घरच्या व्हॉट्सअॅप ग्रूप साठी टंकलं होतं. म्हंटलं इथेही टाकूच. इतर चर्चांमध्ये मुद्दा विरून जाऊ नये म्हणून वेगळा धागा करतेय.
----
सोसायटी मध्ये एका संध्याकाळी मुलीला घेऊन खेळायला गेले होते. मुलं आपापसात खेळत असतात आणि माझ्यासारख्या सोबत गेलेल्या आया एकमेकींशी गप्पा मारतात. तिथे एक बाई भेटली. तिशीची असेल. सोसायटीमध्ये नवीनच राहायला आलेली. तिच्याशी बोलताना कळालं की ती बेंगलोरची असून महाराष्ट्रातच नवीन आहे. तिचा नवरा भारतातल्या टॉपच्या लॉ-फर्म मध्ये नोकरी करतो. त्याला मुंबईत नोकरी मिळाली म्हणून ते कुटुंब इथे आले. ती स्वतः देखील नावाजलेल्या कॉलेज मधून पास-आऊट झालेली वकील आहे आणि मुंबईत नोकरी शोधते आहे. ती मराठी शिकायचा प्रयत्न करत होती. इतक्या पटकन तिने काही शब्द आणि मराठी वाक्यरचना शिकून घेतली ते पाहून मला कौतुक वाटलं पण तिने अगदीच शांतपणे तिला ८ भाषा येतात त्यामुळे नवीन भाषा पटकन शिकण्याची हातोटी तिच्याकडे आहे असं "हे तर कैच नै" च्या चालीत सांगितलं तेव्हा तर मी मी अगदीच अचंबित झाले!! दक्षिणेतल्या अनेकांना येतात तशा चारही दक्षिणी भाषा, ऊर्दू मातृभाषा, हिंदी ऊर्दूशी साम्यामुळे, इंग्लिश कामकाजाची भाषा आणि काही दिवस बंगाल मध्ये राहिल्याने बंगाली. आणि आता ती मराठी शिकायचा प्रयत्न करत होती. इतकी हुशार, शिकलेली, सगळीकडे फिरून आलेली बाई. कशी दिसत असेल असं वाटतं? एखादी वेस्टर्न कपडे घातलेली, मॉडर्न बाई समोर आली का? चुकलं मग तुमचं. ती नखशिखांत काळ्या कपड्यांत होती. होय. तोच तो. प्रसिद्ध काळा ड्रेस. बुरखा.
पितृसत्ताक पद्धतीत वाढल्यामुळे बायकांच्या कपड्यांवरून बाईला जज करण्याची आपली काही गृहितकं असतात. का बनलीत अशी गृहितकं? कारण बायकांना नेहमीच संस्कृती, धर्म, जात ह्यांची प्रतीकं म्हणून वापरलं गेलंय. बायकांचा वापर करून स्वत:चं राजकारण पुढे ढकलण्याची पद्धत जुनीच आहे. त्यातही बायकांचे कपडे हा तर अगदीच दृश्य आणि सगळ्यात सोपा मार्ग आहे.
एक २०० वर्षांपूर्वीचं उदाहरण देते. पहिल्यांदा ऐकत असाल, तर खोटं, अविश्वसनीय वाटेल. पण खरं आहे. आपल्या भारतातच घडलेलं आहे. गोष्ट आहे २०० वर्षांपूर्वीची त्रावणकोर मधली. म्हणजे आताच्या केरळ मधली. तेव्हाच्या जातीयवादी केरळी समाजात खालच्या जातीच्या बायकांना कमरेच्या वर कपडे घालायला परवानगी नव्हती. थोडक्यात ब्लाऊज घालायला परवानगी नव्हती. वरच्या जातीच्या लोकांसमोर बायकांनी छाती उघडी ठेवली पाहिजे असा नियम होता. वरच्या जातीतल्या बायकांना मात्र छाती झाकलेली चालत होती. खोटं वाटतं? पण हे खरं आहे. तेव्हा तिथे ख्रिस्चन मिशनरी आले. त्यांनी नाडर आणि काही जातींचे प्रबोधन केले, त्यांचे धर्मांतर केले, शिक्षण दिले. ह्या धर्मांतरीत जातींना आता वरच्या जातींसारखेच हक्क हवे होते. त्यांची मुख्य मागणी होती आम्हालाही अंगभर कपडे घालू द्या. तेव्हाच्या त्रावणकोरच्या इंग्रजी दिवाणाने हे मान्य केलं. पण उच्चवर्णीय भडकले आणि दंगली झाल्या. चर्चेस, दवाखाने जाळले गेले. कोर्ट केसेस चालल्या. शेवटी ब्रिटिश सरकारच्या मदतीने खालच्या जातीच्या बायकांची अंगभर कपडे घालण्याची मागणी मान्य करण्यात आली. पण त्यांनी जी उत्तरीयं वापरावीत, ती उच्चवर्णींयांपेक्षा वेगळी असली पाहिजेत असाही पोट नियम झाला.
आज २०० वर्ष झालीत. अजूनही भारतात काही बायकांना आम्हाला अंगभर हिजाब घालू द्या म्हणून भांडावं लागतं. तर काही बायकांना आम्हाला जीन्स घालू द्या म्हणून भांडावं लागत!! भय इथले संपत नाही!!! बायकांच्या कपड्यांवरून बायकांचे संस्कार जोवर ठरतात तोवर हे संपणार नाहीच.
माझ्या आईने नेहमीच साडीच नेसली आहे. दुसरा कुठलाच ड्रेस नाही. सुटसुटीत बरा म्हणून सलवार कमीझ सुद्धा नको म्हणते ती. आणि माझी आईच नाही, तर माझी सासू, माम्या, मावश्या, आत्या आणि अशा बर्याच बायका कायम साड्यांमध्येच वावरल्या आहेत. साडीखेरीज इतर कुठलाच ड्रेस त्याना आवडत नाही. कंडिशनिंग, सवय असा सगळ्याचाच भाग आहे. माझ्या आईनंतरच्या पिढीतल्या काही बायका सलवार-कमीझ घालू लागल्या. त्या बायकांनाही 'जास्तच मॉडर्न आहे. हे असले कपडे घालून कुठे साहेबिण होणार" अशा टाईप च्या टोमण्यांना तोंड द्यावं लागलं. आणि माझ्या पिढीच्या बायकांना जीन्स आणि वेस्टर्न कपड्यांवरून टोमणे ऐकावे लागले.
२० एक वर्षांपूर्वीपर्यंत लग्न झालेल्या "सुवासिनी" बायका मंगळसूत्र, कुंकू, बांगड्या, जोडवी अगदी नियमीत घालायच्या. चुकून टिकली पडली, बांगडी फुटली तर अपशकून झाला असं मानायच्या. देवासमोर, घरातल्या मोठ्यांसमोर पदर डोईवरून नाही तर निदान खांद्यांवरून घ्यावाच लागायचा. कंडिशनिंगचाच भाग. हेच वागणं "संस्कारी" म्हणून शिकवण्यात आलेलं होतं. हाच त्यांच्या धर्माचा भाग होता. काही ठिकाणी तर जातीच्या अस्तित्वाचाही होता. माळ्यांच्या बायकांचं आडवं कुंकू, महार बायकांचं निळं कुंकू असेही त्याचे एक्स्टेन्शन्स मी पाहिलेले आहेत. बाईच्या साडी नेसण्याच्या पद्धतीवरून, कुंकू-मंगळसूत्राच्या पद्धतीवरून जात-धर्म, लग्नाचं स्टेटस ओळखू येत असे. त्यांच्या अस्तित्वाचा, आयडेंटिटी-ओळखीचा भाग होत्या ह्या गोष्टी. रादर अजूनही आहेतच. अजूनही बायका काहीही करत असल्या, तरी त्यांच्या गणवेशासोबत, कॉर्पोरेट कपड्यांसोबत सुद्धा मंगळसूत्र-टिकली लावतात. बर्याच बायका अगदी शिक्षिका, डॉक्टर, इंजिनीअर, वकील, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह इतकंच काय पोलीस ऑफिसर सुद्धा झाल्या तरी तुम्हाला टिकली-मंगळसूत्र ल्यायलेल्या दिसतील. भारतीय लग्न झालेल्या बायकांना मंगळसूत्र घालू नको म्हणून सांगितलं, तर ९०% बायका बंड करून उठतील.
हेच मुस्लिम बायकांसाठीही खरं आहे. हिजाब हा त्यांच्याही कंडिशनिंगचा आणि आयडेंटिटीचा भाग आहे. माझ्या आईचं साडीशिवाय इतर कोणतेच कपडे योग्य न वाटणं मी समजू शकते, तर एखाद्या मुस्लीम बाईचं बुरख्यासोबतचं कम्फर्टेबल वाटणंही समजून घ्यायला हवं. तुम्हाला हिजाब ऑप्रेसिव्ह वाटतो का? मग मंगळसूत्रही ऑप्रेसिव्हच आहे की!!! एखाद्या हिंदू सुवासिनी बाईला मंगळसूत्र न घालणं हा मोठा स्ट्रगल असतो. त्यासाठी समाजाशीही लढावं लागतं आणि स्वत:शीही. समाजाशी लढणं एक वेळ सोपं. स्वतःच्या मनातला लढा जास्त कठीण असतो. मंगळसूत्र न घालण्यात कोणताही अपशकून नाही हे मानणं, हे देवावर विश्वास न ठेवण्याइतकं अवघड आहे!! काही बायका तिथे पोहोचतात. त्या सहज मंगळसूत्राला दागिन्यापलिकडे महत्व देत नाहीत. काही बायका तिथे पोहोचूच शकत नाहीत. त्यांना मंगळसूत्र घालू द्या. ज्या तिथे पोहोचल्यात, त्यांनाही जज करू नका.
हिजाब-साठीही योग्य-अयोग्य ठरवण्यासाठी मुस्लिम महिलांना पुरेसा वेळ आणि हक्क द्या. ज्यांना हिजाब आवश्यक वाटतो, त्यांना घालू द्या. नाही वाटत, त्यांनाही जज करू नका.
गणवेश ह्या मुद्यावरून अजून एक वादंग आहे. पण मुळात गणवेश सर्व-समावेशक असावा हे मूळ तत्व का पाळलं जात नाही? मी स्वतः एका मोठ्या-नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचा गणवेश डिझाईन केलेला आहे. स्वतः च्या अनुभवावरून सांगू शकते. आमच्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये मुळात मुली कमीच होत्या. त्यातून मुस्लिम मुली अजूनच कमी. एक मुस्लिम मैत्रीण होती. ती कधीच वेस्टर्न कपडे घालायची नाही. कायम सलवार-कमीझ- अंगावर ओढणी अशा कपडयांत आणि डोकं झाकलेलं. मी युनिफॉर्म कमिटी मध्ये होते. कमिटीमधल्या इतर मुलींना शर्ट-ट्राऊजर/स्कर्ट वगैरे स्मार्ट युनिफॉर्म हवा होता. मी स्पष्ट निषेध नोंदवला. माझ्यासारख्या कायम जीन्स-टी शर्ट मधे फिरणार्या मुलीकडून नकार म्हणजे इतरांना धक्काच होता. पण युनिफॉर्म त्या मुस्लिम मुलीसकट सगळ्यांना कम्फर्टेबल वाटेल असाच असला पाहिजे हाच माझा ह्ट्ट होता. नंतर सगळ्यांना तो पटलाही आणि तिलाही घालता येईल असाच युनिफॉर्म बनवला गेला. हेच तत्व सगळ्या गणवेशांना लागू व्हायला हवं.
आपल्याकडे सगळ्या पुरुषांना आणि अनेक बायकांना देखील मुस्लिम बायका फार ऑप्रेस्ड आहेत आणि त्यांची त्यांच्याच पुरुषांपासून सुटका करणं आवश्यक आहे असं वाटत असतं. पण मुस्लिम बायका ऑप्रेस्ड वाटत असतील, तर हिंदू बायकाही तितक्याच ऑप्रेस्ड आहेत हे लक्षात असू द्या. फार सुटकाच करायची खुमखुमी असेल, तर स्वतःच्याच घरातल्या आया-बहिणींची करा. त्याच तुम्हाला दुवा देतील!!
- शर्वरी