सीझर किक ते फॉसबरी फ्लॉपः हाय जंप एक सिंहावलोकन
एवढ्यातच टोक्यो ऑलिंपिकचा थरार आपण अनुभवला. जेव्हा टीव्हीवर एकीकडे मी माझा आवडता स्पेशल इव्हेन्ट "विमेनस हाय जंप" किंवा उंच उडी अगदी डोळ्यात प्राण आणून पहात होते, तेव्हाच ग्राउंडवर दुसर्या बाजूला "जॅव्हलीन थ्रो" किंवा भालाफेकीच्या पुरुषांच्या स्पर्धा चालू होत्या. आणि बघता बघता आपल्या नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकलं. अगदी डोळ्यावर विश्वासच बसेना! अगदी उत्तुंग यश होतं ते! आणि मला अगदी अचानक धनलाभ. अगदी काहीच कल्पना नसताना नीरज चोप्राचा तो सुवर्ण क्षण अनुभवायला मिळाला.
इकडे २.०४ मीटर्स इतकी नेत्रदीपक उंच उडी मारत रशियाच्या M. Lasitskene या तरुणीने सुवर्ण पदक जिंकलं. आणि डोळ्याचं पारणं फिटलं.
बघता बघता मन भूतकाळात भरारी मारू लागलं. "हाय जंप" माझी पॅशन! चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीचं डोळ्यापुढे दिसू लागलं.
आता वयाच्या या टप्प्यावर येऊन पोचल्यावर बर्याच गोष्टींसाठी सिंहावलोकन केलं जातं. किंबहुना ते आपोआपच होत जातं. गत काळाच्या खूप आठवणी कधीही, कश्याही मनात उचंबळून गर्दी करतात.
तसंच काहीसं हे टोक्यो ऑलिंपिक्समधले सुवर्णक्षण अनुभवताना झालं. या निमित्ताने इथे मैत्रिंणींशी माझे विचार शेअर करते.
....................................१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा मी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांसाठी सराव करायला सुरवात केली तेव्हा मी माझ्या जुन्याच साध्याश्या "सीझर किक" या पद्धतीने उंच उडीचा सराव करत असे.
शाळेत असल्यापासून मी सर्व स्पर्धांसाठी याच पद्धतीने उंच उडी मारत असे. शाळेत जमेल तशी प्रॅक्टिस करत गेले, स्पर्धांमधून भाग घेत गेले, यश मिळत गेलं. तोपर्यंत काही स्पेशल ट्रेनिंग असं मिळालं नव्हतं. त्यामुळे या खेळाच्या तांत्रिक बाजू, किंवा यामागचं विज्ञान याचा कधी विचारच केला गेला नव्हता. किंबहुना ते सर्व करायचं ते वयही नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट होण्याआधीचा हा काळ.
त्यामुळे उड्यांचेही प्रकार असतात हेच माहिती नव्हतं . पण नंतर कधी तरी कळलं की मी मारत असलेल्या उडीला “सीझर किक” असं नाव होतं.
सर्वसाधारणपणे मनुष्यप्राणी उडी कशी मारेल, तशीच अगदी साधीशी अशी ही सीझर किक पद्धत होती. ही सीझर किक उडी काहीशी अशी मारली जायची:
उंच उडी साठीच्या आडव्या बारपासून काही अंतरावर अगदी समोर उभे रहा. पळत या. बार जवळ आला की शरीर उचला. बारवरून उडी मारा.
या पद्धतीत तुम्ही बारवर हवेत असता तेव्हा “स्टॅन्डिन्ग पोझिशन”मधे असता. यालाच खेळाच्या शास्त्रीय भाषेत "फ़ीट फ़र्स्ट" पोझिशन म्हणतात.
म्हणजेच या पद्धतीत तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या अगदीच विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करता. तुमच्या हवेत उंच जाण्याच्या क्रियेला गुरुत्वाकर्षण विरोध करते. म्हणजेच जसे तुमचे पाय जमीन सोडतील आणि तुम्ही हवेत उंच जाण्याचा प्रयत्न कराल, लगेच गुरुत्वाकर्षण आपलं काम सुरू करेल. तो विरोध पत्करून किंवा मोडून काढून तुम्हाला उंच जाण्याचा प्रयत्न करायचाय. जे थोडं अवघड आहे.
त्यामुळे या स्टाइलने उडी मारणाऱ्याला काही लिमिटेशन्स रहातात. आणि प्रगती अगदी धीम्या गतीने होते.
तसंही ठराविक उंची गाठल्यावर आपली उडी अगदी अर्ध्या सेंटीमीटरनेही वाढवण्यासाठी खूपच मेहेनत घ्यावी लागते.
तर मी जेव्हा इन्टरकॉलेजिएट्साठी प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा याच सीझर किक स्टाइलने उड्या मारत राहिले. आणि इतरही सर्व प्रकारचे कॉम्प्लिमेन्टरी व्यायाम करत राहिले.
मग सांगलीच्या "विलिन्गडन कॉलेजा"त स्पोर्ट्सचे डायरेक्टर देसाई सरांशी गाठ पडली. यांनी एशियाड स्पर्धांमधे भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आता मला जसं आठवतंय तसं त्यांचा मुख्य इव्हेन्ट थाळीफ़ेक(डिस्कस थ्रो) असावा. पण ओव्हरऑल ते ऑलराउन्डर अॅथलीट होते. आणि खेळांबद्दल प्रचंड पॅशनेट! अगदी हार्ड टास्कमास्टर!
ते मला काही दिवस अॅथलॅटिक्सची प्रॅक्टीस करताना पहात होते. मग उंच उडीसाठी तेच माझे कोच बनले.
त्यांनी माझी उंच उडीची पद्धत पाहिली. आणि उंच उडीविषयीची वर उल्लेखलेली शास्त्रीय माहिती मला समजावून सांगितली. जी तेव्हा माझ्या जरा डोक्यावरूनच गेली. (आर्ट्सची विद्यार्थिनी असल्याने की काय?) आणि याच गुरुत्वाकर्षणाच्या संपूर्णपणे विरुद्ध जाणारी सीझर किक ही पद्धत सोडून देऊन मी "वेस्टर्न रोल किंवा स्ट्रॅडल रोल" ही पद्धत शिकून घ्यावी असं सुचवलं.
मी ही नवी पद्धत अॅडॉप्ट करण्याचा प्रयत्न करू लागले. पण अंगात, पायात, मनात भिनलेली, वर्षानुवर्षे अंगिकारलेली सीझर किक झटकायला/काढून टाकायला फ़ार मेहनत घ्यावी लागली. शाळेत असल्यापासून हीच तर माझी उंच उडीची पद्धत होती! एक वेळ अशी आली की वाटलं सरांना सांगावं, "सर...मला नाही जमणार ही स्ट्रॅडल रोलची नवी पद्धत. जाऊ दे. मी माझ्या जुन्याच सीझर स्टाईलनेच प्रॆक्टिस करीन. जितकी वाढायची असेल तितकी वाढेल माझी उडी.....जाऊ दे!" कारण जुनी स्टाइल सोडायला माझे पाय आणि मन आजिबातच तयार नव्हते. अगदी कंटाळून गेले होते. धीर सुटला होता.
देसाई सरांनी खूप मेहनत घेतली माझी सीझर किक स्टाइल बदलण्यासाठी. मीही अगदी मन लावून प्रयत्न करत होते. हळूहळू या खेळामागचं शास्त्रही समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. पण अॅक्चुअल ग्राउंडवर सगळं तंत्र शास्त्र नियम घोकत प्रत्यक्ष उडी मारताना मात्र "येरे माझ्या मागल्या" असं होऊन पुनश्च हरिओम!! उडी मारून लॅन्ड होतानाच लक्षात आलेलं असायचं की ................नाहीच जमलं आपल्याला! स्वता:चाच खूप राग यायचा! आता लाजही वाटायला लागली होती स्वता:ची. अर्थातच चिकाटीने रोज प्रॅक्टिस करत राहिले.
पण वन फ़ाइन मॉर्निन्ग माझ्या पायांनी आणि मनानेही स्वीकारली एकदाची ही वेस्टर्न/ स्ट्रॅडल रोल स्टाइल. आणि केवळ चमत्कार! माझं मलाच कळलं नाही, की कशी ती पहिली वज्रलेप पद्धत माझ्या मनाने पुसली आणि कशी ती नवी पद्धत माझ्या पायांनी अॅडॉप्ट केली!
मग मात्र डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आणि वाटलं ....खरंच काय जबरदस्त सायन्स आहे या मागचं! कोणतीही गोष्ट अगदी मुळापासून शिकायची तर त्यामागे काही तरी विज्ञान असणारच. हे अगदी पटलं.
मग आधी जे "मिलिमीटर मिलीमीटर लढवू"(इंच इंच लढवू च्या चालीवर!) असं चालू होतं ते "सेन्टीमीटर लढवू" वर आलं आणि then I never looked back!
(स्ट्रॅडल रोल)
आणि कळून चुकला सायन्समधला एक नियम. पृथ्वीवरच्या गुरुत्वाकर्षणाचा. या निमित्ताने एका शास्त्रीय मूलतत्वाचा डोक्यात प्रकाश पडला! कधीपासून शिकत होतेच की हे शाळेत! पण आत्ता हे गुरुत्वाकर्षण प्रकर्षाने जाणवत राहिलं, विशेषतः ग्राउंडवर! माझ्यासारख्या सायन्स गणिताची नावड जोपासणारीला त्या न्यूटनचं झाडावरून पडणारं सफ़रचंद सतत दिसत राहिलं!
थोडक्यात स्ट्रॅडल /वेस्टर्न रोल स्टाइलमधे गुरुत्वाकर्षणाचा फ़ोर्स आपल्या विरुद्ध संपूर्णपणे काम करत नाही, म्हणजेच, या पद्धतीत तो फोर्स आपल्या विरुद्ध बर्याच कमी प्रमाणात काम करतो. या उलट आधीच्या सीझर पद्धतीत हा फोर्स त्याच्या सर्व शक्तीसकट आपल्या विरोधात काम करतो
थोडक्यात.... In this style, you defy the gravitational force!
याचं मला समजलेलं एक मुख्य कारणः “स्ट्रॅडल /वेस्टर्न रोल” या पद्धतीत तुम्ही "हेड फ़र्स्ट" या पोझिशनमधे उडी मारता.
तर आधीच्या सीझर पद्धतीत तुम्ही “फीट फर्स्ट” या पोझिशनमधे उडी मारता.
आता स्टार्ट आणि टेकऑफ मधील फरक पाहू
सीझर पद्धतीत तुम्ही आडव्या बारच्या अगदी समोरूनच पळत येऊन स्टार्ट घेता.
पण या स्ट्रॅडल/वेस्टर्न् रोल पद्धतीत तुम्ही आडव्या बारच्या ३०/४० अंश कोनातून तिरके पळत येऊन स्टार्ट घेता मग टेक ऑफ़्! बहुतेक वेळा हा स्टार्ट तसा अगदी जवळूनच असतो. ज्याला जितक्या स्टेप्स जमतील तितक्या. साधारणपणे या ३ किंवा ५ स्टेप्स असतात. आणि तुम्ही जेव्हा बारवर तुम्ही हवेत असता, तेव्हा बारला पॅरलल आणि बारलाच फेसिंग असता. आलं का लक्षात....कसा गुरुत्वाकर्षणाला आपण कमी विरोध करतो ते!
आपण जेव्हा सीझर पद्धतीत स्ट्रेट हवेत पाय उचलून उडी मारतो तेव्हा आपण थेट गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने जातो आणि या स्ट्रॅडल रोल पद्धतीत आपण हेड फ़र्स्ट पोझिशनमधे हवेत जाऊन तिथेही आडव्या पोझिशनमधे असल्याने इथे आपण गुरुत्वाकर्षणाच्या तितकेसे विरुद्ध जात नाही, किंवा हा ग्रॅव्हिटेशनल फ़ोर्स् आपल्याला तितकासा विरोध करत नाही. आपल्या हेड फर्स्ट पोझिशनमुळे हा गुरुत्वाकर्षणाचा विरोध आपल्याला खूपच कमी विरोध करतो. या सर्व प्रवासात माझ्या कुवतीनुसार जे समजलं ते इथे माझ्या परीने विस्कटून सांगण्याचा हा प्रयत्न.
असो........
"गरज ही शोधाची जननी आहे".! प्रत्येक गोष्टीत कालांतराने काही बदल होऊन काही सोयीस्कर पद्धतींचा शोध लागत असतो. कधी बऱ्याच वेळा ट्रायल, एरर चालते.
तसंच उंच उडीच्या टेक्नीक्समधे काही काही बदल होत गेले. जे मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले
अगदी सुरवातीच्या काळात एक चौकोनी खड्डा मऊ माती, बारीक वाळू यांनी भरलेला असायचा. व खेळाडू उडी मारून आडव्या बारवरून खाली थेट या वाळूत पडायचा.
मीही सुरवातीला अश्याच प्रकारच्या पिटमधे उंच उडी मारत असे. पण स्वता:ला इजा न होऊ देता शरीर व्यवस्थित रोल करून इतक्या उंचीवरून कसं खाली पडायचं याचं एक टेक्निक उंच उडी मारणारा खेळाडू आपोआपच आत्मसात करून घेतो. मीही हे तंत्र आत्मसात केलं होतं. जसं मांजर कितीही उंचीवरून पडलं तरी चारी पायांवरच व्यवस्थितच उभं रहातं तसंच काहीसं.
याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे .... मार्शल आर्ट्स खेळाडू. हे खेळाडू वीट फ़ोडणे किंवा तत्सम क्रीया शरीलाला इजा न होऊ देता, जसे करतात तसंच या उंच उडीचं आहे.
वर उल्लेखल्याप्रमाणे उंच उडीच्या तंत्रातही काही नवीन बदल आले. त्यातला एक बदल "पिट"संबंधात. बारवरून खेळाडू खाली पडताना डायरेक्ट पिटमधे पडायचा, त्याचा विचार करून खेळाडू कमी उंचीवर पडला तर जरा जास्त सोयिस्कर होईल का, या विचाराने पिटमधे पुढील बदल करण्यात आला.
पिटमधे एक उंच असा वाळू मातीचा ढीग बनवण्यात आला. म्हणजे बारवरून उडी मारल्यावर खेळाडू खूप खोलीवर न पडता या वाळूच्या मऊ ढिगाऱ्यावर पडेल आणि शरिराला इजा होण्याचे चान्सेस आणखीनच कमी होतील असा त्यामागचा विचार.
(स्ट्रॅडल रोल स्टाइल. इथे पिटमधला उंचावलेला वाळू मातीचा ढिगारा दिसतोय. ही पद्धत लवकरच बाद झाली)
हा विचार चांगलाच होता. पण नवीन कल्पना जेव्हा वापरात येतात तेव्हा त्यातले फ़ायदे तोटे नीट समजतात.
उंच उडी हा एक असा प्रकार आहे की ज्यात खेळाडूला खूपच कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. एका स्पर्धेत मला स्वता:ला जेव्हा अश्या उंचावलेल्या पिटवर उडी मारण्याची पहिल्यांदाच वेळ आली तेव्हा असं जाणवलं की वरून खाली पडण्याचं अंतर जरी कमी झालेलं असलं तरी सुरवातीला आडव्या बारवर लक्ष केंद्रित करताना खूपच त्रास होतो. आपण बारवर लक्ष केंद्रित करत असतो आणि नजरेत उंचावलेला पिट आडवा येत असतो. खूपच गैरसोयीचं होतं ते. तरीही त्या स्पर्धा झाल्या तश्याच.
नंतर मात्र अगदी लेटेस्ट टेक्निक म्हणजे सॉफ़्टफ़ोम मॅट्रेसेस! लॅन्डिन्ग पिटमधे या मऊमऊ गाद्या आल्या. अर्थातच आमच्या कॉलेजात या अव्हेलेबल नव्हत्यात. डायरक्ट स्पर्धेच्या वेळीच या गाद्यांचं दर्शन झालं. आणि वॉव!
पडण्याची आणि स्वता:ला इजा होण्याची भीती शून्य टक्क्यांवर आली म्हणजेच स्वता:च्या परफॉर्मन्समध्येही नक्कीच सुधारणा!
अश्या मऊ मॅट्रेसेसवर जेव्हा पहिली उडी मारली....अहाहा काय वर्णावं ते सुख! आणि यात सेफ़ लॅन्डिन्गची १००% गॅरन्टी! त्यामुळे खेळाडू बिनधास्तपणे स्वता:ला झोकून देऊ लागला! परफॉर्मन्स स्पीडीली सुधारू लागला. आपण सध्या ज्या मॅट्रेसेस् स्पर्धांमधे बघतो, त्याच या गाद्या! पहा कुठून कुठे आला प्रवास!
आधी वाळू मातीने भरलेला साधा खड्डा, नंतर त्यातच उंचावलेला मातीवाळूचा ढिगारा आणि नंतर मऊमऊ गाद्या!
आता उड्यांच्या स्टाइल्सबद्दल...........
मी वर उल्लेखलेल्या कोणत्याच स्टाइल्स आता उपयोगात नाहीत. यातही इतके बदल होत गेले! सध्या आंतरराष्ट्रीय आणि लोकल लेव्हलवरही हा खेळ खेळणारे बहुसंख्य खेळाडू एका नव्याच टेक्नीकचा वापर करतात. या उडीला म्हणतात,"फॉसबरी फ्लॉप्"
(फॉसबरी फ्लॉप नेटवरून साभार)
मी जेव्हा खेळत होते तेव्हा फॉसबरी फ्लॉप या पद्धतीची उडी मारणारा जिथे असेल तिथे गर्दीच जमायची.
कारण to watch this style, was certainly a treat to eyes! तेव्हा फ़क्त एखादा मुलगाच मारायचा अशी उडी...तेही इन्टरव्हर्सिटी लेव्हलला किंवा नॅशनल्सला! मुली आधी खेळातच कमी असायच्या, त्यात उंच उडीत आणखी कमी. आणि वेस्टर्न रोल या स्टाइलने उडी मारणाऱ्या मुली खूपच कमी. त्यामुळे "फॉसबरी फ्लॉप" ही फ़क्त पुरुषांचीच मक्तेदारी होती तेव्हा.
या प्रकारात खेळाडू ४/५ पावलांचा(स्ट्राइडस) तिरका स्टार्ट घेऊन घता बघता एकदम बारवर उलटा दिसू लागतो. म्हणजे इथेही हेड फ़र्स्ट पोझिशनच. आणि लॅन्ड होताना शरीराची इंग्रजी C ची आकृती झालेली दिसते. आपण पाहिलं की अगदी जुन्या 1)सीझर स्टाइलमधे फीट फर्स्ट पोझिशन, नंतर 2)वेस्टर्न / स्ट्रॅडल रोलमधे बारला पॅरलल आणि बारलाच फेसिंग(पालथं), पण हेड फर्स्ट पोझिशनच, व या अगदी नव्या 3)फॉसबरी फ्लॉपमधे बारकडे पाठ असते. बारवर उताणी पोझिशन म्हणजे स्काय फेसिंग म्हणू शकतो! इतके बदल होत गेले, बदलत्या काळानुसार!
खरंच ही उडी बघताना बघणारा अचंबितच होतो!
१९६८ साली डिक फॉसबरी या अमेरिकन खेळाडूने ही नवी पद्धत पहिल्यांदा ऑलिंपिकमधे अवलंबली. आणि वर उल्लेलेल्या सर्व पद्धतीपेक्षा या पद्धतीत खेळाडूला गुरुत्वाकर्षणाचा कमीत कमी विरोध होतो.
आणि आता सर्वत्र वापरात असलेल्या फ़ोम मॅट्समुळे खेळाडू या फॉसबरी फॉस पद्धतीचा भरपूर फ़ायदा घेत अधिक धाडसीपणाने आणि बिन्धास्तपणे भरपूर उंच उडी मारून सेफ़ लॅन्डिन्ग करू शकतो. आता तर मुली सुद्धा उंच उडीसाठी फॉसबरी फ्लॉप हीच पद्धत वापरतात.
त्यामुळे ही पद्धत जगभर लोकप्रिय झाली.
पण मला मात्र ही पद्धत शिकता आली नाही याची जराशी खंत आहेच मनात.
(हा लेख मायबोलीवरही मी प्रकाशित केला होता. त्यात थोडे बदल केले आहेत.)