वाईनची रेसिपी म्हणजे किमान २१ दिवसांची निश्चिंती. झटापट फटाफट काही कामच नाही. शिवाय हाताळणीसाठी निर्जंतुकीकरण आणि बेसिक स्वच्छता हे पाळणे मस्ट.
बाकी, काम एकदम सिम्पल आहे.
अननसाच्या वाइनची रेसिपी लिहितेय. मला याला ११% अल्कोहोल मिळालं होतं. इतर फळांसाठी साखरेचं आणि यीस्टच्या खाऊचे प्रमाण थोडेफार बदलणार, त्यानुसार अल्कोहोल कंटेंट. आधी शिरगावकरांचा ब्लॉग फॉलो करत होते, पण हल्ली युट्युब आणि इतर विंग्रजी ब्लॉग वाचून रेसिपी माझी मीच ट्विक करते आहे.
साधारण किलोभर असलेला जराजास्त पिका अननस घेतला. तो चिरून मिक्सरमध्ये फिरवला. या गरात अर्धा किलो साखर घातली. गोडी बघून हे कमीजास्त होऊ शकेल पण साखर घालायलाच हवी, अन्यथा यीस्ट काय करणार? साखर थेट घालण्यापेक्षा पाण्यात विरघळून पाक करूनही घालता येते. त्याने वाइनला अधिक बॉडी मिळते. आता यात कॅम्पडेन टॅबलेट (हे आपल्याकडे महाग मिळतात, मी युएसवरून मित्रामार्फत मागवलेत, ते न्सतील तर सोडीयम मेटाबायसल्फाइट चालू शकते), यीस्ट न्युट्रीयंट (हे नसेल तर मूठभर गहू आणी पाचसहा बेदाणे- मी गहू वापरते) आणि यीस्ट घालून जारमध्ये ठेवून द्यायचे. मोकळ्या तोंडाचा हवा आतबाहेर जाइल पण किडेमकौडे आत जाऊ शकणार नाहीत असे झाकण असलेला जार हवा. मी लोणच्याची बरणी वापरते आणि झाकणाची एक फिरकी सैल ठेवते.. हे सातेक दिवस ठेवायचे आहे. दुसर्या दिवशी बुडबुडे येतात. फर्मेंटेशन झकास सुरू असते. जारला कान लावून ऐकले की यीस्टच्या गप्पा ऐकू येतात. अधून मधून हे मिश्रण ढवळून घ्यायचे. घेताना चमचा हात कोरडा वगैरे हवा.
आता बुडबुडे कमी होत आले की हे गाळून मग सेकंडरी फर्मेंटेशनला ठेवायचे. त्यासाठी मी हा जार घेतलाय. यात आता किमान दोन ते तीन आठवडे मिश्रण ठेवायचे आहे. हवेशी संपर्क नको आणि ढवळाढवळ अजिबात नको. सेडीमेंट्स खाली बसत जातात. वर क्लिअर वाईन मिळते. क्लीअरिंगसाठी पेक्टिन किंवा बेंटोनाइट पावडर किंवा इतर एजंट्स वापरता येतात. पोटॅशियम सोरबेट किंवा वाईन स्टाबिलायझर यामुळे यीस्टचे काम थांबते आणि बुडबुडे थांबतात. मागे मी कोकम वाईनला हे वापरलं नव्हतं. आता वर्षभरानेही मला ती बाटली चारेक दिवसांनी एकदा किंचित उघडून फुस्स करून त्यातला सोडा बाहेर काढावा लागतो. यीस्ट मरतच नाह्येत त्यातली. पण वाईन अप्रतिम झाली आहे!! हल्ली कुणाला पित्त झाले की कोकम सोडाऐवजी ही वाईन पाजायला हवीये.
तर हे सेकंडरी फर्मेंटेशन झाले की, वाईन या अशा पाइपने बाटलीत भरायची. मी हॉटेल्स किंवा बारमधल्या ओळखीच्या लोकांकडून रिकाम्या वाईन बाटल्या जमा करते. हवे असल्यास रिकाम्या वाईन बाटल्या विकतही घेता येऊ शकतात. झाकणॅ नीट नसतील तर वाईन कॉर्कही वपरता येऊ शकतात.
वाईनचा हवेशी कमीतकमी संपर्क आला पाहिजे. अन्यथा ऑक्सिडेशन होऊन तिची चव बिघडते. बाटल्यात भरून झाली की जेव्हा हवी तेव्हा ओपन करून पिऊ करायची. बाटलीत एखादी दालचिनी, स्टार अनिस वगैरे घालून त्याचा स्वाद अधिक खुलवता येऊ शकतो. वाईनची बॉडी अधिक चांगली येण्यासाठी फ्रूट ज्युस्पेक्षा फळांचा गर वापरणे अधिक श्रेयस्कर.
ही कोकम वाईन. हिचा रंग जो काय आलाय ना लाजवाब..
वाइन चव घेऊन पाहिल्यावर कमी गोड वाटत असेल तर परत साखर अॅड करता येऊ शकते. हे करण्यापूर्वी यीस्टचे काम पूर्ण थांबले आहे की ते चेक करून घ्यायला हवे, नाहीतर परत आलेच बुडबुडे (वाइनच्या बाटलीत)
वाइनचे अल्कोहोल कंटेंट मुळातच कमी असते, त्यामुळे ती टल्ली होण्यासाठी प्यायचीच नसते. वाईनची हळूवार नशा आणि मनाची एखादी लागलेली तंद्री हे अफाट कॉम्बिनेशन असतंय.