2021 साली आमच्या लग्नाला वीस वर्षे पूर्ण होणार होती. त्यानिमित्ताने लडाखची ट्रीप अरेंज करावी अशी खूप इच्छा मनात होती...प्लान करायलाही घेतले होते आणि तेवढ्यातच दुसऱ्या कोविड वेव्हने घात केला - ती ट्रीप मनातच ठेवावी लागली
हे वर्ष सुरभिच दहावीचं असल्यामुळे वर्षभरात काही लडाख ट्रीप शक्य नव्हती शेवटी तो प्लान बारगळला
सुरभिची दहावीची परीक्षा एप्रिल मध्ये संपेल आणि त्यानंतर एक मोठी ट्रिप करू असा विचार होता - सुरभीच्या चॉईसनुसार इजिप्तला जायचं घाटत होतं मात्र दैव गती वेगळीच असणार होती सुरभिची दहावीची परीक्षाच मुळी मे १९ पर्यंत चालली...
तिचे अकरावीचे क्लासेस पाच जून पर्यंत सुरू होणार होते त्यामुळे आम्हाला मधले बरोबर दहा-बारा दिवसच फिरायला वेळ होता
मे महिन्याचा शेवटचा आठवडा असा काळ बघता भारतात कुठेही फिरणं कठीण होतं. तिसरी वेव्ह येणार अशी अफवा उठलेली असताना भारताबाहेर फिरायला जायला भीती वाटत होती त्यामुळे परत आमचा मोर्चा हिमालयाकडे वळला.
लेह माझ्या मनात खुसफुसत होतंच त्यामुळे हिमालयात जायचं तर लेहलाच जाऊ असा विचार केला आणि पुनश्च हरी ओम असं म्हणत लेहचं प्लॅनिंग सुरू केलं
गेल्या दोन अडीच वर्षात झालेली शारीरिक आणि मानसिक धावपळ बघता खूप दगदगीचा प्लॅन आम्हाला तिघांनाही नको होता मात्र कुठल्याही ठिकाणी जायचं आणि फक्त रिसॉर्ट वर आराम करायचा यात आम्हाला कुणालाच मजा येत नाही त्यामुळे आराम आणि फिरणं याचं योग्य समतोल साधणारा बेत करणं हे एक मोठं आव्हान होतं
साधारण प्लॅन मी ठरवला तो बारा तेरा दिवसात श्रीनगर होऊन चढत जाणं आणि मनालीला उतरणे असा होता मात्र यामध्ये आराम फारसा होत नव्हता म्हणून मग लेहला मुंबईहून डायरेक्ट फ़्लाईट घेऊन जावं का असा विचार मनात यायला लागला... मात्र डायरेक्ट फ्लाईटने जाताना त्रास होतो असं वाचलेलं डोक्यात होतं ... काय करावं काही सुचत नव्हतं
एकाच दिवसात खूप मोठे मोठे प्रवास हा लेहच्या ट्रिप मधला एक त्रासदायक अनुभव होऊ शकतो तो टाळण्यासाठी मला दिवसाचे छोटे छोटे तुकडे करायचे होते. नुब्रा व्हॅलीतून Pangong लेक ला जातानाना मध्ये कुठे थांबता येईल? असं शोधताना शायोक (Shyok)रिव्हर लॉज या एका छोट्याशा जागेविषयी वाचलं - त्याच्या मालकाशी संपर्क केला असता तो म्हणाला अग सध्या माझं लॉज बंद आहे पण तुला इंटरेस्ट असेल तर लेह साठी ओव्हरऑल इटर्नरी मी करून देऊ शकतो.
इतक्या डोंगराळ भागात फिरताना कोणी ओळखीचा एजंट असेल तर धावपळ बरीच कमी होते हे मागच्या स्पिटि ट्रिप मध्ये अनुभवलेलं असल्यामुळे मी अशा अनुभवी मात्र तरीही माझ्या मनाप्रमाणे प्लॅन करणाऱ्या एजंटच्या शोधात होते
बऱ्याच गप्पा मारल्यानंतर या माणसाचे आणि आपले प्रवास करण्याचे फंडे जुळतात असे लक्षात आल्यामुळे त्याला इटर्नरी करायला सांगून माझी दगदग मी कमी केली
लमायुरू, लेह गाव, खारदुंगला,नुब्रा व्हॅली (यातही तुरतूक पर्यंत जायचं आणि तिथे राहायचं असं फार मनात होतं), पॅंगॉंग लेक, झो मोरिरी जमलं तर हॅनले आणि सरचू अशी मोठी लिस्ट मनात होती
मात्र ही टीप थोडी रमत गमत करायचं मनात असल्यामुळे शेवटी यातली बरीच ठिकाण गाळली यान बरोबर बऱ्याच चर्चा करून झाल्यानंतर फायनल इटर्नरी तयार केली ती अशी
असा साधारणपणे साडेसातशे आठशे किलोमीटरचा पल्ला आम्हाला दहा-अकरा दिवसात गाठायचा होता म्हणजे कोणत्याच एका दिवशी 70 80 किलोमीटर पेक्षा जास्तीची धाव नव्हती
हिमालयातले रस्ते, ट्राफिक जामची शक्यता आणि अध्ये मध्ये फोटो काढायला थांबण्याची आमची खोड असं सगळं लक्षात घेऊन दिवसाला तीन चार तासापेक्षा जास्तीचा बेत केला नव्हता
तयारीतला अजून एक मोठा महत्त्वाचा भाग म्हणजे सामान काय पॅक करायचं आणि तब्येतीची काळजी कशी घ्यायची
सामान काय न्यावे
1- थंडीप्रमाणे कपडे- वाऱ्यामुळे थंडी जास्ती वाजते तेव्हा आपल्याला वाटतं त्यापेक्षा थोडे जास्तीचे गरम कपडे, कान बांधण्यासाठी कान टोपी आवश्यक फक्त स्कार्फ ची असेल आणि तो घट्ट बांधला नाही तर हवा आत जाऊ शकते. हातमोजे सुद्धा उपयोगाला येतात - फोटो काढाय हौस असेल तर टच स्क्रीन वापरू शकणारे हात मोजे मिळतात मला स्वतःला ते प्रकरण गैरसोयीच वाटत असल्यामुळे मी नेहमीच हातमोजे घालणे घाल णे आणि फोटो काढण्यापुरते कुडकुडत हात मोज्यातून बाहेर काढले :)
2 - चालायला सोपे असे आणि बंद स्पोर्ट शूज- बऱ्याच बायका हिरॉइन प्रमाणे हिल्स घालून आलेल्या मी पाहिल्या पाय घसरून पडण्याची बरीच मोठी शक्यता यामुळे निर्माण होते शिवाय पाऊल उघडं पडणारे सॅंडल असतील तर थंडी वाजते
3 - सकाळी कुडकुड थंडी वाजते आणि ऊन पडलं की उन्हामुळे थंडी कमी होते असा अनुभव नेहमी येतो त्यामुळे एकावर एक चढवता येतील आणि आयत्या वेळा काढता येतील असे कपड्यांचे लेयर किंवा थर करणं सोपं जातं ( बहुतेक वेळा मी आत एक स्लिप वर एक पातळ शर्ट त्यावर जाड टी शर्ट असं कॉम्बिनेशन सकाळी करत असे त्यामुळे थंडी वाजली तर यावर जॅकेट घालता येतं उकडलं तर एखादा टी-शर्ट सहज काढता येतो)
4- जीन्स किंवा ट्राउझर सैल घालायची सवय असेल तर हवा जाऊन थंडी वाजते अशावेळी आत पातळ स्लॅक्स घालणं फायद्याचं ठरतं- जाड थर्मल स्लॅक्सची गरज मला तरी वाटली नाही
5- थंडी असली तरी ऊन चिकार असतं तस्मात सनस्क्रीन कडे दुर्लक्ष न करणे. ओठ आणि त्वचा सुद्धा खूप फुटतात त्यामुळे लिप बाम / व्हॅसलिन बरोबर ठेवणे
6 - मोठ्या फ्रेमचे गॉगल्स वाऱ्यापासून आणि उन्हापासून वाचवायला उपयोगी पडतात
इलेक्ट्रॉनिक्स
1- मोबाईल फोन आता लडाखमध्ये जवळपास सगळीकडे चालतात त्यामुळे तुमच्या ग्रुपमध्ये प्रत्येकाकडे फोन असेल तर संपर्क साधणं सोपं जातं- जिओ आणि बीएसएनएल जवळपास सगळीकडे चालतात एअरटेल आणि वोडाफोन मात्र लेह बाहेर अजिबात चालत नाही
२- थंडीमुळे फोन आणि कॅमेरा दोन्ही लवकर डिस्चार्ज होतात त्यामुळे मेमरी बँक बरोबर बाळगणं फायद्याचं ठरतं - ही मेमरी बॅग अजिबात चेकिन लगेज मध्ये ठेवू नका तुमची बॅग एरपोर्टवर मागे ठेवली जाईल. मेमरी बँक केवळ हॅण्ड लगेज मध्ये ठेवणं कायद्याने अनिवार्य आहे
3- प्रत्येक रिसॉर्ट मध्ये इंटरनेट कनेक्शन किंवा वाय-फाय हा भाग फक्त लेह सिटीत असतो त्यामुळे तुम्हाला इंटरनेट हवं असेल तर जिओचा डोंगल बाळगणे किंवा फोनच्या डेटावर अवलंबून राहणे हे दोनच पर्याय असतात- जिओ डोंगल जवळपास सगळीकडे चालत होतं तुरतुक आणि Pangong सोडून
3- जवळपास सगळ्या हॉटेल्स मध्ये चार्जिंग क्लब एक किंवा दोनच असतात बऱ्याचशा वेळेला ते आपल्या बेडच्यापासून लांबही असतात त्यामुळे भरपूर प्लग पॉइंट असलेली आणि लांब लचक वायर असलेली एक्सटेन्शन कॉर्ड बरोबर बाळगणं अतिशय फायद्याचं ठरतं
4 फोटोग्राफीची हौस असेल तर कॅमेरा बरोबर बाळगा नाहीतर मोबाईल ने उत्तम फोटो निघतात:))
औषधं
1- लेह गावाच्या बाहेर फार्मसी मिळणं तसं कठीण आहे त्यामुळे लागणारी औषध बरोबर बाळगावी, यात sanitary pads आवर्जुन भरावी ती बाहेर पटकन मिळत नाही
2- उन्हामुळे डोकं दुखणं खाण्याच्या वेळा बदलल्यामुळे ऍसिडिटी होणं / बाहेरच्या पाण्यामुळे पोट बिघडणं हे प्रकार कॉमन आहेत त्याची औषधे बरोबर ठेवावी
3- काही रोजची घेतली जाणारी prescribed औषध असतील तर प्रीस्क्रिप्शन आणि औषध एकत्रच बरोबर ठेवावीत विमानात प्रीस्क्रिप्शन चेक होण्याचा प्रकार आमच्याबरोबर झाला
4- खूप उंचीवर गेल्यामुळे हवा विरळ असते काही लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो हा त्रास कमी होणं किंवा टाळणं यासाठी डायमॉक्स नावाची गोळी प्रवासाच्या आधी दोन दिवस पासून सुरुवात करून संपूर्ण प्रवासात रोज दोनदा याप्रमाणे घेता येते मात्र या गोळीचे काही साईड इफेक्ट्स आहेत आणि त्यामुळे ती गोळी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय अजिबात घेऊ नये. आमच्या डॉक्टरशी बोलून आम्ही तिघांनीही ही गोळी रोज दोनदा घेतली होती.
4- बरोबर कापूर ठेवावा कापराच्या तीव्र वासामुळे श्वास घ्यायला थोडी मदत होते. मात्र कापूर ज्वालाग्रही असल्यामुळे विमानातून नेता येत नाही तो लेह गावात गेल्यानंतर तिथे विकत घ्यावा. सहज मिळतो
5- बरोबर थोडं खाद्य तेल किंवा खोबरेल तेल ठेवा- सांड लवंड होण्याच्या भीतीने विमानातून तेल न्यायचं नसेल तर लेह गावात तेलाचे चिमुकले सॅचेटस मिळू शकतात - थंडीमुळे नाकाची आतली त्वचा खूप कोरडी होते आणि नाकातून रक्त येण्याचा प्रकार होतो त्या वेळेला अगदी पुसटसा तेलाचा हात नाकपुडीच्या आतून लावल्यास नाकातून रक्त येण्याचा प्रकार थांबतो
6- AMS किंवा Altitude Mountain Sickness हा अगदी खरा प्रकार आहे दुर्लक्ष केल्यास जीवही जाऊ शकतो
यासाठी लेहगावात पोहोचल्या पोहोचल्या दोन दिवस आराम करायला सांगतात, त्यानंतरही श्वास घ्यायला जरा जरी त्रास होत असेल तरी दुर्लक्ष न करता थोड्या खालच्या जागी जाणे आणि डॉक्टरची मदत घेणे अतिशय आवश्यक आहे- लक्ष ठेवण्यासाठीची ठराविक लक्षण म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे/ न थांबणारी डोकेदुखी/ काहीही कारण नसताना अचानक दमायला होणे झोप येणे अशी आहेत
खाऊ पिऊ
1- लांबच्या रस्त्याने प्रवास करताना मध्ये मध्ये आपल्या मनासारखा खाऊ मिळेलच याची अजिबात खात्री नसते - बरोबर थोडे तहान लाडू भूक लाडू ठेवावेत
2- थंडीमुळे तहान लागत नाही मात्र काळजीपूर्वक पाणी न प्यायल्यास डीहायड्रेशन नक्की होतं- त्यामुळे रोज बरोबर पाणी असावं.. बरोबर लहान मुलं असतील तर ज्यूस किंवा मँगोला सारखी सरबत बाळगावीत- पेप्सी किंवा कोक सारख्या एरेटेड ड्रिंक्स मुळे डीहायड्रेशन अजून होतं हे लक्षात ठेवावं
3- पटकन ताकद येईल असे गोड खाण्याचे पदार्थ लाडू चिक्की सुकामेवा वगैरे आवर्जून बरोबर बाळगावीत
4 - बऱ्याचशा ठिकाणी जेवायला ऑप्शन अतिशय कमी असतात- अशाच चवीचे लागतं असे चवी ढवीचे आग्रह असलेली कोणी मंडळी बरोबर असतील तर थोडी चटणी किंवा लोणचं बरोबर ठेवणं सोयीचं जातं