तेरडा
कोणे एके काळची गोष्ट वाटते ही आत्ता. जेव्हा आमच्या इमारतीच्या मागे जमीन होती मातीची. सगळ्याच अशा होत्या. घरासमोर चक्क तळ आणि मग डोंगर होता. आत्ता अशा जागेसाठी करोडो खर्च करायला तयार होतील लोक. आणि आम्ही सगळ्यात स्वस्त असा घर घेतलं होत. लास्ट इन बिल्डिंग kind . बाबा घरामागे चक्क बाग करत. जास्वंद, तगर, भेंडी भोपळा आणि कारलं. आणि नैसर्गिकरित्या यायचा तो तेरडा. एका गुलाबी किंवा राणी रंगाचा आणि मग हवे तितके रंग. शेजारची इमारत फार श्रीमंत वाटायची मला तेव्हा. एकतर तिथे पाणी तुंबायच पावसाळ्यात, म्हणून खेळायला मजा यायची. आणि तेरड्याची भरमसाठ रंग होते तिथे. हवा तो रंग. आत्ता कळतात तेव्हडी झाड तेव्हा नाही कळायची, पण तेरड्याची एक गम्मत होती. फक्त पावसाळ्यात जादूसारखा प्रकाटायचा आणि गणपती झाले कि फळ यायची हात लावली कि फुटणारी. जी जमिनीत जाऊन झोपायची पुढच्या वर्षी साठी.
मजा असायची हि फुल जमा करायची गणपती साठी. मस्त असतात हि फुलं कोमल पण ना कोमेजणारी. रंग इतके सुंदर आणि गालिच्या सारखी उगवणारी. हळू हळू सिमेंटची जमीन झाली आणि फुल गेली. मला आठवतंय जास्वंद तोडली गेली. ती बाबांनी कठड्या जवळ लावली. तेरडा मात्र गेला. मग भेटत राहिला प्रवासात मुंबई पुणे कोकणात. आणि मग प्रवास कमी झाला अन तेरडा विस्मरणात गेला.जो आता आठवला फेस बुक मुळे. लोक वेग वेगळ्या रंगाची फुलं टाकून विचारत होती सांगत होती हा तेरडा आणि पाकळी पाकळी उमलावी तश्या आठवणी येत राहिल्या.
कधी मोठी जागा घेतली कि नक्की तेरडा लावणार. सोय, सुशोभीकरण आणि कशा कशा साठी आपण सिमेंटच्या जमिनी बनवल्या आणि बदल्यात असा काहीतरी सुंदर गमावत राहिलो. पण विसरलो कि आपण निसर्गाचे भाग असतो आणि तो येन केन प्रकारें जिकणार आणि जिंकत असतो. अशा इच्छा आणि आशेसकट आपण शोधात आणि वाढत राहायचा. तेरड्या सारखे लुप्त झालो असे वाटताना अचानक बहरून यायचं