हाय मुलींनो. आमची रोडट्रीप झाली. माझी ४-५ दिवसांची प्रवास-दिनी इथे जमेल तशी देते.
तर खूप कंटाळा आला होताच आणि सक्तीची सुट्टी जी मिळालीये ती एन्जॉय तरी करू म्हणून आम्हाला रोड ट्रिप करायची होती पण त्या ट्रीपवर आम्हीच बरेच कन्स्ट्रेन्ट्स घातले होते. मुख्य म्हणजे अति गर्दीची ठिकाणे, अम्युजमेंट पार्क्स वगैरे नको, उन्हात तळपायचं नाही, गोंगाटाची ठिकाणं नको, एका दिवशी दोन ते अडीच तासांपेक्षा जास्त प्रवास नको आणि गुंडाबाईसुद्धा एन्जॉय करेल अशी ठिकाणं पाहिजेत.
एवढे कन्स्ट्रेन्ट्स, हॉटेल्स आणि ठिकाणांकडूनच्या आमच्या स्पेसिफिक अपेक्षा वगैरेमुळे अर्थातच प्लॅन करताना बरीच चर्चा, मध्ये मध्ये (माझीच) चिडचिड वगैरे होऊन एकदाची ट्रिप प्लॅन झाली.
आमच्याकडे तसे दोन वीकएंड आणि त्यांना जोडणारे मधले ५ दिवस असा भला मोठा वेळ होता पण गर्दीची गणितं सांभाळायला आणि तयारी + नंतरच्या आरामासाठी वेळ असू द्यावा म्हणून आम्ही दोन्ही वीकएंड घरीच राहून मधले वर्किंग डेज फिरायचं ठरवलं.
आदले दोन दिवस एकीकडे हॉटेल्स वगैरे बुक होत असताना एकीकडे बॅगा भरणे, घराची साफ सफाई, थोडं फ्रीझर कुकिंग वगैरे करून ठेवलं. खूप दिवसांनी अशा प्रकारचा प्रवास तेही गुंडाबाईला घेऊन त्यामुळे भरपूर तयारी, भरपूर खाऊ आणि भरपूर सामान घेतलं.
दिवस पहिला : आजचा मुक्काम आम्ही ओहाय नावाच्या गावात करणार होतो. पहिलाच दिवस असल्याने जरा जास्त प्रवास होता. सकाळी उठून अंघोळी आणि मुख्य म्हणजे कॉफी पिऊन तयार झालो.
रात्रीतून गुंडाबाईच्या नाकातून रक्त येण्याचा कार्यक्रम झाल्याचं आम्हाला थेट सकाळीच कळलं. कोरड्या हवेमुळे असेल किंवा तिने झोपेत नाकात बोट घातलं असेल. आम्ही रात्रीतून पॅकिंग, घराचं आवरणे, झाडांच्या पाण्याची सोय करणे, नाजूक झाडं आत घेणे वगैरे प्रकार करून प्रचंड दमून झोपलो होतो. प्रयत्नपूर्वक स्वतःला गिल्ट येऊ न देता तिचं आवरलं.
नेहमीच्या सामानासोबत गुंडाबाईचा संसार - ब्लॅंकेट, पाॅटी सीट, ह्युमिडीफायर, तिची बेबी सिस्टर - पीबली (नावाची बाहुली) वगैरे गाडीत भरून नियोजित वेळेच्या फक्त ४५ मिनीटच पुढे (एकदाचं) गणपती बाप्पा मोरया केलं.
सुरुवातीला कमी उन्हात आणि फ्रेश असताना मी गाडी घेतली. आईची ऍक्टिव्ह एंटरटेनमेंट नसल्याने आणि रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठल्यामुळे थोड्याच वेळात गुंडाबाई पेंगायला लागली. ती झोपल्यावर वेगवेगळ्या हिंदी गाण्यांवर कमेंटी करून ऋने माझं मनोरंजन केलं.
सॅन डियागोची हद्द संपून जसे आम्ही पुढं जात गेलो तसं सुटल्यासारखं फीलिंग आलं. मला सॅन डियागो, आमचं घर, बाग, परिसर सगळं प्रचंड आवडतं पण गेले दीडेक वर्षं जे स्थानबद्धतेत असल्यासारखं झालं होतं त्यातून सुटका झाली असं वाटलं.
अरवाईनच्या जवळ एक रेस्ट स्टॉप घेऊन, गुंडाबाईला दही ग्रॅनोला देऊन आम्ही ड्रायव्हर बदलला आणि रोडट्रीप ऑफिशियली सुरु म्हणून एक-दोन फोटो काढले. मग मी डी जे ड्युटीवर लागले. एल ए चे कुप्रसिद्ध रेकलेस ड्रायव्हर्स पार करून आम्ही थाउजंड ओक्सकडे निघालो. साताऱ्याच्या अरुंद चढ उतारांवर जशी बहुतांश जनता स्वतःला छत्रपती समजते तसं एल ए मध्ये बहुतांश जनता स्वतःला फास्ट अँड फ्युरिअस समजते (असं माझं मत आहे. )
तर थाऊजंड ओक्सच्या ऑलिव्ह गार्डनमध्ये लंच ब्रेक घेतला. तिथे गुंडाबाईला किड्स मेनूसोबत खडू आणि रंगकाम करायला वगैरे छोटं पुस्तक मिळालं त्यामुळे तिचं खाण्यापेक्षा तिकडेच जास्त लक्ष होतं. ट्रिपचे चार पाच दिवस अजिबात खाण्याबाबतीत स्वतःला रेस्ट्रिक्ट करायचं नाही आणि घड्याळातल्या वर्कआउट रिंग्सकडे पाहून गिल्ट येऊ द्यायचा नाही असं मी आधीच ठरवलं होतं. तरीही सवयीने ऑलिव्ह गार्डन मध्ये सॅलड ऑर्डर केलं. (ही चूक पुढे बनाना चिप्स, बटर कुकीज वगैरे स्वाहा करून सुधारली गेली.)
तर असे मजल दर मजल करत एकदाचे ओहाय मध्ये पोचलो. तिथे स्वागत केलं प्रचंड ऊन आणि गरमीने. इथल्या हॉटेलची एक गंमत झालेली. आधी आम्ही एक भारी माउंटन व्ह्यू, प्रायव्हेट पेटीओ, स्पा वगैरे असणारं रिसॉर्ट बुक केलं होतं पण त्यांच्या कन्फर्मेशन मेलमध्ये लिहिलं होतं की १२ वर्षांपर्यंतची मुलं अलाऊड नाहीत- (तिथल्या शांतताप्रेमी गेस्ट्सना डिस्टर्बन्स नको म्हणून). पटलं त्यांचं. नो हार्ड फिलिंग्ज. पण मग परत नव्याने हॉटेल शोधून तिथे हवी तशी रूम मिळवणं ह्यात आमचे अजून तीन तास गेले होते.
मग रूम वर पोचून आराम करून जरा उन्हं उतरली की ओहाय फिरायला बाहेर पडायचं ठरलं. ह्या ट्रिपमध्ये मी माझी छोटी स्केचबुक घेऊन गेले होते. फोटो तर असतातच पण शिवाय प्रवासाच्या रोजच्या दिवसाचे सिग्निफिकन्ट डिटेल्स आणि अजून काही आवडीच्या जागा, घटना डूडल करून डॉक्युमेंट करायच्याअसं मनात होतं. रुममध्ये पोचल्यावर गुंडाबाई एका बेडवर उड्या मारत असताना मी पहिल्या दिवसाच्या प्रवासाचं डूडल केलं ते हे :
वर अनुजा म्हणतेय ते पुस्तकांचं दुकान ओहायमध्येच होतं. त्याबद्दल आणि ओहायबद्दल थोडं उद्या.