ओहाय - ह्या व्हॅली ऑफ मून मध्ये आम्ही पोचलो तेव्हा सूर्य आग पाखडत होता. मला इथली छोटी खेडी फार आवडतात. बहुतांश खेड्यात एक मोठा मेन रस्ता असतो, ज्यावर पोस्ट ऑफिसपासून ते बारपर्यंत सगळी दुकानं असतात. चुकून एखादं चुकार दुकान जे आतल्या गल्ल्यांत लपलेलं असतं. तिथे जाताना आपल्याला लोकल राहणाऱ्यांची छोटी मोठी टुमदार घरं दिसतात. प्रत्येक घराला एक स्वतःच स्वतंत्र व्यक्तित्व असतं. साच्यातून काढलेली सबर्बन घरं बघायची सवय असलेल्यांना (म्हणजे मला) हा चांगलाच रिफ्रेशिंग ब्रेक असतो.
तर ओहाय तसंच होतं/ आहे.
गावाच्या चारही बाजूनी डोंगर. त्यामुळे पुढे-मागे कोणत्याही बाजूला बघितलं की हा टोपाटोपा (डोंगराचं नाव) दिसत होता.
पहिला स्टॉप - बार्ट्स बुक्स नावाचं जुन्या पुस्तकांचं दुकान. हेच ते आतल्या गल्लीत लपलेलं दुकान. हे दुकान म्हणजे पुस्तकप्रेमींसाठी खरं उतरलेलं स्वप्न असावं असं आहे. एक मोठं अंगण, अंगणाच्या दहा बाजूंना - वेगवेगळ्या प्रकारे कपाटं लावून पुस्तकं वर्गीकरणानुसार लावलेली. जागोजागी मांडव घालून, त्यावर वेळ चढवून, कट्टे, टेबल खुर्च्या लावून एखादं पुस्तक घेऊन बसण्याची सोय केलेली. शिवाय दुकानाच्या बाहेरच्या भिंतींत कपाटं करून तिथेसुद्धा पुस्तकं ठेवलेली. दुकान बंद असताना बाहेरचं एखादं पुस्तक विकत घ्यायचं असेल तर पुस्तकाच्या किंमतीएवढी नाणी फटीतून आत टाका असं लिहिलेला बोर्ड होता आणि बहुतांश पुस्तकं जुनी (पण सुस्थितीत) असल्याने नेहमीपेक्षा अर्ध्या किंवा कमीच किमतीला. अजून काय हवं ?
गुंडाबाईला किड्स सेक्शनमधली पुस्तकं बघायला सोडून, ऋला गुंडाबाई ड्युटीवर लावून मी अधाशासारखं दुकान बघून घेतलं, मग फोटो काढले, मग व्हीडिओ काढला. मग परत पुस्तकं बघत बसले. एव्हाना गुंडाबाई आणि ऋ उकाड्याला कंटाळून गाडीत जाऊन बसले होते. त्यांच्या सुदैवानं दुकान ६ ला बंद होत होतं त्यामुळे मला पण १५-२० मिनिटात बाहेर पडावंच लागलं.
मग आम्ही आईस्क्रीम शोधत एका मोठया ग्रोसरी स्टोर मध्ये गेलो. तिथे गुंडाबाईच्या उद्याच्या ब्रेकफास्टसाठी थोडी फळं, दही घेतलं. उन असल्याने एक आईस्क्रिम घेऊन निघालो तर चेकआऊट करताना लोकल बेकरी दिसली. मग एक तळहाताएवढा छोटा चोको लावा केक आणि त्याच आकाराचा एक चीजकेक घेऊन रूमवर गेलो. ह्याच दुकानात चांगली कॉफी मिळत असल्याचं माझ्यातल्या चाणाक्ष चतुरने बघून ठेवलं. मग केक, आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरीज खाऊन परत फिरायला बाहेर पडलो. मेन स्ट्रीटवर.
मुख्य रस्त्यावर एक बाग, एक मजेशीर उंच टॉवर (ज्याच्याखालून आमच्या गुंडाबाईने रॅपुन्झेलला हाका मारल्या), टोप्या, कपडे वगैरे विकणारी दुकानं, एक बंद असलेलं म्युझियम वगैरे पायीच भटकलो.
ह्या रस्त्यावर मुख्यतः टुरिस्ट येत असल्याने रस्ता, दुकानं, भिंती, झालंच तर विजेचे बॉक्स वगैरे सुंदर ठेवले, नटवले होते. जागोजागी फुलंझाडं वगैरे लावली होती. पण सोमवार (आठवडी सुट्टीचा वार) असल्याने बरीचशी दुकानं बंदच होती. अर्थात ते आमच्या पथ्यावरच पडलं.
थोड्या वेळाने गुंडाबाई किरकिर करून रस्त्यातच कडेवर येऊन खांद्यावर डोकं टाकून झोपली.
एव्हाना अंधार पडायला लागल्याने रेस्टारंटस आणि बार जिवंत झाले होते. एक छोटं किंवा मोठं घर, त्याच्या पुढच्या किंवा बाजूच्या अंगणात मांडव, मांडवात फेअरी लाईट्सच्या माळा आणि टेबल खुर्च्या लावून जेवणारं पब्लिक असा एकंदर माहौल होता.
केक हादडल्यामुळे आम्हाला रात्री जेवायला अजिबातच भूक नव्हती. आम्ही जरा गाडीतूनच गाव फिरायचं ठरवलं. आतली घरं सगळी चुपचाप झोपलेली. मग आमच्या आधी बुक केलेल्या त्या रिसॉर्टचा परिसर बघून येऊ म्हणून तिथे निघालो. त्या रिसॉर्टच्या वाटेत इतका किर्रर्र सन्नाटा होता की टरकून अर्ध्या रस्त्यातूनच परत आलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरून चेकआऊट केलं. गुंडाबाईला हॉटेल रूम इतकी आवडली होती की तिला तिथून बाहेर काढण्यासाठी आम्हाला बऱ्याच युक्त्या कराव्या लागल्या.
मग कालच्याच दुकानात मी एक कॉफी स्टॉप घेतला.सकाळची वेळ असल्याने लोकल आज्ज्या दूध, अंडी आणि फुलं वगैरे खरेदी करत होत्या. पण लोकल आज्ज्या ह्या दुकानात कशाला येतील? कदाचित जास्त दिवसांसाठी आलेल्या टुरिस्ट आज्ज्या असतील.
कॉफीनंतर आम्ही एका जवळच्या डोंगरावरून ओहाय व्हॅली बघायला घाट चढलो (गाडीतूनच). वाटेत मला आवडणाऱ्या ओपन जीप गाड्या दिसल्या - मून वॉचिंग टूर वगैरे काहीतरी करून परतणारी मंडळी होती.
व्हॅली बघितली. एक दोन नॉमिनल फोटो काढून निघालो. इथे जवळ मेडिटेशन माउंटन म्हणून जागा आहे, ती बघण्यात ऋला इंटरेस्ट होता पण ती बंद होती म्हणून मग फायनली साडेदहाच्या सुमारास आम्ही ओहायचा निरोप घेतला. आणि शांत निवांत टुमदार घरं, पिक्सी नावाच्या छोट्या संत्र्यांच्या बुटक्या झाडांच्या बागा, फूटभर उंचीची दगडी कुंपणं ह्यांना रस्त्यावरूनच बाय बाय करून सॅन्टा बार्बाराच्या दिशेने निघालो.
एकंदरीत ओहाय आवडलं. एवढं प्रचंड ऊन नसतं तर अजून आवडलं असतं. 'एकदा फॉलमध्ये यायला पाहिजे. तेव्हा आठवडाभर एखादं घर घेऊन लोकल्स सारखं राहायला पाहिजे' वगैरे स्वप्नरंजन मनात करत असताना मला एकदम आठवलं की माझ्या लहानपणी आम्ही कोंकण ते हिमालय कुठेही फिरायला गेलो की बाबा तिथल्या लोकल एखाद्या माणसाला गाठून तिथल्या जागेचे भाव विचारायचे. पुढे-मागे जागा घेऊन छोटंसं टुमदार घर बांधण्यासाठी. नकळत मी बाबांचा वारसा पुढे चालवायला लागले की काय ?
तर हे ओहायचं डूडल:
अर्थातच माझ्या चित्रांतून ह्या जागेला पूर्ण न्याय मिळत नाहीये पण तसा तर तो फोटोतूनही मिळत नाहीच. पण तरीही कोणाला फोटो किंवा बुकशॉपचा व्हिडीओ वगैरे बघायचा असेल तर लिंक शेअर करेन.