काही महिन्यांपूर्वी साधना मासिकात शरद बाविस्कर या माणसाची ओळख, काम यांच्याविषयी वाचलं. त्यांचं पुस्तक आलय असंही वाचलं. वाचायला हवं अशी नोंद घेतली मनाने. आणि लकीली नवऱ्याने हे पुस्तक मागवलं. परवा ट्रेनमधे पुस्तक हातात घ्यायला सवड मिळाली आणि पुस्तक पूर्ण करूनच थांबले.
मला लिहायला काही चांगलं येत नाही, पण या पुस्तकाच्या विषयी लिहिल्याशिवाय रहावेना.
धुळे जिल्ह्यात, रावेर नावाच्या खेड्यात या मुलाचा जन्म झाला. कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरच्या परिस्थितीमुळे रोजंदारीवर मिळेल ते काम करत गेला.
चौथीपर्यंत शाळेत जायला न आवडणारा, इंग्रजीत मार्क कमी पडल्याने दहावीत नापास झाल्यामुळे फुटकळ कामं करत काही काळ घालवणारा ते नंतर आपापलं इंग्रजी आणि फ्रेंच शिकून उत्कृष्ट फ्रेंच शिक्षक म्हणून काम करणारा, शिष्यवृत्ती मिळवून युरोपमधे शिक्षण घेणारा, पाच पाच मास्टर्स डिग्र्या मिळवणारा माणूस, आता जेएनयूसारख्या ठिकाणी प्रोफेसर असा अफाट प्रवास आहे.
सुरुवातीपासूनच तत्त्वज्ञान या विषयाकडे प्रचंड ओढा असल्याने, फ्रेंच तत्त्वज्ञान या विषयात पीएचडीचा अभ्यास सुरू केला. पण कालांतराने सयुक्तिक वाटल्याने हिंदू तत्त्वज्ञान आणि फ्रेंच तत्त्वज्ञान यांचा एकत्र अभ्यास करायला घेतला.
पुस्तकात फारशी न सांगितलेली, कुटुंबाच्या त्रासदायक भूतकाळाची पार्श्वभूमी, मोलमजुरी करणाऱ्या आईचे कष्ट आणि माया, स्वतःचं शारीरिक दुखणं, पश्चिम महाराष्ट्रातील छोट्या खेड्यात असणारं शिक्षणास पूरक नसणारं वातावरणात याही गोष्टींचे संदर्भ निवेदनाच्या अनुषंगाने येतात; पण जास्त भर हा शिक्षण कसं, कोणतं, का घेतलं. कोणाची मदत झाली, अडचणींना तोंड कसं दिलं, संधी कशा मिळाल्या आणि त्यांचा फायदा कसा झाला यावरच आहे.