आमच्याकडे एक बरीच जुनी मळकट कार आणि एक थोडी जुनी बेढब वॅन आहे. या दोन्हीही मी नियमित चालवत असते. पण दोन तीन वर्षात आमच्या नेबरहूडात हळूहळू सगळ्या टेस्ला दिसायला लागल्यात. किंवा साधुसंतांना सगळीकडे जसा ईश्वर दिसतो तशा मला ह्याच दिसत असतील. मागच्या वर्षीपासून तर ड्रायव्हिंग करताना दर तीन मिनिटाला एक टेस्ला बाजूने सुळकन निघून ही जाते. आणि मला आपोआपच हीन भावना येते. कसं ते सांगायला '3 ईडियट्स' मधल्या रँचो सारखा डेमो देते. त्याशिवाय काही ही हीन भावना तुमच्यापर्यंत पोचणार नाही.
कल्पना करा, शेजारशेजारच्या दोन थेटरात दोन सिनेमे लागलेत , त्याचे पोस्टर बाहेरच्या भिंतीवर लावलेयं. एकात 'गहराईयां'ची दीपिका पडूकोण तर दुसऱ्यात कुठल्याही सिनेमाची काकुळतीला आलेली निरूपा रॉय आहे. निरूपांच्या सिनेमाचे तिकीट पन्नास रुपये व दीपिकाच्या सिनेमाचे हजार आहे, आणि तुमच्याकडे पंचवीस रूपये आहेत तर तुम्हाला सिनेमाला न जाताही हीन भावना येईल. शिवाय घरी येऊन टिव्ही बघावा तर आहेत त्या एक-दोन वाहिन्यांवर 'आमची माती-आमची माणसं' लागलेलं असंल, तर जे काय मनात तयार होईल. ती हीच भावना होय.
आम्ही असेच कुठूनतरी कुठेतरी गाडीने जात होतो. मी ड्रायव्हिंग करत होते, तेव्हा रेड लाईटवर थांबून निघाल्यानंतर गाडीचा पिकप व समोरचा चढ चढताना म्हशीवर बसल्याचं फील आलं आणि दुर्दैवयोगाने निळी टेस्ला हरणासारखी टेकोव्हर करून गेली. मगं मी मुलांना विचारले, "तुमच्याकडचे सगळे पैसे मला देता का ? आपण पोटालाच नाहीतर सगळ्या अंगाला चिमटे काढून टेस्ला आणू. लेक , "मी काही ओवाळणीचे जमवलेले एकशे बत्तीस डॉलर देणार नाही. गेट युवर ओन", म्हणाली. मुलगा पार्टटाइम नोकरी करून पैसे जमवतोय म्हणून मला वेडी आशा होती. तो म्हणाला, मला केन्ड्रीक लमारच्या म्युझिक कंसर्टसाठी हवे आहेत, पुढच्या वेळी देतो." बघा आता, हा केन्ड्रीक लमार आला होता का याचे ढु धुवायला!!! कलियुगातील स्वार्थानी बटबटलेली मुलं कुठली आईच्या भौतिक इच्छा किंवा छोटेसे हव्यास पूर्ण करणार, आता आयांना आपापले पांग आपणच फेडावे लागणारे. (बायदवे, पांग म्हणजे काय आणि ते लुगडे किंवा धोतर असल्यागत फेडावे का लागते, शिवाय नेसलेले कधी असते ??)
दुसऱ्या वेळीही व त्यानंतर दरवेळी टेस्ला बघून 'आमची माती, आमची माणसं'वालं गरीब व मंद फील व्हायला लागलं. तेव्हा दरवेळा 'बघा, बघा'वगैरे संवाद व 'मेरा नंबर कब आयेगा' ते 'अपना टाईम आयेगा' ह्या चर्चाही व्हायला लागल्या. कधी उरलेली वाटली डाळ सगळ्यांना तीन दिवस हफ्त्याहफ्त्याने संपवावी लागल्याने, कधी 'डॉक्टर स्ट्रेंज' बघायला नेण्याऐवजी घरीच 'मुंबईचा फौजदार' बघायला लावल्याने, कधी लेकीने दाखवलेल्या क्यूट भूभूचे कौतुक करताना कुत्र्यांमधला 'महेश बाबू' म्हणणे वगैरे आगावपणा केल्याने, माझ्याबद्दल सहसा कुणाचेही धोरण सहिष्णू वगैरे नसते. हळूहळू सगळ्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे. तुम्ही म्हणाल , नवऱ्याशी बोलावे, पण तो 'आशीर्वाद' कणकेपासून-टिव्ही पर्यंत सगळ्या गोष्टींना 'थोडं थांब' असंच म्हणतो. यासाठी थांबून राहीले तर स्वदेस सिनेमातल्या 'बिजली' म्हणणाऱ्या आजी सारखी अवस्था होईल.
तरीही जेव्हा जेव्हा बाजूने टेस्ला जाते मीही 'अशीही बनवाबनवी' मधली मोलकरीण जशी संशय, असूया व असुरक्षित भावनेने , स्टिकर मिशीचे equilibrium हुकलेल्या धनंजय माने व त्याच्या 'भक्कम बाईमाणूस' ईत्यादी गँगकडे बघायची तसे बघते. तिलाही तिची कारणं होतीच, 'विजू खोटे' सारखा शोलेपासून मार खाऊन परत येणारा आद्य अपयशी बॉयफ्रेंड असल्यावर, ती तरी काय करणार ???
तिला जशी तिची कारणं आहेत तशी मलाही , म्हणून माझ्यासारख्या मनाने कुठेतरी किंचितच पण मडोनाची 'मटेरिअल गर्ल' असलेल्या, चटकचांदण्या आणि भटकभवान्यांसाठी ही 'दिसला गं बाई दिसला' या गाण्यात बसवलेली टेस्लाची लावणी....;)
टेस्ला गं बाई टेस्ला
ईर्षेच्या जाळाची नजर नस्ती
चालं मी कडंनं ट्रॅफिकच्या रस्ती
ब्रेकं पुढं, गॅस मगं मागं, भोंगेही स्टायलिश गाती
ब्रेकं पुढं, गॅस मगं मागं, भोंगेही स्टायलिश गाती
लाईटचा दिलबर, वायरचा चार्जर, होs s
लाईटचा दिलबर, वायरचा चार्जर, होs s
का परवडंनं मला, बाई-बाई का परवडंना मला
डब्बा चालवना, पेट्रोल भरवना
घेऊ कसं, घेऊ कसं, घेऊ कसं ??
टेस्ला गं बाई टेस्ला
टेस्ला गं बाई टेस्ला
तिला बघून जीव हा जळला , गं बाई जळला
तिला बघून जीव हा जळला , गं बाई जळला
मस्क हा अंगानं उभा नी आडवा
गं ट्विटात त्याच्या मोहाचा चकवा
म्हणे घ्यावा नाही तर मंगळावर जावा
मस्क हा अंगानं उभा नी आडवा
म्हणे घ्यावा नाही तर मंगळावर जावा
पांढऱ्या कारा, डॉलर लाखाला
निळ्याला सव्वाचा बट्टा
पांढऱ्या कारा, डॉलर लाखाला
निळ्याला सव्वाचा बट्टा
काळजामधे ह्या घुस्ल्या, गं बाई-बाई काळजामधे घुस्ल्या
काळजामधे, काळजामधे, काळजामधे
टेस्ला गं बाई टेस्ला
टेस्ला गं बाई टेस्ला
तिला बघून जीव हा जळला , गं बाई जळला
तिला बघून जीव हा जळला , गं बाई जळला
______
कमेंट न करता जाताय, हे वागणं बरं नव्हं
फोटो साभार# टेस्ला डॉट कॉम व इंटरनेट मीम व विकीपिडीया , चालत नसेल तर उडवेन.
©अस्मिता