घरी दूध खूप शिल्लक होतं म्हणून पनीर करून काहीतरी करायचं ठरवलं. घरी पनीर पहिल्यांदाच करत होते. मग कुणाल कपूरची रेसिपी बघून दोन लिटर उकळत्या दुधात मीठ घातलं, एका लिंबाचा रस घातला पण हाय रब्बा दूध फुटतच नव्हतं. पुन्हा एक लिंबू पिळून ढवळा मारून दहा मिनिटं रामभरोसे उकळत ठेऊन पुस्तक वाचत बसले. थोड्या वेळाने पनीर झालं एकदाचं. मग ते कापडात बांधून, थंड पाण्यात घालून, पिळून फ्रीजमध्ये ठेवलं आणि पुढचा कार्यक्रम सुरू केला.
पनीर लहसूनी ग्रेव्ही (दोन - तीन माणसांसाठी)
आता आधी कांदा टोमॅटो ग्रेव्ही करून घेऊ,
त्यासाठी साहित्य:
तेल १ टेस्पू,
खडा मसाला (ठेचलेली हिरवी वेलची १, दालचिनी तुकडा १, लवंग २, काळी मिरी २, तमालपत्र १)
मोठे कांदे ३ - उभे चिरलेले
मध्यम आकाराचे टोमॅटो ५ - मध्यम चिरलेले (बारीक चिरण्याची गरज नाही)
लसूण पाकळ्या - तीन चार चिरून
आलं - एक इंच चिरून
हिरव्या मिरच्या - दोन तुकडे करून
काजू - १० वीस मिनीटे पाण्यात भिजवलेले. (काजू नसल्यास बदाम चालतील. भिजवून साल काढलेले.)
कृती - कढईत तेल गरम करून त्यात खडा मसाला काही सेकंद परतून सुगंध येऊ लागल्यावर त्यात कांदा, आलं लसूण मिरची घालून परता. तो थोडा सोनेरी झाला की टोमॅटो घाला. तो परतून थोडा मऊ झाला की त्यात किंचित हळद, एकेक चमचा लाल तिखट, धने जिरे पावडर घालून नीट ढवळून गॅस बंद करा. गार झाल्यावर मिक्सरला काजूसह गंधासारखं वाटलं की आपली ग्रेव्ही तयार. ही बाजूला एका बोलमध्ये काढून ठेवा.
मुख्य ग्रेव्ही:
साहित्य: तीन टे स्पू तेल किंवा तूप,
जिरे एक टी स्पून
आलं एक इंच -ज्युलियन केलेले.
हिरवी मिरची दोन - तिरकी लांब कापलेली
कांदा मध्यम आकाराचा एक - बारीक चिरलेला
लसूण पाकळ्या दहा बारा - बारीक चिरलेल्या
अर्धी वाटी फेटलेले दही
साखर दोन चमचे
मीठ
गरम मसाला
कसुरी मेथी
फ्रेश क्रीम/साय मलई - दोन चमचे
कोथिंबीर - बारीक चिरलेली दोन चमचे
पाव किलो पनीर - लांबट तुकडे करून
कृती:
कढईत तेल/तूप गरम करून त्यात जिरं, आलं लसूण घालून वीसेक सेकंद परता. मग त्यात कांदा घालून नीट सोनेरी होईपर्यंत परता, काळा नको! आता आधी करून ठेवलेली कांदा टोमॅटो ग्रेव्ही आणि मीठ, साखर घालून मस्त ढवळत रहा. (चार पाच मिनिटे) ही जितकी छान परतली जाईल तितकी चव छान येईल. ग्रेव्ही घट्ट व्हायला लागली की भांडंभर गरम पाणी घालून ढवळा. झाकण ठेऊन उकळू द्या.
एकीकडे लहान कढईत थोडं तूप घेऊन त्यात पनीरचे तुकडे जरासे शॅलो फ्राय करून बाजूला ठेवा. उरलेल्या तुपात तीनचार लसूण पाकळ्या स्लाइस करून तळून घ्या.
मुख्य ग्रेव्ही उकळली की त्यात फेटलेले दही, तिरक्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चमचाभर गरम मसाला, धने पावडर आणि कसुरी मेथी घाला. शेवटी पनीर घालून तुकडे मोडू न देता हलक्या हाताने एकत्र करा. तळलेले लसूण पाकळ्या आणि तूप वरून ओतून, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून किंचित ढवळा. पुन्हा एकदा मीठ, तिखट चेक करून कमी जास्त करा. वाढताना सजावटीसाठी वरून क्रीम घालता येईल, मी घातले नव्हते.
झाली एकदाची पनीर लहसूनी ग्रेव्ही. पोळी, रोटी, नान किंवा जीरा राईस, साधा भात कश्याही बरोबर छान लागते. मस्त गरमागरम जेवून ब्लँकेटमध्ये घुसा, लग्गेच झोप लागण्याची गॅरंटी!!
ता. क. १. रेसिपी भयंकर मोठी वाटली तरी तितकी किचकट नाहीये, दोन्ही ग्रेव्हीची तयारी एकदमच केली तर पटापट होते.
२. पनीर ऐवजी बटाटा, मटार, किंवा बोनलेस श्रेडेड चिकनसुद्धा या ग्रेव्हीत छान लागेल असं वाटतं.