दिवस दोन :: २४ मे २०२२ :: लेह च्या आजूबाजूला
आदल्या दिवशी झोपताना दमलो होतो पण कुणाला धाप वगैरे काही लागत नव्हती
आजच्या दिवशी गावातल्या गावात आजूबाजूला फिरता येण्यासारखी स्थळं पाहण्याचा विचार होता अर्थात तिघांच्याही तब्येती चांगल्या असतील तरच
झोपेतून उठलो तो हा एवढा सुंदर नजारासमोर होता... जगातल्या समस्त टीन एजर्स प्रमाणे सुरभिचं पण आई दोन मिनिटात उठते ग चालू असल्यामुळे आम्ही गॅलरीत बसून निवांत समोरचा देखावा बघत राहिलो..
आता सगळ्यांच्या तब्येती उत्तम असल्यामुळे थोडफार फिरायला हरकत नाही यावर शिक्कामोर्तब झालं... “ये बाबा आता तू आम्हाला फिरवायला” असं साकडं आमच्या ड्रायव्हरला घातलं आणि तयारीला लागलो
पहिल्यांदा थिकसे मॉनेस्टरी किंवा लढाखी भाषेत थिकसे गोम्पा बघायचा प्लॅन होता. आता पुढच्या प्रवासात अशा अनेक गोम्पा बघायचा योग येणार होता मात्र ही पहिलीच गोम्पा आम्ही बघत असल्यामुळे खूप उत्सुकता होती
पोटभर नाश्ता करून निघालो आणि रस्त्याला लागल्यावर एक पहिलीच गोष्ट जाणवली ती म्हणजे आजूबाजूला असलेलं विस्तीर्ण वाळवंट... गंमत म्हणजे याच वाळवंटात मध्ये मध्ये जमिनीचे हिरवेगार तुकडे दिसत होते
ड्रायव्हरशी गप्पा मारताना कळलं की डोंगर माथ्यावरून खाली येणारा एखादा झरा गावाकडे वळवून त्यावर छोटे छोटे बंधारे बांधून गावकरी शेती करतात त्यामुळे असा मधलाच भाग हिरवागार दिसतो...
डोंगरमाथ्या वरचे झरे गावात वळवून पाणी फिरवण्याची गोष्ट ऐकून मला आमच्या कोकणामधले पन्हळीच्या आणि पाटाच्या पाण्यात भिजवलेले शेतमळे आठवले... हजारो किलोमीटर दूर सुद्धा माणसाची वसाहत तशीच वसते हे पाहून भलतीच गंमत वाटली..
थोडं पुढे गेल्यानंतर रस्त्याच्या आजूबाजूने लष्करी वसाहती दिसू लागल्या- या वसाहती पाहून मला आपल्या मैत्रीण वरच्या प्राचीची आठवण झाली ती इथेच रहात असेल का? असं वाटलं. फोटो काढू नये अशी सूचना असल्यामुळे या लष्करी वसाहतींचे फोटो काही काढले नाही
थोडं पुढे जातो तोवर ही गोम्पा लांबून दिसायला लागलीच.. आमच्या ड्रायव्हरने दरवाज्याच्या अगदी जवळ गाडी लावल्यामुळे फारस अंतर चालायला नव्हतं. आणि वर गेल्यावर दिसणारा नजर अप्रतिम होताच
थिकसे मॉनेस्ट्री /गोंपा
http://thiksay.org/
https://www.ladakh-tourism.net/blog/thiksey-monastery/
पंधराव्या शतकात बांधली गेलेली ही गोंपा अजूनही वापरात आहे. या गोंपाचं बांधकाम तिबेट मधल्या पोटाला पॅलेस सारखं दिसतं
1970 मध्ये चौदावे दलाई लामा येथे आले होते त्यांच्या येण्याची आठवण भरून इथे एक मोठा मैत्रेय बुद्धाचा पुतळा उभारला आहे.
दोन मजली मोठा "मैत्रेय" चा हा पुतळा बघताना मला वरदाची आणि पर्यायाने मैत्रीण ची आठवण आली :)
या मॉनेस्ट्री मधली मला मनाला भिडलेली अजून एक गोष्ट म्हणजे इथली एकदम चमकदार आणि ब्राईट दिसणारी चित्रं.. या चित्रांमुळे अख्या मॉनेस्ट्रीला एक छान उठाव प्राप्त होतो
एव्हाना चालून चालून थोडं दमायला होत होतं त्यामुळे आता परत फिरलो.बघायच्या यादीतलं दुसरं ठिकाण होतं शे पॅलेस
शे पॅलेस
https://www.ladakh-tourism.net/blog/shey-palace/
थिकसे मॉनेस्ट्री मधून लेह शहराकडे परत जाताना हा पॅलेस रस्त्यात लागतो
पूर्वीच्या काळात शे ही लडाखची उन्हाळी राजधानी होती - 1842 मध्ये इथले नमग्याल राजे हा राजवाडा सोडून कायमस्वरूपी स्टोक मधल्या राजवाड्यात राहायला गेले, या वंशातले लोक अजूनही स्तोक राजवाड्यात राहतात.
थिकसे प्रमाणेच इथे सुद्धा वरून दिसणारा नजारा डोळ्यांचं पारणं फेडेल असा होता
हा राजवाडा बघून होईपर्यंत पोटात चांगलेच कावळे ओरडायला लागले होते... त्यामुळे आम्ही शहराकडे परतण्याचं ठरवलं
कालच्याच त्या बाजारपेठेत परत येऊन तुडुंब जेवण केलं आणि मग आता कुठे जायचं त्याच्या विचारात पडलो?
इथे जवळच लेह म्युझियम आहे असं काल आमच्या एजंट ने सांगितल्याचं आठवलं आणि थोडीफार चौकशी करून आम्ही म्युसियम मध्ये पोहोचलो
म्युझियम
सेंट्रल एशियातल्या ऐतिहासिक वस्तू दाखवणारे हे छोटसं म्युझियम मला आणि सुरभिला खूप आवडलं
इथल्या भागातील ऐतिहासिक वापरातील भांडी/ कपडे पुस्तकं लिखाण अशा गोष्टी अतिशय सुबक पद्धतीने मांडून ठेवल्या आहेत - इतिहासाची थोडीफार आवड असेल आणि हाताशी वेळ असेल तर नक्की बघावं असं एक ठिकाण.
म्युझियम मध्ये छोटासा फेरफटका झाल्यानंतर पुढच्या ठिकाणी होतं ते म्हणजे लेह पॅलेस
लेह पॅलेस
लेहच्या राजघराण्याचा हा मूळ राजवाडा
नऊ मजल्याची ही वास्तू आता एकदम पडझडलेल्या अवस्थेत आहे.. पुरातत्व विभागाकडून त्याची डागडुजी आणि नूतनीकरण चालू आहे
लडाख मध्ये कुठूनही दिसतात असे सुंदर व्ह्यू या पॅलेस मधून दिसतातच आणि आत अनेक जुन्या गोष्टी छान मांडून ठेवलेल्या आहेत
एवढं फिरून होई पर्यंत आम्ही परत दमलो होतो आणि आमची रूम आम्हाला खुणावायला लागली होती- उद्याचा दिवस तसा लांब आणि दमणूक करणारा असेल त्यामुळे आता जरा आराम करू असं म्हणून आम्ही रूमवर परतलो