मुक्काम शांतिनिकेतन : पु. ल. देशपांडे

 

Screenshot_20220603-041312_Gallery_0.jpg

      मी पुलंच्या पुस्तकांची पारायणं केलेली आहेत, तुम्हीही केलेली असतील. जावे त्यांच्या देशा, अपूर्वाई, पूर्वरंग, बटाट्याची चाळ , हे तर पाठ होते. नंतर एक शून्य मी , रेडिओवरील भाषणे व श्रुतिका, एका कोळियाने हेही दोनदोनदा तरी वाचलेले होते, पण साधारण दहा वर्षांपूर्वी मी त्यांच्या लेखनातून बाहेर पडले , आऊटग्रो झाले, माहिती नाही काय पण काही तरी झाले खरे !!!

      मग हे पुस्तक माझ्याकडे कसं आलं , का घेतलं , रवींद्रनाथांच्या आकर्षणातून घेतलं की पुलच्या की दोहोंच्या.... असो.  हे पुस्तक मला खूप आवडलं. आता लक्षात आलंय की पुलच्या विनोदी लेखनापेक्षा मला पुलंचे असे वैचारीक लेखन अधिक भावते, जवळचे वाटते कारण ते intrigue करते. विशेष म्हणजे हे लेखन कालातीत का काय म्हणावे तसे वाटले. तसं म्हणावं तर हे पुस्तकं ही एक दैनंदिनी आहे. पुलंनी रवींद्रनाथांच्या जबर ओढीने, संगीताविषयीच्या ध्यासाने, बंगाली भाषेबद्दलच्या आत्मियतेने व एकुणच Bengali Renaissance बद्दल थोडे फार जाणून घेण्याच्या आस्थेने, एक महिना शांतिनिकेतन येथे वास्तव्य केले होते.

    बंगाली भाषा व रवीन्द्रनाथांचे काव्य यांच्या ओढीचा वारसा त्यांना त्यांचे आजोबा, 'गीतांजली'चे भाषांतरकार वामन मंगेश दुभाषी ऊर्फ 'ऋग्वेदी' यांच्याकडून मिळाला. कुठलीही भाषा शिकायची तर ती जिथे जिवंत पिंडातून उमटत असते त्या ठिकाणी जाऊन, तिची नाना स्वरूपे अनुभवून व भोगून शिकायची असते अशी त्यांची धारणा होती. त्याप्रमाणे पहिल्यांदा १९७० साली ते तिथे गेले सालतालपाड्यासारख्या ग्रामीण भागात तसेच कलकत्ता शहरात हिंडले फिरले, त्याचे वर्णन 'वंगचित्रे' या पुस्तकात आहे. मी बहुतेक वाचलंय ते , पण आता अजिबात आठवत नाहीये. सात वर्षांनी पुन्हा पु.ल. बंगालीची उजळणी करण्यासाठी शांतिनिकेतनला गेले. १९७७ साली राजकीय परिस्थिती उग्र व वातावरण हिंस्र झालेले होते म्हणून त्यांना मोकळेपणाने हिंडता फिरता आले नाही, आणि महिनाभर शांतिनिकेतनात ठाणबंद झाल्यासारखे राहावे लागले. त्याकाळात त्यांनी टिपलेल्या नोंदी, रवीन्द्रनाथांपश्चातचे शांतिनिकेतन तसेच रवीन्द्रसंगीत या सर्वाचा अतिशय प्रामाणिक लेखाजोखा या दैनंदिनीच्या स्वरूपात मांडलेला आहे.

  या पुस्तकाच्या पहिल्या अर्ध्या भागात दैनंदिनी आणि स्वाध्याय व दुसऱ्या अर्ध्या भागात उतारे, पत्र, लेख असे याचे ढोबळ स्वरूप आहे. पुलना बंगाली भाषाप्रभुत्त्व होते हे त्यांनी केलेल्या रवीन्द्रनाथांच्या कविता, पत्रे व बालगीतांच्या स्वैर भाषांतरावरून लक्षात येते. त्यांचे हे बंगाली भाषेवरील प्रेम व प्रभुत्त्व बघून रवीन्द्रनाथांचे आप्त श्री गौरकिशोर दास यांनी कौतुकाचे पत्रही लिहीलेले होते. यात ते शांतिनिकेतनच्या सर्व शिक्षकांना व या संस्थेचा कार्यभाग बघणाऱ्या सर्वांना भेटले. या सगळ्यांतून ते रवीन्द्रनाथांचाच शोध घेत होते असे वाचताना जाणवते, पण राजाच्या माघारी प्रजा जशी पोरकी होते तशी शांतिनिकेतनची अवस्था व त्याबद्दल त्यांना वाटणारी हळहळ या पुस्तकात पदोपदी जाणवते. पण तरीही त्यांनी नीरक्षीरविवेकाने रवीन्द्रनाथांच्या  साहित्याचा कणनंकण वेचला आहे. रवीन्द्रसंगीताबाबत ते अतिशय निराश वाटलेत, त्याचा दोष तिथल्या शिक्षकांची संगीताबाबत असलेली rigidity , वेळेवर मिळणारा उत्तम पगार आणि बंगालबाहेरील संगीताविषयीची पूर्ण अनास्था हे ही सांगितले आहे.
  
   प्रचंड गर्मी, डासांचा उद्भव, दिवे जाणे याचा त्रासीक उल्लेख दैनंदिनीत वारंवार येतो, याचा त्यांना निर्मितीवर परिणाम होण्याइतका त्रास झाला. त्याहीपेक्षा बंगाली लोकांना स्वतःच्या हक्कांच्या बाबतची उदासीनतेचे त्यांना आश्चर्यमिश्रीत दुःख वाटले. वेळोवेळी त्यांनी त्यांच्या आप्तमित्रांना व सुनिताबाईंना पत्रेही लिहीलेली आहेत , सुनिताबाईंच्या पत्रांची ते आतुरतेने वाट बघायचे असेही जाणवले. खरं म्हणजे त्यांचा व आपल्यासारख्या वाचकांचा 'भ्रमाचा भोपळा' वेळोवेळी फुटला आहे. पण 'जे आहे ते असं आहे' आणि आता यातूनच जे काही चांगलं शेष असेल ते आपल्याला वेचायचे आहे असा हा तटस्थ प्रवास आहे. काही वेळा ते 'मी आणि माझा रवींद्रनाथ' मला दुसरं कोणी नको या झोनमधेही जातात व त्यांच्यासोबत आपणही जातो. द्वारकानाथ टागोर - रवीन्द्रनाथांचे आजोबा हे धडाडीच्या व उपभोगाच्या सर्व मर्यादा ओलांडून गेलेले होते, पण देवेंद्रनाथ - रवीन्द्रनाथांचे वडील हे ब्रह्मतत्वाच्या साक्षात्कारात गढलेले , या भोगी-योगी दोन्ही टोकांमधला समान पण उदात्त synthesis रवीन्द्रनाथांमधे पुलंना आढळतो व भावतो.

   काही मूळाक्षरांच्या कवितांची भाषांतरे

क चा काय सुरेख थाट, उभा कटीवर ठेवून हात
ख ला झाला खोकला, खोकून खोकून थकला
ग सांगे लवकर या , घरात आला गणराया
:

:
:

इच्छा

रोज वाटे एका फुला
कधी उडता येईल मला ?
हवं तिथं जाता येईल
भारी भारी मज्जा होईल
पाकळी पाकळी लागता पसरू
फूलंच झालं फुलपाखरू
इकडून तिकडे उडत जाता
कोण त्याला अडविल आता
:
:

अशी ही अनुवादित बालकविता, जी मूळची मराठी वाटावी इतकी जमलीये.

लोकगीत-(वात्रटिकेसारखे)

पाऊस पडतो टापूरटुपूर
नदीला आला पूर
तीन पोरींशी लगीन करतो
बामण शिव ठाकूर.
एक बायको रांधायला लागते
बसून खाते दुसरी
जेवल्यावाचून बापाच्या घरी
निघून गेली तिसरी.

नाट्यशेष
दूरवरच्या भूतकालाच्या चेहऱ्याकडे पाहिलं
फडफडातले दिसले फिरते नट
ओळखतो मी त्या सर्वांना
आठवतात सर्वांची नावं
आण पश्चिमेच्या संध्याप्रकाशात जाणतो मी त्यांच्या सावल्या.
नेपथ्यलोकातून नटरूपाने ते सोंगं सजवून येताहेत
जीवनाच्या त्या अन्तहीन नाट्यात.
दिवसामागून दिवस आणि रात्रीमागून रात्री गेल्या त्यांच्या
आपापल्या ओळी म्हणण्यात आणि आपापल्या भूमिका वठवण्यात,
त्या अदृष्ट सूत्रधाराच्या आभासानुसार
आदेशानुसार रंगवीत आले आपापली नाटकं
कधी आसूं ढाळीत-कधी हांसू फुलवीत
नाना ढंगांनी नाना रंगांनी
शेवटी संपलं नाटक.
............

स्फुट

'दुई बोन' म्हणजे(रवीन्द्रनाथांच्या मनातील) 'स्त्री' ची दोन रूपे:
विश्वातल्या कामना राज्याची राणी जिचे वर्णन मला 'Aphrodite' या ग्रीक कामदेवतेशी मिळतेजुळते वाटले. दुसरी साधारण जगन्मातेसारखी वाटली, यात ती निसर्गाशी व सृष्टीशी ,सृजनाशी असलेल्या संबंधांचे द्योतक असं सांगितलेले आहे.

संगीत
हिंदुस्तानी संगीतात साहित्य हे संगीताशी फारकत घेऊन वागतं पण पुलंच्या आयुष्यात आणि बंगाली संस्कृतीत या दोन्हीचा साधारण एकच प्रवाह आहे, त्याची अभिव्यक्तीही एकवटून होते. रवींद्रनाथांच्या मते सृष्टीतल्या सर्व स्थित्यंतरात जे सौंदर्य आहे त्यात एक नशा आहे, पण जे त्या सौंदर्यात बुडून जाऊ शकत नाहीत तेच ह्याला इंद्रियांची चैन पुरवणारे साधन म्हणून अव्हेरतात, पण ज्यांनी यातल्या अनिर्वचनीय अशा जाणीवेचा आस्वाद घेतला आहे तेच जाणतात की हे इंद्रियांच्या परमसामर्थ्याच्या पलीकडलं आहे, यात नुसती इंद्रिये नव्हे तर पूर्ण अंतःकरणाने प्रवेश केला तरी याच्या व्याकुळतेचा अंत लागत नाही. सूर्यास्त, सूर्योदय, चंद्रास्त,चंद्रोदय,  पद्मानदीकाठचा परिसर, शांतिनिकेतनचे प्रत्येक झाडझुडूप, वसंत ऋतूतले चांदणे, त्यांच्या 'पेनेटी' बागेत घालवलेले दिवसदिवस या सर्वांवर त्यांचे फारफार प्रेम आहे.

व्योम
आकाशे तोमार सहाह उदार दृष्टि
माटिर गभीरे जागाय रूपेर सृष्टि
तव आह्वाने एइ तो श्यामल मूर्ति
आलोक अमृते खुँजिछे प्राणेर पूर्ति ।

दियेछो साहस ताइ तव नीलवर्णे
वर्ण मिलाय आपन हरित पर्णे
तरुतरुणेर करुणाय करो धन्य
देवतार स्नेह पाय जेनो एइ वन्य ।

रवींद्रनाथांची पत्रे
बहुतेक पत्रं कादंबिनी दत्त यांना लिहिलेली आहेत, त्या लौकिकार्थाने उच्चशिक्षिता नव्हत्या, लग्नानंतर फार लवकर आलेल्या वैधव्याने त्यांना तत्वज्ञानविषयक वाचनाचा ओढा निर्माण झाला. रवीन्द्रनाथांची 'राजर्षि' वाचून त्या प्रभावित झाल्या होत्या. त्यांची ईश्वरविषयक जिज्ञासा आणि बुद्धिमत्ता रवीन्द्रनाथांना आकर्षून गेल्यामुळे तीस वर्ष त्यांच्यात पत्रव्यवहार होता. ही सगळी पत्रं अतिशय आध्यात्मिक आहेत, त्याबरोबरच आपल्या धर्मातल्या मूर्खपणावरही भाष्य करतात. यांत वेदनेतून येणाऱ्या निष्ठेवर, तेजावर केलेली संवेदनशील देवाणघेवाण आहे. ही दोघं कधीही भेटली नव्हती(बहुतेक), तरीही हा संवाद खूपच प्रामाणिक व उत्कट वाटतो.

   रवींद्रनाथांनी त्यांच्या पुतनीला लिहिलेली जवळजवळ अडीचशे पत्रं पुलंनी वाचली, याचा थोडा सारांश पुलंनी लिहिलाय. त्या वेगवेगळ्या पत्रांमधून जीवनातल्या क्षणाक्षणाला जपणारा, त्यांच्याकडे संवेदनशील मनाने बघणारा, जीवनातल्या चैतन्याइतकाच जडाशी गुंतलेला आणि चिरंतनाइतकेच तात्कालिकाला महत्त्व देणारा 'रवीन्द्रनाथ' हा माणूस वाचकाला भेटत रहातो.

    शरतचन्द्र चट्टोपाध्याय('देवदास' या कादंबरीचे लेखक) यांच्या सोबत असलेल्या मैत्रीचा व नंतर एका भाषांतरावरून आलेल्याचा दुराव्याचाही उल्लेख आहे. 'जन गण मन' या आपल्या राष्ट्रगीताच्या निर्मितीसंदर्भात झालेल्या मतमतांतरांचाही उहापोह केला आहे.

    इंग्रजांविषयीचा रवींद्रनाथांना असलेला राग व साहेबांचे हांजीहांजी करणारे देशातले बुद्धिमंत यांची भर परिषदेत 'मला गायला सांगू नका' या ओळी असलेली कविता गाऊन केलेली फजिती व त्या संदर्भातील प्रसंगांच्या रंजक नोंदी आहेत. ज्याची आचरणातून प्रचिती येत नाही असा धर्म व भाषणात अडकून पडलेली देशभक्ती त्यांना मान्य नव्हती.
 
  कलानिर्मिती विषयी त्यांनी सुरेख दृष्टांत दिलेला आहे, "लाकूड आहे, फुंकरही आहे, पण ज्यामुळं ते सारं लाकूड पेटून उठतं तो आगीचा एवढाचा स्फुल्लिंग नाही. लाकडं चार ठिकाणांहून गोळा करता येतात पण तो अग्निकण स्वतःच्या अंतरातच असावा लागतो. तो नसला तर सारं व्यर्थ आहे ."

पुलंना शांतिनिकेतनातल्या मुलामुलींनी निरोप देताना गायलेलं गाणं

शरते आज कोण अतिथि एलो प्राणेर द्वारे
आनन्दगान गा रे हृदया आनन्दगान गारे..
.......
आनन्दगान गा रे हृदया-आनन्दगान गा रे..

शोमाप्त
पुलंनी हे पुस्तक लिहिताना कमीतकमी स्वत्व उतरावे अशा स्वरूपात मांडले आहे.
या दोन्ही विभूतींच्या मधे येण्याचे धाडस माझ्याकडे नाही. मीही केवळ त्यांनी रवींद्रनाथांना वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य आणले आहे.

अस्मिता

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle