सिडनीची ट्रिप करुन वर्ष होत आले होते म्हणुन यावेळेस आम्ही बालीला जायचे ठरवले. बर्याच दिवसांपासुन जायचे मनात होते पण सुट्ट्या, कॉलेज आणि बालीतल्या ज्वालामुखीचा उद्रेक अशा अनेक कारणांमुळे जायला जमत नव्हते. अनायसे डिसेंबरमधे सुट्ट्या होत्याच पण टिकिट्स खुप महाग होती. त्यातल्या त्यात स्वस्त म्हणुन मग एअर एशियाचे हॉलेडे पॅकेज बुक केले.
बाली हे ऑस्ट्रेलियातील लोकांचे फेवरेट हॉलिडे डेस्टीनेशन आहे. बालीला जाउन न आलेला ऑझी भेटणे दुरापस्तच. पर्थवरुन बालीला जायला साधारण ३-३:३० तास लागतात. बर्याचदा एअर एशिया, वर्जिन ऑस्ट्रेलियाच्या सेलमधे अगदी स्वस्तात टिकिट मिळते. ऑस्ट्रेलियापेक्षा स्वस्ताई असल्याने आणि अंतरही फारसे नाही त्यामुळे इथल्या लोकांना बाली आवडते. त्यात १ AUD म्हणजे जवळ जवळ १०००० इंडोनेशियन रुपये होतात.
बालीवर दिनेशदांची सुद्धा मालिका आहे मायबोलीवर. त्यात बरीचशी टुरिस्ट स्पॉट्स कव्हर केले आहेत. आमची ट्रिप म्हणजे थोडेसे फिरणे, थोडेसे खाणे आणि बराचसा आराम अशी होती. त्यामुळे मी या मालिकेत जास्त काहि टुरिस्ट स्पॉट बद्दल लिहीणार नाही पण मी ट्राय केलेले रेस्तोराँ, स्पाज् आणि शॉपिंगवर लिहायचा विचार करते आहे.
बाली मधले हवामान सहसा दमटच असते. आम्ही चाललो होतो तो टूरिस्ट सिझन होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया बरोबरच जकार्ता, मलेशिया, रशिया असे बरेच ठिकाणचे लोक होते आणि खुपच गर्दी होती. पुढच्या वेळेस जाताना या पिरियड मधे नक्कीच नाही जाणार.
बाली म्हणजे भारताचेच जुळे भावंड आहे. त्यामुळे भारतीयांना तरी तिथे गेल्यावर वेगळे वाटायला नको. पण पर्यटन स्थळ असल्यामुळे आणि अर्थव्यवस्था पर्यटणावरच अवलंबुन असल्याने रस्ते आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ आहे. बाली मधली ९०% जनता ही हिंदू आहे आणि बर्याचशा हिंदू संस्कॄतीतल्या गोष्टींचे संवर्धन केले आहे. तिथले सण समारंभ आणि पध्दती मात्र आपल्या हिंदू पद्धतींपेक्षा फार वेगळ्या आहेत. (यावर पुढे येइनच). जेवण जरी ऑस्ट्रेलियापेक्षा स्वस्त असले तरी भारतापेक्षा महाग वाटू शकते. जागोजागी मागे लागणारे फिरते विक्रेते मात्र भरपुर. तसेच जागोजागी टॅक्सी किंवा भाड्याने कार देणारेही भेटतात. पब्लिक ट्रान्स्पोर्टची मात्र फारशी माहिती मिळाली नाही. तशा 'कुरा कुरा' बस आहेत, त्या चांगल्या वाटल्या पण मग एका दिवसात बरेच काही बघायचे असेल तर भाड्याची गाडीच ठरवलेली परवडते. आजुबाजुचा परिसर मात्र पायी फिरण्यात मजा आहे. आपल्या स्कूटी सारख्या गाड्याही आपण भाड्याने घेउ शकतो.
आम्ही सात दिवस बाली मधे होतो. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीही तिथेच साजरा केला. ७ दिवसातले फक्त साडे तिन दिवस पर्यटन स्थळांना भेट दिली आणि कंटाळलो. बाकिचे दिवस मग फक्त खाणे आणि वेगवेगळी दुकाने फिरणे एवढेच केले.
बालीला जायच्या आधी मात्र मी बरीच माहिती गोळा केली होती पर्यटन स्थळांची. कोणाला हवे असेल तर मी इमेल करेन.
पुढच्या भागात बालीतल्या पहिल्या दिवसाबद्दल लिहेन...