एका सांजेच्या पारीला

एका सांजेच्या पारीला
मन कोरे निराकार
जणु मनाने धरला
निळ्या नभाचा आकार..

आला सरसर वारा
सारी मळभ नभाचे
मनअंगणी हसले
जणु ठसे मेघियाचे

गाणे ओल्या पावसाचे
थेंबाथेंबाने रचले
मन पावसाचे जणु
को-या मातीत रुजले

नभी पाऊस भरता
भरे अमृताचा घट
गाजे सावळा सोहळा
स्वर गंध अनवट

उभे रान थरारले
अन शहारली पाती
नवलाईने फुलली
अंतरीची नवी नाती
सरे सांज सुरमई
रात चंदेरी निजली
ओल्या पहाटगंधात
नवी किरणे सजली..
नवी किरणे सजली..

Keywords: 

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle