून सामान आणून ठेवलं जातं. कधी रविवार घरी दुपारी झोपून सत्कारणी लावला जातो, या वेळात कुणीही मोठ्याने म्युझिक लावून किंवा हातोडीचे आवाज करून आपल्या झोपेवर गदा आणू शकत नाही ही भावना अजून शांत झोपायला मदत करते. या दिवशी मित्र-मंडळींसोबतचे प्लॅन आधीच ठरवले जातात आणि आवाजाबाबतचे सगळे नियम पाळून सुद्धा ते जमू शकतात. बाहेर ट्रेकिंग, हायकिंगला जाणे हा तर अनेक जर्मन लोकांचा रविवारचा आवडता उद्योग, तो आपल्यातही भिनायला लागतो. आपल्याला आवडेल अशा पद्धतीने रविवार सेलिब्रेट करायला जमायला लागतं. आठ दहा वर्षात इतकी बारीक सारीक सांस्कृतिक गोष्ट आपल्यात मुरायला लागते.

तर अशी ही साठां उत्तरांची जर्मन रविवारची कहाणी..भेटूया पुढच्या भागात...

क्रमशः

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle