" आप बाली पास करके आये है लगता है " यमुनोत्रीच्या मंदिरातले पुजारी आम्हाला विचारत होते. आम्ही सकाळी सकाळी सहा वाजता मंदिर उघडायची वाट पहात थांबलो होतो. ह्यांना कसं कळलं ? हाच प्रश्न खाली उतरतांना वाटेत लागणार्या दुकानातून विचारला गेला, तेव्हाही फार आश्चर्य वाटलं. शेवटी आपले रापलेले चेहरे बघून ह्यांना कळलं असावं अशी समजून करुन घेत होतो ते आमचा एक गाईड म्हणाला, सिर्फ बाली पास करके आने वाले लोग इतने जल्दी यहा पोहोच सकते है. नाहीतर खालून वर चढायला सहा शिवाय सुरुवात करता येत नाही.
२०१७ साली स्टोक कांगरी तर झाला पण पुढे काही ना काही कारणांनी ट्रेकचे प्लॅन्स कॅन्सल होत गेले. शेवटी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये महेश आणि केदार दोघे ट्रेक द हिमालयाज बरोबर 'केदारकांथा/ केदारकंठा' ह्या ट्रेकला जाऊन आले आणि मी २ महीन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर, हेमकुंड साहेबला जाऊन आले.
तरी ट्रेक केल्याचं समाधान झालं नव्हतं कारण हे दोन्हीही ट्रेक्स तसे सोपे होते.
तोवर ट्रेकींगचा सिझन संपत आला होता. आता पुढच्या वर्षी बघू असा विचार करतांना अचानकपणे महेशला सुट्टी मिळाली. रोड ट्रीप वगैरे करण्याचा विचार कॅन्सल करुन आम्ही परत ट्रेक करायचं ठरवलं आणि आमच्या सुदैवाने ट्रेक द हिमालयाज मधल्या बाली पासच्या तारखा जमल्या आणि मिळाल्या. महेशच्या बाबांमुळे घरातली सोय झाली आणि आम्ही बुकींग करुन टाकलं.आमच्या ट्रेकची तारीख होती ३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर. ही ह्या सीझनची शेवटून दुसरी बॅच होती. ह्या तारखा सुट्टीशी जमणार्या होत्या म्हणून निवडल्या. पण ही निवड किती योग्य ठरली हे नंतर समजलं. blessing in disguise !
बाली पास, सुपीन आणि यमुनोत्री रेंज मध्ये असलेला एक ट्रेक आहे. हा पास आहे, म्हणजे एका बाजूने चढून दुसरीकडून उतरायचं. बाकी ट्रेक्स मध्ये ज्या रस्त्याने समीट करतात, तिथूनच उतरतात. इथेही अर्थात हवा खराब असेल, जास्त बर्फ असेल तर क्वचित त्याच रस्त्याने उतरवतात. हा ट्रेक ' डिफीकल्ट ' ह्या कॅटेगरीत येतो. बाली पासच्या समीटची ऊंची १६,२०० फूट आहे. म्हणजे लेह पेक्षा जवळजवळ ५००० फूट वर. शिवाय इतक्या ऊंचावर असणारी बर्फाची शक्यता. ट्रेक सुरु होतो ते तालुका हे गाव, ( तसा तो सांकरीपासून सुरु होतो, पण चालण्याची सुरुवात होते ती तालुका पासून ) ६५०० फुटावर आहे. तिथून ट्रेक संपतो ते जानकी चट्टी ( जे यमुनोत्री दर्शनाचे सुरुवातीचे ठिकाण आहे ) ते अंतर जवळजवळ ६५ किमी आहे.
ट्रेकींगचं ऑलमोस्ट सगळं सामान होतचं. फक्त प्रवासासाठी खाऊ, चहाचे सॅशे, नेहमीची औषधं वगैरे खरेदी केली. आदल्या दिवशी बॅग भरतांना लक्षात आलं की महेशचा हेड टॉर्च सापडत नाहीये, लकिली जवळच्या एका दुकानात मिळाला आणि तो आणल्यावर अर्ध्या तासात हरवलेलाही सापडला.
ट्रेकची सुरुवात होते डेहराडूनपासून २००/२२५ किमी अंतरावर असलेल्या सांकरी ह्या गावापासून. इथून लहानमोठे असे ७/८ ट्रेक्स सुरु होतात, त्यातले महत्त्वाचे किंवा प्रसिद्ध म्हणजे केदारकंठा, बाली पास, हर की दून, रुईनसारा, ब्लॅक पिक, देव बुग्याल वगैरे.
आदल्या दिवशी डेहराडूनला पोहोचलो आणि TTH (trek the himalayas) च्या नेहमीच्या पिक अप पॉइंटच्या अगदी जवळ असलेल्या सिद्धार्थ पॅलेस मध्ये उतरलो. हॉटेल एका रात्री राहण्यापुरतं चांगलं होतं. दुसर्या दिवशी सहा वाजताचं रिपोर्टींग होतं. आधीचा अनुभव असल्याने पाच मिनीटं उशीरा निघालो. टपरीवर चहा घेतला. काही लोक आलेलेच होते. उरलेले जमून निघेपर्यंत पावणे सात वाजले. एक मिनि बस आणि एक इनोव्हा अशात मिळून आम्ही १८ जण होतो. ब्रेकफास्ट, जेवण वगैरे करत सांकरीला पोहोचायला साडेचार वाजले. ब्रेफा, जेवण सोडल्यास प्रवासात कोणी कोणाशी फारसं बोललं नाही. मी तर अॅव्होमीन घेऊन बराच वेळ डुलक्याच काढल्या.
सांकरीला पोहोचत आलो तसा हवेतला गारवा वाढला. आणि मग पाऊसच सुरु झाला. खरं मला जरा वैताग आला कारण पाऊस म्हणजे चालतांना पाँचो घालावा लागणार आणि गारवाही वाढणार. ड्रायव्हरने घाईने वर ठेवलेल्या बॅगांवर प्लॅस्टीक घातलं. आमच्या ट्रेकींग सॅक्सवर कव्हर्स होतीच म्हणून बरं. शिवाय आम्ही सगळं सामान, कपडे प्लॅस्टीकच्या पिशव्यांमध्ये ठेवले होतं.
सांकरीला पोहोचेपर्यंत पाऊस थांबला. तिथे गेल्यागेल्या आमच्या टुर लिडरनी स्वागत करुन सामान खोल्यांमध्ये टाकून लगेच ब्रिफींग साठी बोलावलं.
सांकरीहून अनेक ट्रेक्स जात असल्याने TTH नी तिथे एक गेस्ट हाऊस लिजवर घेतलं आहे. त्यात ट्रिपल , चार शेअरींगवर खोल्या आहेत. आमच्या १८ च्या ग्रुप मध्ये आम्ही ४ जणी होतो. आम्हाला एक खोली मिळाली. बाकीच्या तिघी माझ्यापेक्षा १५-२० वर्षांनी लहान होत्या.
हे ते गेस्ट हाऊस.
ब्रिफींगसाठी वर आलो. तिथे चहा वगैरे होता. आधी लिडरनी स्वतःची आणि इतर ३ गाईड्सची ओळख करुन दिली. मग सगळ्यांनी आपापली ओळख करुन देतांना किती ट्रेक्स केलेत हे सांगायचं होतं. प्रत्येकानी किमान ३ तरी केले होतेच. म्हणजे सगळे अनुभवी होते.
आमच्यापैकी तिघांनी BMC ( Basic mountaineering course ) केला होता. अजून दोघांचे नंबर लागले होते. हा कोर्स ३ आठवड्यांचा असतो आणि बराच कठीण असतो.
तिघे जण ( दोन मुली आणि त्यातल्या एकीचा नवरा नॅशनल लेव्हलवर खेळणारे होते. एकीला तर गोल्डही मिळालं आहे. हे दोघे कलकत्त्याहून आले होते, तिथल्या डिकॅथलॉनमध्ये तिचे फोटो आहेत. अर्थात ही माहिती आम्हाला नंतर कळत गेली ) आणि हे सगळे जेमतेम तिशीचे होते. नॅशनल लेव्हलवर सायकलींग करणारी तर वीसच वर्षांची आहे. आम्ही १८ पैकी आम्ही पाच जण चाळिशीपुढचे. आमच्यातला एकजण सिम , कोरीयाहून आला होता आणि तो साठ वर्षांचा होता.
तर आमचा लीडर नविन राणा ह्याने आम्हाला बेसिक नियम सांगीतले. कधिही उशीर करु नका, चहा जेवणालाही नाही कारण ते लगेच थंड होतं. इतरांना त्रास होईल असं वागू नका, स्वच्छता पाळायची आणि मुख्य म्हणजे थोडा जरी त्रास होत असला तर लीडर, गाईड्सपैकी कोणालातरी सांगा म्हणजे वेळेवर मदत करता येईल.
बाकी जुजबी बोलून सात वाजता जेवण आणि दुसर्या दिवशी, रविवारी सकाळी ६ वाजता चहा, ७ ला ब्रेफा आणि ८ ला निघायचं असं सांगून बैठक संपली. ६, ७, ८ हा पॅटर्न पुढच्या दिवासात कायम राहीला, वेळेत थोडाफार बदल होऊन.
सांकरी छोटंस गाव असलं तरी ट्रेकींगला लागणारं ए टु झेड सगळं साहीत्य तिथे मिळतं. विकत आणि रेंटवरही.
थंडी वाढायला लागली होती. एक चक्कर मारुन, जेऊन साडेआठच्या दरम्यान आम्ही पडलो. रात्रीच्या जेवणात रोटी आणि भाताबरोबर दाल मखनी, मिक्स व्हेज आणि गोडात शाही तुकडा असं होतं. त्यापुढे रोज रात्रीच्या जेवणात एक गोड पदार्थ असेच. आणि तो ही रिपीट न होता.
उद्या पहिला मुक्काम सीमा. सगळं मिळून ८/९ किमी चालायचं होतं. पहाडात अंतर किलोमीटर मध्ये नाही तर वेळात मोजतात. त्यामुळे उद्या चार किमी चालायचं आहे असं न म्हणता पाच तास चालायचं आहे असं सांगतात. त्या हिशोबाने उद्या ६/७ तास चालायचं होतं. अंतर जास्त असलं तरी वेळ ओके लागणार होता कारण सुरुवातीचा टप्पा होता. आम्ही सध्या ६००० फुट ऊंचीवर होतो ते उद्या ७००० वर जाणार होतो.
रात्री थंडी चांगलीच वाढली. दोन दोन ब्लँकेट असूनही झेपेना. उद्यापासून टेंट आणि स्लीपींग बॅग्ज. कसं होणार !
रविवारी सगळे वेळेवर तयार होऊन निघालो. अनुभवी लोक बरोबर असल्याचा हा मोठा फायदा असतो. एकही दिवस, एकानेही एक मिनीटही उशीर केला नाही. सगळेच्या सगळे वेळेआधी तयार असत.
आज सुरुवातीला तासभर ट्रॅक्स सदृश्य गाड्यांनी जायचं होतं. मग चालणं सुरु. प्रत्येक गाडीत आत आम्ही ६/७ जण आणि वर गाईड्स, सपोर्ट स्टाफ, सामान आणि चक्क पोतं भरुन कांदे बटाटे भाज्या आणि इतर वस्तू. रस्ता अगदी अरुंद, वळणावळ्णाचा ट्रिकी होता. ड्रायव्हर्स तयारीचे होते. पूर्णवेळ मी, आपल्याला इकडे कधी ड्राईव्ह करता येईल ह्या विचारात मग्न होते.
इकडे सगळीकडे पंतप्रधान ग्रामसडक योजनेची कामं जोरात सुरु आहेत. ह्या पट्ट्यावरच्या ओस्ला नावाच्या शेवटच्या गावापर्यंत हा रस्ता जाणार आहे. त्यामुळे येत्या १/२ वर्षात ह्या ट्रेकचा एक दिवस कमी होईल कारण तिथवर गाडी जाऊ शकेल. ही गावं एवढ्या दुर्गम भागात आहेत की आजवर हे लोक बाहेरच्या जगाशी कसे कनेक्टेड होते हा प्रश्न पडतोच.
तास सव्वा तासाने थांबलो. इथून पुढे चालणे. सगळ्यांना जमा करुन, फार पुढे मागे राहू नका वगैरे सांगून चालायला सुरुवात करायला सांगीतली. गाईड्सपैकी एक जण सगळ्यात पुढे. त्याच्या पुढे जायचं नाही. मुख्य लीडर सगळ्यात मागे, बाकी उरलेले दोघे मधल्या पट्ट्यात असत. सगळ्यात पुढे जो हितेश भाई गाईड होता, त्याच्याकडे त्याच्या स्वतःच्या सॅकव्यतिरीक्त १० किलो वजनाचा ऑक्सीजन सिलींडरही होता. तो त्याने पहील्या दिवसापासून शेवटपर्यंट बाळगला आणि हे आम्हाला शेवटच्या दिवशी कळलं.
आम्ही दोघांनी आणि इतर ४ जणांनी आमच्या मोठ्या सॅक्स ऑफलोडींगसाठी दिल्या होत्या ऑफलोडींग म्हणजे घोड्यावरुन सामान येतं. ह्या ट्रेकमध्ये बेस कँपपर्यंत घोडे असणार होते. पुढे पोर्टर्स. आमच्याकडे छोटी सॅक असे, ज्यात पाणी, थोडा खाऊ, कॅप, गॉगल आणि पॅक्ड लंच असेल तर डबा असायचा. शिवाय फोन, माझा किंडलही माझ्याच सॅक मध्ये असत.
बाकीच्यांनी मात्र थ्रू आऊट स्वतःच्या सॅक्स उचलल्या. त्याबद्दल सतत त्यांचं कौतुक वाटे. खरं म्हणजे हे असं करता येईल हे आमच्या लक्षातही आलं नव्हतं. सुरुवातीला आपल्याला शक्य नाही हा विचार केला कारण कपडे आणि इतर सामानामुळे सॅकच वजन ९/१० किलो तरी भरतं. एवढं वजन उचलून इतकं चालायच आपल्याला जमणार नाही. तरी शेवटी शेवटी, नीट सवय, प्रॅक्टीस केली, सामान कमी केलं तर जमू शकेल ह्या विचारावर आलो आहोत. बघू कसं जमेल ते. ( सामानावरुन, आम्ही नेलेले निम्मे कपडे वापरले गेलेच नाहीत. अगदी फ्लीज जॅकॅट्सही नाहीत. तशीच परत आणली. आता नीट अंदाज आला आहे काय घ्यावं काय नाही याचा. त्यामुळेही सामान कमी होईल. )
तर चालायला सुरुवात केली. रस्त्यात कामे सुरु होती. बुलडोझर वगैरे मुळे काही ठिकाणी थांबायला लागे. साधारण अर्ध्या तासानंतर मोकळा रस्ता लागला. आजचा संपूर्ण रस्ता मोस्टली झाडी असणार होती. सावली, ऊन, सावली.. हळू हळू पुढे जात होतो. एव्हाना थोड्या ओळखी होऊ लागल्या होत्या. पुढे एका गावात एक भुभू आमच्या बरोबर चालू लागला. त्याला बिस्कीटं दिली. काही वेळाने रस्त्याकडेला असलेल्या एका टपरीवर चहा ब्रेक घेतला. खरं तर माझ्या दुसर्या चहाची वेळ होऊन गेली होती तरी मी चक्क चहा घेतला नाही.
रस्त्याच्या कडेला ऊतारांवर कसले कसले मळे होते, वर डोंगरावर तुरळक घरं दिसत होती. मध्ये मध्ये लाल रंगांचे पट्टे असलेली झाडे असत. त्याच्या तुर्यांना वाळवून पीठ काढतात, जे स्वयंपाकात वापरतात.
दररोज ब्रिफींगमध्ये आम्हाला इतर गोष्टींबरोबर उद्या रस्त्यात पाणी मिळेल का तेही सांगत. झरे, पाईप्स मधून येणारं ताजं पाणी.
एका ठिकाणी अजून एक ब्रेक घेतला. हे एक छोटे हॉटेल होते. इथे कोकम सरबत मिळालं. आमच्यात दोन जण कन्नड भाषीक होते, त्यांच्याकडून भाषेचे धडे घेतांना
अख्खा रस्ता नदीच्या कडेने, झाडांच्या सावलीत वर, खाली चढत उतरत जात होता. हवेत मस्त गारवा होता.
साडेबारा दरम्यान जेवायला थांबलो. इकडे चक्क अमूल ताकही मिळालं. मला ह्या बाकड्यांवर बसून झोपून जावंसं वाटत होतं. आज डब्यात पोळ्या आणि कोबीची मस्त भाजी होती. डबे खाल्ले आणि तिथेच झर्यावर धुतले.
हिमाचलमध्ये डोंगराळ भागात आढळणारी अजून एक नवलाईची वास्तू म्हणजे पाण्यावर चालणार्या गिरण्या. अशीच एक गिरणी आम्हाला बघायला मिळाली. पाण्याच्या जोरावर पाती फिरतात आणि दळण दळलं जातं. ती बंद होती म्हणून आतून फोटो घेता आले नाहीत. ही ती गिरणी
अखेरीस अडीचच्या दरम्यान आमची पहिली 'सीमा' कॅंपसाईट आली. दरम्यानच्या काळात घोडे पुढे गेले होते आणि जरा वेळाने, टिम टीटीएच असे टी शर्ट घातलेले दोघे जण, पायात फक्त स्लीपर्स घालून आमच्या पुढे वेगात निघून गेले. ते आमचे मुख्य कुक आणि मदतनीस होते.
आज बाकी स्टाफ पुढे आल्याने तयार सेट केलेले टेंट्स मिळाले. हे टेंट्स अगदी लहान असतात. आत जेमतेम तीन माणसे झोपू शकतात. आणि ऊभं राहीलं तर ते डोक्यावर उचलेले जा ऊ शकतात. सो पँट्स घालणं हे जिकरीचं काम होतं. आमचे डबल शेअरींग होते. सॅक्स आम्ही आतच ठेवल्या कारण मध्येच पाऊस पडत होता. नियमानुसार लगेच टेंटमध्ये जाऊन झोपायचं नव्हतं कारण आत गुदमरल्यासारखं होऊ शकतं. बाहेरच जरा बसून मग आत गेलो. मोठ्या सॅक्सही आत नेल्या . बदललेले कपडे टेंटवर उन्हात पसरून ठेवले. दररोज कँपवर पोहोचल्यावर अंधार पडायच्या आधी आम्ही दुसर्या दिवशीची तयारी करुन ठेवत असू. सांगीतल्याप्रमाणे कपड्यांचे लेयर्स काढून ठेवणे आणि खाऊच्या पिशव्या भरुन घेणे. मी मिक्स ड्रायफ्रुट्स, स्नीकर्सची छोटी चॉकलेट्स, पेपर बोट्सची चिक्की, ड्राईड फ्रुट्स नेले होते. मोठ्या पिशव्यांमधून काढून आमच्या पाठीवरच्या सॅक्समध्ये लहान झिपलॉक पिशवीत ठेवत होतो. चालतांना कधी फारसं खाल्लं नाही, पण कँपवर आल्यावर मात्र भूक लागायची तेव्हा उपयोग व्हायचा.
दुपारी चार वाजता चहा आणि स्नॅक्स, रोज वेगळं काहीतरी आणि गरमागरम. आज भजी होती. त्यानंतर अॅक्लमटायझेशन वॉक म्हणजे आहोत तिथून अजून पुढे, ऊंचावर अर्धा पाऊण तास जाऊन यायचं. हे गरजेचं असतं कारण एव्हाना तुम्ही आहात त्या ऊंचीला सरावले असता. त्याहीपेक्षा ऊंचावर जाऊन खाली आलं की अजून थोडा सराव होतो. climb high, sleep low हा नियम आहे. आल्यावर सूप असे. रोज वेगळं, गरमागरम. ते पित असतांना आमचा ऑक्सीजन, पल्स रेट चेक करत आणि नोंद करत. त्यानंतर दुसर्या दिवसाचं ब्रिफींग ज्यात मुक्काम कुठे, किती अंतर, किती वेळ लागू शकतो, कधी निघायचं, रस्त्यात पाण्याची सोय काय, लेयरींग कसं करायचं आणि इतर महत्त्वाच्या सुचना. त्यानंतर जरा ब्रेक घेऊन साडेसातला रात्रीचं जेवण आणि मग झोप. हे असं जनरल schedule असे.
आज अॅक्लमटायझेशन वॉकला जातांना आमच्या कॅंपच्या पुढे बिकट अॅडव्हेंचरचा कँप दिसला. येतांना पुणे एअरपोर्टवर आमच्या मागच्या खुर्च्यांवर बसलेल्या मुलींच्या बोलण्यात, सांकरी सांकरी ऐकलं आणि न राहवून त्यांना विचारलं की तुम्हीही ट्रेकला जात आहात का ? त्या बिकट बरोबर ' हर की दुन' ला जात होत्या. त्या कदाचिक इकडे असतील म्हणून बघायचा प्रयत्न केला पण कँपवर शांतता होती. कदाचित अजून आल्या नसतील.
वरुन आमचे टेंट्स दिसत आहेत.
परत आल्यावर रोजचं जर्नल लिहून आजचं राहीलेलं वाचन केलं.
आता इकडे, पाण्यात जाऊन वाचायची गरज होती का असं विचारू नका, कारण होती. रोज रोज थोडीच असं मिळणार आहे !
आज माझा ऑक्सीजन ९८ आला. आणि पल्स ७०.
थंडी चांगलीच वाढली होती. आज जेवणात गोड म्हणून गाजराचा हलवा होता.जेवण झाल्यावर मी लगेच जाऊन आडवी झाले पण गारव्याचा चांगलाच त्रास होत होता. काही वेळानी महेश येऊन मला जरा जबरदस्तीनेच बाहेर घेऊन गेला. बाहेर चक्क आतल्यापेक्षा कंफर्टेबल वाटत होतं शिवाय पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश. बाहेर १५/२० मिनीटे फेर्या मारायला लावल्या आणि मग आता जाऊन झोप म्हणाला. हालचाल करुन शरीरात ऊब निर्माण होते आणि मग झोपलं की ती ऊब स्लिपींग बॅगमध्ये ट्रॅप होते आणि थंडी वाजत नाही. खरोखर मला बर्यापैकी शांत झोप लागली. जाग येत होतीच पण तरीही थंडी कमी वाजली. मी स्लिपींग बॅगमध्ये गुरफटून घेऊन किंडल वाचायची ट्रीक शोधली, फक्त एका हातातला हातमोजा काढावा लागत होता, पण तरी जमलं.
रात्री दिड पावणे दोन दरम्यान टॉयलेट टेंट गाठावा असं वाटू लागलं. वर वर जातांना ams ( altitude mountain sickness ) चा त्रास होऊ नये म्हणून सतत म्हणजे अगदी स त त पाणी पिणे हाच एक ऊपाय आहे. आम्ही डायमॉक्स नेल्या होत्या पण एकदाही घेतल्या नाहीत. पाणी प्यायल्याने आणि जनरलच थंडी असल्याने जावसं वाटणं सहाजिकच होतं. इकडे गेल्या काही आठवड्यात अस्वलाचं सायटींग झाल्याने रात्री एकट्याने बाहेर पडायचं नाही अशी ताकीद मिळाली होती.
मला जायचं होतं आणि महेश गाढ झोपला होता. साडेचारपर्यंत वाट पाहिली आणि मग शेवटी हाक मारलीच त्याला. टेंटच्या बाहेर पडणं हेही एक ड्रीलच असतं. आधी तर (त्यातल्या त्यात ) ऊबदार स्लिपींग बॅगमधून हात बाहेर काढून चाचपून हेडटॉर्च लावायचा, डोक्याचा रुमाल/ टोपी नीट करायची. मग जीवावर येऊन अर्धवट झोपेत बाहेर यायचं, मग टेंटच्या दाराची चेन ऊघडून, ग्लोव्ज काढून फ्लोटर्स घालायचे. पायात वुलन सॉक्स असतात ते फ्लोटर्सच्या वेलक्रो मध्ये अडकतात , ते ओढाताण करत काढायचे, फ्लोटर्स जेमतेम अडकवून, बाहेरची कनात ऊघडून रांगत भेलकांडत बाहेर पडायचं.
बाहेर थंडीचा जोरदार फटका बसतो.
पण बाहेर चंद्राचा चमकदार प्रकाश पडला होता. गवतातून धडपडत टॉयलेट टेंट गाठला.
हे टेंट म्हणजे एक खड्डा खणलेला असतो, त्यावर लावलेला आडोसा. आमचे २ असत. त्यातल्या एकाची चेन खराब झाली होती, ती एका विशिष्ट जागेपेक्षा जास्त उघडली की पुन्हा लागायची नाही आणि दररोज कोणीतरी एक जण ती पूर्ण उघडायचाच. मग तो टेंट बाद व्हायचा आणि दुसर्यावर सगळी जवाबदारी यायची.
आपलं काम झालं की तो खड्डा खोदतांना जी माती बाजूला काढलेली असे त्यातली थोडी, तिथेच ठेवलेल्या लहानश्या फावड्यानी खड्ड्यात ढकलून द्यायची.
आता उठलो आहोतच तर दातही घासून घ्यावेत. दात घासणं पण दिव्य असतं कारण तेच. ग्लोव्ज काढावे लागतात आणि थंडगार पाण्याने चुळा भरणं अवघड होतं. ह्यावर आम्हाला एक उपाय सापडला म्हणजे आमच्या ग्रुपमधल्या एकाने सांगितला, तो म्हणजे माऊथवॉश.
आज आम्ही होतो तिथे जरा मॅनेजेबल होतं. पण जशी थंडी वाढेल तसं हे कठीण होणार होतं. शिवाय प्रत्येक कॅंपवर पाणी मिळेल्च, असलं तरी बर्फ झाला असू शकेल ही शक्यता असते. त्यामुळे आता आमच्या ट्रेकच्या मास्टर लिस्ट मध्ये माऊथवॉश घातला आहे.
बाहेर खूप प्रसन्न वाटत होतं. पण चहाला अजून तासभर होता म्हणून पुन्हा जाऊन झोपलो. एव्हाना २/३ जण उठले होते पण ते कोण आहेत हे कळत नव्हतं. कारण टोप्या, जॅकेट्स मध्ये चेहरा दिसत नव्हता. पुढे पुढे जॅकेट्स बघून कोण आहे हे लक्षात येऊ लागलं.
लवकर उठण्याचा फायदा झाला की टॉयलेट टेंटच्या बाहेर लाईनमध्ये उभं रहायला लागलं नाही.
आता आजचा मुक्काम असेल डायरेक्ट १०,२०० फुटावर. देवसु बुग्याल