अत्तरापरी उडून जाई
क्षण जरी फिरूनी हाती न येई
मोहक मादक मधुर साजिरी
स्मरणकुपी ती भरून वाही
त्यात असे एक नाजूक कप्पा
अलगद रचल्या आठवणींचा
हलकी फुंकर पुरे उकलण्या
सडा गुलाबी मधुगंधाचा
साठवली त्या खोल तळाशी
तुझी नि माझी अबोल प्रीति
वळून पाहू मागे जाता
गाठ तुझ्याशी अखंड होती
सखे तुझ्यातच पाहत आलो
ऋतू सुखाचे, दिवस कळ्यांचे
तुझ्यामुळे तर रिचवू शकलो
घोट नकोशा वास्तवतेचे
तूच दिल्या स्वप्नांना वाटा
तूच उभारी श्रांत मनाला
निराश होता कोलाहली या
तूच विसावा आर्त जिवाला
स्मरण अता हे उरले हाती
तीच शिदोरी सोबत माझी
जुन्या क्षणांचा अमूल्य ऐवज
वाटेवरचा प्रकाश होई
- ज्ञाती