इकडून जाताना कुणासाठी काय न्यायचं याची एक यादी असते. एक यादी असते भारतात आईला करायला सांगायचे पदार्थ, बँकेची किंवा काही कागदपत्रांची कामं असतील तर ती एक यादी, एक शॉपिंगची यादी, ज्यात इकडे येताना आणायचं सामान, कपडे, भांडी असं काय काय असतं. मग गेल्यावर याद्या एकेक करत टिक मार्क होत जातात.
आता ऑनलाइन शॉपिंग मुळे काही गोष्टी आधीच ऑर्डर करून ठेवता येतात, याआधी मी क्वचितच भारतात ऑनलाईन शॉपिंग केलं होतं, यावेळी मात्र आधीच वेळेत बघून कपडे, वस्तू ऑर्डर केल्या होत्या. त्या एका मागोमाग एक आल्या की मग लगेच साईज चेक करा, गरज पडल्यास रिटर्न करा हे सगळं ओघाने आलं. मी मुळातच या ऑनलाईन शॉपिंग ची तशी फॅन नाही, रिटर्न करणे हा प्रकार शक्यतोवर नको असा प्रयत्न असतो, पण तरी काही वेळा नाईलाज झाला. आई बाबांची काहीच ऑनलाईन खरेदी नसते, मी गेले आणि तो माणूस अल्मोस्ट रोज यायचा काही ना काही द्यायला किंवा परत घेऊन जायला. अचानक लॉटरी लागल्या सारखी काय खरेदी चालली आहे असं वाटावं अशी आमची भारतात खरेदी होते. मुख्य भर इकडे न मिळणारे पदार्थ, भारतीय कपडे, इकडे कुणासाठी गिफ्ट्स वगैरे. गेल्या काही वर्षात बरेच भारतीय, मुख्य महाराष्ट्रीय पदार्थ इकडे मिळायला लागले तेव्हापासून त्या गोष्टी कमी झाल्या आहेत, तरी बुलढाण्यातली डाळ, तांदूळ, स्टीलची भांडी आणि उरलेली कपडे आणि खाऊ खरेदी नाशिकला केली जाते. तरी पुण्यात जाणं शक्य नव्हतं, नाहीतर लक्ष्मी रोड, तुळशीबाग इथेही एकदा जायला आवडतं, बऱ्याच जणांची भेटही होऊ शकते पण दर वेळी भारत वारीत पुण्याला जायचा बेत जमवणं अवघड होतं.
बर्याच आप्तांच्या भेटी झाल्या होत्या. बुलढाण्यातून खास घ्यायचे असे सगळे पदार्थ खरेदी करून बॅग मध्ये भरले गेले. सृजनची खास इच्छा होती की एकदा गच्चीत जेवायचं, पाऊस थांबल्यावर एक दिवस मग ती अंगत पंगत पण केली. बॅगांची वजनं करून काही बॅग पॅक झाल्या. सासरच्या वाटेवर कुचुकचु काटे टोचतात आणि माहेरच्या वाटेवरचे दगड पण मऊ लागतात अशी एक म्हण आहे. पण दिशा कोणतीही असो, बुलढाणा नाशिक की नाशिक बुलढाणा, हा प्रवास कंटाळवाणाच वाटतो. समृद्धी महामार्ग होईल होईल म्हणत तो थोडा झालाही, पण पुढच्या वेळीच तो योग असावा, कारण या आमच्या मार्गातला भाग तेव्हा चालू झाला नव्हता. दर वेळी हा प्रवास कसा करायचा ही एक मोठी चर्चाच असते. आधी ट्रेनचा प्रवास केला आहे, पण त्यातही ट्रेनच्या वेळा, रिझर्व्हेशन खूप आधीपासून करा, शिवाय मलकापूरला जा आणि आमच्या मोठ्या बॅग बघता तो पर्याय बादच केला जातो. बस पण सोयीच्या नाहीत. एकदा तर मी, सृजन आणि आई बुलढाण्याहून निघालो आणि सुमेध नाशिकहुन. एकूण सात आठ तासांचा प्रवास, मधल्या एका ठिकाणी भेटलो आणि आई परत गेली, मी पुढे नाशिकला. हे इतकं नाट्यमय घडलं होतं की एकाच वेळी आमच्या दोन गाड्यांनी त्या पेट्रोल पंपावर दोन बाजूंनी एंट्री घेतली. सिनेमात दाखवलं असतं तर काहीही काय असं वाटलं असतं, पण प्रत्यक्षात झालं. आणि मग मी आणि सृजन ने या गाडीतून त्या गाडीत बस्तान हलवून आम्ही पुढे आणि आई परत गेली. यावेळी मी, आई आणि सृजन असे जाऊ आणि नाशिकला जाताना औरंगाबादला जाताना एका मावशीची भेट घेऊ असं ठरलं.
शिक्षणा निमित्त घराबाहेर पडून आता वीस वर्ष होतील. तरी प्रत्येक वेळी निघताना वाईट वाटतंच. आता दुरून सहज ठरवलं आणि आई बाबांकडे गेले असं होत नाही, त्यामुळे पुढची ट्रिप होई पर्यंत किंवा आई बाबा इकडे येई पर्यंत भेटी होत नाहीत. हे सगळं सोपं नसलं तरी हेही तेवढंच खरं की पुढे जाणं क्रमप्राप्त असतंच. आम्ही सगळेच आवर्जून फोटो घ्यायला हवेत हे आता आता शिकतोय. ठरवून मग एक आमचा फोटो आणि घराचे बागेचे असे फोटो काढून ठेवले. ट्रिप समाधानाने पार पडली होती, अनेकांच्या भेटी झाल्या, उन्हाळ्यातली मजा, लहान गावातलं पूर्ण वेगळं वातावरण असं सृजनचं आजोळ त्याला अनुभवायला मिळालं. निघताना सगळे शेजारी मला सोडायला आले. काळजी करू नकोस, आम्ही आहोत असं आश्वासक आपुलकीचं बोलले. जुने शेजारी जे आता दुसरी कडे आहेत त्या सगळ्यांची आठवण काढली जातेच, आणि गाडी रस्त्याला लागली.
आम्ही निघालो त्या दिवशी पाऊस होता. ही आईची खास मैत्रीण, तिच्याकडे तिनी खास आणून ठेवलेली स्टफ भाकरी होती, रावण पिठलं भरून केलेली. ती खाल्ली, अजून बराच खाऊ घेतला आणि तसे वेळेत नाशिकला पोचलो. त्यामानाने रस्त्याचा त्रास जाणवला नाही.
तिथे आलेली पार्सल चेक करून झाली. सृजनची पणजी आजी आणि पणजोबांची भेट झाली. अजूनही नातलग भेटी, मित्रांच्या भेटी झाल्या. तिथे एकेक आवडीचे पदार्थ खाणे आणि एकीकडे प्रत्यक्षात दुकानात जाऊन करायची अशी खरेदी झाली. दर वर्षी पेक्षा मॉल मधली गर्दी यावेळी प्रकर्षाने कमी जाणवली. मधल्या करोना काळात ऑनलाईन पर्याय लोकांना जास्त सवयीचे झाले असतील, त्यामुळे असेल कदाचित. भोसला मिल्ट्री स्कुल मधलं राम मंदिर आणि तिथला परिसर फार छान आहे , म्हणून तिथे जाऊन आलो. ओला उबर, स्वीगी झोमॅटो या प्रकारांची गाठ नाशिक मध्ये होते, याही गोष्टी इथे जर्मनीत अजून तेवढ्या रुळलेल्या नाहीत, मग ट्रॅफिक मधून जायला नको वाटलं तर हे सगळे पर्याय वापरून हौस भागवून घेतली.
नाशिकची मिसळ फार आवडते, यावेळी आवडत्या ठिकाणी जाणं जमलं नाही, ते आता पुढच्या वेळी बघू. शेवटच्या दिवशी अगदी निघताना दाबेली बोलावली. कॉलेज रोडची पाणी पुरी असं सगळं खाऊन झालं. आता नाशिक मधले बदल मला जाणवतात एवढं ते ओळखीचं झालं आहे. खाण्यासाठी इतके नवीन रेस्टॉरंट्स, चहाचे कॅफे आणि कॉलेजच्या लोकांना आवडतील असे बरेच फास्ट फूड जॉइंट्स यांनी रस्तेच्या रस्ते भरलेले आहेत. आम्हाला साधं एक काहीतरी खेळणं हवं होतं द्यायला तर तशी दुकानं आतल्या गल्ल्यांमध्ये, मोठ्या रस्त्यांवर सहज सापडेल असं नाहीच. नाशिक मधल्या रेस्टॉरंट्सची नावं हा एक वेगळाच विषय आहे. दर वेळी नवीन विनोदी नावांची भर पडते, यावेळी हॉटेल गुदगुल्या हे आजवर पाहिलेल्या नावांना मागे टाकणारं हॉटेल (दुरून) बघितलं. सगळी कामं करत परतीचा दिवस उजाडला सुद्धा. पुन्हा डोळे भरून, लवकर भेटू म्हणून निरोप घेतले गेले.
बरेचदा आमच्या डोळ्यासमोर आम्ही निघालो तेव्हाची परिस्थिती असते आणि मग पुढच्या ट्रिप पर्यंत झपाट्याने गोष्टी बदललेल्या असतात. आम्हाला ज्या गोष्टींचं कौतुक वाटतं, त्या बाकीच्यांसाठी नॉर्मल असतात. वाढलेली महागाई दिसते, मोठमोठ्या इमारती दिसतात. काही गोष्टींचं खूप कौतुक वाटतं, काहींचा त्रास होतो. दोन तीन आठवडे झाले की सृजनला पण त्याची शाळा, मित्र यांची आठवण येते. इथे रोजचं रुटीन असतं त्यामुळे तिथे सगळी मजा असली तरी थोडा कंटाळा सुद्धा येतो. आत्ता त्याला जेवढं कुतूहल आहे, तेवढं कदाचित मोठा होत गेला की राहणार नाही, ते स्वाभाविक आहेच. तो मोठा होईल तसं त्याचं अनुभव विश्व विस्तारत जाईल, पण त्याच्या आठवणीत आपल्या देशाचा, माणसांचा जिव्हाळा हे नक्की असेल, असं हे सगळं बघताना वाटतं, निदान तसे प्रयत्न आपण करायला हवेत, करूच हे ठरवलं जातं. आम्हालाही घराची ओढ लागलेली असतेच. नोकरी, शाळा, झाडं ठीक असतील का, इथल्या मित्र मैत्रिणींच्या भेटी, शेजारी हे सगळं पुन्हा आठवायला लागतं.
नाशिक मुंबई रस्त्यावर गर्दी असतेच, पण यावेळी त्या पूर्ण घाटात जशी गाडी चालली होती की मी एक मिनिट झोपू शकले नाही. एक ट्रक डाव्या बाजूला तर एक उजव्या बाजूला, त्यांना ओव्हर टेक करत निघालेली आमची गाडी आणि घाटाचा रस्ता. मुंबई विमानतळावर अगदी वेळेत पोचलो, पुन्हा सीटचे गोंधळ निस्तरले, बॅगा आत गेल्या. विमानतळावर एक खाण्याचा राउंड झाला. दिल्लीत पोचून पुन्हा थोडा वेळ थांबलो आणि विमान फ्रांकफुर्ट कडे उडालं. विमान आकाशात उडतं तेव्हा पुन्हा भारताचा पुन्हा भेटू असा निरोप घेतला, मागचा महिना पूर्ण डोळ्यासमोरून गेला. इथे उतरलो की पुन्हा सवयीने बाहेर पुन्हा इथल्या भाषेतले संवाद आपोआप सुरु होतात. ठरलेला एक जण टॅक्सी घेऊन घ्यायला आलेला होताच. घरी येऊन आजूबाजूची कोणती झाडं किती वाढली, गवत वाळलं म्हणजे पाऊस कमी झाला, आता काळजी घेऊ पुन्हा असं म्हणत बॅग आत घेतल्या. दुसऱ्या दिवशी शेजारची आजी भेटली आणि पुन्हा हात हातात घेऊन खूप बरं वाटलं तुम्हाला परत पाहून म्हणत तिने जवळ घेतलं. आपल्या घराला सुद्धा पुन्हा बघून भेटून बरं वाटलं. आम्ही शेजार्यांकडे दिलेल्या झाडांची काळजी नव्हती, ती पुन्हा घरी आणली. त्यांना काजू कतली आणि त्यांच्यासाठी आणलेल्या भेटी दिल्या. पुढची भारताची ट्रिप कधी करायची याचे बेत मनातल्या मनात चालू झाले आणि भारतवारी सुफळ संपूर्ण होऊन ब्लॉगवर सुद्धा आली.
समाप्त