९० च्या दशकाच्या सुरुवातीला जागतिकीकरणानंतर आपल्याकडच्या शहरी भागांमध्ये झपाट्यानं बदल व्हायला लागले. नवनवी टीव्ही चॅनल्स, इंटरनेट कॅफे यांच्यामार्फत आधी कधीही न पाहिलेलं एक जग लोकांच्या घरात पोहोचलं. एम-टीव्ही, चॅनल-व्ही यांचाही यात मोठा हात होता. परदेशी पॉप गायकगायिका, त्यांचे म्युझिक व्हिडिओज, त्यातली फॅशन या सगळ्याचं विशेषतः तरुणांना वेड लागलं. पुढे अनेक घरांमध्ये PC दिसायला लागले. वॉकमन्स, मोबाइल फोन्स, CDs ची देवाणघेवाण हे पाठोपाठ होतंच. त्यातूनच पॉर्नोग्राफी बघण्याच्या व्यसनाने शिरकाव केला.
‘विश्वामित्र सिण्ड्रोम’ पुस्तकात हा सगळा काळ येतो. त्यातही केंद्रस्थानी हे पॉर्न बघण्याचं व्यसन आहे. त्याला केंद्रस्थानी ठेवण्याचा आपला उद्देश लेखकानं प्रस्तावनेत स्पष्ट केला आहे.
ठाण्यातल्या मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या एका आळीत घडणारी ही कथानकं आहेत. पहिल्या एक-दोन कथांमध्ये त्या आळीचा tone प्रस्थापित होतो. लेखकानं स्वतः ते जग तेव्हा पाहिलेलं आहे. तिथल्या तरुणाईचा तो सुद्धा एक भाग होता. त्या प्रवाहात ओढला जातानाच अनेक बारीकसारीक गोष्टी त्याच्या मनात नकळत टिपल्या जात होत्या. त्यातूनच पुढे कधीतरी त्याच्या डोक्यात पुस्तकातल्या पात्रांनी जन्म घेतला. त्या पात्रांचं ‘प्रसंगी अपरिपक्व, विचारभणंग असणे जसंच्या तसं दाखवण्या’चा हेतूही लेखकानं सुरुवातीलाच स्पष्ट केला आहे.
मुळीच सद्गुणी, नावालाही आदर्शवादी नसणारी अशी ही पात्रं पुस्तकभर पसरलेली असणे, हे वाचक म्हणून आपल्याला धक्कादायक वाटू शकतं. मात्र एक वेगळा प्रयोग म्हणून त्यात मजा आहे. पुस्तकामागचं लेखकाचं उद्दीष्ट सतत डोक्यात ठेवून वाचल्यास ती मजा घेता येईल. सूक्ष्म विनोद, अतिशयोक्ती, खिल्ली, टिंगलटवाळी, फार्सिकल ट्रीटमेंट, ब्लॅक कॉमेडी – हे सगळं त्यांत आहे आणि ते अगदी चित्रदर्शी आहे.
या ‘पुरुषवादी’ कथा आहेत. पात्रांच्या तोंडचे संवाद, त्यांच्या मनातले विचार नेमकेपणानं मांडताना वापरलेली भाषा, शब्दप्रयोग आपल्यासाठी अनोळखी नक्कीच नाहीत; मात्र ते असे उघडउघड, छापिल मराठी पुस्तकांत सहसा बघायला मिळत नाहीत. वाचकांसाठी हा आणखी एक धक्का वाटू शकतो. या प्रकारचे धक्के खाण्याची तयारी ठेवूनच पुस्तक वाचायला हवं.
कथांची शीर्षकंही unique आहेत. त्यांतली ‘बब्राबभ्राबभ्रा’ ही कथा आधी ऐसी अक्षरे ऑनलाइन दिवाळी अंकात वाचली होती. तेव्हा वाचताना असे सगळे धक्के बसल्याचं आठवतं. तेव्हा मी ती कथा एका बैठकीत पूर्ण वाचू शकले नव्हते, हे देखील कबूल करायला हरकत नाही. याला कथा म्हणायचं का; का म्हणायचं; त्यात वाहवा करण्यासारखं काय आहे; वगैरे बरेच प्रश्न पडले होते. नंतर कधीतरी मी पुन्हा ती कथा एकसलग वाचली. मजा आली हे स्वतःशीच कबूल केलं. पुस्तकातल्या बाकीच्या बहुतेक कथाही पुढे कुठे ना कुठे छापून आल्या. पण मी त्यांतली एकही कथा वाचली नव्हती.
पुस्तकातली मला सर्वात आवडलेली कथा म्हणजे ‘गर्लफ्रेन्ड एक्सपिरिअन्स’. अगदी शीर्षकापासूनच झकास जमून आलेली आहे ती. त्यातल्या ‘एक्सपिरिअन्स’मधून लेखकाला जे अभिप्रेत आहे, ती गोष्ट बहुतेक सर्वांनीच कॉलेजवयात या-ना-त्या प्रकारे अनुभवलेली असतेच. शिवाय कथेतलं डिटेलिंग फार भारी आहे. मला सहसा कोणतंही पुस्तक एकसलग वाचायला आवडतं. पण ही कथा वाचल्यावर पुढे ५-६ दिवस मी हे किंवा दुसरं कोणतंही पुस्तक हातातच घेतलं नाही. इतका त्याचा परिणाम ‘अहा!’ होता.
तुलनेने काही कथा जरा ‘कथा’ नसणार्या, प्रसंगी भरकटलेल्या (किंवा ताणलेल्या), अनावश्यक तपशील असलेल्या वाटल्या. सगळ्या कथा प्रथमपुरुषी आहेत; मात्र प्रत्येक कथेतला निवेदक वेगळा आहे. हा प्रयोगही मला आवडला. प्रत्येक कथेत इतर कथांमधले काही ना काही संदर्भ/उल्लेख येतात. त्या अर्थाने, म्हटलं तर या कथा जोडलेल्या आहेत; म्हटलं तर स्वतंत्रपणेही वाचता येतील अशा आहेत. मात्र त्या जोडकथा म्हणून वाचलेल्या जास्त चांगल्या, असं (पूर्ण पुस्तक वाचल्यावर) माझं मत.
जाताजाता... ‘जागतिकीकरणाला अगदी सुरुवातीलाच तोंड दिलेली तरुण पिढी’ या वर्णनात माझ्या वयोगटातले अनेकजण मोडतात. त्या सुरुवातीच्या वर्षांत मी सुद्धा परदेशी म्युझिक चॅनल्स आवडीनं पाहिली आहेत. तेव्हाची काही गाणी आजही मी घरात काम करता करता गुणगुणते. त्यापलिकडच्याही काही गोष्टी तेव्हा समोर आल्या होत्याच. तरीही पुस्तकात दिसलेला भवताल (भौगोलिक अर्थानं नव्हे) मला बराचसा अनोळखी होता. त्यामुळे पुस्तक वाचून पूर्ण झाल्यावर मला आधी प्रश्न पडला, की जागतिकीकरणाच्या लाटेचा असा तडाखा आपल्याला बसलाच नाही? की बसलेला कळलाच नाही? की आपण तो सहज झेलला? की आपल्याला काही फरकच पडला नाही? की आणखी काही?
मला वाटतं, तेव्हाच्या तरुण पिढीतल्या प्रत्येकाच्या भवतालानुसार या प्रश्नांची वेगवेगळी उत्तरं येतील. ती मिळवण्यासाठी, नव्हे किमान या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी तरी हे पुस्तक वाचायला हवं. तो एक वेगळ्या धाटणीचा सामाजिक दस्तऐवज आहे.