काझीरंगा - मेघालय दिवस २ - काझीरंगा सफारी

दिवस २ -

भारताच्या पूर्वेला असल्याने ४:३०-५ पासून उजाडायला सुरूवात होत होती त्यामुळे रोज ५ लाच उठून बसायचो. ६:३० ला जीप येणार होती.

काझीरंगामधे ४ रेंजेस आहेत - सेंट्रल, इस्टर्न, वेस्टर्न आणि बुर्हापहार

आम्हाला आधी २ हत्ती आणि १ जीप सफारी हव्या होत्या - त्या नाही मिळाल्या हे बरं झालं हे नंतर कळलं. आम्ही सेंट्रल आणि ईस्टर्न जीपने केल्या आणि वेस्टर्न हत्तीवरून.

सेंट्रल रेंज - गेंडे, जंगली म्हशी (wild buffalo), हरिणं, हत्ती दिसले. indian roller हा अतिशय सुंदर पक्षी ५-६ वेळा उडताना दिसला. आम्हा ७ जणांत २ दुर्बिणी होत्या. त्यामुळे छान बघता आले प्राणी-पक्षी.

काही फोटो देते -

genda1_0.jpeg

buffalo1_0.jpeg

सफारी ४० मिनिटांची वगैरे होती.सफारी आटोपून हॉटेलवर गेलो. नाश्ता उरकून जवळच ऑर्किड पार्क बघायला गेलो. तिथे १०-१२ कायमस्वरूपी प्रदर्शनं आहेत - ऑर्किड फुलं, आसामच्या संस्कॄतीची माहीती, कॅक्टस, एक अगदी पिटुकलं तळं वगैरे. २ सफार्याच्या मधे वेळ घालवायला हे केलेलं आहे असा अंदाज :) . थोडा वेळ घालवला तिकडे. एक बांबू हाऊस होतं त्यावर बरोबरचे कुटुंब चढले.

treehouse_0.jpeg

दुपारी १:३० ला जीप येणार होती त्यामुळे पुन्हा हॉटेलवर जाऊन खाऊन घेतलं. ही सफारी ईस्टर्न रेंजमधे होती. ही रेंज हॉटेलपासून १२ का काहीतरी किमी अंतरावर होती त्यामुळे लवकर निघालो होतो. इकडे एका वेळी २० च जीप्स अलाऊ करतात आणि प्रत्येक १-२ जीप्सबरोबर गन घेऊन वनविभागाचा माणूस देतात. आमचा जीपवाला (म्हणे) अनुभवी असल्याने त्याने पुढच्या जीपमधे गनधारी घेतला ( हे आमच्या नंतर लक्षात आलं नाहीतर आम्ही आग्रह धरला असता गनधारी हवा म्हणून.) गनधारी अशासाठी की इथले हत्ती तेवढे माणसाळले नाहीयेत. गन म्हणजे tranquilize करायलाच. ह्याच रेंज मधे वनविभागाच अस्तित्व खूप जाणवलं.

शिरल्या शिरल्या २ गरूड आणि घरटं दिसलं. indian roller तर सारखे दिसत होते. हा पक्षी नुसता बसलेला असताना नॉर्मलच दिसतो पण उडताना त्याचे रंग बघायचे.

eagle1_0.jpeg

eaglenest1_0.jpeg

dove_0.jpeg

ह्या रेंजमधे एका बाजूला नदी / तळं आणि एका बाजूला बर्यापैकी घनदाट झाडी होती. हरीण, गेंडा अगदी जवळून बघता आले. खर्या अर्थाने जंगलात गेल्यासारखं वाटल ते इथेच. एका ठिकाणी वॉच टॉवर होता तिथून नदीच्या पलीकडे भरपूर गेंडे, हत्ती, हरणं चरताना दिसली. खूप लांब होती. टीव्हीवर बघतो तसं प्रत्यक्ष डोळ्याने बघायला छान वाटलं. नदीच्या कडेला झाडं असतात त्यावर चढून ऊन खात बसलेली छोटी कासवं दिसली. दुर्बीण होती म्हणून नाहीतर ती दिसणं कठीण होतं.

थोडं पुढे एक गेंडा झाडीत चरत होता, २ प्लॅटफॉर्म मधे असतं तेवढ्या अंतरावर होता. जीपवाल्याने थांबवून बघू दिलं. आमच्या पुढच्या जीप्स ह्यावेळी पुढे गेल्या होत्या. नुकताच पाऊस पडून गेल्याने अजून एक रस्ता बंद आहे तर पुढे यु टर्न मारू असं जीपवाला म्हणाला. थोड्या अंतरावर त्या २ जीप्स समोरून आल्या तर त्यांच म्हणणं त्यांना वाघ दिसला. हा जो गेंडा आम्ही थांबून बघत होतो त्याच्या पुढे दाट झाडीत होता म्हणे आणि त्यांच्या जीपच्या चाहूलिने जंगलात गेला. हे संभाषण आसामी भाषेत पण टायगर शब्द ऐकल्यावर आम्ही कान टवकारले आणि आमच्या जीपवाल्याला पिडायला सुरूवात केली. गंमत म्हणजे समोरचा जीपवाला आणि आतली माणसं जणू कुत्रा किंवा मांजर दिसलाय त्यात काय एवढं असे भाव चेहर्यावर. आता परतीच्या प्रवासात आम्हाला एकच ध्यास - वाघ दिसला पाहीजे. जीपवाला म्हणाला पुन्हा दिसण्याची शक्यता कमी आहे कारण इतकं मोठं जंगल आहे, जीपचा आवाज आलेला असताना पुन्हा वाघ त्याच जागी कशाला येईल ? तरी आम्ही परतीच्या प्रवासात दोन्ही दिशांना डोळे फाडफाडून बघत होतो. आता गेंडा, हरीण अगदी आमचा आवडता indian roller कडे लक्ष न देता पट्टे दिसतात का ह्याकडेच सगळं लक्ष. अर्थात वाघ दिसला नाहीच. पण वाघाने आम्हाला बघितलं असेल अशी आपली आमची वेडी आशा. रेंज मधून बाहेर पडून हॉटेलवर पोचेपर्यंत वाघ दिसला असता इतक्या जवळ तर काय झालं असतं ह्याचं स्वप्नरंजन करत भरपूर हसून घेतलं.

मी आणि मैत्रीणवरची लीना -

we2.jpeg

दुसर्या दिवशी वेस्टर्न रेंज मधे हत्ती सफारीसाठी ६:३० ला निघायचं होतं आणि आल्यावर हॉटेल सोडायचं होतं. त्यामुळे आवराआवरी करून झोपलो.

दिवस ३

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle