जेव्हा वयाची पंच्याहत्तरी येते —२
**************************
चक्क काहीतरी लिहावे वाटतय
म्हणजे मी म्हातारा झालोय?
अवघे पंच्चाहत्तरावेच तर सरतेय
किती ही कलकल?मीच गप्प बसतोय....
सूनेने उशीर झाला समजून दिला चहा
मुलाने हातातले वर्तमानपत्र ठेवलं समोर
सौ ने माझ्या कपाळाला लावला हात
तोंडाने बडबड,वैताग,जीवाला घोर....
आऽज्जोऽ ओरडत नातवाची बाॅलिंग
कप-गडी बाद दर्शवी माझ्यातला अंपायर
बाबा-ढगोबांचा गडगडाट परिणामी रडारड
बसणार वीजेची चपराक बाल-गालावर ....
बाळ धावला,खेळ संपला,जीव कावला,
भावी गेंदबाज शाळेत निघाला
एकांत मिळाला पण अवसान गळाले
गेलो स्वप्न दुनियेत ,लागलो कण्हायला ....
जन्मा आली भाग्यशाली कविता
स्वभावाला औषध नाही काही
पंखा बंद म्हणूनओरडलो जाग येता
जो-तो माझ्याकडे हसू दाबत पाही ....
विजया केळकर_____
नागपूर