सुप्रभातीस कोवळे ऊन
ऊन झेले फांदी एक
एक फुटवा फांदीशी
फांदीच्या मनी इच्छा अनेक ....
अनेक पक्ष्यांना दिली हाक
हाक ऐके न्यारा पक्षी
पक्षी विसावण्या येई
येता पंखांना नटवे नक्षी ....
नक्षीत पर्णछाया मोहक
मोहकता भावे मना
मन गुंतावे दृश्यात
दृश्याने सुखाविले नयना ....
नयन जाणती अनभिज्ञ खग
खग निरखी चौदिशा
चौदिशांच्या जाणे खुणा
खुणा ध्यानी राहो ही मनिषा ...
मनिषा काढावे छायाचित्र
छायाचित्र मनोहर
मनोहर नि दुर्मिळ
दुर्मिळ सांभाळू धरोहर ....
विजया केळकर_______
नागपूर