रॉकेट बॉईज चा ट्रेलर पहिल्यापासून सिरीज पाहायची फार उत्सुकता होती . जितका ट्रेलर छान वाटलेला तितकीच सिरीजही रंजक वाटली. भारतीय अणु ऊर्जा संशोधनाचे जनक डॉ होमी भाभा आणि भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही सिरीज या दोन वैज्ञानिकांचं आयुष्य ,त्यांच्या कार्याचे महत्वाचे टप्पे दाखवताना स्वतंत्र भारताच्या विज्ञान,तंत्रज्ञान इतिहासाचा छोटासा आढावाही घेते.
पहिला सिझन १९४०-१९६० दरम्यानचा कालावधीत घडताना दाखवला आहे.जिम सरभने साकारलेला होमी भाभांचा रोल आणि ईश्वाक सिंग ने साकारलेला विक्रम साराभाईंचा रोल मध्ये अतिशय उत्तम प्रकारे जमले आहेत. त्यांच्यातील सुरुवातीचा मेंटॉर-स्टुडन्ट रिलेशनशिप, नंतर मैत्री,वैचारिक देवाणघेवाण ,वाद अशा सर्व प्रसंगांत दोघांची केमिस्ट्री फार जमलीय. या दोघांव्यतिरिक्त इस्रो च्या सुरुवातीच्या दिवसात डॉ साराभाईंच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे डॉ ए.पी .जे अब्दुल कलाम पाहताना फार छान वाटत. डॉ सी वि रमण यांची व्यक्तिरेखा २-३ छोट्याशा सीन्समधूनही लक्षात राहते
रॉकेट बॉईज पाहताना जाणवलेल्या काही गोष्टी म्हणजे एखाद्या महत्वाच्या पण लांबलचक अशा कालखंडाला न्याय देऊ शकेल अशी कलाकृती साकारायला वेब सिरीज प्लॅटफॉर्मचा कल्पकपणे उपयोग केला जाऊ शकतो. दुसरं म्हणजे अनावश्यक भडक दृश्य ,अतिप्रमाणात असलेल्या शिव्या वगैरे टाळूनही चांगली सिरीज बनू शकते.अर्थात या सिरीज मध्ये एकूण ३-४ सीन्स मध्ये एफ वर्ड्स आहेत पण अशा टाईपच्या शब्दांचा भडीमार नव्हता ,हे आवडलं. जनरली वेब सिरीज मध्ये शेवटच्या सीनमध्ये पुढचा एपिसोड लगेच बघावा अशी व्यवस्था करू ठेवली असते तसं काही घडत नाही. अधेमधे संथपणा येतो ,तरीही एका पोएटिक फ्लो मध्ये पुढचा एपिसोड येत राहतो.
ज्या प्रसंगात विज्ञानविषयक चर्चा आहे त्यांचा क्लिष्टपणा तसाच ठेवून केवळ त्या पात्रांच्या कथेत आपण प्रेक्षक म्हणून गुंतलोय,हे आपल्याला स्वतःलाच कळत आणि म्हणूनच आपण न कंटाळता बघत राहतो,हे फार आवडलं.वैज्ञानिकांची गोष्ट म्हणून विज्ञानाशी निगडीत असली तरी साराभाईंच्या व्यक्तिमत्त्वावर,पोशाखावर ,त्यांच्या संवादात गांधीजींच्या स्वप्नातील भारत येतो,तो सजग स्वप्नाळूपणा इतिहासाच्या पुस्तकातून भेटलेल्या भारावलेल्या गोष्टींची आठवण करून देतो. तर भाभांच्या व्यक्तिरेखेतून महत्वकांक्षा बाळगणं ,ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असणं किंवा जगाबरोबर वागताना त्याच्यासारखंच वागता आलं पाहिजे, अशा आशयाचे व्यावहारिक संवाद पुन्हा वर्तमानात आणतात.
ब्रिटिश स्टाइलच्या जुन्या इमारती ,पूर्वीच्या कार्स,व्यक्तिरेखांचे कपडे ,अप्रतिम आणि सुटेबल बॅकग्राऊंड म्युझिक ,सुंदरपणे चित्रित केलेल्या फ्रेम्स, छाया प्रकाशाचा सुंदर उपयोग करून चित्रित केलेले व्हिज्युअल्स आणि इतर डिटेल्स मुळे पूर्ण सीरिजला छान सेपिया टोन सेट झालाय तोही आवडला.
काही काही फ्रेम्स खूप आवडल्या,फार स्पॉयलर न येऊ देता लिहायच्या झाल्या तर डॉ कलाम यांची एन्ट्री असलेला प्रसंग ,केम्ब्रिज विद्यापीठावरून वरून उडणारी दुसऱ्या महायुद्धातली प्लेन्स ,एका फ्रेममध्ये डॉ भाभा,डॉ साराभाई आणि डॉ कलाम महत्वाच्या मिटिंग साठी वाट बघत एकाच सोफ्यावर ओळीत बसले आहेत ती फ्रेम,भाभांचे आणि साराभाईंच्या महत्वाच्या माईलस्टोन दाखवताना बनवलेले ओव्हरलॅपिंग सीन्स,रॉकेटचे वेगवेगळ्या प्रकारे वापरलेले मोटिफ्स असे बरेच प्रसंग लक्षात राहतात.
दोघांच्या वैयक्तिक आयुष्याचे एक्सट्रा डिटेल्स ,काही प्रसंगांना जास्त ड्रॅमॅटिइज्ड किंवा कॉमेडी करून दाखवणं किंवा शेवटी दुसऱ्या सिझनची तयारी म्हणून की काय कॉन्स्परन्सी थिअरीकडे जाणारा शेवट ,अशा काही बाबी खटकू शकतील .असे असले तरीही भारतीय तंत्रद्याना क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या या दोन शास्त्रज्ञांवर एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न म्हणता येईल सिरीज बनते ,हेही नसे थोडके !
जाता जाता आठवलं,आमच्या शाळेत रमण मंडळाची एक छोटीसी लायब्ररी होती .त्यात शास्त्रज्ञांची ओळख असलेली छोटी छोटी पुस्तक वाचायला मिळायची.कधीतरी डॉ भाभा आणि डॉ साराभाई यांची छोटेखानी चरित्र वाचलेली. त्यांच्या व्यक्तिरेखांना टीव्हीच्या स्क्रिनवर पाहून पुस्तकातून भेटलेलं पण ओळखीची असलेले कुणीतरी भेटल्यासारखं वाटलं
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
माझ्या पर्सनल ब्लोग (https://chitrkshan.blogspot.com) वर पुर्वप्रकाशित