ह्या वड्या करायला अगदी सोप्या आहेत. गाजराचा कीस, साखर, दूध, खवा इत्यादींचं प्रमाण बिनचूक माहिती असेल तर शब्दशः डोळे मिटून वड्या होतात. ह्या वड्या यंदाच्या मोसमात मी पहिल्यांदा केल्या त्याच मुळी १ जानेवारीला, म्हणून म्हटलं इथे साग्रसंगीत लिहूया जेणेकरून सृजनाच्या वाटामध्ये लिहायला माझी 'सुरूवात' होईल.
वड्या करण्यासाठी साहित्यः
गाजराचा कीस - ५ वाट्या
साखर - ३ वाट्या
दूध - २ वाट्या
खवा - १ वाटी
वेलची पूड - ३ टी स्पून
बदाम/ काजू/ पिस्त्याचे काप सजावटीसाठी
अर्धा किलो गाजराचा कीस साधारणपणे ५ वाट्या भरतो. कीस मोजून घेताना वाटीत दाबून भरायचा नाही. उरलेलं साहित्य मोजून घ्यायचं. एका जाड बुडाच्या कढईत गाजराचा कीस घेऊन त्यात दूध घालून एकत्र करायचं. थोडावेळ झाकण ठेवून कीस शिजू द्यायचा. की मऊसर झाला की साखर घालायची. गॅस बारीक ठेवून सगाळं मिश्रण परतत राहायचं. साखर घातल्यावर मिश्रण पाणीदार होईल, पण हळूहळू आटून/ दूध आटत येईल. आणि गाजराचा कीसही शिजेल. मग त्यात खवा घालून परतत राहायचं. आवश्यक वाटल्यास खवा आधी कोरडाच भाजून घ्या आणि मग गाजर साखरेच्या मिश्रणात मिसळा. सगळं नीट एकत्र करून परतत राहायचं. कढईत मिश्रणाचा गोळा फिरायला लागल्यावर तूप लावलेल्या ताटात थापून वरून बदाम/ काजू/ पिस्त्याचे काप पेरून वड्या कापायच्या.
तर यंदा वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुट्टी असल्याने प्रोजेक्ट गाजराच्या वड्या हाती घेतले. सासुबाई त्यांच्या नणंदेकडे जायच्या होत्या, म्हणून त्यांच्यासोबत खाऊ द्यायला होतील आणि उरलेल्या घरात ठेवू अश्या बेताने जरा मोठा घाट घातला. पण पूर्ण दिवस पार्लरमध्ये काढल्यावर अचानक संध्याकाळी सात वाजता आठवले की आपण गाजराच्या वड्या करणार आहोत. मग चटकन फु.प्रो.मध्ये गाजरं घालून त्याचा कीस कम कोशिंबीर करून कढईत घातली. मग सुमारे तासभर परतत राहिल्यावर अखेर कढईत एकदाचा तो गोळा फिरू लागला. तोवर नवर्याकडून बदाम काजू पिस्त्याचे ड्रायफ्रूट स्लायसरवर काप करवून घेतले. वड्या ताटात थापल्या, कापल्या आणि ताटातून काढल्यावर त्याचे दोन वाटे केले. घरातल्या सदस्यांना चव बघायला दिल्यावर एक मोठा प्राणी स्वयंपाकघरात आला आणि म्हणू लागला की मी मदत केली आहे, तर माझ्या ऑफिसातल्या मैत्रिणींना द्यायला एक डबा वड्या मला हव्यात. मग दोन वाट्यांचे तीन वाटे केले. एक डबा नवर्याला दिला, एक डबा साबांच्या पिशवीत (त्यांना सांगून) ठेवला. आणि एक डबा घरात डायनिंग टेबलवर ठेवला. दुसर्या दिवशी सकाळी सगळ्यांचीच निघायची घाई होती, त्यामुळे अधिक काही गप्पाटप्पा न करता सगळे आपापलं आवरण्याच्या नादात होते. त्या गडबडीत साबांनी डायनिंग टेबलवरचा डबा माझ्या आईचा आहे असं समजून नवर्याला तिकडे देण्यासाठी देऊन टाकला. मग नवर्याच्या सॅकमध्ये वड्यांचे दोन डबे झाले. त्या वड्यांवर त्याच्या ऑफिसातले मित्रमैत्रिणी तुटून पडल्याने दोन्ही डबे संपले. आणि अश्या रितीने ज्या घरात वड्या बनल्या, त्या घरातले सदस्य वड्यांपासून वंचितच राहिले. आता पुन्हा घाट घालावा लागणार आहे, मोसम आहे तोवरच!