मी सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करत असलेल्या सिनियर केअर होममध्ये आज एक नवीन जर्मन आज्जी दाखल झाल्या. वय वर्ष 98. डोळयांनी पूर्णपणे अंध. आज त्यांचा इथे पहिलाच दिवस असल्याने त्यांचे स्वागत करून त्यांना माझ्या कामाच्या स्वरूपाबद्दल माहिती देऊन आज थोडक्यात संभाषण आटोपून उद्या सविस्तर बोलावे, असे ठरवून मी त्यांना भेटायला गेले.
कृश शरीरयष्टी असलेल्या या आज्जींचे संस्थेत स्वागत करून त्यांना मी इथे काय करते, हे सांगताच, त्या एकदम खूष झाल्या आणि दिलखुलास हसत मला म्हणाल्या, मी 98 वर्षांची आणि माझा नवरा 80 वर्षाचा. उद्या तो मला भेटायला येईल, तेंव्हा तो माझा मुलगा आहे असा तुमचा गैरसमज होऊ नये, म्हणून आधीच सांगून ठेवते.
त्या बरोबर माझ्या दिशेने पाहून बोलत असल्याने मी त्या अंध असल्याचे साफ विसरून गेले होते. माझ्या जर्मन बोलण्याच्या पद्धतीवरून त्यांना मी परदेशी व्यक्ती असल्याचे समजले असणार. त्यामुळे त्यांनी मला मी कुठली, हे विचारले. मी भारतीय, हे सांगितल्यावर त्यांनी मला त्यांना इंग्रजी बोलता येते आणि फ्रेंचही येते हे सांगितले आणि त्यानंतरचे पुढचे सगळे संभाषण त्यांनी इंग्रजी मिश्रित जर्मनमध्ये केले.
इतक्या भाषा कुठे शिकलात, असे विचारल्यावर मी जर्मन सरकारी कर्मचारी होते, आणि मी खरं म्हणजे हे तुला सांगणे योग्य की नाही माहीती नाही पण आता इतक्या वर्षांनी त्याने काही फरक पडेल, असे वाटत नाही, असेही पुढे म्हणाल्या.
तुम्ही नक्की कोणत्या स्वरूपाचे काम करायचात, असे विचारल्यावर वेगवेगळ्या देशातील लोकांशी संपर्काचे आणि दुभाषिकांचे काम करायचे, हे त्यांनी सांगितले. त्यांच्या वडिलांनी म्हणे त्यांना लहान असतांनाच इंग्रजीचा प्रायव्हेट क्लास लावला होता, त्यामुळे त्यांचे इंग्रजी शाळेतल्या इतरांपेक्षा कायम सरस असायचे. भरपूर भाषा शिकणे अत्यावश्यक आहे, असे ते म्हणत, हे ही त्यांनी सांगितले.
वडील काय करायचे, हे विचारल्यावर त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक ज्यूंना समुद्र मार्गाने जहाजाद्वारे ट्रान्सपोर्ट करत वाचवले, हे सांगितले. अशा 3 बोटी यशस्वीरित्या सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्यानंतर चौथ्या बोटीवर रशियन सैन्याचा बॉम्ब पडला आणि वडील समुद्रातच मृत्यमुखी पडले, असे सांगितले. मी गेले की माझ्या अस्थी समुद्रातच विलीन व्हाव्या अशी माझी शेवटची इच्छा आहे. आता मी लवकरच जाईन आणि माझ्या बाबांना समुद्रात भेटेन, असे म्हणाल्या. मग माझे बाबा, माझे लाडके बाबा, असे म्हणत त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
मग, तुला पुतीन आवडतो का? असे मला विचारले. नाही, तो कोणाला कसे आवडू शकतो, असा मी प्रतिप्रश्न केल्यावर आत्ताच्या युद्धजन्य परिस्थितीविषयी त्या बोलायला लागल्या.
मग मी वातावरण हलके करायला तुम्ही तुमच्या मिस्टरांना कसे भेटलात, हे विचारल्यावर त्यांनी वडील पूर्वी इन्शुरन्स कंपनीत काम करायचे, तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये हा मुलगा भेटला आणि प्रेमात पडला हे सांगितले. तुमच्या वयात 18 वर्षांचे अंतर असतांना कसा संसार झाला, हे विचारल्यावर माझ्या नवऱ्याला खूप त्रास झाला. गेल्या कित्येक वर्षांपासून तो माझी सुश्रुषा करतो आहे, याचा मला त्रास होतो, आज मी इथे आणि तो घरी.. मात्र त्याने खूप आनंदाने माझ्यासोबत 60 वर्षं संसार केला, असे म्हणाल्या.
माझ्या फॅमिलीचे फोटो त्यांना दाखवायला फोन त्यांच्यासमोर नेला, तेंव्हा त्या म्हणाल्या, अगं, मला दिसत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून.. मी त्या अंध असल्याचे पुन्हा एकदा साफ विसरून गेले होते.
5 मिनिटे बोलू म्हणता म्हणता आज्जींसोबत जवळपास 40 मिनिटे गप्पा झाल्या.
मी त्यांना भेटायला आल्याबद्दल त्यांनी मनापासून माझे आभार मानले आणि मी उद्या पुन्हा भेटेन, हे सांगितल्यावर तुझी माझ्या मुलीसोबत आणि नवऱ्यासोबत उद्या भेट होईल. नक्की ये भेटायला, असे सांगून त्यांनी माझा निरोप घेतला.
सकीना वागदरीकर-जयचंदर
07.07.2022
आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉगची लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com