बाबाच्या आठवणी
सालाबादप्रमाणे नवीन वर्ष येतं अन संपत, कसं, ते कळतही नाही. अनपेक्षितपणे डॉ कन्ना मडावी व डॉ प्रकाश व डॉ मंदा आमटेच्या भेटीने दोन हजार चौदाची सांगता झाली अन त्या आठवणी आळवत असतानाच नवीन वर्षाची सुरुवात आवडत्या लेखकाच्या भेटीने झाली ... ... क्या बात है! आपलाच हेवा आपल्याला वाटावा. नाही, हा हेवा नाही तर 'ठेवा' आहे.
त्याचं असं झालं आमची एक सेतू - अ कॉन्शस पेरेंट फोरम ही पालकांची संस्था आहे. दरवर्षी मुलांच्या छंदांच प्रदर्शन व काही तज्ञांच्या कार्यशाळा आयोजित करत असतो. हे जरी प्रदर्शन असलं तरी मुलांसाठी उत्सव व आमच्यासाठी एक कार्यच असतं. तारखा ठरल्या अन कळलं की श्री. श्री द महाजन व डॉ अनिल अवचट कान्ह्याला जाणार आहेत व नागपुरात मुक्कामाला थांबणार आहेत. आम्ही संधी सोडली नाही.
इथे पोचल्यावर जेवण, आराम, मुलांसाठी ओरीगामी कार्यशाळा व संध्याकाळी बापू व बाबांच्या गप्पा असा आखलेला कार्यक्रम होता पण विमान उशिरापोचल्याने कार्यशाळे व्यतिरिक्त सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडले. बापू एक चालता बोलता वनस्पती विश्वकोष आहेत,ह्याशिवाय त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. तर बाबाबद्दल (बाबांबद्दल नाही, ए बाबा) बरीच वाचून, ऐकून होते. त्यांच्या पाहुणचाराची जबाबदारी आम्ही दोघी कार्यकर्त्या, अस्मादिक व वर्षावर होती. खाण्यापिण्याच्या नखरे नसल्याचे कळल्याने सेलिब्रेटींसाठी,( नो, नो, सेलीब्रीटीतला 'से' शब्द उच्चारायला सक्त मनाई) खायला काय करायचं ह्याच टेन्शन अजिबात नव्हते. पाहुणचाराची संधी मिळाल्याचा आनंद तर होताच त्याचबरोबर त्यांच्याशी गप्पा मारायला मिळणार ह्याचा आनंद जास्त होता. काश! विमान वेळेवर न आल्यामुळे मला ह्या दुहेरी मेजवानीचा आस्वाद घेता आला नाही. असो!
भरगच्च सभागृहात बाबाने ओरीगामीच फूल करता करता बापूंशी मारलेल्या गप्पांचा आनंद रसिकांनी घेतला. रात्रीच्या जेवणात घासभर भात खाणारे ते तिघं अन पसाभर खाणारे आम्ही तीस कार्यकर्ते अशी पंगत साग्रसंगीत ( ह्यातलं साग्र काय माहीत नाही पण बाबाच्या संगीताने ) झाली. विनंतीशिवाय गाणं म्हणणारा हा एकमेव गायक असावा! पुणेकरांना वर्हाडी तिखट जेवणानंतर काहीतरी गोड खायची इच्छा झाली . आपण आईस्क्रीम खाऊ या, हे सांगण्यातला तिघांचाही मोकळेपणा, नि:संकोचपणा, साधेपणा, सहजता खूपच भावली.
बापूंचं वय, हवामान व पुढचे कान्हातले कार्यक्रम बघता, दुसर्यादिवशी सकाळी महाराजबागेत फेरफटका रद्द करावा लागला तरी फार निराशा झाली नाही कारण तेवढाच वेळ त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यात वर्षाच्या घरी घालवता आला. बाबाने गुळपोळीच्या केलेल्या कौतुकाच्या नशेत सुरळीच्या वड्या खाऊ घालायची कालची अपुरी इच्छा आज पूर्ण करून घेतली. वर्षाकडे गेलो तो स्नेहा, अमर, तन्वीही येऊन पोचलेले अन बाबाच्या फर्माइशी पर पोहे करण्यात वर्षा मग्न होती. सकाळी सकाळी बासरीवर बाबा 'रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा' वाजवत होता... सगळ्यांची आपुलकीने चौकशी..... पोहे मस्त झालेत हं... हे गाणं किती छान 'तुम पास आए, युं मुस्कुराये'...सगळ्यांसाठी एकेक ओरीगामीच भेटवस्तू करणं.. एखादं जुनं गाणं, तन्वी, अमरचं गाणं ... अंगणात जाऊन आमचे फोटो काकां..जगभरातल्या आदिवासींचा छंदाचं प्रात्यक्षिक व गोष्टीसह बोटांवरच्या दोरीच्या करामती.... त्याचबरोबर बापूंच त्यांच्याजवळचा खजिना उधळणं.. त्या उत्साहात तयार व्हायचं विसरून जाणं ... थोड्या थोड्या वेळाने बापूंना त्याची आठवण करून देणं ... लाकूड मिळालं असतं तर तेही करून दाखवलं असतं...... चौसष्ठ कलांपैकी किती येत नसतील? कदाचित बोटावर मोजण्या इतपत.. धमाल! दोन तास कसे गेले ते कळलंच नाही.
बदललेली आर्थिक, सामाजिक परिस्थिती, जीवनशैली .....ढसळलेली नीतिमूल्ये... दोन पिढ्यांतली दरी .... असंवेदनशीलता.. अशा अनेक विषयांवर बाबाशी मारलेल्या गप्पा....सुरुवात झाली ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने..
"पसायदान ही फार ग्रेट कविता आहे जगातली. केवढं भव्य स्वप्न आहे हे! ज्ञानदेव काय म्हणतात - लेखन कसं असावं - साज्य अन मवाळ. साज्य म्हणजे सच्चं व मवाळ म्हणजे आक्रमक नसावं. मितुले अन रसाळ! मितुले म्हणजे थोडक्यात असलेतरी रसाळ, रसरशीत असावे. शब्द जसे कल्लोळ अमृताचे... आपल्या किती मिळतं ह्या ज्ञानेश्वरीतून... आपल्याकडचं शहाणपण आहे ते का सोडायचं? विज्ञानाने जे काय दिलं आहे , ते घेऊ यात.. पण हे जे शहाणपण असेल तर विज्ञानाचा योग्य उपयोग करू शकू.. एक ठाकर जमातीचा आदिवासी होता.. गोफण फिरवायचा अन पाखरं उडवायचा.. मी त्याच्याकडून गोफण फिरवायला शिकलो. मी जोराने गोफण फिरवली, तसा तो म्हणाला, ' पोरा जोर करू नको काही वाटा पाखरांचा अस्तुया '... हा इसेन्स आपण घालवलाय... आमच्याकडे एक म्हैस होती कल्याणी नावाची. ..तिच्या कपाळावर चांदवा होता..तिच्या दुधावर आम्ही पोसलो... दोन हजार सालापासून त्र्याणववर्षाची आई माझ्याकडे असते... आम्ही जुन्या आठवणी काढतो, गप्पा मारतो... ती मेल्यावर तिला पुरलं... मी आईला विचारलं तिचं कातडी काढून विकतात वैगेरे.. तर ती म्हणाली माझी सगळी पोरं तिचं दूध प्यायली,आईला असं कोणी विकत का? व्हल्यु अडिशन की काय ते म्हणतात,...ते आपण गमावलंय! आपण वस्तू विकत घेतो, उपभोग घेतो, नवीन वस्तू घेतो अन कचरा निर्माण करतो.... कुणाविषयी आत्मीयताच नाही राहिली. ही माझी बासरी! तिनी मला किती आनंद दिलाय... माझ्या मनात तिच्याविषयी कृतज्ञता आहे.... माझं पुस्तक आहे सृष्टीत गोष्ट, वनात जनात त्यात लिहिलंय... मी माझ्या सगळ्या वस्तूंशी संवाद साधतो...काष्ठशिल्प वैगेरे करताना वस्तू चटकन दिसत नाही, जरा इकडेतिकडे बघितलं की दिसतातही ,मग मी विचारतो ..हातोडेबुवा रुसलात का? किंवा काहो कुठे गेला होतात... नाही, जरा बिडी प्यायला गेलो होतो... असे मनातल्या मनात संवाद होत असतात. हे अगत्य आहे ना ते सजीवांविषयी आहेच निर्जीवांविषयीही आहे. ते आज आपण घालवलंय...
आपल्या मुलांना जन्म दिलाय ही एक जैविक घटना घडून गेलीये... आपली मुलं ही स्वतंत्र माणसं आहेत... ती सक्षम झाली की आपण त्यांना वेगळी व्यक्ती समजावं... त्यांचं जीवन त्यांच्या हातात आहे... आपण शेजार्यांकडून अपेक्षा ठेवत नाही ना तसंच मुलांकडून कमीतकमी अपेक्षा ठेवायच्या... जगात दु:खाच मूळ कारण अपेक्षा आहे... मुलं अडचणीत आली तर आपण त्यांच्या पाठीशी असावं... विश्वास गमवता कामा नये... सुनंदाला जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा तिने मला तयार केलं... आपल्यालाच का झाला हा प्रश्न विचारायचा नाही्, ह्यातून काही निष्पन्न होणार नाही... आता काय करता येईल, त्याचा विचार करायचा... औषध घेऊन तिला आठ वर्ष जास्तीची मिळाली... जाण्यापूर्वी दोन वर्ष आधी मुक्तांगण सुरू झालं होतं... चार केमो झाल्या... केमोचा दिवस सोडला तर बाकी दिवस ती काम करत असे... डॉनी सुचवलं परदेशी जाऊन उपचार घ्यायला पण ती म्हणे इथेच राहणार, इथेच उपचार घेणार अन मुक्तांगणाचं काम करणार... ती वन डे अॅट अ टाइम नाही तर ती वन मोमेंट अॅट अ टाइम जगली.. ..तिने मला तयार केलं! हे जे छोटे मोठे प्रसंग मला अलीकडचे वाटतात. मृत्यू समीप ही शक्यता नाहीतर खात्री असताना शांत राहून काम करणं हे मी पाहिलंय...हे मानवी जीवनात शक्य आहे मग लहानसहान गोष्टींवर का मात करता येऊ नये "...
सुनंदा नोकरी करून पैसे कमावणार व बाबा स्वच्छंदी आयुष्य जगणार ! बिनशर्त विभागणी! खरंच त्यांना हे जमलं असेल का ? अशी मनात शंका सुद्धा येत नाही! किती नितळ, पारदर्शी आयुष्य ! कुठल्याही प्रकारचं ओझं नाही.. साधं, सरळ, सहज, सोपं, सरधोपट... आयुष्य! आपण किती ओझी बाळगत असतो, नाही का! तो काय म्हणाला...... तिला काय वाटेल...... अशी एक ना दोन ...अनेक ओझी!
'जगा व जगू द्या' ह्या जीवनमंत्रात, बाबाच्या भेटीतून एका शब्दाची भर पडली .... 'जगा व जगू द्या ओझ्याविना'