तर सोलापुरात आणि फक्त सोलापुरातच, पाव चटणी नावाचा एक चाट प्रकार मिळतो. आणि तीच चटणी वापरून चटणीपुरी आणि कचोरी पण मिळते. लहानपणीच्या असंख्य आठवणी आहेत या दोन्हींबरोबर! असला अफलातून प्रकार आहे नं हा, आणि सोलापूर बाहेर कुठेच दिसला नैय्ये (मला तरी)! शाळेत असताना, भैय्याची गाडी, अपने एरिया मे लय वर्ल्ड फेमस होती. बहुतेक त्यानेच सुरु केली असवी ही. मग पार्क कट्ट्यावर च्या गाड्यांवर, सातरस्त्याच्या बाबुराव भेळ कडे आणि इतर अनेक ठिकाणी मिळू लागली.
कसली भारी चटणी असते, आणि नक्की काय काय घालत असावेत ते जाम कळायचं नाही. पण गेल्या भारत वारीत लहान बहिणीच्या साबांकडून रेसिपी मिळाली!
इकडे आल्यावर कारळं नव्हते माझाकडे मग ते मागं पडलं. काल इं ग्रो मध्ये कारळाची चटणी दिसली केप्र ची. मग परत सगळ्या आठवणी जाग्या झाल्या! युट्युब वर रेसिप्या बघाव्या म्हटलं. तर पहिलीच रेसिपी मेहुल ची!! वॉव क्या बात, क्या बात, झालं. आणि रेसिपी सोडून मेहुल ला थोडं स्टॉक पण करून झालं.
मेहुल म्हणजे आम्च्या समोरच्या बिल्डींग मध्ये रहायचा..माझ्या आत्तेभावाचा मित्र होता, पण आमची काही ओळख नव्हती. नंतर तो हिप हिप हुर्रे ह्या झी टी वी च्या सिरीयल मध्ये होता. तेव्हा फार भारी वाटायंच की आपल्या आवडत्या सिरीयल मध्ये सोलापूरचा कोणीतरी आहे म्हणून! मग अमिताभ शाहरुख च्या मोहोब्बतें मध्ये पण आला. नंतर बर्याच जाहिराती आणि टी वी सिरिअल्स मध्ये होता वाटतं. पण मी इकडे आल्यावर काही फॉलो करत नव्हते.
आणि अचानक त्याची रेसिपी पाहून मज्जा आली! त्याचा मुलगाही आता जाहिरातीत असतो. कसला गोडू आहे!
तर असो, असं नमनाला घडीभर तेल झाल्यानंतर रेसिपीकडे वळते.
बहिणीच्या साबांनी सांगितलेल्या रेसिपीत पंढरपुरी डाळ्याच पीठ करून वापरले आहे पण मेहुलने बेसन घेतलेलं मग मी दोन्ही अर्ध अर्ध घेतलं.
तर सगळी गोम चटणीतच आहे!
चटणी:
२ चमचे सुकं खोबरं (खीस), २ चमचे तीळ, २ चमचे कारळे (niger seeds) भाजून पूड करायची. माझाकडे कारळे नव्हते, मग मी टी केप्र ची चटणी घेतली आणि नंतर बाकी काही मसाले घातले नाहीत.
एका कढईत फोडणी साठी घेतो तेव्हडं तेल घ्यायचं. तेल गरम झालं की त्यात खोबरं + तीळ + कारळाची चटणी पूड टाकायची आणि चांगलं परतायचं. मग दोन चमचे बेसन + डाळ्याचं पीठ घालून परतायचं. मग गरम पाणी घालून चक्क पातळ पिठल्यासारखं शिजवायचं. त्यात चिंच, गूळ, आलं लसूण मिरची चं वाटण आणि मीठ घालून चव एड्जस्ट करायची. झाली चटणी! (अजून सोप्प करायचं असेल तर भेळेची चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी घालायची)
चटणी ची कंसिस्टंसी आमटी सारखी हवी.
असेम्बली:
पाव चटणी साठी एक ब्रेड किंवा चटणी पुरी साठी पाणीपुरीच्या पुर्याना भोकं पाडून प्लेट मध्ये घ्यायचा.
त्यावर चुरमुरे नुसते, किंवा चुरमुर्याचा चिवडा पसरायचा. वरची चटणी सढळ हाताने घालायची. मग, कांदा टोमॅटो कोथिम्बीर आणि असल्यास कांद्याची पात बारीक चिरून घालायची. वरून घरगुती शेव ( झीरो नंबर ची नाही शक्यतो)
झालं!
(माझ्याकडे पातच काय, कोथिंबीर पण नव्हती त्यामुळे फोटोत नैय्ये) आजच्या पावसाळी वातावरणात थेट सोलापुरात पोचले मनाने!
हिंदी / मराठी
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle
इंग्लीशUse Ctrl+Space to toggle