"आजीच्या जवळी घड्याळ कसले, आहे चमत्कारिक, देई ठेवुनी ते कुठे अजूनही, नाही कुणा ठाऊक.." माझे बाबा त्यांच्या नातवंडांना झोपवतांना गात असलेलं गाणं ऐकलं की मला माझी आज्जी-आईची आईच आठवायची कायम.
ह्या गाण्यातल्या आज्जीकडे कुठलेही घड्याळ नसूनही तिला दिवसाचा कुठला प्रहर आणि वेळ सांगता यायची, तशीच माझ्या कस्तुरा आज्जीलाही यायची. ती निरक्षर होती. पण आता किती वाजले असतील, हे ढोबळपणे सांगू शकायची कायम. नाशिक पुणे रस्त्यावर येणाऱ्या स्टेशन्सची नावं आणि त्यांची ऑर्डरही तिला अचूकपणे सांगता यायची. इतकेच नाही तर ती हिशोबातही चोख होती.
आज हे गाणं आठवायचं कारण म्हणजे जर्मनीतील हॅनोवर शहरात एका सिनियर केअर होममध्ये सायकॉलॉजीस्ट म्हणून काम करते, तिथे मला भेटलेल्या एक उत्साही आज्जी. त्यांची गोष्ट मी आज सांगतेय.
केक आणि कुकीज बेकिंगमधल्या त्या एक्स्पर्ट.वेगवेगळ्या व्हरायटीचे केक बनवतांना त्या माप फक्त 'फील' करतात. टायमरही लावत नाहीत. ओव्हनमधल्या केककडे बघूनच त्यांना कळतं की तो बेक झाला असेल की नाही.
केक माझा लहानपणापासून आवडता. पण तो बेकरीत मिळणारा नाही तर माझ्या आईच्या हातचा. माझी आई आमच्या लहानपणी आणि नंतरही अनेक वर्षे लोखंडी कढईत वाळू गरम करून अंदाजपंचे गव्हाचं पीठ, तूप, साखर, दूध, व्हॅनीला इसेन्स घालून गॅसवर खरपूस भाजून केक बनवायची. अजूनही कधीतरी करते. त्याचा तो खमंग दरवळ आणि तोंडात विरघळून जाणारा चवदार तुकडा आठवला की मी नॉस्टॅल्जिक होते. आईच्या ह्या बेसिक केकची चव आणि मागच्या वर्षी ख्रिसमसच्यावेळी आमच्या संस्थेतील ह्या आज्जींनी कंपनीतीलच ओव्हनमध्ये बेक केलेल्या कुकीजची चव डायरेक्ट कनेक्ट करता आली.
त्या चवीमुळे आज्जींचे आणि माझेही कनेक्शन जुळले. त्या दिवशी आज्जींकडे लगेच जाऊन त्यांच्या कुकीजचे कौतुक करून त्यांच्याकडून रेसिपी घेऊन मी तशाच कुकीज घरी बनवल्या. सगळ्यांना आवडल्याही. चव सिमिलर आली, तरी पण मला त्यांच्यासारख्या तोंडात विरघळून जाणाऱ्या कुकीज जमल्याच नाहीत. मग कुठे चूक झाली असेल, हे त्यांनी मला स्टेप बाय स्टेप विचारून शोधून काढलं. ही चव तुमच्या हाताचीच असणार, असे म्हटल्यावर जोरात हसत माझा हात हातात घेऊन त्या म्हणाल्या, घे, आता तुझ्याही हातात ती उतरली बघ.
अशा ह्या आज्जी. मागच्यावर्षी त्या संस्थेत दाखल झाल्या तेंव्हा मला खासकरून सांगितलं गेलं होतं की त्यांना नक्की भेट, त्या डिप्रेशनमध्ये आहेत फार.
मी भेटले, त्यावेळी त्या दुसऱ्या मजल्यावर डबल रूममध्ये राहत होत्या. सिंगलरूमसाठी त्यांनी ऍप्लाय केलेलं होतं आणि वेटिंग लिस्टवर होत्या.
ह्या आज्जींचे मिस्टर वारलेले आणि एक मुलगा ह्याच शहरात आणि दुसरी मुलगी स्वीसमध्ये राहणारी. आमच्या कंपनीतच जॉब करणाऱ्या एकीच्या त्या नातेवाईक. तिच्याकडून समजलं की त्यांना सायकियाट्री वॉर्डमध्येही काही महिने ठेवावं लागलं होतं. इतकी त्यांची परिस्थिती बिकट होती.
आज्जींना भेटले, तेंव्हा त्यांनी रडत रडत बरंच काही सांगितलं, जे आता मला नीट आठवतही नाहीये. मी त्यांचे सांत्वन केले होते आणि त्यांनी त्याबद्दल खूप कृतज्ञता व्यक्त केली होती, इतकेच आठवते. आमच्या अधूनमधून भेटी घडत राहिल्या. आज्जी हळूहळू सावरत असलेल्या जाणवत होत्या.
नंतर काही आठवड्यांनी त्यांना तिसऱ्या मजल्यावर कायमस्वरूपी राहण्यासाठी सिंगल रूम उपलब्ध झाली. तेंव्हा मी त्यांना भेटायला गेले. तर त्यांची रुम अगदी घरच्यासारखी सुंदर सजवलेली होती. एक गोष्ट मला त्यातली अतिशय आवडली ती म्हणजे खिडकी शेजारच्या भिंतीलाच पक्षी आणि झाडांचं चित्र असलेला हिरवा-गुलाबी पडदा लावलेला होता, ज्यामुळे त्यामागेही एक खिडकी असेल, असा भास निर्माण व्हावा.
आज्जींचे डिप्रेशन आता पार उडून गेले होते. त्यांच्या रुमसारख्याच त्या खूप फ्रेश आणि उत्साहात दिसत होत्या. त्यांनी सांगितले की त्या आता सर्व ग्रुप ऍक्टिवीटीजमध्ये भाग घेतात.
कुकीज खाऊ घातल्यानंतर त्यांनी एकदा कंपनीत एक मस्त केकही बेक केला आणि आम्हाला खाऊ घातला. त्यांची नातेवाईक आमच्याच डिपार्टमेंटला असल्याने आम्हाला तो मिळाला. नाहीतर शंभरएक एम्प्लॉईजसाठी केक बनवणे आणि सर्वांच्याच वाट्याला तो येणे अवघड आहे.
मग मी आज्जींना म्हणाले मलाही तसा केक बनवायला शिकायचे आहे. तुम्ही शिकवाल का? मी सगळे साहित्य आणेन, आपण इकडे बनवूया.
आज्जींनी आनंदाने होकार दिला. मी साहित्य आणले आणि त्याच्या पुढच्याच आठवड्यात आज्जी आणि मी पाऊण तासात तो केक बनवलासुद्धा! माझ्या डिपार्टमेंटच्या लोकांना दिला आणि घरीही चवीसाठी आणला. सर्वांनाच तो खूप आवडला.
केक बनवता बनवता आज्जींसोबत खूप छान गप्पा झाल्या. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मोकळेपणाने हसत हसत उत्तरं दिली. त्यांनी सांगितलं , की घरी असतांना दर आठवड्याला त्या एक वेगळ्या व्हरायटीचा केक बनवत. आता इथेही ते रुटीन चालू ठेवू शकत असल्याने त्यांना इथे घरच्यासारखेच, घरात राहिल्यासारखेच वाटते. आमच्या काही कलिग्जही त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटच्या कलीग्जसाठी आज्जींकडून केक बनवून घेतात.
केक कुणाकडून शिकलात, हे विचारले असता, त्या म्हणाल्या, त्यांची आई एक ग्रेट कुक होती. ती स्वयंपाकबरोबरच केकही खूप छान बनवायची. वेगवेगळ्या व्हरायटीज करायची. त्यामुळे केक बनवायला त्या त्यांच्या आईकडूनच शिकल्या. त्यांची आई वयाच्या ५० व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सरने गेली आणि ह्या आज्जींनाही नेमका तोच आजार होता, ज्यातून आता त्या पूर्णपणे बऱ्या होऊन बाहेर आल्या आहेत. त्यांचे एक ब्रेस्ट काढावे लागले पण त्यांनी सिलिकॉन इंप्लान्ट केलेले असल्याने ते कळत नाही. ब्रेस्ट कॅन्सर होऊन ब्रेस्ट काढाव्या लागलेल्या आणि मला भेटलेल्या ह्या तिसऱ्या आज्जी.
तुम्ही यातून स्वतःला कसे सावरले, असे विचारले असता, काही नाही गं विशेष.. माझे एक ब्रेस्ट वॉर्म तर दुसरे कोल्ड इतकाच काय तो फरक असे जोरात हसत हसत त्यांनी मला सांगितलं आणि मला टाळी देत हसवलं सुद्धा!
काय एकेक माणसं असतात ना! खरोखर ग्रेट. मी थक्क झाले आणि मनोमन त्यांच्यासमोर हात जोडले.
सकीना वागदरीकर-जयचंदर
१६.०७.२०२२
आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉगची लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com