आठवणींचा ठेवा ... आरामखुर्ची

मध्यन्तरी सपा च्या आरामखुर्ची च्या फोटोने मला माझ्या लहानपणात पोचवले. समरण रंजनात वेळ खूप छान गेला. म्हणून हे सपा ला डेडिकेट करतेय. थॅंक्यु सपा

आठवणींचा ठेवा ...आराम खुर्ची

मागच्या आठवड्यात सोशल मीडियावर मैत्रिणीच्या पिकनिकचे फोटो बघत होते. लोकेशन सुंदर होतं. खोलीची छानशी गॅलरी आणि गॅलरीतून समोर दिसणारी हिरवीगार टेकडी, त्यावरून वहाणारे छोटे छोटे झरे, ढगांमधून सूर्य हळूच डोकावत असल्याने हिरवळीवर पडलेलं कोवळं सोनेरी ऊन ... फ्रेम अप्रतिम होती होती. पण माझं लक्ष वेधून घेतलं ते गॅलरीतल्या आराम खुर्चीने, जिने मला कमीत कमी पन्नास वर्षे तरी मागे नेलं.

आमच्या लहानपणी घरात सोफे वैगेरे नसतंच. मोठया हाताच्या लाकडी खुर्च्या, घडवंच्या, लाकडी बाकं किंवा मग सरळ जमिनीवर सतरंजी घातलेली असे. जरा सधन घरात गादी लोड तक्क्यांची बैठक असे. आमच्या घरात मात्र वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे सहज हलवता येणाऱ्या, वजनाला हलक्या, आणि वेळ आली तर घडी करून ठेवता येणाऱ्या आणि तरी ही नाव सार्थ करून भरपूर आराम देणाऱ्या अश्या आराम खुर्च्याच होत्या बैठकीच्या खोलीत.

ह्या आराम खुर्च्या हल्ली फार पहायला मिळत नाहीत म्हणून सांगते. ह्यात लाकडाच्या अंदाजे दोन इंच रुंदीच्या दोन चौकटी एका स्क्रुने थोड्याश्या सैल अश्या फिक्स केलेल्या असतात ज्यामुळे त्या खुर्च्या फोल्ड होऊ शकतात. खुर्ची उघडली की खालची चौकट जमिनीवर राहते आणि वरच्या चौकटीत वर खाली लाकडी दांड्या च्या आधारे बसवलेल्या जाड कापडाच्या झोळी सारख्या आकारत आपल्याला मस्त बसता येतं. त्यांची कापडं अगदी टिपिकलच असत. किरमिजी,हिरवा रंग आणि त्यावर पांढरे पट्टे हेच असायचं डिझाईन.

कापडाच्या लांबीवर खुर्चीचा झोल अवलंबून असतो. लांबी कमी केली की खुर्चीत ताठ बसता येत जे मोठ्या माणसाना जास्त करून आवडतं. त्यामुळे आमच्याकडे तश्या ताठ बसता येईल अश्या खुर्च्याच जास्त होत्या. खूप झोळ असणारी खुर्ची एखाद दुसरीच असे त्यामुळे त्यात कोण बसणार ह्या वरून आम्हा भांवडात भांडणं ही होत असत.

दिवाळी, गणपती, किंवा कोणी पाव्हणे येणार असतील तर ती कापडं धुतली जात . त्या दिवशी आम्हाला खूपच संभाळून वागावं लागे कारण खुर्चीच्या दांड्या आईला सहज मिळतील अश्या असत. ☺️ दुपारी टाइमपास म्हणून खुर्चीची दांडी हळूच कोणाला ही न समजेल अशी काढून ठेवणे आणि कोणी पोरगं बसायला गेलं की कसं आपटलं म्हणून टर उडवणे वैगेरे प्रकार ही आम्ही करत असू. अर्थात मुला ऐवजी कोणी मोठं बसलं तर मात्र आमची धडगत नसे. त्या लाकडी दांडीचा प्रसाद चुकवणं जवळ जवळ अशक्यच होत असे. आणि वरती " काय ही अघोरी चेष्टा , जरा नीट वागा " असं काहीतरी आईच बौद्धिक ही ऐकावं लागे ते निराळच.

माझ्या लहानपणीच्या अनेक रम्य आठवणी ह्या आराम खुर्चीशी निगडित आहेत. गोष्टींची पुस्तकं वाचणे, अभ्यास करणे, दुपारी रेडिओवर खुर्चीत झुलत झुलत गाणी ऐकणे, दाणे, चिवडा असा खाऊ खाणे , पावसाळ्यात गॅलरीतल्या खुर्चीत बसून आकाशातले ढग बघणे, पावसाच्या पाण्याचे तुषार अंगावर घेत , तल्लीन होऊन पाऊस, पागोळ्या बघणे अश्या अनेक गोष्टींसाठी आराम खुर्चीच लागत असे मला. आमच्या गॅलरीत एक खूप मोठा मोगऱ्याचा वेल होता. उन्हाळ्यातल्या संध्याकाळी खुर्चीत बसून संधीप्रकाशात फुलणाऱ्या कळ्यांकडे एक टक पहात बसणे आणि कळी उमलली की तो सुवास मनात साठवून घेणे ह्या आठवणीने तर आज ही मला उत्साहित वाटत.

काळ पुढे सरकत होता. उच्च शिक्षणासाठी आणि पुढे नोकरीच्या निमित्ताने आम्ही शहरात आलो. तिथे जागा मर्यादित म्हणून आराम खुर्च्या ठेवणं अडचणीचं आणि आउट डेटेड वाटू लागलं. आमच्या ही नकळत फोल्डींग च्या लोखंडी खुर्च्या, दिवाण, सोफे ह्यांनी दिवाणखान्यात कधी एन्ट्री घेतली आणि आमच्या आवडत्या आरामखुर्च्या अंग मोडून कधी माळ्यावर जाऊन बसल्या ते आम्हाला ही कळलं नाही.

कोकणात ही आमच्याकडे खळ्यात मांडव पडला की आजच्या प्लॅस्टिकच्या जमान्यात ही एका रांगेत अश्याच साताठ आरामखुर्च्याच ठेवलेल्या असतात बसण्यासाठी. मात्र त्या हाफ आराम खुर्च्या म्हणतात तश्या आहेत आणि त्यांना टेकण्यासाठी हात आहेत. गंमत म्हणजे कोणती खुर्ची कोणाची हे ही साधारण ठरलेलं असत. मला एकदम टोकाची , कमळाजवळची जागा आवडते. खुर्चीत बसलं की मंद वास येत राहतो कमळाचा.

आमची मनी ही कधीतरी अंगाचं मुटकुळं करून खुर्चीत देते ताणून मस्तपैकी. ती खुर्चीत झोपली की मोतीचं डोकं फिरत तीच का खुर्चीत झोपलीय म्हणून. बसल्या जागी गुरकावत रहातो तिच्यावर. अर्थात तिच्यावर ढिम्म परिणाम होत नाही. ती मस्त झोप काढते खुर्चीत. असो. मी जेव्हा लग्न होऊन पहिल्यांदा कोकणात गेले तेव्हा खळ्यातील आरामखुर्च्या बघून ज्या घरात आपल्या माहेर सारख्या आरामखुर्च्या आहेत त्या घरात आपलं नक्की जमेल ह्या विचाराने एकदम आश्वस्त वाटलं होतं मला.

आरामखुर्चीत बसून पुन्हा ते सुख अनुभवण्याच्या विचाराचं सध्या मनावर भलतंच गारुड आहे. त्यामुळे ती आरामखुर्ची आता लवकरच माळ्यावरून खाली येईल, तिची साफसफाई होऊन तिला नवीन कापड ही घातलं जाईल. आमच्या गॅलरीत ती विराजमान होईल. तिच्यात बसून कॉफी पिताना , बाहेरची झाडं पानं बघताना मी पुन्हा एकदा लहान होईन. तेव्हा दिसायचं तसं जग पुन्हा मला सुंदर दिसायला लागेल. जगण्याची नवी उमेद मिळेल...

हेमा वेलणकर

( फोटो नेटवरून साभार )

product-jpeg-500x500-1.jpg

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle