ट्रेकचा दुसरा दिवस - मुक्काम देवसु बुग्याल.
७००० वरुन १०,२०० फूट. अंतर साधारण ८/९ किमी. वेळ ५/६ तास.
आज आम्हाला हॉट लंच होतं. एव्हाना हॉट लंच म्हणजे जास्त चालायचं नाहीये हे लक्षात आलेलं होतं. बरोबर ८ वाजता निघालो.
निघाल्या निघाल्या आमच्या रस्त्यावरचं शेवटचं दुकान लागलं. आणि पाऊसही सुरु झाला म्हणून आम्हाला थोडा वेळ आडोश्याला ऊभं रहायला सांगीतलं आजचाही रस्ता कालसारखाच. फक्त जरा जास्त दाट झाडी लागत होती. बाजूला कालचेच लाल तुरे होतेच. बरोबर खळाळत वाहणारी नदी होतीच. ती कधी डावीकडे, कधी उजवीकडे.
चढ, उतार, लहानमोठे ओढे, दगड , माती चिखल पार करत हळू चालत, मध्ये ब्रेक घेत कँपसाईटवर पोहोचलो. आम्ही वर वर जात होतो. त्यामुळे उतार आला की आता दुप्पट चढ येणार ह्याची धडकी भरायची. इथेच रस्त्यात एका ठिकाणी एका पुलावरुन हर की दुन ट्रेकचा रस्ता वेगळा होतो.
आजपासूनच्या चालण्याचं एक सुख होतं ते म्हणजे स्वर्गरोहिणी पिकचं होणारं दर्शन. पांडव ज्या मार्गावरुन स्वर्गात गेले ते शिखर आजपासून आमच्या बरोबरीने असणार होतं. हे अजून कोणीही सर करु शकलेलं नाहीये, ज्यांनी प्रयत्न केला ते परत आले किंवा नाहीसे झाले.
एका ठिकाणी सरळ उतार उतरुन पुढे तसाच उभा चढ चढून जायचं होतं. उताराच्या टोकाला तळाशी गर्द झाडी आणि प्रचंड गारठा होता आणि बाजूला ऊंच सुळके. तिथे वर मधमाश्यांचा एक मोठ्ठा थवा (?) भिरभिरत होता. हजार दिड हजार तरी असतील आणि प्रचंड मोठी पोळी लागली होती. त्या वरच राहू देत अशी प्रार्थना करत घाईघाईने तो भाग ओलांडला. शेवटचा चढ बराच कठीण होता. त्यानंतर आलेलं पठार कसंबसं पार केलं आणि कँपसाईटवर पोहोचलो.
घळीकडे जाणारा रस्ता
आज रस्त्यात एक गंमत झाली. एका ठिकाणी खूप अरुंद अश्या घळीतून खाली उतरायचं होतं. खूप अंधारी आणि झुडूपांनी गच्च भरलेली. आमचा सगळ्यात पुढचा गाईड आत शिरला आणि लगेच बाहेर आला. जरा थांबा म्हणे. तर दोनच मिनीटात आतून आणि बाकी सगळीकडूनच शेळ्याच शेळ्या बाहेर पडू लागल्या. आणि बाहेर आम्ही सगळे तर त्या बिचकून पुन्हा उलट्या वळून जाऊ लागल्या. मग आम्हाला मागे जा मागे जा करत त्यांना रस्ता दाखवला. जवळजवळ हजाराच्या आसपास असतील. आणि त्यांना सांभाळायला ३/४ जण. मध्येच एक माणूस बाहेर आला तो त्याच्याकडे हे
ह्या बॅगेत किमान ४/५ पिल्ले होती, ती तीन दिवसांची होती. त्यांना आता वर थंडी सहन होणार नाही म्हणून खाली नेत होते. खरं सांगते, ती पिल्ले आणि घाबरुन भराभरा जाणार्या त्या शेळ्या बघून माझा नॉनव्हेज न खाण्याचा निर्णय अजून अजून पक्का होऊ लागला. आणि मी सिरीयसली ह्यावर विचार करते आहे.
कँपवर पोहोचलो . आमच्या पुढे मागे बिकट अॅडव्हेंचर टिम होती. त्यांचा एक ग्रुप बाली पास करत होता. कँपसाईटवर जागा अगदी थोडी असल्यामुळे त्यांच्यात आणि आमच्या गाईड्स मध्ये जागेसाठी जरा चढाओढ झाली. त्यांचा आणि आमचा एकाच छोट्या मैदानावर पुढेमागे कँप लागला. आमचे कँप्स उतारावार होते. त्यामुळे त्या रात्री आम्ही सगळे घसरत टेंट्स च्या दाराशी जात होतो. आणि मग अर्धवट झोपेत स्लिपींग बॅग मध्ये कसंबसं वर सरकत होतो.
आज जरा लवकर पोहोचल्याने लंचच्या वेळेपर्यंत dumb charades खेळलो. प्रचंड धमाल आली. आणि मग रोज कँपवर पोहोचल्यावर हे पण एक रुटीन झालं.
संध्याकाळी नेहमीप्रमाणे acclamation walk ला नेलं. पावसाळी हवा होती. एव्हाना सगळ्यांशी बर्यापैकी ओळखी झाल्या होत्या. चालतांना मागे सप्तचिरंजिव वगैरे ऐकलं., वळून पाहीलं तर जितेंद्र दोघांना सांगत होता आणि त्याला नीट आठवत नव्हतं तर त्यांच्या संभाषणात घुसले. आणि मग आमच्या मस्त गप्पा रंगल्या. जितेंद्र जेमतेम २८/२८ वर्षांचा, पण त्याला बरीच माहिती असल्याचं बघून कौतुक वाटलं.
आज पाऊस होता, त्यामुळे उद्या कसं काय होणार अशी शंका होती.
आज दुपारी चहाबरोबर गरमागरम मठरी आणि रात्री खीर होती.
पहीले दोन दिवस तसे बरे गेले तरी गाईड्स अभी तक ट्रेक शुरुही नही हुआ है ह्यावर अडून होते.
--------------------------------------------------------------------
ट्रेकचा तिसरा दिवस - मुक्काम रुईनसारा ताल
१०,२०० वरुन ११,८०० फूट . अंतर १२ किमी. वेळ ६/७ तास.
उद्याचा मुक्काम असणार होता रुईनसारा ताल. रुईनसारा ताल हा ही एक वेगळा स्वतंत्र ट्रेकच आहे. आता ह्यात एक कॅच होता. उद्या आम्हाला सुपीन नदी ओलांडायची होती. जर दुपारी एक पर्यंत पोहोचू शकलो तरच नदी क्रॉस करायची नाहीतर परवा सकाळी कारण उन्हे जशी चढत जातात तसे वरचे ग्लेशियर वितळतात आणि खाली नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढतो. परवा सकाळी नदी ओलांडायची कोणाचीच तयारी नव्हती कारण सकाळी महा प्रचंड थंड पाणी असणार आणि तसंच पुढे चालत जायचं म्हणून सगळ्यांनी ठरवलं की काहीही झालं तरी उद्याच पलीकडे मुक्काम करायचा. त्यामुळे लवकर, सात वाजता निघायचं ठरलं.
आज बरच चालायचं असल्याने आमच्या कुकने आम्हाला पोटभर पोहे, मॅकरोनी आणि खीर खायला घालून रवाना केलं.
चालण्याची सुरुवात उतारापासून. जवळजवळ अर्धा तास उतरत होतो., ते ही दाट झाडीतून आणि किचकट रस्त्यावरुन. बरेचदा पाय घसरला, कालच्या पावसामुळे चिखलही झाला होता. ह्या उतारावरुन पुढच्या चढांचा अंदाज आला.
उद्यापासून हळू हळू झाडी विरळ होत जाणार.
.
पण आजचा दिवस चालतांना सगळे अनुभव घेऊन आला.
चढ, उतार, तीव्र चढ त्यामुळे तीव्र उतार, झुडूपे, माती, वाळू, मोठे दगड, चिखल, छोटे ओहोळ आणि चक्क धबधबे
ह्या फोटोत नीट दिसत नाहीये पण मस्त धबधबा होता. हा शेवटचा टप्पा होता चालण्याचा पण अर्थात माहिती नव्हतं. फार फार दमले होते आणि अवचित तो समोर आला. मग भिजून ताजंतवानं वाटलं. मला भिजायला अज्जिब्बात आवडत नाही. पण परत, ही अशी संधी कोण सोडेल ? भिजून घेतलं. पण शुज ओले होऊ लागले म्हणून मन आवरलं.
हा आमचा राम तेरी गंगा मैली फोटो
आज चालणं खरंच कठीण वाटत होतं, त्यात वेळेवर पोहोचण्याची घाई होती. ब्रेक्स कमी घेतले जात होते.
एक कठीण चढ चढून आल्यावर....... इथेच टाका तंबू
एक वाजायला आला तरी टेंट्स काही दिसेनात. आज काही नदी ओलांडता येणार नाही बहुदा. आमच्या गाईड्सनी स्पष्ट सांगितलं होतं की सारखं सारखं, आता किती वेळ विचारु नका. गुड्डूभाई गाईड तर वाटेल ते उत्तर देत. पण आमची अवस्था बघून ह्यावेळी त्यांना दया आली आणि गिनके २० मिनीटमे पोहोच जायेंगे हे ऐकल्यावर आमच्या अंगात त्राण आले.
आणि बरोबर २० मिनीटांनी
फायनली थकून भागून नदीकाठी पोहोचलो.
पुढे दुसरं दिव्य होतं ते बर्फासारख्या थंडगार पाण्यातून अनवाणी, दोराला धरुन नदी क्रॉस करण्याचं. नदी दोराला धरुन ओलांडायची होती.
आमचे फ्लोटर्स आम्ही ठेऊन घेतले होते. शुज काढून ते घातले. लेसेस बांधून शुज गळ्यात अडकवले. पँट फोल्ड केली आणि इकडेतिकडे न बघता सरळ काठाशी गेले. इकडेतिकडे, पाण्यात बघू नका, सरळ समोरच्या डोंगरांकडे बघा आणि पाय उचलू नका, सरकवा हे ऐकून पाण्यात पाय घातला. आणि त्याक्षणी काय धक्का बसला ! पाणी अती म्हणजे अतीच थंड होतं, पुढे नदी कशी ओलांडली ते आठवत नाही पण बाहेर आल्यावर पावलं लालभडक झाली होती. पुढे बराच वेळ तो बधिरपणा राहीला.
सगळ्यांनी ओरडत, किंचाळत नदी क्रॉस केली आणि मग जल्लोश केला.
हा सगळा वेळ आमचे गाईड्स पाण्यात पाय रोऊन दोर धरुन उभे होते. ज्यांना मदत लागली त्यांच्या बरोबरीने नदी क्रॉस करत होते. आणि आमची अवस्था बघून हसतही होते.
आम्ही रोज निघण्याच्या आधी वॉर्म अप आणि कँपवर पोहोचल्यावर कूल डाऊन करत असू. आज सुट्टी. आज अॅक्लमटायजेशन वॉकलाही सुट्टी.
दुपारी चहाबरोबर व्हेज चॉप्स चापले.
ही कॅंपसाईट.
आम्ही रोज सकाळी निघतांना स्लिपींग बॅग्ज पॅक करुन ठेवत असू.
आल्यावर टेंट्स लावायला आणि निघतांना डिस्मेंटल करायलाही जमेल तशी मदत करायचो. पण आमची ती मदत म्हणजे लुडबूड होती. तरी शेवटच्या दिवसापर्यंत बर्यापैकी तयार झालो.
उद्या सकाळची नदी क्रॉस करायची सर्कस टळल्याने सगळे खुश होते.
बिकटची जी टिम आमच्या मागे पुढे होती ( खरं तर पुढेच असे. ७/८ जण होते आणि हे लोक अगदी टेकण्यापुरते ब्रेक घेत होते. इकडेतिकडे न बघता सतत चालत होते )
त्यांनी नदीच्या पलीकडे मुक्काम केला. दुसर्या दिवशी आम्ही नदी क्रॉस करतांनाची त्यांची कसरत पाहून घेतली.
रोज प्यायचं पाणी आम्हाला अश्या नदी, ओढ्यांमधून भरुन घ्यावं लागायचं. फक्त शेवटच्या २ दिवशी एक एक थर्मासभर गरम पाणी मिळालं.
पाण्यासाठी आम्हाला आमच्या हायड्रेशन बॅग्ज ( बॅग्ज म्हणायचं, त्याचं खरं नाव आहे हायड्रेशन ब्लॅडर ) चा खूप उपयोग झाला. अगदी हॅन्ड्स फ्री. ( हा फोटो देता येत नाहीये )
नदीच्या काठावर फोटो काढायलाच हवा. (हे दुसर्या दिवशी निघतांना)
रात्री मजा झाली. एकतर एकही रात्र सलग झोप लागत नव्हती. आज टेंट जरा सपाटीवर होते आणि खाली गवत असल्याने जरा बरं होतं पण थंडी चांगलीच वाढली की शेवटी पायातही थर्मल घालावे लागले.
तर गंमत. रात्री पावणे दोन, दोनच्या दरम्यान शेळ्यांचं ओरडणं ऐकू येऊ लागलं. ६/७ असतील. कँपच्या जवळून आवाज येत होता. बहुदा कळपातून चुकल्या असाव्यात. बराच वेळ आवाज येत होता. खूपच अस्वस्थपणा आला. बिचार्यांना भेटू देत आपले भाईबंद.
सकाळी चौकशी केली तर गाईड्स म्हणाले ६/७ नव्हत्या दोनेक हजार असतील, त्या इकडून पुढे जात होत्या.
चला, निम्मा ट्रेक संपला.
उद्यापासून खरी चढाई सुरु. ( म्हणजे गेले ३ दिवस काय करत होतो ?)
-------------------------------------------------------------------
ट्रेकचा चौथा दिवस - मुक्काम ओदारी
११,८०० वरुन १३,१०० फूट. अंतर ४ किमी. वेळ ५ तास.
आज उपमा आणि ब्रेडबटर खाऊन आरामात ८ वाजता निघालो.
आज बराच चढ असल्याने आणि जेवण कँपसाईटवर असल्याने सगळे निवांत होते. आरामात, थांबत फोटो काढत पुढे जात होतो.
स्वर्गरोहिणी आता बाहेर डोकावू लागलं होतं.
आजूबाजूचा परिसरही बदलायला लागला होता.
ह्या घळीच्या टोकाला, पार पलीकडे कँप होता
आणि सावकाश कँपसाईटवर पोहोचलो.
आजचा अॅक्लमयटाजेशन वॉक म्हणजे दुष्टपणा होता. आधी आम्हाला चविष्ट नुडल्स खायला घातले ( हे नुडल्स उकळत्या पाण्यातून काढतांना आम्ही दुपारीच पाहीले होते. त्यावरुन आजचं जेवण काय ह्याच्या पैजा लागल्या होत्या, ( पैजा काय लावायच्या त्यात, सरळ सरळ दिसत होतं ना ! पण जो हरेल तो पुन्हा सुपीन नदी क्रॉस करुन येईल असं ठरलं ) पण आम्हाला सगळ्यांना क्लिन बोल्ड केलं ! आणि सगळेच हरल्याने सुपीन नदी क्रॉस करण्याचा बेत रद्द केला गेला ) आणि मग कँपच्या मागे एक ऊभा सुळका होता. तिकडे चला म्हणून चालवायला सुरुवात केली तर थांबेचनात.
आजच बाली पासला पोहोचवणार की काय !
शेवटी वर वर नेऊन आता उतरा असं सांगीतलं. उतरणं अजून कठीण. परवा आप्ल्याला अश्याच रस्त्यानी उतरायचं आहे., तो तर जेमतेम पाऊल टेकेल इतका अरुंद आहे, आणि तिकडे थोडंथोडंकं नाही तर पाऊण तास चालायचं आहे शिवाय बाजूला दरी असेल तर आत्ताच जमवून घ्या.
आमचा लीडर एवढंच बोलायचा.
आम्ही ह्याही पेक्षा ऊंचावर होतो. फोटो काढायचे राहीले. दिसतांना, त्यात काय असं वाटेल पण तो सरळ ऊभा ऊंच चढ होता.
आमच्या दु:खावर ऊतारा म्हणून रात्रीच्या जेवणात शिरा होता.
कॅंपसाईट रात्रीच्या वेळी
इकडे थंडी अजून वाढली म्हणून अजून एक थर्मल घालायला सुरुवात केली.
रात्री स्लिंपिंग बॅगमध्ये घालायला वॉर्मर्स मिळाले. हे पातळ पण उबदार, स्लिपिंग बॅगसारखेच शिवलेले असतात. ते बॅगच्या आत ठेऊन त्यात आधी शिरायचं आणि मग झटापट करुन दोन्हीच्या चेन्स लावायच्या. वॉर्मर्सची ऊंची बॅगपेक्षा कमी होती बहुतेक ( किंवा आम्हाला ते जमलं नाही ) मग अती वैतागून ते पांघरुणासारखे गुंढाळून घेतले.
उद्या बेसकँप. !!!
उद्यासाठीचं ब्रिफींग करतांना, कँपवर जोरदार वारा असतो त्यामुळे टेम्परेचर अजून कमी होतं तेव्हा कान नीट झाकलेले ठेवायला सांगीतले.
उद्याचा हायलाईट होता, नामा कांडी रिज.(ridge)
सकाळी टेंट्स वाईंड अप होतांना
एवढी थंडी होती की उन्हात उभं राहूनही सहन होत नव्हती !!!!
--------------------------------------------------------------------
ट्रेकचा पाचवा दिवस - मुक्काम बाली कोल कँप ( बेस कॅंप )
१३,१०० वरुन १५,१०० फूट. अंतर अंदाजे ४ किमी. वेळ ५ तास.
आज आम्ही बेस कँपला पोहोचणार.
सुरुवात चढापासून होती. जरावेळात चढाला सरावलो. झाडे जाऊन आता सगळीकडे रेती, सुटे, मोठे दगड दिसायला लागले होते.
हवेत गारवा होताच की आठ वाजताही हातमोजे घातले होते.
पहीला चढ चढून आल्यावर ब्रेक घेतला.
काही वेळात ती रिज (सुळका किंवा कड ) येणार. तो भाग कठीण असणार आहे. चालतांना डावी उजवीकडे बघू नका, पायाखाली बघा. घाबरु नका. हे ऐकून उत्सुकता वाढली होती.
पलीकडे लगेच टेंट्स असणार हे ही सांगीतलं होतं म्हणून,काय एवढं, थोडाच वेळ चालायचं असेल असंही वाटत होतं
चालायला सुरुवात केली.
तर पुढचा चढ चढल्यावर हे समोर आलं
बघितल्यावर एकदम छाती दडपल्याची भावना निर्माण झाली. फोटोत दिसतांना जरी असं वाटत असलं की ही कड सरळ आहे, चढ नाहीये तरी तसं नाहीये. हा सरळ ७० अंशाच्या कोनात चढणारा रस्ता होता. आणि दोन्हीकडचे उतार सरळसोड खाली गेलेले होते. जेमतेम एक पाऊल मावेल एवढीच पायवाट. मी आधी अंदाज घेतला. इकडे पाय बिय घसरला तर काय होऊ शकेल. जास्तीत जास्त काही हाडं मोडतील.
चालायला सुरुवात केली.
हे संपल्यावर टेंटस येतील ह्या आशेवर होतो तो पुढे किंचीत उतार आला आणि दुसरा चढ. पुढे तिसरा, चौथा. संपेचनात. सगळे दमले होते, वैतागले होते. चौदा साडेचौदा हजारावर आल्याने दम लागत होता. आणि टेंट्सचा पत्ताच नाही. एव्हाना घोडे आणि सपोर्ट स्टाफ पुढे गेले होते. हे कुक आणि हेल्पर्स पायात क्रॉक्स, साध्या स्लिपर्स घालून अश्या वेगात चालत जायचे की आम्हाला लाज वाटायची.
पाच चढ क्रॉस केल्यावर शेवटी टेंट दिसले.
चालण्याच्या शेवटच्या ट्प्प्यात आमच्या गृपमधला सनी माझ्याबरोबर होता. तो नॅशनल लेव्हलवर नऊ वेळा मार्शल आर्ट्स वगैरे खेळात खेळला आहे. त्याशिवाय ब्राझिलियन जिजुत्सू वगैरे अचाट नावांचे खेळही तो खेळतो. ( मला फक्त ब्राझिलियन वॅक्स माहिती )त्याची बायको अनन्या एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलीस्ट आहे. ती पण होतीच आमच्याबरोबर. दोघेही जेमतेम तिशीचे.
कॅम्पला पोहोचल्यावर हुश्श झालं.
आज इकडे वेगळंच द्रुश्य होतं. बर्याच जणांना काही ना काही त्रास होत होता. डोकं तर बहुतेक सगळ्यांचचं दुखत होतं. मळमळणं, गरगरणं. गाईड्स त्यांना भरपूर पाणी प्या असं सारखं सांगत होते. मला चक्क उकडत होतं. नशिबानी महेशला किंचीत डोकं दुखण्यापलीकडे काही होत नव्हतं आणि मी अगदी बरी होते. त्यावरुन ' आम्हाला डोकं आहे वगैरे नेहमीचे जोक करुन झाले ). आज दुपारी टेंटमध्ये अजिबात जायचं नाही अशी सक्त ताकीद होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वारा बिरा नव्हता म्हणून गारवाही सहन करण्याइतपत होता.
जेवण झाल्यावर आम्ही काही जण असच चालायला गेलो. समोरच पास दिसत होता. हा तर सहज क्रॉस करु शकू.
चहा झाल्यावर ( चहा बरोबर फ्रायम्स होते ) वॉकसाठी त्याच रस्त्याने पुन्हा नेलं.
वरुन दिसणारं दृश्य
आणि हे झळाळतं स्वर्गरोहिणी.
खाली आल्यावर ऑक्सीजन चेक. आजपर्यंत रोज माझा ऑक्सीजन ९६-९८ असे. पल्सही ७० च्या आसपास. बरेच जण ९० च्या वर किंवा ८८-९० पर्यंत असत. पण आज हायेस्ट मार्क्स ९० आले. माझा ऑक्सीजन ८८ आणि पल्स चक्क ७९. ते साहाजिकच होतं.
आज शेवटचं ब्रिफींग.
उद्या एकूण १४ किमी चालायचं आहे. पोहोचायला उशीर होईल.
पहाटे २ ला उठायचं. ३ ला चहा ब्रेफा आणि ४ ला निघायचं.
भरपूर पाणी भरुन घ्या
नीट लेयरींग करा
कान नीट झाकलेले ठेवा
आम्ही सांगू त्याच क्रमाने चालायचं. एकानेही लाइन सोडायची नाही.
समीटवर जास्तीत जास्त ५ मिनीटं थांबायला मिळेत त्यात काय ते फोटो काढून घ्या.
पुढे किचकट उतार असतील तिथे, आता उतरायचं आहे म्हणून घाई गडबड करु नका वगैरे वगैरे.
वातावरणात थोडी अॅन्झायटी, थोडं टेन्शन होतं.
जेवणाआधीच आम्ही उद्याचे कपडे घातले. पहाटे २ वाजता कपडे बदलण्याची हिंमत नव्हती.
मी वर एकूण ६ लेयर्स ( थर्मल, वर ट्रेकींगचा फूल स्लिव्ज टी शर्ट, त्यावर रनिंगचा ड्रायफीट टी शर्ट,त्यावर पुन्हा थर्मल, त्यावर साधा कॉटनचा टी शर्ट, आणि वर नेहमीचं डाऊन+ फ्लिज जॅकेट )
आणि पायात ३ लेयर्स ( थर्मल, कॉटन पँट त्यावर ट्रेकींगची पँट )
डोक्याला रुमाल, मला रुमाल आवडतो, हवा तसा सैल घट्ट करता येतो आणि त्यावर लोकरी कान झाकणारा पट्टा.
मला एकावर एक २ सॉक्स लेयर्स हवे होते पण ते फार घट्ट झाले असते म्हणून एकच घातले, शिवाय हातमोजे.
सॅकमध्ये अजून एक थर्मल ठेऊन घेतला. झिपलॉक पाऊचेस मध्ये भरपूर खाऊ ठेऊन घेतला.
जेवायला गोडात कस्टर्ड होतं लवकर जेऊन, नेहमीप्रमाणे फेर्या मारुन थोड्या अस्वस्थतेत, थोड्या उत्सुकतेने झोपायला गेलो.
समीट तर होऊन जाईल. समोरच दिसतय. चढ असला तरी पसरट आहे. धडपडण्याची भिती नाही. पण पुढे हे म्हणत आहेत तो उतार कसा असेल ?
क्रमशः