अंकितने मला सोडलं. मी त्या संध्याकाळच्या धुंदीत होते.
उशीर झाला होताच त्यामुळे अंकित लिफ्ट मध्ये आला. ट्रिकी होतं हे. डान्स floor वरची controlled, monitored जवळीक आणि इथं हे असं फक्त दोघं असणं. बन्द दाराआड आणि इतक्या छोट्या जागेत. आणि इतक्या कमी वेळासाठी. त्यातही त्या डान्स नंतर.
केवढे पॅरामीटर्स होते या छोट्याशा स्पेस मधे.
माझे आणि त्याचे श्वास एकमेकांना व्यवस्थित ऐकू जात होते. निदान मला तरी येत होतेच त्याचे उष्ण खोल निःश्वास ऐकू. मी आणि तो एकाच क्षणी एकमेकांकडे वळलो. काहीही कळण्याआधी मी त्याच्या अजून जवळ सरकले. त्याच्या हाताला माझ्या बोटांनी स्पर्श केला. माझा हात त्याने हातात घेतला. "रसा," आवाजावर नियंत्रण ठेवत येईल तशा deep आवाजात तो म्हणाला. मी एखाद्या हिपनोटाइज्ड माणसासारखी अजून जवळ सरकले. एका लयीत आम्ही पूर्ण एकमेकात विरघळत गेलो. माझा मजला आला हे कळलंच नाही. लिफ्ट उघडली आणि त्या आवाजाने भानावर येऊन मी एकदम लांब झाले. अर्ध्या मिनीटात आकाशाला हात लावून येता येतं तर!
" सॉरी रसा, मैने रोकना चाहिए था खुदको. " तो अतिशय आनंदात पण म्हणायचं म्हणून बोलला.
"Hmm.. " मी काय बोलणार होते? मी पण त्याच ecstasy मध्ये विहार करत होते.
"बाय. जाऊं? " मी म्हणाले.
" बाय रसा. टेक केअर. Sleep well"
मी बाहेर आले. लिफ्ट खाली गेल्याची खात्री करून दाराचे latch उघडले. या भावनिक अवस्थेत पण थोडं डोकं ठिकाणावर होतं.
आमच्या भेटी होत होत्या. बाईक राईड्स पण. अजून जास्त जवळ येत होतो हे अगदी जाणवत होतं.
मग एकदा त्याच्या मित्राच्या फार्महाऊस वर पार्टी होती. त्याने पुन्हा मला विचारलं की मी येईन का?
फार्महाऊस पार्टी हा माझ्यासाठी फार कंफर्टेबल प्लॅन नव्हता खरं तर.
पण त्याच्या ग्रुप मधल्या मुलींनी पण मला ping केलं. " चलो ना रसा. मजा आयेगा. और हम लोग ज्यादा मस्ती नाही करते. अल्कोहोल इन limits अँड कुछ लोग सिगरेट. बाकी कुछ भी नही"
हे ऐकून मी अजूनच टेन्शन मध्ये आले.
शिवानीला सांगितलं तर ती म्हणाली, " ते इतकं सांगतायत म्हणजे खरंच असेल. आपण कधीकधी night outs, farmhouse parties ना जास्त वेटेज देतो. अंकित आहेच ना बरोबर. "
तरीही माझ्या मनात धाकधूक होती.
अंकित म्हणाला, एक काम करते है तुम्हे comfortable नही लगा तो हम dinner करके निकल जायेंगे. प्रॉमिस. Don't worry.
थोडी हिंमत करावी लागणार होती.
अक्की चा कॉल आला तेंव्हा त्याला पण सांगितलं.
It's fine. फक्त अलर्ट रहा. मुलींचा सिक्स्थ सेन्स strong असतो. आणि जरा ही नको वाटलं की अंकितला सांगून निघ लगेच. मागची पार्टी चांगली होती ना. आणि आत्ता तुला जाऊ वाटतंय का नाही अगदी मनापासून सांग"
"हो. " मी लगेच म्हणाले.
" मग जा. "
दुसऱ्या दिवशी ऑफिस मधला आमच्या joining ग्रुप मधला प्रतीक आणि सानिका माझ्या डेस्कवर आले चहा प्यायला घेऊन जायला. अधून मधून येतातच म्हणजे.
कॅफेटेरियात चहा घेऊन बसलो आणि प्रतीक म्हणाला,
" कैसी है रसा? All well? "
मी जरा चकित झाले. " हो ठीके की. काय झालं"
" मला अक्षयचा कॉल आला होता. माझा नंबर आहे ना तुझ्याकडे? तुला कधी ही इमर्जसी मध्ये मदत हवी असेल तर लगेच कॉल कर. "
I was totally taken aback.
मला अजिबात अपेक्षित नव्हतं हे.
" अक्षय ने तुला नक्की काय सांगितलं आहे?"
" तो म्हणाला मी तिथं नाहीय. पण रसाला काही लागलं कधी तर एक कॉन्टॅक्ट असावा म्हणून.
आणि इतकं काय. अक्षयने सांगितलं नसतं तरी तुला हवं तेंव्हा सांग आम्ही आहोतच की. "
Hmm.. जरा रागच आला मला अक्कीचा. पण डोक्यात आत काहीतरी एक टिकटिक होती ती बंद झाली. एक secure net असल्यासाखं वाटायला लागलं.
आणि सारखं आपण कसे हुशार , independent, strong , सगळं handle करू शकणारे असा स्टँड कशाला घ्यायला हवाय? लागली मदत तर दोस्त लोक असायला हवेतच मदतीला. या विचाराने मी रिलॅक्स झाले.
अंकितचा मेसेज आला की जॅकेट किंवा स्टोल ठेव बरोबर. तिथं थोडी थंडी पण असेल.
Friday night ला आम्ही निघालो. अंकित मला पिक करायला आला तर बाईक ऐवजी कार.
कार?
" तुला खरंच मध्येच परत यायचं असेल तर मध्यरात्री बाईकवर नको इतक्या लांबून. म्हणून रेंट out केली. "
हे किती thoughtful होतं!
पण कार मधे आम्ही पहिल्यांदा बरोबर असणार होतो. हे मला आत बसताना जाणवलं. पण कारमध्ये अजिबात काहीही घडलं नाही. नेहमीसारख्या गप्पा. या ग्रूप मधल्या लोकांचे किस्से सांगणे, पास्ट पार्टीज, पिकनिक्स वगैरे.
फक्त जरा जवळ पोचल्यावर त्याने डाव्या हाताने माझा हात हातात घेतला. पोचेपर्यंत.
आम्ही पोचलो. अंधार झाला होताच थोडा. थोड्या भाज्या, गहू ,ऊस वगैरे लावलेले patches मागच्या बाजूला आणि रस्त्याच्या जवळ अगदी टूमदार घर. तळमजला आणि पहिला मजला असे दोनच मजले.
खाली मोठा hall, किचन आणि एक बेडरूम. बाहेर पोर्च. शेतच असल्यामुळे पार्किंगला बरीच जागा.
आम्हाला welcome केलं सगळ्यांनी. अलयने घर दाखवलं.
"वरच्या मजल्यावर अजून bedrooms आहेत. मुली वर जाऊ शकतात निवांत. पण झोपणे allowed नाहीय." अलय म्हणाला.
मी हसले. "फार पटकन झोप येते मला. "
"Let's see. हम जनरली ना सोते है, ना सोने देते हैं" अनिका म्हणाली.
सगळे जण एकदम पार्टी मूड मध्ये होते. जाम गोंधळ चालला होता. दोघांना एकेका टीम मध्ये add केलं गेलं.
Dumb charades. Seriously?
किती दिवस झाले होते खेळून. ऑफिस मध्ये पण कधीमधी टीम गेम्स होतात. पण थोडा वेळ.
अंकित हसत होता तो केयोस बघून.
काहीही चाललं होतं. भरपूर snacks आणि स्टार्टर्स होते. बीयर आणि Breezers होते.
कॉफी आपापली बनवून घ्यायची होती.
माझ्यासारखे drinks prefer न करणारे इतर बावळट पण होते वाटतं अजून तिथं.
दोन दिवाण, थोड्या खुर्च्या ,बीनबॅग्ज, फुट स्टुल्स वगैरे होतेच. एका एंडला एक झोपाळा पण होता. आणि दुसर्या एंडला बाल्कनीत जायला फ्रेंच विंडो. पण फ्लोअर seating बरंच होतं. सगळ्या भिंतींजवळ गाद्या होत्या. एकदम कोझी कंफर्टेबल पण अस्थेटीक अरेंजमेंट होती.
पेस्टल जाणवेल न जाणवेल अशा सेल्फ प्रिन्टचे पडदे झुळझुळत होते. एका भिंतीवर पेंटिंग्स, एकावर एक मोठं म्युरल आणि एका कॉलमवर फॅमिली फोटोज होते. एका कोपर्यात मोठं वाझ होतं. मधे दोन सेंटर टेबल्स होती. ब्रॉडर लेवल ला दोन सीटींग अरेंजमेंटस होऊ शकतील पण मोठा ग्रूप असेल तर एकच होईल असं काहीसं.
"कुठंही बस पण झोपायचे नाहीय. " मी सगळी व्यवस्था निरखत असताना अजून कुणीतरी बोललं.
"झोपायचे नाही ही तंबी इतक्या वेळा ऐकूनच आता झोप येईल बहुतेक "मी म्हणाले. तसा अंकित माझ्याकडे आला. " Let's make coffee for all"
इतक्या मित्रात पुन्हा एकदा चोरलेला मी टाइम..
आम्ही हसत, एकमेकांना कोपरखळ्या मारत कॉफी बनवली.
अंकित बाहेर जाऊन किती लोक कॉफी पिणार हे विचारून आला होता. काही cups त्याने बाहेर नेले. नेताना माझ्या गालावर एक quick हलका किस.. काही कळण्या आधी तो बाहेर गेलाही होता. परत आला तेंव्हा जणू काही घडलंच नव्हतं इतका इनोसंस चेहऱ्यावर. मी अजून प्रोसेस करत होते. " कॉफी बिटर है या स्वीट? " त्याने विचारलं. मी blush करत गप्प राहिले.
मी ओट्यासामोर उभी होते आणि तो माझ्या अगदी शेजारी ओट्याला पाठ टेकून, माझ्या डोळ्यात डोळे घालून. केलेल्या कारनाम्याचा माझ्यावर झालेला परिणाम चेक करत. अवघड होतं हे. शिवाय कुणी आलं तर अगदी नक्की पकडलं जाणार.
मी पटकन दुसरा ट्रे त्याच्या हातात देत म्हणाले, " जा घेऊन". तो गेला. पुन्हा एकदा क्षणार्धाची चोरी करत ..
अजून थोडी कॉफी बाकी होती.
इतक्यात अलय आत आला. "मी नेतो उरलेले. "
"हो वन मिनिट " म्हणून मी उरलेले cups भरायला लागले. तो शेजारीच उभा होता.
" Thanks for making it रसा. "
" अरे thanks काय त्यात? कॉफी तर आहे "
" आय मीन मेकिंग इट हियर. नवीन आहेस ना तू अजून आमच्या ग्रुप मध्ये. "
मी हसले.
" रसा, अंकित सिरियस आहे तुझ्याबद्दल" अचानक तो म्हणाला.
यावर काय बोलावं मला सुचलंच नाही. म्हणजे मनात आनंद झालेला लक्षात आला पण बोलू काय?
मी पण आहे? नाही ना. अजून मला बराच विचार करायचा आहे. आणि त्यालाही करू द्यायला हवा आहे.
इतकी घाई करायची गरज काय आहे? या मंद झुळुकेच्या स्पीडने मी आनंदात आहे. इवलेसे क्षण खूप आनंद आणि आठवणी देतायत. वारं वादळच असायला हवं असं नाही ना प्रत्येक नातं?
"मला पण आवडतो तो" मी इतकं च म्हणाले.
" फक्त आवडतो? इतकंच?" अलय काळजीने म्हणाला.
" हो i think it is better to go slow"
"That is ok. I understand. And it's right"
तो हसला आणि पुढं म्हणाला. " पण आत्ता मजेत आहात ना तुम्ही दोघं? "
" हो एकदम. " मी अगदी मनापासून म्हणाले.
" Just one thing Rasa. अंकित फार emotional मुलगा आहे. त्याला hurt करू नकोस. नीट समजावलं की आम्हा पोरांना सगळं समजतं. We men are stupid. But we learn. "
मी "Don't worry" इतकं म्हणेपर्यंत अंकित आत आला. त्याला एक हाय फाय देऊन अलय उरलेला ट्रे उचलून बाहेर गेला.
अंकित थोडा शांत झाला अचानक. मगासची अमच्यातली रोमँटिक एनर्जी एकदम ड्रॉप झालेली वाटली मला.
" All ok? " मी विचारलं.
" Hmm.. चल ना बाहेर. आतच आहेस तू कधीची. We are not the hosts, remember? " तो एकदम म्हणाला.
यानेच मला कॉफी बनवू या म्हटलं. होतं ना?
आम्ही बाहेर गेलो.
मी माझ्या टीम मध्ये बसल्याक्षणी मलाच पुढचा मुवी द्यायचा असं सगळ्यानी ठरवून टाकलं. आणि तो अंकितने द्यायचा हे पण.
आम्ही एका पिलर मागे गेलो.
"रंगबिरंगी" तो माझ्या कानात कुजबुजला.
अरे देवा. कसं करू? मी या ग्रूपमधे नवीन होते. यांची एक मेथड सेट असणार या खेळाची.
मला एक आयडिया सुचली. अर्थात ती वर्क व्हायला अवघड होती.
मी actor सांगण्याची खूण केली. केसावरून हात फिरवला. तर आधी शारुख वगैरे नावं आली. मग मी केस नसल्याची खूण केली. चष्मा दाखवला. आणि त्याचं ते iconic smiling face दाखवलं. तरी कुणी जवळ पोचेना.
मग मी सरळ पाण्यातून उगवलेलं फूल अशी अॅक्शन केली. कमल? कुणीतरी म्हणलं. नशीब! एका टप्प्यावर पोचलो. मी पार्क करायला सांगितलं आणि synonyms guess करायला सांगितले.
I knew it was too फार पण मला मजा येत होती आणि दुसरा ऑप्शन त्यावेळी सुचत नव्हता.
त्यातून इतका कल्ला चालला होता की बास. मी हरण्याची तयारी करूनच हा प्रकार करत होते.
हे खरं कुणालाही माहिती असायची शक्यता कमीच होती.
इतक्यात अलय म्हणाला, पंकज?
Wow! एकतरी समानार्थी शब्द कुणीतरी सांगितला. Expected अजिबात नसताना. मी अजून एखादा सांगायची खूण केली. इंग्लिश or हिंदी?
मी गंमत म्हणून "दोन्ही नाही" म्हणाले.
"मराठी? " अजून कुणीतरी म्हणालं.
मी नाही म्हटल्यावर
" आता काय संस्कृत शब्द सांगणार का काय? "
तर मी हो म्हणाले.
त्यावर अलय ने जलज, नीरज, राजीव, उत्पल? अशी धडाधड सरबत्ती केली. I really didn't expect पण आम्ही उत्पल पर्यंत पोचलो होतो.
उत्पल म्हटल्यावर त्याचे मुव्हीज ओळखायला सुरू केले लोकांनी. अर्थात गोलमाल पासून. पण शेवटी काही बॉस लोकांच्या मदतीने रंगबिरंगी पर्यंत गेलो बरोबर.
It was such a fun team effort.
अंकित माझ्याकडे बघून आश्चर्याने हसत होता.
नंतर आम्ही एक ब्रेक घेतला तेंव्हा अलय मला म्हणाला, "I never expected that anyone here knows that much Sanskrit. That was very well played. "
मी म्हणाले. " So did I. I really didn't think कीसिको ये word पता होगा भी. You really exhausted all the options"
अंकित पण एकदम कौतुकाने म्हणाला "मुझे नहीं पता था तुम्हे इतना सब पता होगा. मेरे दादाजी संस्कृत के scholar थे. बनारस जाके पढाई की थी उन्होंने. दादी बताती थी| "
खरंच पब्लिकने कुणालाही झोपू दिलं नाही.
खूप गोंधळ, मजा मस्ती.
दुसरे गेम्स. आणि अर्थात गाणी. मग छोटे groups पण झाले.
काही लोकांना चांदण्यात चालायला जायचं होतं, काहीना पत्ते खेळायचे होते.
मी आणि अंकित अर्थात चालायला जाणार होतो.
थंड हवेची शिरशिरी आणि त्या मधाळ जादूई रात्री अंकितच्या जवळ असण्याच्या जाणिवेने येणारी शिरशिरी यात फरक कळत नव्हता.
अनेक sweet nothings त्या चांदण्या रात्री आम्ही शब्दा, डोळ्या, श्वासातून बोलत चालत राहिलो. स्पर्शाची अनिवार गरज होतीही आणि
नव्हतीही. स्पर्श होईल या पुसटशा जाणिवेचं कड्याचं टोक पुरेसं होतं. स्पर्शाहून खूप जास्त काहीतरी आमच्यात घडत होतं.
मी नकळत स्टोल लपेटला होता. आजूबाजूला थोड्या अंतरावर हसत खिदळत चाललेली दोस्त मंडळी होती. Life was beautiful..
एखाद्या शब्दाची देवाणघेवाण होऊन मग कटाक्षांची पण देवाणघेवाण होत होती. चांदणं तीव्र होत होतं.
बऱ्याच उशिरा आम्ही परतलो. पण आता खरंच झोप उडाली होती.
"झोपायचे नाही" चा धोशा लावलेली पब्लिक पण पेंगुळली होती. पण आम्ही दोघं डोळ्यात नशा घेऊन हॉलच्या दारातल्या पायरीवर बसलो होतो. बाकी पब्लिक आत जागा मिळेल तिथं पसरलं होतं.
आम्ही मंद प्रकाशात शांत, तृप्त बसलो होतो.
थोड्या वेळाने अंकित म्हणाला "गाना सुने? "
मी हुंकार दिला.
त्याने अगदी दोन मीटर पलीकडे ऐकू जाणार नाही अशा आवाजात मोबाईलवर गाणं सुरू केलं, " खामोश सा अफसाना .. पानीसे लिखा होता.. " uff! त्या सगळ्या वातावरणाला हेच background music असू शकतं. पाण्यावर हलके तरंग उठवेत इतकंच बास.. गाणं संपल्यावर नवीन गाणं पण लावलं नाही आम्ही.
पहाट होत आली. तशी अंकित म्हणाला, रसा तुम्हे सोना है तो जाके सो जाना अंदर. ".
मी नकार दिला. झोप येत नाहीय.
"तो चले? " तो म्हणाला.
" जाऊया? खरंच? " मी विचारलं. Anyway ही झोपलेली पब्लिक काय आता साडेआठ शिवाय उठणार नव्हती.
" चलो. " गाडीच्या काचा खाली करून आम्ही शांतपणे निघालो. झोपलेले रस्ते, हलका नारंगी गुलाबी आकाशाचा पूर्व पट्टा .. सगळं अतिशय reassuring होतं.
" सुबह गाँव की हो या शहर की सुंदर ही लगती है. है ना? " अंकित म्हणाला. "जैसे सोते हूए हर कोई बच्चे जैसा इनोसंट लगता है. "
खरंच..
हे पर्पेचुअली असंच चालत राहिलं फार काही न घडता तरी चालणार होतं मला.
"गाना चलाऊ?"
पुन्हा हो म्हणाले.
त्याच्या फोनवर " इंकेम इंकेम इंकेम " सुरू झालं. याला योग्य वेळी इतकं योग्य गाणं कसं काय सुचतंय? त्या सुदिंग स्वरात माझं मन पण
" चाले इदि चाले" म्हणत होतं .खरंच इतकंच बास होतं याहून जास्त काही नसलं तरी..
माझ्या बिल्डिंग खाली पोचेपर्यंत पहाट थोडी शुभ्र झाली होती.
" मै जाता हूं. तुम सो लो जरा या नींद ना आये तो रन करने जाना. आके सो जाओ. " किती ती काळजी!
मी वर आले. रन आधी डोक्यात नव्हता पण आता त्याने बोलल्यामुळं जायची एनर्जी आली होती.
मी फ्रेश होऊन चेंज करून शूज घालून रनला गेले. मधे शिवानीचा फोन आला तिला अपडेट्स दिले.
परत आले आणि मस्त झोप काढली. मधेच मावशी येऊन गेल्या होत्या. मावशीनी रविवार म्हणून ठेचा पिठलं भाकरी केली होती.
उठून मेसेजेस चेक केले. अंकितचा मेसेज नव्हता. तो पण झोपला असणार.
पिठलं भाकरी ठेचा खाऊन नेटफ्लिक्स लावलं. कपडे धुणे, लावणे वगैरे वीकेंड स्पेशल कामं केली. संध्याकाळी ऑफिस फ्रेंड्स बरोबर मुवि आणि डिनर चा प्लॅन होता. अधून मधून वाट बघत होते पण अंकितचा मेसेज नव्हताच.
निघण्याआधी एक मेसेज केला त्याला की मी चालले आहे. तो डिलिवरच झाला नाही. मुवी सम्पवून परत आले तरी नाही.
मग शिवानीला कॉल केला. तिच्याकडे अजून रविवार चालू होता. तिला सांगितलं. तिने हसून पुन्हा सगळ्या बेकार पॉसिबिलिटिज रिपीट केल्या. फोन बाल्कनीतून खाली वगैरे.
मी पुन्हा एक मेसेज करून झोपी गेले. सकाळपर्यंत एकही मेसेज डिलिवर झाला नव्हता. फोन करू का? नको. जरा वाट बघते.
अंकितला मेसेज करणे आणि तो डिलिवर व्हायची वाट बघणे या महत्वाच्या कामात ऑफिस, घर, घरच्यांचे फोन, मित्र मैत्रिणींशी गप्पा हे सग्ळं होतं. इतके तास अजिबात काँटॅक्ट न करता आम्ही राहिलो नव्हतो बर्याच दिवसात. मला फार अनईझी वाटत होतं पण इतकं पॅनिक व्हायला नको होतं. दुसर्या दिवशी डांस क्लास होताच.
डान्स क्लास होता पण अंकित नव्हता. त्याच्या एकदोन मित्रांना विचारलं पण ते म्हणाले " पता नहि, बताया नहि कुछ. जनरली यही मिलते है हम"
मग त्याच्या ग्रूपमधल्या एक दोन मुलिंना मेसेज केला. त्यांना अर्थात माहिती नव्हतं. फोन लागत नाहीय त्याचा. त्या पण म्हणाल्या.
तेंव्हा माझ्या लक्षात आलं, की मला त्याचं घर माहीती नाही, त्याच्या ऑफिसमधलं कुणी माहीती नाही, नक्की ऑफिस मधे तो कोणत्या टॉवरला बसतो ते माहीती नाही, जे मित्र माहीति आहेत ते त्याला अधून मधून भेटणारेच. त्याला रोज भेटणारी एकही व्यक्ती मला माहिती नाही.
हा सगळा सॉलिड शॉकिंग तिढा होता. आणि मला काय करावं हे कळत नव्हतं..