मुझसे दोस्ती करोगे-रेस्ट्स ईन 'पिसेस'

मुझसे दोस्ती करोगे - रेस्ट्स ईन 'पिसेस' -पूर्वार्ध

कलाकार : काही उगीच हसणारे, काही अति तर काही जेमतेम अभिनयही न करणारे, काही मान डुले , काही सुट्टीवर आल्यासारखे उत्साही, काही अतिशय आनंदी ( सगळे इतर ठिकाणी उत्तम अभिनय करतात पण इथे वावच नाही.)

दिग्दर्शक/निर्माते : तेच ते गोल बेड असणारे चोप्राज्
संगीतकार: हेहेहेहेहेSSSSS ,हुहुहु, आआआआआ त सगळी गाणी बसवणारे
पात्र: शिंदे, कुलकर्णी, कानेटकर थोडीच असणारेत ते खाली सतरंज्या पसरून झोपतात, गोलबेडवाले(गोबेवा) यांची आवडती माणसं मलहोत्रा, खन्ना, सहानी, कपूर आहेत.आपण नाही!!!!! ये दिमागमें एकबार फिट कर दिया तो आपकी पिसं काढणेकी कल्पकता वाढती है!

लहानपणापासून राज(हृतिक), टीना(करीना) आणि पूजा(राणी) यांची आणि यांच्या एकुण पाच पालकांची खूपच दोस्ती असते तरी हा 'मुझसे दोस्ती करोगे?' हा प्रश्न का विचारलाय कोण जाणे, 'मुझसे लव्ह करोगे' किंवा 'मुझसे लग्न करोगे' जास्त जुळलं असतं.

स्थळ :रेल्वे स्टेशन मनाली
काळ:पंधरा वर्षांपूर्वीचा
सीन: उगीचच हसणारी पाच मोठी, उगीचच भावूक होणारी तीन छोटी माणसं-मुलं...

यात किरण कुमार- हृचाबा, स्मिता जयकर -हृआय ,सतिश शहा-हिमानी शिवपुरी- राणीचे(पूजा)आई-बाबा, सचिन खेडेकर -करीनाचा बाबा .... यांच्यात अतिशय घट्ट मैत्री असते , हृ अन् आयबाबा कायमचे लंडनला जात असतात. हृबाला डॉट कॉमचा बिझनेस सुरू करायचा असतो. असे व्हेग बोलून सांगितल्याने आपल्याला शंका घ्यायला वावच रहात नाही, व तेही रातोरात कोट्याधीश होतात. बालपणी आपण हमेशा एकमेकांना इमेल करू असा वादा त्यांनी केला असतो.

(ही 'टीना' करीनाच वाटते, करीना 'टीना' करतच नाही म्हणून मी तिला 'करटीना' म्हणणारे आणि कभी खुशी कभी गमची 'पू'ही हीच आहे .हे शुद्ध कॉपीपेस्ट आहे. गोऱ्या रंगासाठी वखवखलेल्या तमाम भारतीय जनतेची ही एक डम्ब फँटसी आहे. शिवाय हृतिकच्या व्यक्तिरेखेलाही अधेमधे 'मै प्रेम की दिवानी हूं' मधल्यासारखे 'हाय' झटके येत रहातात. )

या दरम्यान करटीना इमेलायचा वादा करूनही आळशीपणा करायला लागते म्हणून पूराणी हे काम करत रहाते. बालहृ ठरल्याप्रमाणे लंडनात गेल्यावर बालकरटिना आणि बालपूराणी यांना इमेलही करतो. रातोरात श्रीमंत झाल्यामुळे महिन्याभरात काळा झगा घातलेली शेफ त्यांच्याकडे 'गोभी के पराठे' करते पण 'वो इंडिया जैसे कहां' हेही सांगतो, तरी बरं टेलिग्रामसारखे शब्दागणिक पैसे पडले नाहीत, नाहीतर यांनी राणी-अमिताभचे 'Black' मेल केले असते. पूराणी अतिशय शांत, समजूतदार असते , करटीना उगाचच अतिशय हातवारे करते, तिच्यासमोर किबोर्ड नुसता धरला असता तरी इमेल आपोआपच टाईप झाली असती पण ही फ्रेंच विंडोत बसत असते.

जे मनाली म्हणून दाखवले आहे त्याच्या रेल्वेस्टेशनच्या खांबावर शिमला लिहिले आहे आणि हे बहुतेकवेळी स्वित्झर्लन्ड वाटते. 'गोबेवां'चे भारतीय हिल स्टेशन युरोपात असते. रोशनांचे भारतीय हिल स्टेशन कॅनडात असते. सगळ्यांनी भारताचे तुकडेवाटप भारताबाहेर केलेय. मोठ्यांच्या वेदना मोठ्यांना माहीत !!

तर एका इमेलात बालहृ लिहितो की एकदा तो चर्च मधे गेल्यावर त्याला 'हेहेहेहेहे' अशी धून ऐकू आली. हे नुसतं वाचलं तर वेताळाचं हसणं असेल असं वाटतं पण ती 'अनदेख्या प्यार'ची धून होती. आपल्यासारख्या कुणीही अनदेखा प्यार केलेला नसलेल्या , आणि त्याउप्पर उलट रोज एकमेकांची तोंडं बघायचा कंटाळा आलेल्या लोकांना हे कधीही कळणार नाही. प्यार बचपणमधे पनपायला सुरुवात झाली होती. पण इमेल पूराणी करत होती मग पूराणी हृराजच्या प्रेमात पडायला लागते आणि हृराज तिलाच करटीना समजून तिच्यावर 'अनदेखा प्यार' करायला लागतो.

मातापितरांची एवढी दोस्ती असूनही ते पंधरा वर्षे भारतात येत नाही. दुसरं कुणी एवढी डॉटकॉमने मिळवलेली संपत्ती असती तर दरवर्षी बिझनेसक्लासने गेलं असतं.पण असो. अनदेखा प्यार निड्स टू बी कॉनस्टंट , जणू वनवासच आहे. सिनेमाचा कणा असा असल्याने हा सिनेमा आपल्याला कणाकणाने झिजवतो. पंधरा वर्षांंनी एकेदिवशी करटीना व पूराणीला अचानक कळते की हे हृराज व कुटुंब भारतभेटीला येत आहे. एकमेकांना फोटोही पाठवलेला नसल्याने हृराजला आपला प्यार कोण आहे हे कळत नाही , (इथे आपल्याला आशा की 'मी पाहिलं तुझ्या डोळ्यांच्या थ्रू, कधी शंभर एक कधी शंभर टू' असं काही होईल, पण नाही सगळे पुन्हा पुन्हा मचूळ हसतात. ह्यांच्यापेक्षा पौराणिक मालिकेतल्या नारदमुनीचे हसू करारी वाटेल.) रेल्वेतून उतरून तडक करटीनाच्या दिशेने जातो ,पूराणीकडे ढूंकूनही बघत नाही. म्हणजे जेव्हा समोर अनदेखा प्यार नसताना त्याला 'हेहेहेहेहे' ऐकू यायचं आता मूर्तीमंत प्यार उभा असताना हृताळ्याला कळत नाही. करटीना व पूराणी ठरवतात की पंधरा दिवसच तर आहेत आपण सहज थापा मारून दिवस काढू ,मग तर ही पिडा जाणारच आहे नं ! मगं करटीना सारखं त्याला 'हे मिस्टर अमेरिका' म्हणते, तो लंडनहून आल्याचं सांगतो तर करटीना 'एक बार जो मैने तय कर लिया तो तय करलिया ' म्हणते, सांगितलं होतं नं डम्बय !! तो म्हणतो 'पूराणी, तुमभी कितनी बडी होगयी हो' म्हणजे लंडन आणि भारतीय प्रमाणवेळ वेगळी आहे पण काळ तर सारखाच पुढे जातो की.

आता माता की चौकी का जागरण असे काही तरी चालू आहे, तिथे हृराज मोठ्यांच्या पाया पडतो, त्यामुळे लंडनमधे राहूनही संस्कार कसे कूटकूटके भरलेले आहेत असं सगळे कौतुकाने म्हणतात व निरर्थक हसतात. नंतरच्या सीनमधे तरुण मुलं व बॉडी डबल स्केटिंग करतात , लहानमोठे पिकनिक करतात. हृराज सारखं फ्लर्ट करतो कारण हीच ती इमेल करणारी असा त्याचा समज, बट इट वॉज लाईक अ बम्प ऑन द वॉल कारण करटीना स्वतःचीच स्तुती करतेय. पूराणी मात्र लंडनच्या 'लंडन युनिव्हर्सिटी' मधे अप्लाय करतेय. हे खूप खोटं वाटतं ,एका धेडगुजरी शोमधे युनिव्हर्सिटीचे नाव 'विद्यापीठ युनिव्हर्सिटी' असे म्हटले होते , त्याचीच आठवण आली. हळूहळू हृराजला जाणवायला लागतं 'बिनामिले , बिनादेखे' आपल्याबद्दल हिला कसं सगळं माहिती , रिअली ?! पूराणीला म्हणतो आपण चांगली दोस्ती करूया.

नंतर 'कहेदोके तुम मेरे दिलमें रहोगे , कहेदोके तुम मुझसे दोस्ती करोगे' हे गाणं गात पिकनिक आहे, करटीना गाते 'देखूंगी, सोचूंगी, कल परसो कुछ कहूंगी' , गद्य वाटाव्यात अशा ओळींचे बळंच पद्य करून चाल लावलेली आहे. हे सगळं सगळ्यांचे आईबाबाज् मोठ्या कौतुकाने बघत आहेत, मचूळ हसत जमेलतसे प्रोत्साहनही देत आहेत.नंतर एका पॉश रेस्टॉरंटमध्ये हे तिघे बसलेले असतात , करटीना म्हणते 'मला यूथ फेस्टिव्हलमध्ये जायाचे हाय अन् नाचाची पिराक्टीस करायची हाय', आणि निघून जाते पण पूराणी समजूतदार , मदरली व त्याला छाsन ओळखत असल्याने 'गोभी के पराठे' ऑर्डर करून आपल्या हाताने भरवते. ( प्रौढांसाठी मदरली नही होते है ना राणी Wink ! )
हृराजला 'कुछ तो गडबड है 'वाटतं कारण त्याच्या 'गोभी के पराठे' प्रकरणाशी करटीनाला काही देणंघेणं नाही.

पुढच्या दिवशी नारदमुनी पंचपालक नाश्त्याच्या टेबलवर पूराणीसाठी स्थळ आले आहे सांगतात, कुणी की हृबाच्या लंडनमधील मित्राचा मुलगा पूराणीत इंटरेस्टेड आहे हे आपल्याला कळते. इथेच मला धडधडलं कारण गोबेवांचा घरचाच 'लोड' म्हणजे उदय चोप्रा.....
इथे हृराज करटीनाला खोलता येणाऱ्या दिलाचे नेकलेस आणतो. दुकानात अचानक आल्याने पूराणीलाही एक घेऊन देतो. आणि रात्री करटीनाला नेऊन गळ्यात घालतो मगं ती म्हणते हिंमत असेल सर्वांसमोर परपोज कर की गड्या ! नंतर यूथ फेस्टिवलचे 'आज के लडके आय टेल यू, कितने लल्लू व्हॉट टू डू ' महाकाव्य सुरु होते. हे धड हिंदी नाही, धड इंग्रजी नाही व जे आहे त्याचेही व्याकरण गंडलेले असल्यामुळे सबटायटल्स वाचून प्रेक्षक उन्मनी अवस्थेत जाऊ शकतो. कपडे अतिशय बेकार, डान्स बेकार , सगळंच महाभिकार आहे. इथेच गातगात कालचं लक्षात ठेवून हृराज 'ओ माय डार्लिंग, आय लव्ह यू' म्हणतो. ह्यानंतर घरी एकांतात कृष्णासमोर करटीना 'मला बी लव व्हायलंय देवा' म्हणते. ही एकांतात सुद्धा लटकेझटके, नार्सिझम व हातवारे करते , हे मला भुमिकेशी प्रामाणिक रहाणे वाटले.

हृराज कुटूंबाला ह्या उघड उघड इलू-इलूचे रिश्तेदारीत रुपांतर करावे वाटते. मग सचिन खेडेकर किरण कुमारला म्हणतो तू इतका बडा आदमी असूनही माझी मुलगी सुनबाई म्हणून तुला आवडली कमाल आहे. (त्याने मैने प्यार किया बघितलाय नक्कीच.) हे लग्न ठरल्याचा पंचआईबाबांना अपार आनंद होतो.

हृराज आणि कुटूंब लंडनला निघते.दुसऱ्या दिवशी थेम्स नदीच्या काठावर वसलेल्या हापिसात हृराज काम-काम खेळत असताना अचानक 'गोभी क्या पराठ्यां'चा वास येतो, तर काय चाणाक्ष वाचकांनी ओळखलेच असेल , फॉईलमधे पराठे घेऊन साक्षात पूराणी आलेली असते. थेम्स नदीच्या पुलावरच्या कठड्यावर बसून बापजन्मी खायला न मिळाल्यासारखं हृराज पराठ्यांची तारीफ करत खातो. मगं पूराणीला लंडन दाखवायच्या निमित्ताने गरीब प्रेक्षकांना चार चकाचक गोष्टी दाखवल्या आहेत. फिरतफिरत ते दोघे 'हेहेहेहेहे' वाल्या चर्चला येतात. मगं राणी ते 'हेहेहेहेहे' अचानक 'हुंहुंहुंहुंहुं' असे पण त्याच चालीत गुणगुणते व हृराजला पूराणी हाच आपला खरा 'अनदेखा प्यार' आहे ह्याचा साक्षात्कार होतो.सगळं आठवून हृराजच्या फक्त चेहऱ्याला भावनातिरेकाने कापरे भरते. तो विचारतो 'ह्यो दगा कामून ?' ती म्हणते 'स्टेशनवर तू माह्याकडे बघितलंबी न्हाईस हृताळ्या! करटीनाला बगून यडा झालास, मन तर म्या लावलं पर तू भूललासी वरलिया रंगा, म्या तरी काय करावं मंग?' हृराज म्हणतो 'करटीनाला समजाऊ आपण दोगं पर म्या फकस्त कागूद लिव्हणारीवर प्यार केलायं अन् ती तू हायंस' , तरी पूराणी 'लई लेट झाला की राव' ,म्हणत रडत जाते व सहमती म्हणून परत पळत येऊन एक जादू की झप्पी देते.

-------------------- मध्यांतर---------------------

मध्यांतरानंतर खिल्ली कंटिन्यूड.....

चर्चमधल्या कल्पनेतल्या धबधब्याच्या काठी 'जाने दिलमें कबसेहे तूऊऊऊऊ' सुरू होते. आता 'अनदेखा प्यार' आऊट ऑफ क्लॉजेट आल्यामूळे आपणही सुटकेचा निश्वास सोडतो. मग पूराणी आणि हृराज सोक्षमोक्ष लावण्यासाठी भारतातल्या युरोपला निघतात. विमानात हृराज पूराणीला माँ के ऑक्सिडाईज्ड कंगण देतो व 'आता ऑफिशयल झालंय तर एक मुकाबिका देकी' म्हणतो. ती म्हणते 'शादीके बाद' तर हृताळ्या म्हणतो 'ह्योच परॉब्लेम इंडियाच्या पोरींचा, च्यामारी' ! (हा परॉब्लेम गोबेवांच्या पोरींचा आहे, इंडियाच्या नाही , शिवाय नोंद घ्यावी की कंगण ऑक्सिडाइझ्ड आहेत.)

भारतात आल्यावर करटीनाच्या घरासमोर हीईईई पांढऱ्या कपड्यातल्या लोकांची गर्दी, निरर्थक हसल्याने सचिन खेडेकर भगवानला प्यारा झालेला असतो. मगं पळत पळत येऊन करटीना हृराजला दुःखावेगाने मिठी मारते. सगळी श्वेतवस्त्रपरिधारित मंडळी भारावलेल्या झॉम्बीज् सारखी एकदाच मागे वळून बघतात. कुणाच्याच चेहऱ्यावर कसलेच भाव नाहीत. मगं पूराणीला आता त्याग करावा लागणारे हे कळते, ह्या करताच तर करटीनाला आई दिलेली नव्हती, नाही तर गोबेवांना आईबाबाज्ची काय ददात, पटकथा गंडली की असे फालतू 'हालात के हातों मजबूर' त्याग करावे लागतात. सूचक म्हणून पूराणी ऑक्सिडाइझ्ड कंगण काढते, अशीही काय किंमत म्हणा त्यांची !!

आता पितृशोकाने दुःखी करटीना पंजाबी ड्रेस घालायला लागते. बाबाला काही हे रूप पहायला मिळाले नाही. पंधरा दिवसांपासून उपाशी असलेली करटीना , हे आत्ताच फेशिअल करून आल्यासारखी दिसते, मगं हृताळ्या तिला झोक्यात बसवून पराठे भरवतो. तीही बरोबर साडेतीन मिनिटात मूव्ह ऑन होते. बिच्चारा करटीना बा, आधीही काही नाही आणि नंतरही ! अडीच अश्रू गाळल्यावर चार पालक करटीनाच्या भविष्याचे निर्णय घेतात. हे ऐकून पूराणी दोन अश्रू गाळते. बाहेर करटीना हृराजला परपोज करते. सगळे पालक आनंदात शादीची तारीख ठरवतात , सगाई आणि शादी दोन्ही लंडनमधे करायची ठरते. पण पूराणी दुःखी असल्याने आपल्याला 'आआआआआ' ऐकवत रहातात.

पुन्हा भारतातल्या चर्चमधे हृराज पूराणीला म्हणतो सगळ्यांना खरं सांगूया ही पुन्हा 'लईच लेट झाला, करटीना लैच एकटी हाय हे बरंबरं न्हाई' पालुपद सुरु ठेवते. दोस्तीवर एक प्रवचन होते , आपण दोस्तच राहू व त्याग करू हे पूराणी ठरवते. पण हृराजला हे पटत नाही , तो म्हणतो 'तुझ्या लव्ह खातर मीबी कुरबानी देणार पर तू माझ्या शादीच्या दिवशीच शादी करायची' . मगं एकाच मांडवात कुरबानी द्यायची ठरते. ही बळजबरी सगळी 'लोडा'च्या एन्ट्रीसाठी आहे. मगं पुन्हा थोडं दुःखी 'आआआआआआ' आहे. हे 'आआआआ' संपायच्या आत सगळी मंडळी लंडनला पोचतात. आपल्याला मात्र 'थ्री मन्थ्स लेटर' फलक दाखवतात.

आता सगळे दोन जिने असलेल्या महालासमोर हसत उभे आहेत. गोरे नोकर चाकर बघून सतिश शहा किरण कुमारला 'अरे, तू तर गोऱ्यांना नोकरीला ठेवलंस म्हणजे खरंच मोठा माणूस झालास' म्हणत अभिमानाची झप्पी देतो. गरीब प्रेक्षकांना महालाचा टूअर देतात. हृराज पूराणीला कुठे कुठे एकटं गाठून धमक्या देतो व एकाच मांडवात द्यायच्या कुरबानीची आठवण करून देतो. ही कुरबानी खरंतर प्रेक्षकांची आहे.

महालात सगाईची पार्टी आहे. सगाई की रस्मे चालू असताना हृराज पूराणीला harass करत रहातो. पण हे तर काहीच नाही , कारण लोड जिन्याच्या मधोमध तुणतुणं घेऊन आलेला आहे. विमानात पन्नास सिटांवर एक सीट फ्री असल्याने 'उचो'ला घेतले असेल , यश बाबा म्हणाले असतील, 'तुणतुणे तेवढे टाक ब्यागेत' ! लोड कुठेही कसाही फिरवला तरी काय , 'संयत' अभिनय सोडत नाही. लोड गातोय , ' सांवली सी एक लडकी, धडकन जैसे दिलकी, देखे जिसके वो सपने कहीं वो मै तो नहीं' , म्हणजे हायका 'जान ना पैचान , मै तेरा महेमान' , पूराणी त्याला प्रेक्षकांइतकंच टाळतेय. लोडाचे आईबाबाज् आणि नारदमुनी पालकांची ओळख होते. पूराणी लोडाच्या दोस्तीला नाही म्हणते. पण तो चिवट म्हणतो , 'दोस्ती तो तुम्हे करनी पडेगी' , नो मिन्स नो रे लोताळ्या ! बावळटपणाच्या तर-तम भावात चुरस लागलेली दिसत रहाते पण आपण स्टॉकहोम सिंड्रोम झाल्यासारखं बघत रहातो.

सगळे नाश्त्याला महालाच्या अंगणात बसलेले आहेत. लोड इथेही कडमडतो, त्याला पूराणीचं दिल जितायचं आहे. सगळे कौतुकाने दुरून बघतात, त्यांना एकटं सोडतात. लोड म्हणतो, ' तसा मी पोरींमधे लैच फेमस हाय पर मला तुझा फोटो बगून कुचकुच झालं' , मगं पूराणी कंटाळून दोस्तीचा शेकहँड करते, पालकचौकडी दुरून आनंदाने उड्या मारते. चौघंजणं पिक्चरला जातात. ड्राकुला दिसला की पूराणी हृराजला चिकटत रहाते. ह्यावरुन घरी आल्यावर तिला सगळे घाबरट म्हणून चिडवतात, लोड येऊन तिला मनवतो, दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू असं काही बाही म्हणतो व मी किती क्यूट व अडोरेबल आहे हे पूराणीकडून जबरदस्तीने वदवून घेतो .आता मात्र माझा मेंदू झिजायला सुरुवात झाली होती त्यामुळे मागेपुढे झाले असेल तर सांभाळून घ्या.

इकडे सगळे मॉलमधे...
करटीना पूराणीला सांगते ते इमेल मी केले नव्हते हे हृराजला कळायला हवं, पूराणी म्हणते "झालं गेलं गंगेला मिळालं, लेट्स कंटीन्यू द थापाज् ". पूराणीच्या आईला लोड जावई म्हणून खूप आवडतो. ती हृराजला पूराणीचा होकार मिळवायला सांगते. हृराज एकांतात पूराणीला कुजकट बोलत आईचा निरोप सांगतो , 'काय मगं करणार ना लग्न , आपल्याकडे काही अरेंज मैरिज होत नाहीत का म्हणून , किती दिलांना तोडणारेस आता , किती लपवालपवी करणारेस, आय डेअर यू... तुला लोडाशी लग्न करावं लागणारच आहे, नाहीतर मी सगळ्यांना खरं सांगतो की नै बघ' म्हणतो व पुन्हा भावनातिरेकाने चेहरा थरथरवतो.

पुन्हा पार्टी, सगळे आनंंदी महालात मेडली गाणी सुरू होतात आणि द्वयर्थी संवाद साधले जातात. ज्येनांना वयानुरूप 'उडे जब जब जुल्फे टाईप गाणी' दिली आहेत. महालात पाऊस सुरु होतो व पूराणीचा हात धरुन हृराज 'कुच कुच होता है ' गातो , असे आँखो ही आँखो मे इशारे होऊनही करटीनाला काही शंका येत नाही. आदल्या दिवशीच्या 'तमाशा'मुळे दुसऱ्या दिवशी पूराणी दबावाखाली येवून लोडाला होकार देते. पालकचौकडी एकाच मांडवात डोली उठवायचे ठरवतात. लोड आणि पूराणीची सगाईची पार्टी व पुन्हा रडकं गाणं आहे मी म्यूट करतेय.

रात्री रिकाम्या हॉलमधे ही चौघं 'स्पिन द बॉटल/ ट्रूथ ऑर डेअर' खेळतात. करटीना 'इमेल मी नै केले' हे सांगून टाकते. हृराज मज्जाक मधे 'मगं मी शादीपण पूराणीशी केली पाहिजे म्हणतो' ,आणि ढोल ऐकू येतात. दुसऱ्या दिवशी प्यार , दोस्ती, कुरबानी असं कैबै बोलतात. लोडाला शंका येते कारण पिच्चर संपत आलाय , हृराज काही तरी फालतू बोलून समजावतो. थोडं इंटेन्स-इंटेन्स खेळतात. हृताळ्या लोडाला म्हणतो , 'प्यार कुरबानी बी हाय' ! मगं तर लोडाची खात्रीच पटते.

दुसऱ्या दिवशी बकरी ईद असताना आदल्या रात्री बकऱ्या एकमेकांना कसे समजावतील तसं हृराज पूराणीला समजावतो व ' लग्न जाऊदे पण मुझसे दोस्ती करोगे' म्हणतो. मी इतक्या वेळा ऑक्सिडाइझ्ड कंगणाला तुच्छ लेखले त्याबद्दल एकवार माफी द्या , ते म्हणजे सिन्ड्रेलाचे काचेचे बूट + हमापकेहैकौनचा टफी होते व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यामुळे सिनेमा एकदाचा संपतो. लग्नाच्या गडबडीत ते कंगण बरोबर पूराणीला येतात आणि करटीना वेडेवाकडे तोंड करते. कारण तिला आता आयुष्यात स्वतःसोडून इतरांचा विचार करावा लागणारे.

अचानक 'राधेक्रिष्णा, राधेक्रिष्णा' भजन व मधे 'आआआआ' म्हणजे जे होतंय तो आपल्याला चमत्कार वाटावा, हृराजच्या तबकातून करंडा उडून कुंकू बरोबर पूराणीच्या मांगमधे पडते. नंतर चक्कर यावी एवढा कँमेरा फिरवतात. ती पुसायला जाते पण साध्या वेशभूषेतील करटीना येवून 'मला कसं कै कळलं नै' म्हणत मांग पुसू देत नाही.' मी एकटी नै, तुम्ही त्याग करु नका' म्हणते. तर हृताळ्या आता करटीनाला ,'मुझसे दोस्ती करोगे?' विचारतो, लोड म्हणतो आपण चौघे छान मित्र म्हणून राहू , म्हणजे हा एक एन्डलेस लूप झाला की....कुणीतरी कट्टी करुन संपवा एकदाचं , प्रेक्षकांनी तरी ! :फिदी:

#थोरतुझेउपकारकाकणा

©अस्मिता

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle