सूर्याकडे कधी डोळे बंद करून पाहिलंय. डोळे उघडे ठेवून बघता येतच नाही. पण डोळे बंद करून पहिला ना की आपण एका वेगळ्या विश्वात जातो. मस्त लाल केशरी रंग. डोळे बंद केले कि आपण तसही आपल्या जगात जातो आणि सूर्यासमोर ते जग इतक्या सुंदर आणि तेजाळलेल्या रंगाने भरलेलं असतं. गम्मत म्हणून कधीतरी करून बघा आणि तसेच डोळे बंद करून सूर्याकडे पाठ करा. जग निळाईनं भरून जातं. कृष्णाचा निळा रंग, आकाशाचा निळा रंग किती छान वाटतं. शांत समृद्ध अथांग.
डोळे बंद करून हे रंगखेळ पाहायची सवय हल्लीच लागली. पण हा खेळ मस्त आहे. वेगळ्या वेळी वेगळ्या प्रकाशात, वेगळ्या आकारात वेगळी अनुभूती देणारा. सूर्यासमोर फक्त केशरी रंगपटल बाकी काहीच नाही. आणि इतर वेळेस वेगळे रंग वेगळ्या आकृती. मन कस आहे त्यावर पण ठरणारे रंग. ध्यानधारणा करण्यासाठी हा एक क्षण फार महत्वाचा असतो. इकडे तिकडे भरकटणारं मन ह्या रंगावर आणलं कि थोडा स्थिरावत. नाही तर ध्यान ध्यानाने केलेलच असतं. किती आणि कसे विचार कुठून येतात ह्याचा पत्ता नसतो. खोल, उथळ आनंदी दुखी. करू नकोस किंवा करायचा नाही म्हटलं की सगळी शक्ती गात्र तिथेच का वळतात देव जाणे. असो…
तर डोळे मिटून दिसणाऱ्या रंगांविषयी आणि आकारांविषयी. छान खेळ आहे हा. लहानपणी काचांच्या तुकड्यांचा असायचा ना तसा, नुसते डोळे हलवायचे, प्रकाश बदलायचा आणि कॅलिडोस्कोप तयार, करून पहा कधीतरी.
खालिल ठिकाणी पुर्वप्रकाशित
https://wordpress.com/post/ugichach.wordpress.com/35