हृता
आज मला तोच दिवस आठवतोयं ज्यादिवशी तुला , तुझी आई व मी पहिल्यांदा 'देवी अहिल्याबाई होळकर' अनाथाश्रमात पहायला आलो होतो. तीन साडे तीन वर्षांची असशील, भेदरलेल्या डोळ्यांनी इकडेतिकडे बघत लाईनमधे एका ताईचा हात धरून टुकूटुकू बघत होतीस. तुझ्या आईला एक मिनिटही लागला नाही ओळखायला. तिने सरळ मिठीच मारली तुला. तुला बघताक्षणी तुझ्या प्रतिक्षेत काढलेली प्रदीर्घ वर्षे कुठे गळून पडली काय माहिती , काही आठवेनासं झालं. आईने व मी मिळून केलेले सगळे पेपरवर्क देऊन उरलेल्या औपचारिकता पूर्ण केल्या. आता दोन आठवडे ट्रान्झिशन मधे तुला घेऊन सगळे शहर फिरत तुझे तीन वर्षातले सगळे कौतुक करत फिरत होतो. नाही म्हणायला धाकधूकही होतच होती, तुला फक्त गुजराती यायचं तेही भीत भीत काहीसं अस्पष्ट बोलायचीस. छोटा शब्दकोश ताबडतोब घेऊन टाकला. पण तिथल्या संचालिका मालतीताईंच्या मते दत्तक मुलांपेक्षा आईवडील जास्त घाबरतात. त्यांच्यामते सगळ्यात अशक्त आणि किरकिरे मूल तू होतीस. आता तू थोडीच विश्वास ठेवणारेस, फार फोटोही नाहीत दाखवायला. तिथे तुला सगळे मिनी म्हणायचे , आईला ते नावच वाटले नाही म्हणून तिने 'हृता' निवडले, निवडले काय तिच्यामते तू 'हृता'च होतीच. ईश्वराने दिलेली भेट जी फक्त आमचीच होणार होती. मलाही हे नाव फार आवडले, तू त्याहीपेक्षा जास्त आवडलीस. बोलक्या डोळ्यांनी मला डोळ्यांची भाषा शिकवायला लागलीस. काही आवडलं की डोळे मोठे करायचीस, नाही आवडलं की संशयी नजरेने डोळ्यांच्या कडा दुमडून घ्यायचीस. शेवटी सगळे सोपस्कार पार पाडून , तुला आमचीच करून आपण न्यु यॉर्कला येणाऱ्या विमानात बसलो. थकव्यामुळे तू झोपूनच होतीस आम्ही मात्र नवमातापिता असल्याने आळीपाळीने जणू पहाराच देत होतो.
तू इथे आलीस , तुझ्या घरी... तो दिवस होता बावीस सप्टेंबर, शिशिर ऋतूचा पहिला दिवस. ते पहिले दोन तीन महिने तू अजिबात हट्ट करायची नाहीस, तुला आणलेल्या खेळण्यांशी खेळत काही तरी गुणगुणत असायचीस. मला वाटलं आपली लेक अगदी गुणाची आहे , पण कसंच काय !! जेव्हा आम्ही तुझे हक्काचे आईबाबा आहोत हे तुला लक्षात आलं, तू बालहट्ट सुरू केलेस. खरं सांगु ! जीव भांड्यात पडला , तोपर्यंत काही तरी चुकतयं वाटायचे. हळूहळू तुला थोडं मराठी थोडं, इंग्रजी आलं आणि आपला तिघांचा कौटुंबिक संवाद सुरू झाला. दुसऱ्या मुलांना बघून तू पहिल्यांदा मला" Dad, let's go swing" म्हणालीस, तेव्हा मी आईला अभिमानाने सांगायला गेलो तर ती चिडवत म्हणाली, "मला 'मॉम कँडी दे' ऐकून पंधरा दिवस झालेत, तू हरलास." तुझी आई पण तुझीच आई आहे, हृते !! तुझं हे मतवादी आणि हटवादी असणं व स्वतःला पटल्याशिवाय एखादी गोष्ट न करनं हे गुण अगदी तंतोतंत तिच्यातून आले आहेत.
शाळेत जाऊन नवीन मित्रमैत्रिणी गोळा करायचा केवढा तो छंद तुझा, पुन्हा जिच्याशी जास्त मेतकूट तिच्या छंदांचा छंद. कधी सोंगट्या गोळा केल्या कधी तू आणि आईने रंगीत दगडं गोळा केले, कधी बाटल्यांची झाकणं गोळा केली , अजूनही असेल एखादे सोफ्याच्या वळकटीत. तू रूळलीस आणि आम्हालाही रूळवलंस !! एकदा तर लांब केसांच्या राजकन्येवरचा सिनेमा बघून केस वाढवायचे ठरवले , रोज चिंचेच्या बोटकांएवढ्या वेण्या घालून शाळेत जायचीस, सकाळी बस पकडायची घाई , माझा टर्न असला की मी घातलेल्या वेण्या तुला पटायच्या नाहीत परत आल्यावर दोन गोट्यांएवढे बुचडे दिसायचे. एकदा तू आणि मी एका दुकानात हिंडत असताना एका लांबकेसांच्या मुलीला बघून मी तिच्या आईलाही बोलून आलो,तिने सुचवलेले तेल शाम्पू काही बाही घेऊन आलो तर दोनच दिवसात आईच्या मागे लागून मासिकात बघितलेली पिक्सी का काय कट करून आलीस. वर मलाच म्हणालीस "बाबुडी , तुझेही केस गळतातच नं, तूच लाव आता ते तेल आणि शाम्पू!" असंच वर्षभर एकॉनॉमिक्स ध्यास घेऊन अचानक ग्राफिक डिझायनिंग मधे जायचे ठरवून मोकळी झालीस, अर्थात मेहनत करायचीस व परिणाम भोगायची तयारीही दाखवाचीस म्हणून खूप वाद व्हावेत असं काही घडलंच नाही.
आईचा व्यवसाय वाढायला लागला तसे मी माझ्या कामाचे तास कमी केले , तुझ्या टीनेज वयात तुझ्यासाठी वेळ द्यायचा असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं. ते तुझं रनिंग , track practices साठी होणारी पळापळ म्हणजे तू तर धावायचीस, पण पळवायचीस आम्हाला !! बघता बघता उत्तम मार्क घेऊन कॉलेजला निघूनही गेलीस, स्वतःचे सगळे स्वतः करायचा तुझा कल होताच ,आता तर पंखातही बळ यायला लागलं होतं. मगं बऱ्याच ठिकाणी स्वयंसेवक होऊन दर शनिवारी, रविवारी फॉस्टर केअरला जायचीस. आईला वाटायचं तू स्वतःचं कनेक्शन शोधतेयंस , कदाचित तू भारतात जाऊन खरे आईवडीलही शोधशील. मला काही तसे वाटले नाही पण या वयात काय सांगता येते असे तिने म्हटल्यावर माझ्याकडे काही उत्तर नसायचं. नवीन जॉब लागल्यावर तू हे वेळेअभावी बंद करशील वाटलं होतं.दर शनिवारी धावतपळत फोन करायचीस ते तेवढं एक समाधान. एकेदिवशी बुधवारी तुझा फोन आला तर आम्ही घाबरलो चक्क ! तेव्हा तू अपघातात गेलेल्या एका स्त्रीबद्दल आम्हाला सांगितले, किती दुर्दैवी खरंच. तिची मुलगी अशीच दोन अडीच वर्षाची तुमच्या फॉस्टर मधे आली आहे हे सांगताना तुझा आवाज थरथरत होता. तुला आईने समजावून कसेबसे शांत केले. काही प्रश्नांची उत्तरं नसतात आपल्यापाशी शोधावी लागतात, नाही तर आहे त्यालाच आयुष्य समजून पुढे जावे लागते.
रोजच फोन करायला लागलीस मगं, एवढी हळवी तू कधी झाली नव्हतीस. एकेदिवशी सरळ त्या अनाथ मुलीला दत्तक घेण्याचा विचार तू बोलून दाखवलास, त्या संस्थेत इतकी वर्षे स्वयंसेवक म्हणून काम केल्याने व आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने ती लोकं तुला प्राधान्य देणार होती. आईला हे अजिबात पटले नाही कारण तू एकटी हे मूल कसे वाढवणार तेही वेगळ्या वंशाचं , तुझ्या भावी आयुष्यात याने अडचणी येतील , तुझे लग्न कसे होणार , ना ना चिंता तिला भेडसावत होत्या. शिवाय तुझ्या आईचे शरीर मायटोकॉन्ड्रिअल डिसॉर्डरमुळे गर्भधारणेसाठी सक्षम नव्हते, पण तुला असा कसलाही त्रास नव्हता मगं हे पाऊल तू का उचलावेस हे तिला स्त्री म्हणून लक्षात येत नव्हते. मलाही तिचं म्हणणं पटत होतं तरी तुझंही चूक वाटत नव्हतं. पण तुझी तळमळ इतकी खरी होती नं हृते की नाही म्हणायला जीवावर आलं गं ! तू आम्हाला पटवून देत होतीस, दर शनिवार- रविवार त्या मुलीसोबत तिची आई बनण्याचा प्रयत्न करत होतीस. किती धावपळ झाली तुझी, शेवटी तुझे समर्पण बघून मी व आईने तुझ्या निर्णयात साथ द्यायची ठरवली. कारण तुझ्या मते सर्व प्रकारची कुटुंबं असतात, लग्न जेव्हा होईल तेव्हा होईल मुल आधी असले तरी काय हरकत आहे. तीच आणि तशीच क्रमिकता असली पाहिजे असे थोडीच आहे, प्रेमाने माणूस समृध्द होतो, समाजातील नियमांनी नाही. कधीकधी आयुष्य असे प्रश्न निर्माण करते की उत्तर बाहेर शोधण्यापेक्षा आपणच उत्तर होऊन जायचे. हे ऐकून खरोखरच जाणवलं की हे तुझे पॅशन नाही तर कॉलिंग होते. तुझ्यामुळे आमच्या आयुष्याचे रंगहीन इंद्रधनू चैतन्याच्या विविध रंगांनी उजळून निघाले. आता तशाच चैतन्याचा झरा तुलाही हवा आहे, यात त्या अनाथमुलीबद्दल असलेल्या सहानुभुती ऐवजी तुझी आई होण्याची इच्छा व समर्पण अधिक दिसले आणि पुन्हा तूच आम्हाला तुझ्या नवीन जबाबदारीच्या जाणीवेत, नव्या जीवनपद्धतीत व नव्या विचारसरणीत रूळवलेस.
आज तू पहिल्यांदा तुझ्या लेकीला , आमच्या नातीला 'ऑटमला' घेऊन येणारेस. मी तर रोजचाच पण चमचमीत स्वयंपाक करून ठेवलाय, तुझ्या आवडीची बासुंदी केलीये पण ऑटमला भारतीय जेवण आवडेल नं आवडेल म्हणून आईनेही नवीन प्रकारचा पास्ता केलाय. आता ऑटमने पास्ताच खाल्ला तर आई पुन्हा एकदा जिंकणार आणि तुम्ही दोघीही जेवलात की मी तृप्त होणार. हा चैतन्याचा सोहळा आहे, सोहळ्यात आपली माणसं लागतातच गं , योगायोग बघ, तूही ऑटमच्या पहिल्या दिवशी इथे तुझ्या घरी आलीस, नव्या ऋतुला घेऊन ... आयुष्याचा ऋतू, रंगांचा ऋतू, नव्या बदलाचा व सृजनाच्या सोहळ्याचा ऋतू !!!
©अस्मिता :)
स्पंदन दिवाळी अंक २०२१ पूर्वप्रसिद्ध