वानवळा देणे म्हणजे आल्याकडचे पदार्थ, फळं, भाज्या हे इतरांना भेट म्हणून देणे.
एक म्हण आहे की घरच्याच चिंचेने दात आंबलेत आणि त्यात आला वानवळा.
माझ्या एका आत्याकडून आम्हाला दरवर्षी त्यांच्या बागेतल्या किमान २ पेट्या द्राक्षांचा वानवळा यायचा.
ज्या कोणाकडे हरभर्याची सुकलेलेई भाजी असेन तर ते देतात. नवर्याच्या एका मामांकडून आम्हाला डाळींब येतात.
आमच्याकडे आल्यागेल्या सर्वांना, आई आणि आजी काही बाही वानवळा देत असत.
भारतात नातेवाईकांना भेटायला गेले की चिंचा, तीळ, मोहरी, मेथी, धने, जवस, कुरड्या, पापड, पापड्या, शेवया असा बराच वानवळा आजही मिळतोच मिळतो.
हे असं जे आपल्या सवईतलं , पाहण्यातलं आजवर घडत आलेलं भारताबाहेरही आपल्यासोबत घडलं की, कसलं भारी वाटतं.
मागे एकदा एक मैत्रीण तिच्या झाडाचे सफरचंद घेऊन आली. पहिला घास खाल्ला आणि मला परमानंदाची अनुभूती आली. आमच्या घरी एक बोर सफरचंदाच्या चवीची होती. आणि ह्या सफरचंदाची चव त्या बोरीसारखी होती. अर्थात हे मी मैत्रीणीला सांगितले तेव्हापासून ती आठवणीने माझ्यासाठी सफरचंद पाठवते. ह्यावर्षी ती कामानिमित्त अमेरीकेत आहे पण तिने आठवणीने तिच्या नवर्याला ते पोहचवायला सांगितले.
आमच्याकडे शेजारी सर्वांच्याच बागेत कोणते न कोणते तरी फळझाड आहे. काही लोक फळं पिकली की टोपलीत कढून ती कुंपनाच्या दाराबहेर ठेवतात. ज्याला जेवढी हवी तेवढी त्यांनी घेऊन जावे. ह्या दिवसात आम्ही सफरचंद विकत आणतंच नाही.
माझ्या बागेत प्लमचे (आलूबुखार्याचे) झाड आहे. १०० किलो पर्यंत फळं लागतात त्याला. मग मी लेकामार्फत माझ्या सर्व शेजार्यांना त्याच्या बॅगभरून पाठवते. माझ्या बर्याच मैत्रीणींना कधी घरपोहोच तर कधी त्या स्वतः येऊन तोडून घेऊन जातात. बच्चे कंपनीला तर खास घरी येऊन तोडून खायचे आमत्रण असते.
मी तर कच्च्या प्लमचे लोणचे बनवून त्याचापण वानवळा देते.
ह्या असल्या परंपरा, पद्धती जगण्यातला आनंद द्विगुणीत करतात.