नेमेचि येतो............(फोटोसहित) पावसाळ्यातली माझी बाग.

नेमेचि येतो.............(पावसाळ्यातली माझी बाग)
kida in kardal.jpg
dodake.JPG
peru flower.jpg
tailor bird.jpg
pumkin flowwer.jpg
butterfly.jpg
sitout_0.jpg
almanda.jpg

पावसाळ्यात पहिल्या जोरदार पावसानंतर माझ्या बागेचं रुपडंच बदलून जातं. आत्ता तर...भरपूर पावसात सगळी बागच स्वच्छ धुवून निघालेली. नुक्ताच माळी येऊन गेलेला असल्याने अगदी संपूर्णपणे मॅनिक्युअर्ड अशी माझी बाग जावळ काढलेल्या बाळासारखी गोंडस दिसत होती.
घोसाळ्याचा व भोपळ्याचा हे दोन्ही वेल आपल्या कोवळ्या नक्षीदार फ़ुटव्यांच्या पायांनी बागेत सगळीकडे सैरावैरा पळत सुटलेतसं वाटतं. घोसाळ्याचा वेल कंपाउंड वरून आणि भोपळ्याचा जमिनीवरून! घोसाळ्याच्या वेलाने कंपाउंडवरून जाता जाता आपला एक वळणदार नाजुक फ़ुटवा मधेच उंच आणि ताठ उभ्या असलेल्या ख्रिसमस् ट्रीवर जादू टाकावी तसा टाकला आहे. आणि या परदेशी झाडाला आपल्या पिवळ्या फ़ुलांची तात्पुरती लोंबती कर्णभूषणं बहाल केली आहेत.
नारळ आणि ख्रिसमस् ट्री या दोन्ही झाडांच्या आधाराने, मधेच एका राक्षसी आकाराच्या कोळ्याने एक प्रचंड मोठं जाळं केलेलं असतं. सकाळी बागेच्या अगदी टोकाला असलेली जास्वंदीची फ़ुलं काढायला जावं, आणि जर लक्ष नसेल तर हे जाळं अंगाला चिकटायचं आणि तो कोळीही अंगावर आला तर मग संपलंच! हा कोळी इतका मोठा आहे की त्याला चक्क चेहेरा आणि एक प्रकारचं व्यक्तिमत्व आहे! हा कुशल विणकर रातोरात आपलं सुंदर षटकोनी जाळं विणतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात नारळ आणि ख्रिसमस ट्री यांच्या मधला प्रचंड मोठा तरीही नाजुक असा चमचमणारा तो षटकोन बागेच्या सौंदर्यात भरच टाकतो.
बागेच्या दुसर्या टोकाला जास्वंदी आहे. जास्वंदीची फ़ुलं काढायला लिंबाच्या काटेरी फ़ांद्यांखालून वाकत वाकत काळजीपूर्वक जायला लागतं. कारण लिंबाच्या काट्याचा ओरखडा चांगलाच झोंबतो आणि दोन तीन दिवस चांगला लाल होतो. पण एकदा जास्वंदीखाली गेलं की कधी कधी खूप मजा येते. फ़ुलातला मध पिणारी चांगली दोन तीन तरी फ़ुलपाखरं अगदी आपल्याला स्पर्श करून उडून जातात. जास्वंदी, लिंबू असलेला हा बागेचा कोपरा तसा एरवी एकाकीच असतो. त्यामुळे मध पिण्यात दंग असलेल्या फ़ुलपाखरांना अगदी जवळ जाईपर्यंत आपला पत्ता लागत नाही. आणि आपल्यालाही ती जेव्हा आपल्या अंगावरून उडत जातात तेव्हाच कळतं. खरं म्हणजे थोडं दचकायलाच होतं!
घोसाळ्याच्या वेलावरची कोवळी सडपातळ घोसाळी तेवढ्याच नाजुक सडपातळ फ़ांदीवरून अगदी सरळ जमिनीच्या दिशेने काटकोनात लटकलेली पहायला मजा येते.
आपणहूनच धराशायी झालेल्या भोपळ्याच्या वेलाची पिवळीजर्द फ़ुलं सकाळी संपूर्णपणे अगदी फ़ताडी आणि टरारून फ़ुललेली असतात. फ़ताडी असली तरी देखणीच दिसतात तीही!
पानंही हिरवी गार आणि पाची बोटं पसरून उघडलेल्या हाताच्या पंजाप्रमाणे ! याच्या हिरव्या वेष्टनातल्या, अधोमुखी कळ्याही तितक्याच नाजुकसाजुक आणि उमलायला उत्सुक! काही छोट्या, कमी उंचीच्या कळ्या मात्र नुक्तंच उभं रहायला शिकलेल्या बालकाच्या तोर्यात दिमाखाने ताठ उभ्या असतात, काही वेळा रांगेत, एकापुढे एक. अगदी लोभसपणे!
बागेत अश्या वातावरणात कीटकांचीही एक जीवसृष्टी सुखेनैव नांदत असते!
बर्याच वेळा एक अगदी हिरवा गार आणि गोलाकार किडा पानांवर बसलेला दिसतो. तो उडल्यावर दोन गोष्टींचा मला साक्षात्कार झाला होता. एक म्हणजे हा मस्तपैकी उडू शकतो. कारण तो पानांवर निवांतपणे बसलेला असताना त्याच्या गोलमटोल गोलाकारात त्याच्या पंखांची जाणीवच होत नाही. दुसरं म्हणजे त्याच्या पंखांवर सप्तरंगी चमक आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात तो एखादा पाचूच पंख लावून उडतोयसं वाटतं!
खताच्या प्लॅस्टिकच्या क्रेटमधून टोमॅटोची रोपं आली आहेत. या क्रेटच्या जाळीतून ती मुसंडी मारून बाहेर आली आहेत. काही अगदी छोटे टोमॅटो आले आहेत. संपूर्ण झाडावर नाजुकशी पिवळ्या टोकदार पाकळ्यांची बरीच फ़ुलं दिसताहेत. म्हणजे आता बरेच टोमॅटो लागणार तर!
नक्षीदार वेलबुटीच्या पारदर्शक तलम पंखांचे चतुरही बर्याच संख्येने बागेत उडत असतात. बागेवर जणू छोटी मिनिएचर आणि शोभिवंत हेलिकॉप्टरच घिरट्या घालतात! या बागेत किती रमावं तेवढं थोडंच!
मधेच कधी तरी हळद्याची शीळ ऐकू येते. लगबगीने गच्चीत जाऊन हळूच लक्ष ठेवलं, तर अचानक कडुलिंबाच्या हिरव्या गार पसार्यात हळदीच्या पिवळ्या जर्द रंगाचा हळद्या दर्शन देतो. पण खूप पेशन्स हवा बरं त्यासाठी, सब्रका फ़ल पीला...........................मीठा होता है!
एकदा तर एक गंमतच झाली.....
चिवड्यात घालण्यासाठी कढिलिंब हवा होता म्हणून बागेतला कढिलिंब आणला. आता धुवावा म्हणून पानं काढण्यासाठी हातात घेतला. दचकलेच. अगदी ओळखू येणार नाही, असा एक प्रेइंग मॅन्टिस या पानात लपला होता.
खरं म्हणजे आधी आळशी मनाला वाटलंच होतं.. की, आता धुवायची गरज आहे का खरंच हा परसातला कढिलिंब? भरपूर पावसात सगळी बागच स्वच्छ धुवून निघालेली. बाजारचा असता हा कढिलिंब तर नक्कीच धुवायला पाहिजे, पण हा तर घरचा कढिलिंब! तरीही आफ्टरथॉटमुळे घेतला धुवायला.
मग या "खंडोबाच्या घोड्या"ला.....हे मॅन्टिसचं मराठी नाव.... घेतला रिंगणात! बाप रे काय काय करून दाखवलं त्यानं! एक तर तो बर्याच वेळेला नमस्काराच्या पोझमधे असतो म्हणूनच त्याला "खंडोबाचा घोडा" हे नाव पडलं आहे. तेच कारण इंग्रजी नावाचंही.....praying mantice म्हणजे प्रार्थना कीटक!
त्याला फार त्रास दिला तर तो चांगलाच अॅग्रेसिव्ह बनतो. चांगला हात उगारून मारण्याचीही अॅक्शन करतो तो. म्हटलं ना एवढेसे कीटक पण कधी कधी घाबरवतात!
तर नेहेमीप्रमाणेच काही फोटो काही व्हिडिओ, सगळं झाल्यावर त्याला अलगद सोडूनही दिलं परत बागेत. गेला बिचारा सुखरूप सदेह परत त्याच्या जागी.
पण नंतर मनात आल्याशिवाय राहिलं नाही..जर कढीलिंबाची पानं न धुता चिवडा केला असता तर "पातळ पोह्यांचा चिवडा विथ् फ़्राइड प्रेइंग मॅन्टिस" अश्या नावाचा इंडो चायनीज् असा एक नाविन्यपूर्ण असा पदार्थ तयार झाला असता!
हे झालं अंगणातल्या बागेबद्दल. माझ्या स्वयंपाकघराला लागूनच एक ओपन टु स्काय असं सिट आउट आहे. त्याच्या कठडयावर काही आणि खिडकीच्या कॅनॉपीवर टांगलेल्या काही, अश्या बर्याच कुंड्या तिथेही आहेत. तिथेही पक्षी, कीटक, मधमाश्या येऊन जाऊन असतात.
एका कुंडीत सहज गंमत म्हणून मोसंबीच्या बीया टाकल्या होत्या. आली लगेच छोटी छोटी रोपं. सहज लक्ष गेलं तर एक पान वेगळं वाटलं. जरा जवळून पाहिलं तर अगदी पानाच्या रंगाचे हे महाराज ! आपल्या सर्व असंख्य अगणित पायांनी संपूर्ण देठाला खालपासून वरपर्यंत गच्च मिठी मारून! रोपाच्या अगदी शेवटच्या वरच्या पानाजवळ.
काय हे कॅमॉफ्लॉजिंग! लांबून शंकासुद्धा आली नसती ....कुणीतरी आहे तिथं!
आपल्या तर्जनीच्या आकाराची ही हिरवी गार अळी. या अळीच्या डोक्यावर सुंदर डिझाइनचा, काळ्या बारीक बारीक ठिपक्यांचा हेअर बॅन्डच जणु! अळीच्या मंदगती हालचाली चालू होत्या.
पोटाखालच्या असंख्य अणकुचीदार छोट्या पायांनी सूक्ष्म मंद गतीने पुढे सरकण्याची संथ क्रीयाही चालू होती. पण ती नजरेत भरेलशी नव्हती. मी काही फोटो काढले. म्हटलं, बघू काही वेगळी पोझ मिळतेय का, कारण एकाच अँगलने सगळे फोटो मिळत होते.
कुंडीतलीच एक काडी उचलली, अगदी बारीक. हो........मला काही टोचून त्रास नव्हता द्यायचा त्या एवढ्याश्या जिवाला! त्याच्या तोंडाच्या बाजूने त्याला अगदी फक्त स्पर्श केला आणि चक्क दचकले. त्याने माझ्यावर अस्त्र उगारलं. बाप रे...एवढासा बोटभर प्राणी! हे लोक असली अस्त्रं बाळगून असतात याची तसूभरही कल्पना नव्हती.
त्याने काडीच्या स्पर्शाबरोबर आपल्या तोंडाच्या दोन्ही कोपर्यातून चक्क फटाकदिशी दोन लाल लाल चुटुक अँटिना बाहेर काढले. प्रत्येकी एक सें.मी. लांबीचे तरी असावेत! खरंच घाबरायला झालं क्षणभर! कारण माहितीच नव्हतं यांना अँटिना असतात आणि आणिबाणीच्या वेळी ते दुष्मनवर रोखतात! म्हटलं आता एक व्हिडिओ घ्यावाच. पण काडी मी टोचणार आणि फोटो, व्हिडिओ मीच घेणार, नाहीच जमलं ते. त्यातल्या त्यात एक दुर्घटना घडली. त्याने अचानक खाली उडी मारली खालच्या कॅनॉपीवर दिसेनासाच झाला अचानक. वाईटच वाटलं जरा. एक तर माझ्यामुळे तो खाली पडला आणि दुसरं म्हणजे त्याच्या डिफ़ेन्स मेकॅनिझमचा व्हिडीओ नाही घेता आला.
सिट आऊटच्या कठड्यावर एका कुंडीत लिंबाचं रोप आहे. या रोपाची पानं कातरायला काही माश्या येतात. अगदी कर्रकटकने मापून कापली असावीत इतकं सुंदर गोलाकार कातरकाम या माश्या करतात. ही पानं त्या व्यवस्थित तोंडात धरून घेऊन जातात, त्यांच्या घरट्यात बिछाना बनवण्यासाठी!
पुढच्या अंगणात नारळीच्या झाडावर बहुतेक कावळाचं घरटं आहे, आणि त्यात अंडी किंवा पिल्लं असावीत कारण अंगणात गेल्यावर कावळा आधी कर्कश्य आवाजात घिरटया घालतो आपल्या डोक्यावर आणि आपण जर त्याच्याकडे दुर्लक्क्ष केलं तर तो आपला डोक्याच्या दिशेने खाली सूर मारतो आणि आपण दचकतोच, कारण त्याला चक्क चोच मारायची असते! आपण पळ काढतो. अरे बाबा तूच आमच्या बागेत घरटं केलयंस, आणि आमच्यावरच हल्ला?
असो..
याच कालावधीत बागेत गोगलगाईंचाही सुळसुळाट असायचा. पाठीवर सुंदर श्ंख घेऊन आपल्यामागे चमकदार चिकट चंदेरी स्रावाची रेघ सोडत मंद गतीने वाटचाल करणार्या गोगलगायी बागेची नासाडी करतात म्हणून त्यांचा नायनाट करणं अगदी जिवावर येतं. डोक्यावर दोन पिटुकले अ‍ॅन्टेना वागवत मंद गतीने संथ सावकाश मार्गक्रमणा करणारा हा इवलासा सुंदर जीव आणि तितकाच सुंदर त्याच्या पाठीवरचा वळणदार नाजुकसा शंख!!
असंच एकदा, बराच पाऊस होऊनही कंपाउंडकडेच्या आपोआप आलेल्या कढिलंबावरची कीड गेली नाही म्हणून म्हटलं, थोडी छाटणी करावी. एक दोन मोठया फ़ांद्या छाटल्यावर, कंपाउंडची भिंत थोडी उघडी पडली आणि भुर्रर्रदिशी एक चिमुकला पक्षी उडून गेला आणि अंगणातल्याच पलिकडच्या कडुलिंबाच्या हिरव्या घुमटात अदृश्य झाला. नीट पाहिलं तर कढिलंबाच्या पसाऱ्यामागे, (जो आताच मी छाटला होता), एका कर्दळीच्या पानात घरटं दिसलं. पान खालच्या दिशेने वळलेलं, लोंबतं. खालच्या टोकापासून पानाच्या दोन्ही बाजू सुबक शिवण घालत घालत एकमेकाला जोडल्या होत्या. ही शिवण वरपर्यंत नेली होती. वरच्या बाजूल छान पोकळी तयार झालेली. आत डोकावले तर डनलॊपला लाजवेल अशी सुंदर पिसांचीच मऊ गादी आणि त्यावर चार् अंडी. अगदी अप्रतीम शिवणकाम केलेलं.
बागेत फ़िरताना या कर्दळीच्या रानात थोड्या थोड्या अंतरावर फ़ांद्यात बेमालूमपणे लपलेली तीन घरटी पाहून उगीचच
हॉस्पिटलातल्या बाळंतपणाच्या वॉर्डातून फ़िरल्याचं फ़ीलिंग आलं. ती लोंबत्या पानांमधे बेमालूमपणे लपलेली घरटी अगदी पाळण्यांसारखी वाटली क्षणभर, आणि अगदी आत लपलेली तीन तीन चार चार पिटुकली अंडी! नंतर त्या बाजूला सनबर्डस् ची लगबग जाणवली म्हणून असं वाटतंय की अंडी सनबर्ड्स् ची असावीत.
पावसाळा संपत आला की वेडे राघू यायला लागतात. अंगणातला कडूलिंब आपल्या काही फ़ांद्यांनी गच्चीत ओणावला आहे. हे राघू कडूलिंबाच्या फ़ांद्यांवर चार पाचाच्या संख्येने एकमेकांना लगटून बसलेले असतात. फ़ार गोजिरवाणे दिसतात ते तेव्हा! कधी कधी गच्चीत यांच्या करामती बघायला मजा येते.
या राघूंच्या हालचाली फ़ार वेगात होतात. साधे कधी ते उडतच नाहीत. एखादा पट्टीचा पोहोणारा जसा पाण्यात सूर मारताना जश्या नेत्रदीपक हालचाली करतो आणि बघणारे विस्मय चकित होतात, अगदी तस्संच या राघूंच्या हालचाली बघताना वाटतं.
कधी कधी आपण गच्चीत चकरा मारत असतो आणि अचानकच डावीकडून चमकदार पारदर्शक पंखांचा चतुर विजेच्या वेगाने आलेला दिसतो म्हणेपर्यंत उजवीकडून तेवढ्याच वेगाने आलेल्या राघूने त्याची हवेतच शिकार केलेली असते. सगळा निमिषार्धातला खेळ! शिकार चोचीत धरून राघू कडुलिंबावर बसलेला दिसतो. आता तरी हा वेडा राघू शांत बसेल? नाही...धोबी जसा वाकवाकून हातातलं धुणं धोपटत असतो, तस्संच अगदी पद्धतशीरपणे वाकवाकून चोचीतली शिकार कडुलिंबाच्या फ़ांदीवर आपटत असतो. ………सामिष भोजनाची तयारी!
सगळ्यात एक खूप छान बदल जाणवतोय, संपूर्ण परिसरात आणि बागेतही खूप चिमण्या चिवचिवतायत. मध्यंतरी परिसरातला चिमण्यांचा वावर..... अगदी नव्हताच म्हटलं तरी चालेल. मला वाटतं एकूणातच कोरोनामुळे वाहनांची वर्दळ कमी झालीये, आणि प्रदूषणही. म्हणूनच बहुतेक परिसरातल्या चिमण्यांचं अस्तित्व परत एकदा अगदी प्रकर्षाने जाणवायला लागलं आहे. यालाच आपण "blessing in disguise" म्हणू शकतो!

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle