आप्पेपात्रातली कोफ्ता करी: आफ्ता करी

Screenshot_20230115_083556_0.jpg

पूर्वतयारीचा वेळ: : ३० मिनिटे
प्रत्यक्षात लागणारा वेळ: : ४५ मिनिटे

लागणारे जिन्नस:
कोफ्त्यांसाठी :

किसलेले पनीर एक वाटी , साधारण पाऊन वाटी चितळे गुलाबजामचे कोरडे मिक्स, किसलेले गाजर अर्धी वाटी, दोन बटाटे उकडून किसून, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, पाच काजू- अर्धबोबडे ,चिमूटभर वेलची पूड, अर्धा चमचा साखर , मीठ, चमचाभर तिखट, चमचाभर गरम मसाला , दोन चिमूट कसूरी मेथी. परतण्यासाठी तेल. पत्ताकोबी घरात असूनही लक्षात आले नाही घालायचे.

करीसाठी:
दोन कांदे, चार टोमॅटो, प्रत्येकी एकएक चमचा आलेलसूण पेस्ट, चमचाभर तिखट,१- २ चमचे गरम मसाला / शाही पनीर मसाला,चिमूटभर वेलची पूड, अर्धा चमचा साखर, मीठ, चिमूटभर हळद, दोन तमालपत्रं, अर्धा कप दूध ,अर्धा कप हाफ अँड हाफ. जी अर्धी मलाई असते, त्यातल्यात्यात कमी स्निग्धांश असलेली मलई असते.

क्रमवार पाककृती:
कोफ्त्यांसाठी वर दिलेले सगळे घटक एका मोठ्या बोलमधे गोळा करा. हलक्या हाताने मिसळून व मळून गोळे करून घ्या. 'हलक्या हाताने' लक्षात ठेवा कारण हे बेसनाचे लाडू नव्हेत. दाबून मळलेले कोफ्ते गच्च होतात व पोटांत (त्यांच्या) कच्चे रहातात. शिवाय आपण तळून न घेता परतून घेणार आहोत, म्हणून वरून किंचित चपटेही चालतील. पृथ्वी जशी जिऑईड आकाराची आहे तसे , अजून चपटे झाले तर उडत्या तबकड्या होतील , हाकानाका. त्याही चालतील.

१. जिऑईडपूर्व मिश्रण

Screenshot_20230115_083803.jpg

२. मिश्रणात तेल घातले की नाही की लक्षात नाही.
३. हे चेंडू किंवा तबकड्या आप्पेपात्रात व्यवस्थित परतून घ्या. दोनतीन थेंब तेल घालून प्रत्येक बाजू परतायला मध्यम आचेवर तापलेल्या आप्पेपात्रात तीन मिनिटे तरी लागतील. आच वाढवली की पटकन होतात पण आतून कच्चे रहातात , शिवाय यात गुलाबजाम मिक्स मधली दूधाची पावडर व पनीर ह्यां दोन्ही घटकांत असलेल्या प्रथिनांमुळे हा पदार्थ चटकन करपतो व काळे डाग पडतात. प्रोटीनच्या साखळीमुळे असे होत असावे.
Screenshot_20230115_083627.jpg

४. तयार आफ्ते=आप्पे+कोफ्ते
Screenshot_20230115_083640.jpg

माझ्याकडे चांगले आप्पेपात्र आहे पण कपाटाची अवस्था 'हंड्यावर हंडे , हंड्यावर हंडे ठेवले सात, त्याच्यावर ठेवली परात' अशी आहे. हे हाताशी आले तेच घेतले.
अवांतर: 'हंड्यावर हंडे , हंड्यावर हंडे, हंड्यावर हंडे ठेवले सात, त्यावर ठेवली परात,' एवढं बिल्डअप करून जुन्याकाळच्या मुली लक्ष्मीकांतरावांच्या किंवा कमलाकररावांच्या घरात वगैरे यमक जोडायच्या, गेला बाजार ह्रितिकराव-जॉनराव तरी ऐकायला न्याय्य वाटलं असतं. असो. Wink

५. दोन कांदे , आले लसून पेस्ट एकत्र करून थोड्या तेलावर+थोड्या लोण्यावर दोन तमालपत्रं घालून परतली, क्रिमी दिसायला लागल्यावर दोन टमाट्यांची पेस्ट त्यावर घातली . दोन उकळ्या येऊ दिल्या.
Screenshot_20230115_083651.jpg
६. परतून झाल्यावर त्यात कोरडे मसाले , साखर , वेलची पूड वगैरे घालून अजून दहा मिनिटे उकळले, मलई व दूध थोडे उकळून कसूरी मेथी घातली.
७. अगदी खायच्या पाच मिनिटे आधी आफ्ते यांत सोडले. घटकाभर मंद आचेवर राहू दिले .
Screenshot_20230115_083556_1.jpg
कोफ्ते मऊच हवे असतील तर अजून शिजवून घ्या. आमच्याकडे भारतदेशाप्रमाणे कोणीतरी एकजण नेहमीच विरोधीपार्टीत असते. त्या एकाला हे मुरलेले आफ्के दुसऱ्या दिवशी आवडले, बाकीच्यांना काही फरक पडला नाही. पण हे मुरलेले अगदी बाहेरच्या कोफ्त्यांसारखे लागतात!!!

©अस्मिता :)

वाढणी/प्रमाण:
४ लोकांसाठी २ वेळा
अधिक टिपा:
हे त्यातल्यात्यात कमी स्निग्ध आहे. फॅट फ्री नाही व आरोग्यदायी नाही. सोपे व घरगुती आणि ताजे असल्याने छानच लागते.

माहितीचा स्रोत:
आप्पेपात्रासोबत मिळालेले बुकलेट

अधिक टिपा :
हे त्यातल्यात्यात कमी स्निग्ध आहे. फॅट फ्री नाही व आरोग्यदायी नाही. सोपे व घरगुती आणि ताजे असल्याने छानच लागते.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle