आलीच की दहावी! प्रबोधिनीतली सहा वर्षे चढत्या भाजणीची वाटतात मला. त्यामुळे दहावीचं वर्ष सगळ्यात खास आणि खूप लक्षात राहिलेलं आहे. नववी आणि दहावी आम्ही एकाच वर्गात (वर्गखोली) होतो. त्यामुळे कदाचित नववी ते दहावी हे transition देखील जाणवलं नाही. आमच्या पंचनदीच्या शिबिराची एक गम्मत म्हणजे हे शिबीर झालं २६ मार्च ते ३० मार्च ह्या कालावधीत आणि आमच्या वार्षिक परीक्षा होत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात! म्हणजे नववीच्या वार्षिक परीक्षेच्या एक आठवडा आधी आम्ही सगळा अभ्यास सोडून कोकणात शिबिराला गेलो होतो. आमच्या सुदैवाने पालकांना आणि शाळेला ह्यात आमचे “शैक्षणिक नुकसान” होण्याची भीती वाटली नाही. नाहीतर आम्ही किती मोठ्या आनंदाला मुकलो असतो.
तर शिबिरावरून परत आलो, नववीची परीक्षा दिली आणि लगेच १५ एप्रिलपासून आमचे दहावीचे वर्ग सुरु झाले. १५ एप्रिल ते १५ मे असे दहावीचे जास्तीचे तास झाले होते. मला वाटतं तेव्हा आमची अर्धा वेळ शाळा होती आणि उरलेला वेळ आम्ही शाळेत पडीक असायचो! आमच्या वेळी दहावीची पुस्तकं आणि नोट्स ह्या आधीच्या वर्गातल्या मुलींकडून वारसा हक्काने मिळायच्या. किमान आठ ते दहा वर्षे जुन्या नोट्स अशा प्रकारे पास ऑन होत असत. मी ही एक पेटी भरून पुस्तकं घेऊन आले होते! ती पाहून “अरे बाप रे दहावी!” अशी एक जाणीव नाही म्हटलं तरी झालीच! त्यामुळे ग्रंथालयाशेजारच्या अभ्यासिकेकडे आमचा मोर्चा (कधी नव्हे ते) वळू लागला.
आमच्या ह्या जास्तीच्या तासांना आम्हाला दहावीचा अभ्यास तर होताच पण त्याशिवाय अभ्यास कसा करायचा ह्याचे ही धडे मिळाले. शाळेमुळे आम्ही ज्ञानार्थी झालो होतोच पण गरज असेल तेव्हा उत्तम विद्यार्थी आणि परीक्षार्थी देखील झालो. प्रबोधिनीतर्फे दर वर्षी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये स्वअध्ययन कौशल्य शिकवणारी शिबिरं होत असतात. ह्यातली बरीचशी कौशल्ये आम्ही नववीपर्यंत शिकलो होतो. पण त्यापुढे जाऊन उत्तम परीक्षार्थी कसे व्हावे हे दहावीमध्ये शिकलो.
पाचवी ते नववी माझ्या लेखी “पास झालो” ह्याहून अधिक मार्कांना काहीही महत्व नव्हते. पण आमच्या दहावीच्या सुरुवातीला आम्हाला पोंक्षे सरांनी एका कागदावर दहावीत किती टक्के हवे आहेत असं लिहायला सांगितलं होतं. मला आठवतंय आम्ही त्यावेळी मुलांच्या मजल्यावरच्या एका वर्गात बसलो होतो. त्या वर्गातल्या फळ्याच्यावर एक पट्टी होती त्यावर लिहिलं होतं – Not failure, but low aim is a crime! ते वाक्य पाहून मी माझे ड्रीम मार्क्स लिहिले होते! आता आमच्यापैकी प्रत्येकीकडे एक ध्येय होते. अशा प्रकारे दहावीचा बाऊ न करता आमची दहावी सुरु झाली.
सुट्टी संपली आणि नेहमीप्रमाणे शाळा सुरु झाली. शाळा सुरु झाल्यावर दहावीत आम्ही बाकी इतक्या गोष्टी केल्या की दहावी म्हणून विशेष ताण कधी घ्यायला वेळच नव्हता. आता शाळेत आम्ही सगळ्यात सिनियर ताया होतो! दहावीच्या वर्गावर अनेक जबाबदाऱ्या असायच्या. शाळा भरताना आज्ञा देणे, प्रार्थना, गीता-गीताई सांगणे, पथक प्रमुख म्हणून पथकशः उपक्रमांची जबाबदारी इत्यादी. दहावीत भाग्यश्री ताई आमच्या वर्ग शिक्षिका होत्या. म्हणजे आमच्या प्रबोधिनीच्या पहिल्या आणि शेवटच्या अशा दोन्ही महत्वाच्या वर्षी भाग्यश्री ताई आमच्या वर्गशिक्षिका होत्या! भाग्यश्री ताई खूप छान संस्कृत शिकायच्या. त्यांच्याबद्दलची आमची आवडती तक्रार म्हणजे त्यांनी आम्हाला कधीही ऑफ तास दिला नाही!! आम्ही कितीही आरडाओरडा केला तरी आजीबात ऐकायच्या नाहीत त्या ह्या बाबतीत! पण आम्ही दहावीत त्यांच्या बरोबर आमचा शाळेतला सगळ्यात संस्मरणीय दिवस plan आणि execute केला! त्याची आठवण पुढे येईलच!
मी आधी लिहिल्याप्रमाणे प्रबोधिनीत आषाढी एकादशीला भजनांचा सुरेख कार्यक्रम असतो. त्याच्या काही आठवणी. एका वर्षी प्रत्येक वर्गाने एक एक अभंग सांगायचा होता. ह्या अभंगांच्या मध्ये धुन गायली जाते. उदा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. तर आम्हाला वाटलं की ह्या धुनीमध्ये सर्व संतांचा उल्लेख होत नाही. म्हणून मग आम्ही ह्याच चालीवर अजून एक कडवं रचलं आणि गायलं. त्यात जनाबाई, संत रामदास, संत चोखामेळा अशी सगळी नावं घातली होती! दरवर्षी पुण्यात पालखी मुक्कामाला असताना आम्ही निवडुंग्या विठोबाच्या मंदिरात वारकऱ्यांच्या सेवेसाठी जायचो. एका वर्षी पालखीच्या दर्शनाच्या रांगेला मदत करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून मी आणि काही जणी पालखीच्या अगदी जवळ उभ्या होतो. तेवढ्यात कोणीतरी मंत्री दर्शनासाठी आले. आम्ही तिथेच उभ्या असल्याने त्यांनी आमची चौकशी केली आणि आमचे कौतुक केले. एवढं करून ते थांबले नाहीत तर त्यांनी त्यांच्या गळ्यातला भलामोठा फुलांचा हार माझ्या गळ्यात घातला! तो हार माझ्या उंचीपेक्षा जास्ती लांब होता! नंतर चौकशी केली तेव्हा कळलं की ते महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री श्री. गोपीनाथ मुंडे होते!
दहावीच्या वारीच्या/आषाढी एकादशीच्या खूप छान आठवणी आहेत. आम्ही सगळ्याजणी आळंदीला प्रस्थान सोहळ्यासाठी गेलो होतो. आदल्या दिवशी संध्याकाळी संत ज्ञानेश्वरांची पालखी मंदिरातून निघते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी वारीला सुरुवात होते. त्या दिवशी संध्याकाळी पालखी पुण्यात पोचते. आम्ही आदल्या दिवशी दुपारी आळंदीला पोचलो. तिथे एका धर्मशाळेत राहायची सोय झाली होती. आम्हाला कोणीतरी सांगितले होते की जेव्हा पालखी प्रस्थान ठेवते तेव्हा मंदिराचा कळस हलतो. अर्थात आमचा आंखो देखी वर विश्वास अधिक! त्यामुळे आमच्यापाशी एक मिशन होतं कळस हलतो का ह्याची शहानिशा करण्याचं! गावात वारकऱ्यांची भरपूर गर्दी होती. तिच्यातून वाट काढीत आम्ही मंदिराशी पोचलो. आकाश भरून आलं होतं. कधीही मुसळधार पावसाला सुरुवात होईल अशी चिन्ह होती. शिवाय इतक्या गर्दीत आम्हाला पालखीचं दर्शन होणं देखील अवघड होतं. तेवढ्यात कोणाच्या तरी ओळखीने आम्ही मंदिराजवळच्या बँकेच्या इमारतीच्या गच्चीवर जाण्याची परवानगी मिळवली (मला वाटतं कोणाची तरी आई त्या बँकेत काम करत होती). आम्ही बँकेत घुसलो आणि गच्चीवर गेलो, फक्त एक गोष्ट होती की त्या गच्चीला कठडेच नव्हते. पण वरून सगळं खूप छान दिसत होतं. आम्ही कळसावर लक्ष ठेवून होतोच. नेमकी पालखी निघणार तेवढ्यात धो धो पाऊस सुरु झाला. आम्ही तरीही भिजत कळसाकडे पाहत उभ्या होतो पण इतका पाऊस पडत होता की काही फुटांवरचं दिसत नव्हतं. त्यामुळे आम्हाला शेवटी गच्चीच्या जिन्यात जावं लागलं. कळस हलतो कि नाही हे पहायचं राहून गेलं! त्या रात्री कुठे जेवलो ते आठवत नाही पण रात्री धर्मशाळेत परत आलो तेव्हा आमच्या पलीकडच्या खोलीत भरपूर वारकरी बायका वस्तीला होत्या. आम्हाला पाहून पहिल्यांदा त्यांना जरा आश्चर्य वाटले पण मग त्यांना काही अभंग म्हणून दाखवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एकदम कौतुकाचे भाव आले! रात्री बारा वाजेपर्यंत आजूबाजूला गोंधळ होता. त्यातून झोपलो तर पहाटे तीनपासून आंघोळीसाठी गडबड सुरु! सगळ्याजणी आवरून बरोबर सकाळी ७ वाजता आमच्या ठरलेल्या दिंडीपाशी हजर झालो. आज आम्ही आळंदी ते पुणे असे वारीबरोबर चालणार होतो. वारीत खूप मजा आली. दिंडीतल्या बायकांबरोबर फुगड्या खेळलो, नाचलो, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चाललो. मस्त वाटत होतं. पण त्याआधी माझी जरा अडचण झाली. माझी एक चप्पल चालायला सुरुवात करतानाच तुटली! एका चपलेने कसं चालणार म्हणून मी काही अंतर अनवाणी चालले. पण दुपारी ऊन आल्यावर रस्ते तापायला लागले! तेव्हा मला रस्त्यावर पडलेल्या दोन पायांच्या दोन वेगवेगळ्या रंगाच्या स्लीपर्स मिळाल्या. त्या घालून मग मी उरलेलं अंतर चालले. अनवाणी चालणं, रस्त्यात पडलेल्या विजोड चपला घालून चालणं everything was fun! एक नक्की की वारीची एक धुंदी असते. तिच्यात तुम्हाला सगळ्या अडचणी क्षुल्लक वाटायला लागतात! मात्र शेवटच्या टप्प्यात आम्ही सगळ्याजणी दमलो होतो. मला आठवतंय संचेतीच्या चौकात पालखी आली आणि आम्ही कला निकेतनच्याच्या समोरच्या फुटपाथवर बसकण मारली! काही वेळ तिथे बसल्यावर पुन्हा उठून चालत प्रबोधिनीत परत आलो!
दुसऱ्या दिवशी सगळ्या शाळेत आलो पण आता पाय बोलत होते! अर्थात आदल्या दिवशी घरी जाऊन कोणीच अभ्यास करण्याचे कष्ट घेतले नव्हते! आम्हाला दहावीत गणित शिकवायला ढवळे सर होते. ते आजोबांसारखेच होते. कडक आणि प्रेमळ. त्या दिवशी त्यांच्या तासाला आम्ही कोणीच गृहपाठ करून आलो नव्हतो हे पाहून त्यांनी चौकशी केली. मग आम्ही मोठ्या उत्साहाने त्यांना आमच्या वारीचा वृत्तांत दिला! आळंदीहून पायी चालत विठोबाच्या दर्शनाला वगैरे वगैरे. त्यावर ढवळे सर आमच्या वर्गासमोर उभे राहिले, त्यांनी आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि म्हणाले – “Forget everything else! For now I am your Vithoba!” That is the moment etched in my memory – ढवळे सर कमरेवर हात ठेवून म्हणत आहेत I am your VITHOBA!
आषाढी एकादशी झाली आणि मग एका रविवारी वर्षासहलीसाठी आम्ही ड्युक्स नोजला गेलो. नेहमीप्रमाणे खूप मजा धमाल केली! संध्याकाळी लोणावळा स्टेशनवर परतीची लोकल पकडण्यासाठी उभे होतो तेवढ्यात प्रिया म्हणाली, माहित्येय का आज काय आहे? आज friendship day आहे! आपला शाळेतला शेवटचा friendship day! म्हणून तिने सगळ्यांसाठी friendship bands आणले होते ते आम्ही सगळ्यांनी बांधले! हे आपलं शाळेचं शेवटचं वर्ष आहे ही भयंकर जाणीव आम्हाला सगळ्यांना त्या दिवशी झाली! दुसऱ्या दिवशी शाळेत आम्ही मोठ्या अभिमानाने ते friendship bands मिरवत होतो. पण मला वाटतं ही संकल्पना शाळेत फारशी स्वागतार्ह नव्हती. तुम्ही ते काढून टाका असं सांगितलं नव्हतं कोणी पण आम्हाला ते जाणवलंच की हे आवडलेलं नाहीये. त्या दिवशी केमिस्ट्रीच्या तासाला सविता ताईंनी विचारलं की हे हातात काय बांधलंय? मग friendship day, friendship band वगैरे गोष्टी ऐकल्यावर ताईंनी विचारलं मैत्री म्हणजे काय? आम्ही काय काय वेगवेगळी उत्तरं दिली! पण सविता ताईंनी सांगितलेली मैत्रीची व्याख्या अजूनही लक्षात आहे. तेव्हा आम्ही ionic bonds, covalent bonds शिकत होतो. ताई म्हणाल्या की मैत्री ही covalent bond सारखी असते ज्यात दोन्ही atoms आपले electrons अशाप्रकारे share करतात की कोणता electron कोणत्या अणूचा आहे हे कळत देखील नाही. अशी मैत्री हवी मग त्याला friendship band ची गरज नसते. आम्हाला हे म्हणणं बरंच पटलं आणि आम्ही ते friendship bands काढून टाकले. पण आजही असं वाटतं की आम्ही आणि शाळा दोघांचंही बरोबर होतं. शाळेला चुकीच्या प्रथांना प्रोत्साहन द्यायचं नव्हतं पण त्याचवेळी आम्हाला आमच्या शाळेच्या शेवटच्या वर्षी मैत्रीचं हे प्रतीक मिरवणं फार महत्वाचं वाटत होतं! अर्थात आज इतक्या वर्षांनी तो friendship band हरवला तरी आमची मैत्री कायम आहे and that is what really matters! (so I guess Shala was more right!)
दहावीच्या गणेशोत्सवाच्या खूप छान आठवणी आहेत. गणपतीचे दिवस मंतरलेले दिवस असायचे. शाळेचा गणपती म्हणजे घरचाच गणपती वाटायचा/वाटतो. दरवर्षी प्रबोधिनीत विविध प्रकारे गणेशोत्सव साजरा व्हायचा. पथकशः कार्यक्रम व्हायचे. पथक म्हणजे houses त्यामुळे पाचवी ते दहावीच्या त्या त्या पथकातील मुलींची चांगली मैत्री व्हायची. दररोज कोणत्यातरी मंडळासमोर किंवा बाहेरगावी ते कार्यक्रम व्हायचे. ते ७ दिवस अभ्यासाला सुट्टी असायची! निम्मेच तास व्हायचे, निम्म्या तासांना सराव आणि दररोज आरती! शिवाय संध्याकाळी मिरवणुकीसाठी दलावर बरची नृत्याचा सराव पण सुरु व्हायचा. साधारणतः १५ ऑगस्टला पहिली रंगीत तालीम, गणपतीच्या दिवशी दुसरी रंगीत तालीम आणि गौरी जेवणाच्या दिवशी तिसरी आणि शेवटची रंगीत तालीम असायची. आठवी ते दहावीचा बरच्यांचा गट असायचा. दहावीला आल्यावर बरच्यांच्या विविध formations ठरवणे आणि बसवणे अशा गोष्टींमध्ये रोज घरी जायला ९-९:३० वाजायचे (शाळा ५ ला सुटली तरी). एकूण ६ पथकं त्यांचे तीन तीनचे दोन गट. त्या दोन गटांमध्ये कोणता गट पुढे असणार अशी स्पर्धा असायची जे रंगीत तालीमीच्या गुणांवर ठरायचे. मग दुसऱ्या गटाने आपल्या formations चोरू नयेत म्हणून त्यांना कल्पनाशक्ती लढवून नावे आणि खुणा देणे वगैरे गोष्टी चालायच्या. आम्ही आमच्या formations ना red giant, white dwarf अशी ताऱ्यांच्या वेगवेगळ्या stages ची नावे दिली होती! त्यांच्या खुणाही मजेशीर होत्या (ह्या खुणा फार महत्वाच्या असायच्या कारण रस्त्यावर नाचताना त्या गोंधळात शिट्टीची विशिष्ट धून ऐकून, ती खुण पाहून पुढच्या आवर्तनाला सगळ्यांनी एकाच वेळी नवीन formation मध्ये जाणे हे coordination त्या खुणांमुळे शक्य व्हायचे). दहावीच्या सो कॉल्ड महत्वाच्या वर्षांतले अनेक तास आम्ही ह्या formations ठरवण्यात, पथनाट्य, पोवाडे इ. सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यात घालवत होतो आणि सुदैवाने कोणालाच त्याची काळजी वाटली नाही!
दहावी (NTS) आणि बहुतेक नववीत (MTS) सुद्धा आम्ही वास्तुतल्या स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शनासाठी जात होतो. प्रबोधिनीत विवेक कुलकर्णी सर आणि सविता ताई हे दोघे प्रामुख्याने MPSC आणि UPSC ह्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र चालवतात. ह्या केंद्रातून आजपर्यंत प्रशासकीय सेवेत महत्वाची जबाबदारी उचलणारे अनेक अधिकारी बाहेर पडले आहेत, पडत आहेत. आमचे वर्ग शनिवारी दुपारी आणि रविवारी सकाळी असायचे. दहावीच्या जोडीला हा वेगळ्या प्रकारचा फोकस असलेला अभ्यासक्रम शिकायला मजा येत होती. मला वाटतं स्पपकेमध्ये शिकलेल्या कौशल्यांचा दहावीत आणि त्यानंतरच्या सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयोग झाला!
आता दहावीच्या सगळ्यात खास दिवसाची आठवण. ही कल्पना नक्की कोणाच्या डोक्यात आली ते मला आता आठवत नाही. पण बहुतेक भाग्यश्री ताईंनी आम्हाला सुचवलं असावं. तर नवरात्र जवळ येत होतं. त्यावेळी संपूर्ण शाळेसाठी काय उपक्रम राबवता येईल असा प्रश्न होता. मला वाटतं आम्ही पाचवीत कि सहावीत असताना असा शारदोत्सव झाला होता. अर्थात त्यावेळी त्याचं संयोजन कोणी केलं होतं ते माहिती नाही पण भरपूर चर्चेअंती (पक्षी: गोंधळाअंती) ह्या वर्षी आपण दहावी मुलींच्या वर्गाने ती जबाबदारी घ्यावी असं ठरलं. सगळ्या गोष्टींसाठी गट करण्यात आले आणि प्रत्येक गटाला जबाबदारी देण्यात आली. मी नियोजनाच्या गटात होते. बेसिकली आमच्या वर्गाला एक अख्खा दिवस शाळा चालवायची होती. मात्र त्या दिवशी शाळेत नेहमीचे तास असणार नव्हते तर विविध स्पर्धा आणि उपक्रम असणार होते. शिक्षकांसकट सर्व ११ वर्गांना बिझी ठेवण्याची जबाबदारी आम्हा ३६ जणींची होती. मला वाटतं शारदोत्सवाच्या नियोजनासाठी भाग्यश्री ताईंनी दिलेला तास हा बहुदा पहिला ऑफ तास J ह्या साऱ्या नियोजनाचे, तयारीचे hilarious किस्से आहेत. आम्ही त्यावर अजून पोट धरून हसत असतो. कमाल ही आहे की मला ह्या संस्मरणीय दिवसाची तारीखच आठवत नाहीये! पण ऑक्टोबरमधला एक दिवस होता. त्या दिवशी शाळेच्या तासांच्या घंटा कधी द्यायच्या ते घंटा स्वतः देण्यापर्यंत (ह्या गोष्टीला ताराबाई फारशा तयार नव्हत्या! एवढ्याश्या पोरी तुम्ही! तुम्हाला दोरी तरी नीट ओढता येणारे का? अशी त्यांची (बऱ्यापैकी रास्त) शंका होती! त्यामुळे घंटा देताना त्या बाजूला उभ्या राहिल्या होत्या.) सगळ्या गोष्टी आम्ही करणार होतो. तो अख्खा दिवस सगळ्या वर्गांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला. आम्ही उपक्रम स्टेशनरी आणि मुलं फिरती असा format ठेवला होता. म्हणजे दर तासाला प्रत्येक वर्गाने वेगळ्या खोलीत जायचे आणि तिथल्या उपक्रमात सहभागी व्हायचे. मुलांच्या कल्पना शक्तीला आणि बुद्धीला चालना देणारे सगळे उपक्रम होते. काही स्पर्धा व्यक्तीशः तर काही गटाने. सगळ्यात शेवटच्या तासाला आम्ही अख्ख्या शाळेचा खजिना शोध ठेवला होता! त्यासाठी खूप खपून clues तयार केले होते! शिक्षकांच्या देखील स्पर्धा घेतल्या होत्या! धमाल आली होती! सगळं वेळेवर होतंय ना, कुठे काही अडचणी येत नाहीयेत ना, पळापळ, गडबड गोंधळ आणि खाजिनाशोधच्या वेळी तर नुसता कल्ला! एक नंबर मजा आली होती! आमच्या वर्गाने खूप मोठी जबाबदारी घेतली होती आणि दिवस पार पडल्यावर काहीतरी करून दाखवल्याची जाणीव. बेस्ट दिवस होता तो!
आमच्या ह्या शारदोत्सवात भाग्यश्री ताईंनी आम्हाला खूप मदत केली! त्यांच्याबरोबर काम करताना मजा आली होती. ह्या निमित्ताने प्रबोधिनीच्या बैठकांविषयी सांगता येईल. प्रबोधिनीत बहुतेक वेळेस कोणत्याही उपक्रमाच्या आधी नियोजनाच्या बैठका होतात आणि उपक्रम झाल्यावर एक शोध बोध बैठक होते आणि त्या बैठकीनंतर श्रम परिहार! ह्या पद्धतीमुळे सगळ्या उपक्रमांना एक शिस्त असते. जिचा पुढे आमच्यापैकी प्रत्येकाला आपल्या व्यावसायिक आयुष्यात उपयोग झाला आहे. ह्याच्या मागेपुढे कधीतरी शाळेचा भोंडला झाला होता. अर्थात तो दर वर्षी होत असे पण ह्या वर्षी दहावी मुली म्हणून नियोजनाची जबाबदारी आमच्यावर होती. शिवाय सगळ्यात सिनियर म्हणून आम्ही सगळ्या साडी नेसून आलो होतो (पण शाळा सुटल्यावर भोंडल्याच्या तयारीसाठी चौथा मजला ते गच्ची अशा असंख्य फेऱ्या मारताना कशाला साडी नेसलो असं काही काळ वाटलं होतं!). भोंडल्याला प्रत्येक वर्गाची एक खिरापत असायची. अर्थात ती ओळखायला अवघड असावी अशी अपेक्षा असते. एका वर्षी आमच्या वर्गाने दही बटाटा शेव पुरी खिरापत म्हणून ठरवली! And it was a BAD idea! दुपारपासून आमच्या वर्गातून चाट पदार्थांचा इतका सुवास दरवळायला लागला होता की आमच्या वर्गाची खिरापत स्वतःच ओळखा पाहू असं ओरडून सांगत होती! What were we thinking! पण त्या वर्षीची सगळ्यात पॉप्युलर खिरापत आमचीच होती J
एकीकडे दहावीचा अभ्यास सुरु होता. पण दिवाळीची सुट्टी संपली आणि मग आमची खरी दहावी सुरु झाली. आता बाकीच्या उपक्रमातून लक्ष कमी करून ते अभ्यासाकडे अधिक असणं अपेक्षित होतं. मला वाटतं आमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत काही परीक्षा झाल्या होत्या. त्यातल्या एक का दोन open book आणि दोन take home परीक्षा होत्या. Open book was open book आणि take home च्या वेळी आदल्या दिवशी संध्याकाळी आम्हाला प्रश्नपत्रिका मिळत असे. त्याचा अभ्यास करून दुसऱ्या दिवशी तोच पेपर लिहायचा. मला आठवतंय एका परीक्षेला पोंक्षे सर पर्यवेक्षक म्हणून होते. सर पेपर घेऊन वर्गात आले आणि म्हणाले की मला काही काम करण्यासाठी पुन्हा प्राचार्य कक्षात जावं लागेल. तर मी तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देतो, काही पुरवण्या सह्या करून ठेवतो. तुम्ही पेपर लिहा आणि वेळ संपली की उत्तरपत्रिका गोळा करून मला खाली आणून द्या. आम्ही तसं केलं. कोणाच्याही देखरेखीशिवाय सगळ्यांनी पेपर लिहिला. त्या दिवशी असं वाटलं की हीच बेस्ट पद्धत आहे परीक्षा देण्याची! स्वतःच स्वतःचा पर्यवेक्षक असलं पाहिजे. मला वाटतं की बरेचदा नियम किंवा कायद्यापेक्षा देखील विश्वास हा अधिक binding असतो कारण नियम किंवा कायदा तोडणं ह्यापेक्षा एखाद्याचा विश्वास तोडणं अधिक कठीण असतं. अर्थात मार्कांना फारसं महत्व नसल्याने परीक्षेत कॉपी करण्याची शाळेत आणि नंतरही कधी गरज वाटलीच नाही!
प्रबोधिनीतल्या प्रत्येक वर्षी शिबीर/निवासी सहल ह्यापैकी काहीतरी झालंच पाहिजे मग दहावी कशी अपवाद असणार! आमचं अतिशय संस्मरणीय असं निवासी शिबीर डिसेंबरमध्ये झालं – आमचं अभ्यास शिबीर! सकाळचे दोन तास घरी जाऊन आवरून दुपारचा डबा घेऊन शाळेत परत यायचं, आणि रात्रीचा डबा पालक शाळेत आणून देणार. उरलेला वेळ शाळेत राहून अभ्यास करायचा. आम्ही रात्री युवती विभागात झोपत होतो. सकाळी लवकर उठून उपासना, एक अभ्यास सत्र, मग घरी जायचं, दिवसभरात अभ्यास सत्र, संध्याकाळी दलावर दोन तास भरपूर खेळ, नंतर एक तास व्याख्यान, मग रात्रीचं जेवण आणि पुन्हा एक रात्रीचं अभ्यास सत्र! कधी तरी रात्री सरांबरोबर गच्चीवर जाऊन आकाश-निरीक्षण करायचं! दिवसभर मनात अभ्यासाचे विचार असायचे. शिवाय एकमेकींच्या सोबतीने छान अभ्यास व्हायचा. आमच्या अभ्यास शिबिराच्या वेळी दर रोज संध्याकाळी खूप सुंदर व्याख्याने झाली. त्यातली तीन मला नीट आठवत आहेत. एक होतं वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक, गड-किल्ले यांचे अभ्यासक डॉ. प्र.के.घाणेकर यांचं! त्यांनी आम्हालाच विचारलं की मी कोणत्या विषयावर बोलू? तेव्हा आम्ही गड किल्ल्यांच्या विषयी असं उत्तर दिलं होतं. व्याख्यान खूप रंगलं पण मला प्रश्नोत्तराच्या वेळी त्यांनी दिलेलं उत्तर खूप लक्षात राहिलं आहे. त्यांना विचारलं होतं की तुम्ही आजपर्यंत इतके गड किल्ले सर केले आहेत. तुम्हाला सर्वात अवघड वाटणारा गड कोणता? त्यावर सर म्हणाले, उंबरठा गड! तुमच्या घराच्या दाराचा जो उंबरठा असतो ना तो ओलांडून एकदा तुम्ही बाहेर पडलात की मग काहीच अवघड नसतं! How very true! दुसरं आठवणारं व्याख्यान म्हणजे पहिले मराठी एव्हरेस्टवीर श्री सुरेंद्र चव्हाण यांचं. ते नुकतेच एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करून आले होते. त्यांचे अनुभवकथन ऐकणे खूप प्रेरणादायी होते. तिसरे व्याख्यान झाले होते भटक्या विमुक्त जातीच्या लोकांसाठी काम करणारे श्री. गिरीश प्रभुणे यांचं. त्यांच्या व्याख्यानाच्या वेळी ओळख आणि समारोपाची जबाबदारी माझ्यावर होती. मी माझ्या ओळखीमध्ये प्रभुणे सर हे भटक्या विमुक्त लोकांच्या पुनर्वसनाचे काम करतात अशा अर्थाचे वाक्य बोलले होते. सरांनी त्यांच्या व्याख्यानात त्या वाक्याचा उल्लेख करून ह्या लोकांनी कधी एका जागी वस्ती केलीच नसल्याने त्यांचे पुनर्वसन नसून हे प्रथमवसन करण्याचे काम चालू आहे असं म्हटलं. हे लक्षात ठेवून मी समारोपाच्या वेळी प्रथमवसनाचा उल्लेख केला त्याबद्दल त्यांनी माझे कौतुक केले होते हे लक्षात आहे. आमच्या अभ्यास शिबिरात आमच्या जोडीला आमच्या यु.वि. तल्या ताया पण असायच्या. त्या पण त्यांचा अभ्यास करायच्या किंवा पुस्तक वाचायच्या. अभ्यास शिबीर म्हटलं की मला पहाटे पहाटे कॉरिडोरमध्ये फेऱ्या मारत केलेले संस्कृतचे पाठांतर आठवते. अभ्यासिकेत टेबलावर डोकं ठेवून काढलेल्या डुलक्या आठवतात! दुपारी फिजिक्स लॅबच्या मागच्या बाजूला बसून पुस्तक वाचण्यात हरवलेल्या आम्ही सगळ्या आठवतो. माझी फेवरेट जागा होती ती वाचण्यासाठी! फार भारी दिवस होते ते. आम्ही शाळेत होतो आणि अभ्यास करत होतो पण तरीही शाळेशी आमचा काही संबंध नव्हता. आमचं स्वतःचं एक वेळापत्रक होतं. शाळेच्या घंटा आमच्यासाठी नव्हत्याच! अभ्यास आजीबात बोअर वाटत नव्हता कारण त्याजोडीने दल आणि व्याख्यानं देखील होती. आणि मुख्य म्हणजे आम्ही एकट्या अभ्यास करत नव्हतो. अभ्यास शिबीर संपलं आणि दुसऱ्या दिवसापासून आमच्या प्रिलीम परीक्षा सुरु झाल्या.
सीबीएसई बोर्डाची परीक्षा फेब्रुवारीत सुरु होते. त्यामुळे प्रिलीम नंतर जवळपास लगेच आमची अभ्यासासाठी सुट्टी सुरु झाली. पण त्या आधी एक गोष्ट बाकी होती. गेली ५ वर्ष आम्ही दर वर्षी पाहत होतो दहावीच्या मुलींना निरोप समारंभाच्या दिवशी रडताना! हा समारंभ नववीच्या मुली दहावीच्या मुलींसाठी आयोजित करत असत. आमच्या वर्गाने ठरवलं होतं की त्या दिवशी रडायचं नाही. एकतर आम्हाला माहिती होतं की आम्ही शाळेत पुन्हा पुन्हा येत राहणार आहोत. ह्या वास्तूशी नातं कायम जोडलेलं असणार आहे. मग का रडायचं? हे सगळं आम्ही पाळलं. निरोप समारंभाच्या दिवशी आम्ही कोणीच रडलो नाही. पण हे बहुदा शक्य झालं कारण आम्ही त्या आधी एकदा जोरदार रडलो होतो. एका ऑफ तासाला वर्गात नेहमीप्रमाणे गडबड गोंधळ सुरु होता. असं होतं ना बरेचदा की अशा गोंधळात एक क्षण असा येतो की अचानक सगळे एकाच वेळी शांत होतात आणि मग एक विचित्र सन्नाटा पसरतो. तर अशावेळी आमच्या वर्गाची ठरलेली ट्रिक होती. टाळ्या वाजवायच्या! तर त्या तासाला अशीच शांतता पसरली आणि मग एकदम कोणाच्या तरी लक्षात आलं की आता काही दिवसांनी आपण ऑफ तासाला अशा एकत्र बसून मजा करणार नाही! नंतर कधीच नाही. आणि मग chain reaction सुरु झाल्यासारखं आम्हा सगळ्यांना रडू आलं!
पीएल सुरु झाली. मी काही दिवस घरी तर काही दिवस अभ्यासिकेत जात असे. आम्ही बऱ्याचदा दिवस ठरवून शाळेत यायचो. त्यामुळे अभ्यासाबरोबर टीपी, गप्पा पण व्हायच्या. काही नाही तर कोपऱ्यावरच्या चंदूच्या दुकानात जाऊन चहा तर नक्की असायचा. ते आमचं अजूनही आवडीचं ठिकाण आहे. दुसऱ्या आमच्या खाण्याच्या जागा म्हणजे कोपऱ्यावरची कच्छी दाबेलीची गाडी आणि आमच्या दहावीच्या वर्षीच सुरु झालेला फेमस जीवाला खा सामोसा!
सीबीएसईची परीक्षा कमी किचकट असते. १०० मार्कांचे पाच पेपर आणि दोन पेपर्सच्यामध्ये ५ ते ७ दिवसांची सुट्टी. त्यामुळे जवळपास महिनाभर परीक्षा चालू असते! आता एवढी रेंगाळणारी परीक्षा असल्याने मला दहावीची परीक्षा म्हणून वेगळं काही लक्षातच नाहीये! त्या महिन्याभरात मी एका लग्नाला गेले, माझ्या ताईचं डोहाळेजेवण झालं! आणि त्यातच पेपरही झाले! केंद्रीय बोर्डाच्या शाळेत आमचं केंद्र होतं. मला आठवतंय आमच्या पहिल्या पेपरला आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी यु.वि.च्या काही ताया आल्या होत्या. मला वाटतं पोंक्षे सर पण आले होते. एका महिन्याने परीक्षा संपली आणि आम्ही मज्जा करायला मोकळ्या झालो. परीक्षा संपल्यावर पहिल्यांदा काय करायचं ते आमचं खूप आधी ठरलं होतं! आम्हाला कहो ना प्यार है पाहायचा होता! मला वाटतं जानेवारीत तो रिलीज झाला आणि आता मार्चच्या शेवटी आम्ही तो पाहणार होतो! शोधलं तर (आमच्या सुदैवाने) फक्त लक्ष्मीनारायणमध्ये त्याचे शोज होते! आम्ही तिकीट काढायला गेलो तेव्हा आम्हाला सलग तिकीटं हवीत असं सांगितल्यावर त्या खिडकीवरच्या माणसाने आम्हाला पूर्ण थेटर खाली आहे कुठे पण बसा असं सांगितलं होतं :D
आमची परीक्षा संपल्यावर पुढचे तीन दिवस आमच्या प्रज्ञा मानस तर्फे aptitude tests घेतल्या होत्या. खरं सांगायचं तर माझी त्या क्षणी कोणत्याही परीक्षा/चाचण्या देण्याची इच्छा नव्हती. ह्या परीक्षेच्या चक्रातून कधी एकदा बाहेर पडतोय असं झालं होतं मला. फार फार निरीच्छेने मी त्या चाचण्या दिल्या होत्या!
त्यानंतर लगेच रंगपंचमी होती. आमच्या वर्गाचा अत्यंत आवडता सण! आम्ही जवळपास दरवर्षी एकदा तरी पाणी पिण्याच्या नळावर पाणी-पंचमी साजरी करायचोच! म्हणजे कोणीतरी पाणी उडवायला सुरुवात करायचं की मग सगळ्या भिजून चिंब ओल्या! एका वर्षी वर्गातल्या एकीच्या घरी जाऊन दिवसभर रंग खेळलो होतो! आता तर आम्हाला नाही कोणीच म्हणणार नव्हतं! That is the best rangpanchami ever! नंतर तीन दिवस तोंडावरचा रंग गेला नव्हता माझ्या!
आम्ही परीक्षा संपल्याच्या आणि सुट्टीच्या आनंदात इतक्या मश्गुल होतो की त्यावेळी शाळा संपली अशी जाणीवच झाली नाही! यथावकाश दहावीचा निकाल लागला. आमच्यापैकी बहुतेक सगळ्या जणींना उत्तम मार्क पडले होते. मी ही खुश होते. दहावीच्या पहिल्या दिवशी माझे जे ड्रीम मार्क्स मी लिहिले होते त्यापेक्षा २ मार्क जास्तीच पडले होते मला! रूढार्थाने शाळा संपली! पण आता असं वाटतं की शाळा संपली आणि मग आम्ही खऱ्या प्रबोधिनीच्या मुली झालो. इथे मी थांबणार आहे. मी खूप प्रकारे ह्या पोस्टचा शेवट लिहून बघितला आणि डिलीट केला. कारण आत्ता लक्षात येतंय की दहावी संपली, शाळा संपली तरी प्रबोधिनीपण संपलेलेच नाही आणि ते कधी संपणारही नाहीए!