"आजीच्या जवळी घड्याळ कसले, आहे चमत्कारिक, देई ठेवुनी ते कुठे अजूनही, नाही कुणा ठाऊक.." माझे बाबा त्यांच्या नातवंडांना झोपवतांना गात असलेलं गाणं ऐकलं की मला माझी आज्जी-आईची आईच आठवायची कायम.
ह्या गाण्यातल्या आज्जीकडे कुठलेही घड्याळ नसूनही तिला दिवसाचा कुठला प्रहर आणि वेळ सांगता यायची, तशीच माझ्या कस्तुरा आज्जीलाही यायची. ती निरक्षर होती. पण आता किती वाजले असतील, हे ढोबळपणे सांगू शकायची कायम. नाशिक पुणे रस्त्यावर येणाऱ्या स्टेशन्सची नावं आणि त्यांची ऑर्डरही तिला अचूकपणे सांगता यायची. इतकेच नाही तर ती हिशोबातही चोख होती.