निसर्ग नोंदी

मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी
- ना. धों. महानोर
हल्ली जिथे रोज संध्याकाळी वॉकला जातोय तिथे चालताना हायवेच्या पल्याड आमच अंबरनाथ शहर तर दुसऱ्या बाजूला हाजीमलंग गड दिसत रहातो. Midc ने भुसंपादन केलेल्या जागेवर नुकतेच मस्त रस्ते बांधून काढलेत पण अजून प्लॉटिंगही झाल नाहीये तर ते नवेकोरे रिकामे रस्ते, बेफाम वारा ह्यामुळे वॉकसाठीच आमची फेव्हरिट जागा होऊन गेलीय ही.आकाश कायमच संध्याकाळी रंगांची उधळण करत इतकी वेगवेगळी चित्र चितारत असत रोज की त्या कलाकारीला भुलून चालता चालता अनेक फोटो काढायची कला आपण हमखास शिकतोच शिकतो इकडे चालायला यायला लागलो की.अजून कोणतंही बांधकाम,वस्ती,कंपन्या नसल्याने बुरुड,ओस पडलेल्या जमिनीवर (कारण इथे फक्त पावसाळी शेती होते) उन्हाळ्यात माळ टिटव्यांची,नेहमीच्या टिटव्यांची लगबग सदैव सोबत करायची. बुलबुल,नाचण, भिंगऱ्या, दयाळ, कोतवाल, शिंपी, वटवट्या, कोकीळ,भारद्वाज, सुभग, खंड्या, वेडे राघू, चिमण्या, साळुंक्या, भोरड्या, ब्राम्हणी मैना, कवडी मैना,चिमण्या,सुगरण,पोपट, हे पक्षी पण मुक्तपणे संचार करताना दिसतात इथे.चालण्याच्या मोहापेक्षाही निसर्ग अनुभवण्याचा मोहच मला रोज तिकडे नेत असतो खरतर. डांबरी रस्ते सोडून इथल्या पायवाटांना आपलस म्हणत त्या नेतील तिकडे गेलो तर काही पायवाटा चक्क टेकडीवर फिरवून आणतात आपल्याला. इथे सगळीकडेच झाडांमधून पक्ष्यांची किलबिल सदैव रुणझुणत असते आणि तो रुणझुणता नाद आपल्याला एक छान लय देतो चालण्यासाठी. उन्हाळा संपता संपता झालेल्या एक दोन पावसातच ह्या परिसराचे रुपडे बदलून गेले आणि जसाजसा पाऊस रुळला तसतस सगळीकडे जणू हिरवळीच धरणच फुटल ह्या परिसरात. तो बदल बघून अरूणाताईंच्या ढग दाटून येईल, झाड नवीन होईल... ह्या ओळी पटकन आठवल्या होत्या. खरतर इकडे चालता चालता अरुणाबाई, शांता शेळके, नलेश पाटील, बोरकर, ना धों, इंदिरा संत आणि अनेकांच्या कविता आपसूक आठवत रहातात.
यंदा मे संपता संपता पावसाची वर्दी लागली आणि एक दिवस वॉकला जायला जरा उशीरच झाला. वॉक संपत येईपर्यंत सांजावून गेल होत आणि सगळ्या आसमंतावर काळोखाच साम्राज्य पसरल. नेहमी खरतर ह्यावेळी आम्ही घरी जायला निघत असतो पण वॉक झाला की पंधरा- वीस मिनिट तिथली शांतता अनुभवत वाऱ्यावर बसण्याचा रोजच्यासारखाच मोह होऊन अंधार झाला तरी बसलो आणि एक सुंदर अनुभव मिळाला. एकदम अचानक आजूबाजूला चिमूट चिमूट प्रकाश उजळायला लागला. एकेक करत नजर जाईल तिकडे लुकलूकणारे काजवे अंधार मिटवू पहात किर्र आवाजात जणू तिमिर प्रार्थना करू लागले होते. सगळं बालपण नजरेसमोरून तरळून गेल त्या लुकलूकणाऱ्या काजव्यांना बघून. लहानपणी ह्या दिवसांत अंगणात काजव्यांची झाडच फुलायची जणू आणि मग आम्ही ते काजवे पकडून ठेवायचो आणि घरातले मोठे ओरडले की सोडून द्यायचो. गावी तर लक्ष लक्ष काजवे बघून काळजाचेच काजवे होऊन सगळा अंधार नाहीसा होऊन मन स्वप्नांच्या वाटेवर दूरदूर चालू पडायच. ते सगळ सगळ आठवल त्या दिवशी काजवे बघितल्यावर.
पाऊस लागून राह्यल्यानंतर सगळीकडे गवतासोबत कुर्डु, टाकळा अश्या रानभाज्यांची रेलचेल झाली,भात खाचरांत चहाच पीकच पीक उतरल. इतरही बऱ्याच खोलगट ठिकाणि पाणी साचून इटूकली पिटुकली बरीच तळी तयार झाली.
ह्या बदलांबरोबरच पावसाळी पक्षी दिसायला लागले. गाय बगळे, पाण कोंबड्या, शराटी,तित्तर, बगळ्यांचे वेगवेगळे प्रकार नेहमीच्या पक्षांबरोबर दिसू लागले.
गडद निळे गडद निळे जलद भरून आले
शितलतनू चपलचरण अनिलगण निघाले- बा. भ. बोरकर ह्या ओळी आभाळ रोजच सार्थ ठरवू लागल आणि ते श्यामवर्णी मेघ जणू आभाळगोंदण बनून गेले.डोंगर कधी मऊशार ढगांच्या दुलईत गुडूप होऊ लागला तर कधी काळ्याशार पाऊस ढगांआड लपू लागला.काळ्या करड्या डोंगराला नवे हिरवेगार कपडे मिळाले आणि त्यावर शर्यत लावल्यासारखे पांढरेशुभ्र ढग भरभर पळताना बघत बघत आमचा चालण्याचा शिण कुठल्या कुठले नाहीसा होऊ लागला. कित्येक वेळा इंद्रधनू दिसत इकडे, तेही डोंगरापासून थेट शहरातल्या बिल्डिंग पर्यंत पसरलेल्या अर्ध गोलाकार आकारात तर कधी डोंगराआडून येऊन डोंगराअलीकडे संपणार.चालताना एका शेताच्या बांधावर एक कडुनिंब उन्हाळ्यात पूर्ण निष्पर्ण झालेला बघत होते आणि हैराण होत होते कारण आजवर मी कधीच संपूर्ण पानगळ झालेला कडुनिंब पाह्यला नव्हता. झाड वठलं की काय ह्या विचाराने मी खंतावत होते पण आठवडा भराच्या पावसाने आपली जादू दाखवत चक्क त्या कडुनिंबाच्या अंगावर अंगभर कोवळी लुसलुशीत पालवी दिली आणि चिवट जीवन इच्छा म्हणजे नक्की काय ह्याच मला प्रात्यक्षिक बघायला मिळाल. निसर्ग पदोपदी आपल्याला इतकं काही शिकवत असतो फक्त आपल्याला ते समजून घेता यायला हव अस मला वाटत.इथल्या एका झाडावर कोतवाल पक्ष्यानी आपल घरट बांधलय आणि मी ते घरट न बघताही मला त्याबद्दल लक्षात आल कारण कोतवाल त्या झाडाच्या पंधरा फुटाच्या आसपास कावळा काय साळुंक्यांनाही येऊ देत नव्हता हल्ली आणि आलंच कोणी तर आक्रमक होऊन पळवून लावताना दिसला. म्हणून मग जरा नीट बारकाईने बघितल्यावर मला त्याच घरट दिसल.गेल्या दहा- पंधरा दिवसांत इथल्या वावरांत लावणीची गडबड बघायला मिळाली, एका रांगेत लयबद्ध पद्धतीने भात लावताना इरली घातलेली माणस सूर्यास्ताच्या वेळी बांधावर शिळोप्याच्या गप्पा मारत बसलेली नाहीतर उभी असलेली दिसतायेत हल्ली. हे सगळं बघून
रुजे दाणा दाणा
ज्येष्ठाचा महिना
मातीतला गंध ओला
चौखूर दिशांना
पाखरांचे पंख, आम्हा
आभाळ पुरेना ह्या ना. धोंच्या ओळी न आठवल्या तर नवलच.
काही काही वावरांत सातधारी- नऊधारी भेंड्याची रोप दोन तीन फुट उंचीची झाली आहेत तर पडवळ, कारली यांचे मांडव उभे राह्यले आहेत. एक दिवस वॉक न घेता रस्त्यावरून उतरून ह्या शेतांत जाऊन ही पिकं नीट बघायची आहेत. अगणित फुललेल्या रानफुलांच्या ताटव्यांचे फोटो काढायचे आहेत. हेरून ठेवलेले गारगोटीचे चार दोन दगड ( रस्ताच्या कामावेळी दगड फोडल्याने,खणल्याने इकडे खूप सारे गारगोटीचे दगड रस्ताच्या कडेला दिसतायेत)घरी न्यायचे आहेत.हल्ली पावसाळ्यात एखाद्या दिवशी मस्त सूर्य ढगांआडून बाहेर येतो आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात सगळ अजूनच हिरवंगार दिसत तर कधी आकाश काळ्या ढगांनी ओथंबून आलेलं असत तर कधी रिमझिम पाऊस असतो तर कधी मुसळधार पाऊस.उन्हाळ्यात इथल्या भणाण वाऱ्याने जेव्हढ मस्त वाटायच तितकंच धो धो पावसात छत्री घेऊन चालायलाही इथे मस्तच वाटतय.
-अश्याच काही निसर्ग नोंदी

FB_IMG_1679039108700.jpg

FB_IMG_1679039111950.jpg

FB_IMG_1679039118965.jpg

FB_IMG_1679039121782_0.jpg

FB_IMG_1679039128035.jpg

FB_IMG_1679039136973.jpg

FB_IMG_1679039152614_0.jpg

FB_IMG_1679039155655.jpg

FB_IMG_1679039124920.jpg

FB_IMG_1679039148536.jpg

FB_IMG_1679039142211.jpg

FB_IMG_1679039131292.jpg

FB_IMG_1679039115980.jpg

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle