बाली पास - समीट आणि फायनली उतरलो

तर आजचा शेवटचा दिवस.

ओदारीला आल्यापासून पास समोर दिसत होता. बेस कॅम्पला तर अगदी समोर होता. हा तर चुटकीसरशी चढून जाऊ. हा ट्रेक डिफीकल्ट कॅटेगरी आहे, इथवर येताना अनेकदा अनुभव घेतलाय, पण कोणत्याही ट्रेकचा सगळ्यात कठीण भाग असतो तो समीट. ते तर समोर दिसतय आणि सहज अचीव्हेबल आहे हे ही कळतय मग अजून डिफीकल्ट काय असेल ?
नाही म्हणायला उतरतांना कठीण रस्ता आहे हे आठवत होतं पण एवढे कठीण चढ चढून आलो आहोत, आता उतरायचं तर आहे मग काय ! असंही वाटत होतं.

रात्री नीट झोप आलीच नाही. मी बराच वेळ वाचत पडले होते. थंडी जबरदस्त होती. कालचं वॉर्मर आज नीट, ते जसं वापरणं अपेक्षित आहे तसं वापरणं जमलं एकदाचं. एवढे लेयर्स शिवाय वॉर्मर आणि स्लिपींग बॅग असूनही हुडहुडी भरत होतीच.
उद्या ( उद्या काय, आजच ) आम्हाला पॅक लंच होतं. त्यासाठी डबे कालच घेऊन ठेवले होते. किचन टेंट थोड्या अंतरावर असला तरी तिकडून थोडे आवाज येत होतेच. त्यांना आम्हाला ३ वाजता ब्रेफा आणि लंच द्यायचं होतं, बिचारे रात्री झोपले तरी का कोणास ठाऊक !

जरा वेळ डुलकी लागली. आमच्या गृपमध्ये ३/४ जण पट्टीचे घोरणारे होते, शेवटी शेवटी त्यांच्या जोड्या जमवून त्यांनी टेंट्स शेअर केले. अशी एक जोडी नेमकी आमच्या बाजूला होती. भरीस भर महेश पण मंद सुरात घोरत होता. दिड वाजताच जाग आली. उठलो आहोतच तर जाऊन येऊ. मग गर्दी होईल म्हणून महेशला उठवलं. ओदारी आणि बेस कँपवर आम्हाला रात्री गरम (म्हणजे कोमट खरं तर ) पाणी देत होते, ते थर्मासमध्ये घेतलं होतं, त्यातून पटकन जमतील तसे दात घासून घेतले.

बाकी काही नसलं तरी आम्हाला स्लिपिंग बॅग्ज गुंढाळून पॅक करुन ठेवायच्या होत्या. एरवी ठिक होतं, आवरतांना उजेड असे, आज अंधारात, हेड टॉर्च च्या उजेडात गुंढाळतांना नाकी नऊ आले.

तेवढ्यात ब्रेकफास्टचं बोलावणं आलं.

बाहेर हाडापर्यंत पोहोचणारी थंडी पण चंद्राचा उजेड, स्वच्छ चांदणं, सगळ्यांची लगबग, गाईड्स, स्टाफची धावपळ, किचन टेंटमधून येणारे आवाज आणि वास,. पलीकडे बिकटच्या कँपवरही जाग दिसत होती,

ब्रेकफास्टला मॅगी, दलियाची खीर आणि चण्यांची उसळ होती. पॉवर पॅक्ड ब्रेफा. बाहेर आमचे भरलेले डबे तयार होते. भूक नव्हती किंवा होती पण अ‍ॅन्झायटी मुळे जाणवत नव्हती. मी जेमतेम वाटीभर मॅगी आणि दोन चमचे उसळ खाल्ली ( जे अगदी म्हणजे अगदीच चुकलं ).

गरम पाणी आलं. आम्ही थर्मास नेणार नव्हतो म्हणून हायड्रेशन बॅगमध्येच ओतून घेतलं. त्यात अर्ध्यापर्यंट साधं पाणी कालच भरलं होतं, ते थोडंफार गोठलं होतं. कोमट पाण्याने उरलेली बॅग भरुन घेतली. बरोबर माझी बाटली होतीच.

डबे शोधतांना मजा आली. बर्‍याच जणांचे ते ट्रान्स्परन्ट, निळे डबे होते. हा तुझा, हा माझा करत ते शोधले.

सांगायचं राहीलं, आम्हाला रोज निघतांना काहीतरी खाऊ मिळे. चॉकलेट्स पेपर बोट्सचे ज्युस, सफरचंद ( ही सफरचंदे खूप गोड होती, मी खाल्लं नाही, महेशनी दोन्ही संपवली आणि ती फारच आवडली), बिस्कीट्स वगैरे. आजही ज्युस होतंच. ते ठेऊन घेतलं.स्ट्रेचिंग म्हणून जरा उगाच हातपाय हलवले.

इथवर आमच्या मोठ्या सॅक्स, टेंट्स, स्लिपींग बॅगा आणि मॅट्स, स्वयंपाकाचं सामान आणि इतर सगळ्या गोष्टी, अगदी सिलेंडर सुद्धा घोड्यांवरुन आल्या. इथून पुढे घोडे येत नाहीत. आमच्या सॅक्स पोर्टर आणतील. एक जण दोन सॅक्स उचलतो. ऐकुनच आम्ही गार झालो होतो.

पलीकडे आज आमचा मुक्काम जिथे होता, त्या लोअर धामनी कँप साईटवर,बालीपास ट्रेकच्या सगळ्या बॅचेस संपेपर्यंत टेंट्स लावलेले असतात. आणि कुक वगैरे स्टाफ असतो. तिकडे सामान पोर्टर कडून न्यावे लागते जे जास्त महाग पडतं म्हणून हा बेस बनवून ठेवतात. सगळेच. म्हणजे ट्रेक्स नेणार्‍या सगळ्याच कंपन्या. त्यामुळे आमच्या सॅक्स सोड्ल्यास बाकी सामान आणि स्टाफ आज आले तसे परत जाणार.

चार वाजायला आले. चलो चलो असा गाईड्सचा पुकारा सुरु झाला. सगळे तयार होतेच.

मर्फीचा नियम आत्तापर्यंत गप्प होता, तो बोललाच. पुण्याहून निघतांना महेशचा हेड टॉर्च सापडत नव्हता, तो नविन आणला आणला आणि मग जुनाही सापडला हे सांगितलं आहेच. पण साहेबांनी नविन बरोबर ठेवलाच नाही. तो घरीच ठेऊन दिला हे मला ट्रेक सुरु झाल्यावर कळलं. रोज रात्री आम्हाला हेड टॉर्च वापरावा लागायचा बाहेर वावरतांना. हा जुना टॉर्च भरपूर वापरला गेलाय. केदारनी पण तो अनेक वेळा ट्रेक्स ना नेला आहे. त्यामुळे समीटला निघतांना जे व्हायचं ते झालच. महेशचा हेड टॉर्च बंद पडला. नशिबाने लहान हँड टॉर्च होता. शिवाय आम्ही लाईनमध्ये चालत होतो म्हणून पुढे मागे उजेड होता म्हणून बरं.

तर सगळ्यांना गोळा केलं

आजपर्यंत चालतांना आशिष सगळ्यात सावकाश चालत पोहोचत असत. त्यांनाच सगळ्यांच्या पुढे ऊभं केलं. कालच हे फॉर्मेशन सांगितलं होतं पण कोणी फार लक्ष दिलं नाही. आजही ते, मला पुढे नका करु, माझ्यामुळे सगळ्यांना उशीर होईल असं सांगत होते. गाइड्सनी अर्थातच लक्ष दिलं नाही. वाटलं तर पुढे बघू म्हणून लाईन न मोडायची सक्त ताकीद देऊन आम्हाला चालायला सुरुवात करायला सांगितलं.

हे आम्ही निघालो

1._before_starting.jpg

अंधार असला तरी जनरल स्वच्छ चांदणं आणि हेडलाईट्सचा उजेड ह्यामुळे नीट व्हिजीबिलिटी होतीच.
आमच्या बरोबरच बिकटचीही टिम निघाली होती.

सुरुवातीला सुटी रेती असलेला पॅच होता, त्यानंतर दगड सुरु झाले. तेही सुटे सुटे. त्यावर अंधारात तोल सावरता येत नव्हता आणि कधी थांबायचंय हे कळत नसल्याने अचानक पुढच्यावर धडकायला होत होतं.
पाच एक मिनीटांनी साधारण अंदाज आला.

आता सरळ तीव्र चढ सुरु झाला. ट्रेक्सच्या आयटनरीज मध्ये steep ascent असं जनरली वर्णन असतं. दर ४/५ मिनीटांनी थांबत होतो. प्रॉब्लेम होत होता ते थांबायचं कुठे ह्यासाठी कारण पाय नीट टेकवता येतील अश्या जागाच नव्हत्या. वेडंवाकडं उभं रहायला लागत होतं. calves वर ताण येत होता.
गाईड्स आमच्या आजूबाजूला होते.

हळू चालावं लागत होतं पण हे बरंच होतं. आम्ही १५,१०० वरुन १६,२०० गाठायचे होते ते ही साधारण २ तासात. हळू चालण्याने, ब्रेक्स घेण्याने दम कमी लागत होता.

एव्हाना बिकटची टिम बरीच वर पोहोचली होती. अंधारात त्यांचे हेडलाईट्चा उजेड दिसत होता.
बिकटची हिच पद्धत असावी किंवा हे लोक जास्तच घाईत असावेत. एवढ्या लवकर अंधारात समीटवर पोहोचून काय करणार होते ? म्हणजे सूर्यास्त सूर्योदय बघायला पण त्यांना अर्धा पाऊण तास थांबायला लागलं असतं.

आता ग्लेशियर सुरु झाला. अगदी सुरुवातीला मी जे म्हणाले blessing in disguise ते हेच. आम्ही सिझनच्या शेवटास गेलो होतो म्हणून आम्हाला फक्त ह्याच भागात बर्फ मिळाला. ऐन बर्फात उतरणं महा कठीण झालं असत.

जरी हळू हळू ब्रेक घेत चालण्यानी दम कमी लागत होता तरी सारखं थांबल्यानी थंडी पण वाजत होती. इथे ग्लेशियरवर बर्फाचा गारवा शूजच्या जाड सोल्समधूनही पायाला जाणवत होता. गारठल्यासारखं होत होतं. हातमोजे होते तरी तळहात बधिर झाले होते.
सावकाशीने ग्लेशियर पार केला. हळू हळू फटफटायला लागलं..

तिकडे बिकटची टिम वर पोहोचली होती.

ग्लेशियर पार केला आणि जरा टिचभर सपाटीवर पोहोचलो. ब्रेक घेतला. गर्दी करुन कसेबसे सगळे उभे राहीले.
जरा वेळाने लीडर नविन म्हणाले, अब जिसको जैसे जाना है, जाओ. फक्त हितेशभाईला ओव्हरटेक करायचं नाही.
आणि मग सगळे निघाले. दगडांवर पाय घसरत होतेच पण नीट उजाडायला लागल्याने व्यवस्थित दिसत होतं.

समीटवर पोहोचलो.

2._on_top.jpeg

हे अजून काही फोटो

whatsapp_image_2023-10-07_at_10.35.00_am.jpeg

3._view_from_summit_2.jpeg

4._view_from_summit_3.jpeg

5._view_from_summit.jpeg

8._summit_penoramic_view.jpeg

शेवटचा मेंबर विथ लीडर.

6._while_reaching_summit.jpeg

सगळे फोटो काढण्यात मग्न झाले. सगळीकडे उत्साहाला उधाण आलं होतं. शेवटी नविनला आवाज चढवावा लागला. एव्हरेस्ट पे नही आये हो. इतना आवाज करने की जरुरत नही है.

हुडहुडी भरली होती. आमच्या नशिबाने कालपासून वारा नव्हता म्हणून आम्ही वाचलो.
सगळ्यांना जमवून गृप फोटो झाला.

7._summit.jpeg

एका दगडावर शांतपणे टेकलो होतो. पोहोचल्यावर मला नक्की काय वाटलं सांगणं कठीण आहे. रोज कँपसाईटवर पोहोचल्यावर सुटकेची भावना निर्माण व्हायची तसं काही नाही झालं. आनंद नक्कीच झाला. काहीतरी अचिव्ह केल्याचं समाधान ? सांगू शकत नाही., त्याहीपेक्षा काहीतरी वेगळं. एक पोकळी बहुतेक. आणि खूप शांतता.

हे फिलींग मला ह्या ट्रेकमध्ये बरेचदा जाणवलं. महेश आणि मी बरोबर गेलो असलो तरी एक शेवटचा दिवस सोडल्यास आम्ही सतत कधीच बरोबर नसायचो. त्याचा चालायचा स्पीड आणि स्टॅमिना माझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. त्यामुळे तो पुढेच असायचा. फक्त अधूनमधून मी कुठे आहे ह्याचा अंदाज घ्यायचा. रादर आमचं तसच ठरलं होतं.
तर एकटीने चालतांना खूप वेळा एक वेगळीच तंद्री लागायची. असच काहीतरी.

तर आम्हाला दिलेली १५ मिनीटं होत आली. थंडी सॉलीडच वाजत होती. फोटो काढून झाले होते. इथवर काही त्रास झाला नाही, आता उगाच जास्त ताणण्यात अर्थ नाही म्हणून आम्ही ४/५ जण हितेशभाईच्या मागे निघालोच.

एका दगडामागून वळसा घालून जायचं होतं. दगडाला वळसा घातला आणि पोटात पहीला गोळा आला.

9._dangerous_patch.jpeg

आजवर येतांना स्वर्गरोहिणी समोरच आहे, काही कमीजास्त झालं तर डायरेक्ट तिकडे टाईप्सचे जोक सहज मारले होते. ते आता खरे होणार की काय असं वाटायला लागलं

फोटोत ती पायवाट चांगली रूंद दिसते आहे पण प्रत्यक्षात ती जेमतेम पाऊलही पूर्ण मावणार नाही एवढी होती. पाय घसरला तर उजवीकडे डायरेक्ट स्वर्गरोहिणी गाठायचा रस्ता आणि डावीकडे भुसभुशीत माती असलेला आधार, जो अगदी बिनकामाचा होता.
वाट जेमतेम दोनेकशे मीटर असेल. जेमतेम २०/२५ पावलं चालले आणि थांबले.
जमणार नाही. पायच उचलेना. शेवटी गाईडच्या मदतीने रस्ता ओलांडला आणि बसलो.

पलीकडच्या बाजूने

whatsapp_image_2023-10-07_at_10.35.32_am.jpeg

थोड्याफार फरकाने सगळ्यांचीच अवस्था अशी झाली होती.

इथून पुढे बराच बरा रस्ता होता. म्हणजे तीव्र उतार होते पण ते चांगले चालणेबल होते.
असे उतार होते. जे जरा वेळाने जरा जरा हिरवे दिसू लागले.

10._slope_1.jpg

इथून पुढे चालतांना रस्ता चुकण्याची चांगली शक्यता होती.

जमेल तसं भराभरा उतरत होतो. एका ठिकाणी जरा बसलो तर निघतांना मला उठताच येईना. पायातली सगळी शक्ती निघून गेल्यासारखं वाटायला लागलं. पोटात खड्डा पडला आणि आता मला इथून काही चालता येणार नाही वाटायला लागलं.
नऊ साडेनऊ वाजले होते म्हणजे अजून किमान चार तास चालायचं होतं,

तू सकाळी नीट खाल्लस ना ?
हो म्हणजे वाटीभर नुडल्स. म्हणजे वाटीभर नुडल्सवर मी पाच तास होते आणि कठीण चढ चढून आले होते. शिवाय काल रात्रीच जेवण सात वाजता, ते ही धड झालं नव्हतं.
तरीच.
तरी काही खावस वाटेना. शेवटी महेशनी फोर्सफुली एक जेल खायला लावली ( मी लाँग रन दरम्यान बरेचदा खाते ) आणि ड्रायफ्रुट्सची पिशवी जॅकेटच्या खिश्यात टाकून कशीबशी उठले. पाच दहा मिनीटात बरंच बरं वाटायला लागलं.

पुढे बराच वेळ थोडा चढ, बराच उतार असं चालत होतो. चालून चालून इतका थकवा आला की शेवटी आडवं होण्याशिवाय ऑप्शन नव्हता.

11._tired_me.jpg

dsc05142.jpg

उकाडा पण वाढला होता म्हणून वरचं थर्मल आणि टी शर्ट काढून टाकला. पायातलं थर्मल मात्र काढता येणं शक्य नव्हतं.

अगदी सुरुवातीपासून ही गंमत होती की चालायला लागलं की जरावेळाने उकडायचं आणि मग जॅकेट कंबरेला बांधावं लागायचं. जरा एक मिनीट जरी थांबलं तरी थंडी वाजायला लागायची मग एक तर चालायला लागायचं किंवा जॅकेट काढून अडकवून घ्यायचं. तसच इथेही होत होतं. चालतांना चक्क घाम येतोय की काय असंही वाटत होतं आणि जरा दम घ्यायला थांबलं की थंडी.

एव्हाना माझ्या दोन्ही पायांचे (जास्त करुन उजव्या पायाचा ) अंगठे, पाय आतल्या आत पुढे सरकत असल्याने टोकाशी दाबले जाऊन दुखायला लागले होते. हा प्रॉब्लेम लाँग रनच्या वेळी मला नेहमी होतो. अंगठा काळानिळा पडतो.

उजव्या पायाला एवढा ठणका लागला की पाऊलही टाकवेना. पाऊल टाकताना वेडंवाकडं करुन टाकावं लागत होतं आणि प्रत्येक ठिकाणी तसं शक्य होत नव्हतं. माझा चालण्याचा स्पीड एकदम शुन्यावर आला. बरं आमचं सामान ऑलरेडी पुढे गेलेलं होतं त्यामुळे फ्लोटर्स घालू वगैरे ऑप्शनही नव्हता.

पुढे एका ठिकाणी डबा खायला थांबलो. डबा खाऊन झाल्यावरही कोणाचीच उठायची इच्छा नव्हती. तसही मागून येणारे पोहोचल्याशिवाय निघायचं नव्हतच. जवळचे ड्रायफ्रुट्स वाटून टाकले. काल दुपारी चहाच्या वेळी चिक्क्या पण वाटून टाकल्या होत्या.
माझ्याकडे कापूस आणि बँड एड्स होती. कापूस आंगठ्यावर ठेऊन वरुन बॅड एड्सनी जरा कुशनिंग केलं. वाटलं की आता जमेल पण नाही. त्याचा शुन्य उपयोग झाला.

आता ज्याबद्दल गेले २ दिवस ऐकत होतो तो भाग आलाच. सगळ्यांना एकत्र येऊ दिलं , आणि मग उतरण सुरु झाली.
ही ती उताराची सुरुवात.

danger_slope_1.jpg

danger_slope_2.jpg

danger_slope_3.jpg

danger_slope_4.jpg

सुरुवातीची चांगली पंधरा मिनीटं असा ८० अंशात उतार होता. नशिबाने धरायला थोडे फार दगड आणि काटेरी का होईना झुडूपं होती. गाईड्स आजूबाजूला होतेच.

मी आणि काही जणांनी बराच भाग बसून सरकून पार केला.
हा रस्ता म्हणजे नजर हटी दुर्घटना घटी असा नव्हता. इकडे नजर हटी आणि डायरेक्ट वरती. आप गिर गये तो थैली मै भरके लाना पडेगा अश्याच शब्दात आम्हाला सांगितलं होतं. आता कोणी स्वर्गरोहिणीला डायरेक्ट तिकीट वगैरे जोक मारले नाहीत.
पुढे एक कड आली. इकडे तसा उतार नव्हता पण पुन्हा अतीशय अरुंद पायवाट होती. मध्येच कुठेतरी धसका बसेल असा पॅच यायचा तेव्हा देवाचा धावा करत एक एक पाऊल टाकत चालत होते.

आमचे गाईड्स स्वतः भिती वाटेल अश्या ठिकाणी उभे राहून आम्हाला मदत करत होते. मी एक ऑब्झर्व्ह केलं. ते इकडे पाय ठेवा, तिकडे धरा असं सांगत. आम्ही सांगितल्याशिवाय ते हात धरुन तो भाग पार करुन देत नसत.
दुखर्‍या अंगठ्यामुळे मी पाऊल जे वेडंवाकडं टाकत होते त्यामुळे गुडघा, मांडी आणि दुसर्‍या पायावर ताण येऊ लागला. शेवटी अती भिती वाटायची तिथे नविनचा हात धरुन ते प्रकरण एकदाचं पार केलं.

हे संपल्यावर आम्ही सगळे मानसिक थकून एका ठिकाणी बसलो. बसलो काय लिटरली लोळलो, देवाचे आभार मानले. तेव्हा प्रशांत म्हणाला, हे असं आहे हे माहिती असतं तर तो कधी म्हणजे कधीच ह्या ट्रेकला आला नसता.

on_the_way_to_lower_dhamni.jpeg

बर्फ असतो तेव्हा इकडे दोर वगैरे लाऊन उतरवतात. ते पटकन होतं पण तेही तेवढच भितीदायक असणार. बर्फ असण्याचा एकच फायदा असतो, आजूबाजूला उतार किती आहे, दरी वगैरे काही कळत नाही. अज्ञातलं सुख.. दुसरं काय !
अनिच्छेने पुन्हा चालायला सुरुवात केली. आता तेवढा भितीदायक रस्ता नव्हता.

माझं लंगडत चालणं बघून लीडर नविननी विचारलं की शुजचा साईज काय आहे? नेमकं त्याचा आणि दुसर्‍याचाही तोच साईज होता. नाहीतर ते त्यांचे शुज मला देणार होते.
एव्हाना बाकीचे पुढे गेले होते. लंचच्याच वेळी विचारलं असतं तर मला कोणाकडे तरी पायात घालायला काहीतरी मिळालं असतं.
आणि जसं काही राखून ठेवल्यासारखा आमच्या गृपमधला कपिल मागून उगवला. त्याला विचारलं तर त्याच्याकडे स्लिपर्स होत्या. फक्त कपिल ताडमाड ऊंच म्हणून त्याच्या स्लिपर्स चांगल्या २ साईज मोठ्या. पण काहीतरी मिळालं. शुज काढले, ते महेशनी त्याच्या बॅगला अडकवले. स्लिपर्स घातल्या आणि हुश्श म्हणत चालायला सुरुवात केली. मला कॅम्पवर पोहोचेपर्यंत स्लिपर्सची काळजी घ्यायची होती. त्या तुटल्या असत्या तर पुन्हा शुज घालावे लागले असते.

me_with_slippers.jpg

स्लिपर्स घालून ट्रेकला !!!!!
तरी आधीपेक्षा बर्‍याच वेगात चालता येऊ लागले. ऊन वाढलं होतं. दिड वगैरे वाजला असेल. अखेरीस अडीच वाजता, पहाटे निघाल्यापासून साडे दहा तासांनी एकदाचे पोहोचलो.
बाकी बहुतेक सगळे अर्ध्या पाऊण तासाआधी आलेले होते आणि दुखरे पाय घेऊन बसले होते.

कपिलला त्याच्या स्लिपर्स दिल्या आणि म्हणाले, ह्या क्षणी तू जी इच्छा करशील तशी बायको तुला मिळेल हा माझा आशिर्वाद आहे.
तर म्हणे, दिदि, (ह्या सगळ्यांनी पहील्याच दिवशी मला दिदी करुन टाकलं होतं आणि महेशला अंकल. तेव्हा त्यांना सांगितलं की त्याला दादाजी म्हणालात तरी हरकत नाही, मला दिदीच म्हणायचं. मग महेशचं नाव 'महेश सर' झालं. )
काय रे हे ? सगळे म्हणायला लागले, दिदी, फिरसे उपर जाईये और अभी हमारी चप्पले लेके जाईये और वापस आके हमे आशिर्वाद दिजीये !

टेंटमध्ये सामान टाकलं. शब्दशः टाकलं आणि अंगावरचे हजारो कपडे बदलले. आजचा टेंट मजेदार होता. एकतर तिथे लेव्हलवर जमीन नव्हती त्यामुळे जिथे जागा मिळेल तसे टेंट्स लावले होते. आमच्या टेंटच्या खाली तीन बाजूंना तीन मोठ्ठे दगड होते. पण आता आजची टेंटमधली शेवटची रात्र आणि तसही आता ह्याची सवय झाली होती.

camp_site.jpg

तोंड वगैरे धुतलं आणि जरा पाठ टेकली.
आज जरा लवकरच चहासाठी बोलावणं आलं आणि चहाबरोबर गरमागरम सामोसे होते. कपिल खुश झाला आणि म्हणाला कुच और मांगना चाहीये था !

जरा वेळाने सुप टाईमचा हाकारा झाला तर आमच्यासाठी अजून एक मोठ्ठं सरप्राईज होतं, पाणी पुरी आणि पुर्‍या तिथेच तळल्या होत्या. जनता खुश झाली.
आत्ता सगळे जण मस्तपैकी बर्मुडा वगैरे घालून आले होते. आता कसली थंडी ! पण थोड्याच वेळात हवा अशी बदलली की प्रत्येक जण जाऊन पुन्हा स्वेटर्स चढवून आला.

मधल्या वेळात सॅक्स मधलं सामान शफल करुन धुवायचे कपडे एकात आणि न वापरलेले एकात असं आवरुन टाकलं.
उद्या शुज न घालता फ्लोटर्स घालायचे ठरवले.

डिनरच्या आधी आम्हाला सर्टीफिकीट्स दिली. आधी एकाला सांगितलं गठ्ठयातून एक काढ आणि ते ज्याचं होतं त्याला द्यायचं, घेणार्‍याने थोडक्यात ट्रेकबद्दल बोलून दुसरं काढायचं. वातावरण एकदम भावूक वगैरे झालं.
आमच्यापैकी एक जण (आशिश) मागच्या वर्षी एव्हरेस्ट बेस कँप करुन आले होते. त्यांनी कबूली दिली की बाली पासपूढे EBC काहीच नाही. एकतर तिथे रात्री झोपायला होम स्टेज वगैरे असतात शिवाय रस्त्यात खाण्यापिण्याची भरपूर ऑप्शन्स असतात. त्यामुळे एक ऊंची सोडली तर EBC अजिबात चॅलेंजिंग नाहीये.

डिनरला, आम्ही ट्रेक पूर्ण केला म्हणून गुलाबजाम होते.

आता पुढचा प्रश्न, उद्या यमुनोत्रीला जायचं का ?
आम्ही जिथून खाली उतरणार होतो तिथेच एक फाटा यमुनोत्री कडे जाणारा होता. पहाटे लवकर निघालो असतो तर दर्शन करुन जानकी चट्टीला वेळेवर पोहोचता आलं असतं. तिथूनच आमच्या डेहराडूनला नेणार्‍या बसेस असणार होत्या. काही जण रात्रीची ट्रेन्/बस पकडून निघणार होते म्हणून डेहरादूनला सात्/साडेसात पर्यंत पोहोचायला हवं होतं.
आधी सगळेच नको नको म्हणत होते. पण अचानक, इथवर आलो आहोत तर जाऊ या वर गाडी वळली आणि उद्या पहाटे साडेचारला निघायचं ठरलं. खरं खूप कंटाळा आला होता. पहाटे पावणेचारला उठून चहा घेऊन निघालो. तिघे जण आणि एक गाईड आम्हाला डायरेक्ट खाली भेटणार होते.

आज अंधारात चालणं जरा जास्त कठीण होतं कारण दाट झाडी असल्याने चांदणं जाणवत नव्हतं. रस्ताही एकीकडे चढ आणि दुसरीकडे दरी असा होता. तिन चार वेळा मीच दरीत पडता पडता वाचले. मागे चालणार्‍यांपैकी कोणाचे तरी इअर बड्स अंधारात पडले ते सापडणं अशक्यच होतं म्हणा. मग ह्यावरुन पुढे असलेल्या आम्ही ( त्यामानाने ) वयस्कर (!!!) लोकांमध्ये, काय ही मुलं, आत्ता काय गरज आहे गाणी ऐकायची वगैरे चर्चा रंगलीच.
आज उतरुन जायचं असलं तरी चढ असलेले रस्ते होतेच. जरा वेळाने, जिथे यमुनोत्री कडे जाणारा रस्ता फुटत होता तिथे पोहोचलो. तिथून मात्र नीट पायर्‍या होत्या, फक्त त्या जरा जास्त ऊंच होत्या.

yamunotri_1.jpg

पावणे सहा वाजता मंदीराच्या आवारात पोहोचलो. अगदी शांतता होती. मोजकेच लोक दिसत होते. तिथे गरम पाण्याची कुंडे आहेत. ज्यांना आंघोळी करायच्या होत्या त्यांनी केल्या. आम्ही तोवर मंदीराबाहेर, ते उघडायची वाट पहात थांबलो. आत पुजा सुरु होती. जरा वेळाने गाभार्‍यात प्रवेश मिळाला पण आतली दारे बंद होती.

yamunotri_2.jpg

पुजार्‍यांनी आरतीला थांबणार आहात का विचारलं, असाल तर बसून घ्या म्हणाले. त्याच वेळी त्यांनी, मी अगदी सुरुवातीला उल्लेखलेला प्रश्न विचारला, आप बाली पास करके आये है क्या ?
होतं असं की जानकी चट्टीहून यमुनोत्रीसाठी रस्ता सुरु होतो तो साधारण सहाला उघडतो. त्यामुळे इतक्या लवकर पोहोचलेले लोक हे बाली पास करणारे ट्रेकर्सच असतात बाकी लोक खालून वर येतात दर्शन घ्यायला. ट्रेकर्स अजून ऊंचावर असतात ते खाली येतात. आणि मग अजून खाली उतरुन जातात.
एवढ्यात दारे उघडली. एवढी सुरेख मुर्ती आहे यमुना देवीची. आरती सुरु झाली. शब्द कळले नाहीत पण ऐकायला फार छान वाटलं. आरती झाल्यावर बाहेर पडलो. बाहेरच्या दुकानात प्र्साद वगरे घेऊन उतरायला सुरुवात केली.

yamunotri_3.jpg

एव्हाना लोक वर येऊ लागले होते आणि कौतुकाने, तुमचं दर्शन झालं पण ? वगैरे विचारत होते. क्वचित घोडेवाले, पालखीवाले बाली पास बाली पास ओरडत पण होते तेव्हा मजा वाटायची.

नऊ साडे नऊला खाली पोहोचलो. पराठे चहा असा दमदमीत ब्रेफा केला आणि आलो तसेच एक मिनी बस आणि एक इनोव्हा असे परत निघालो.
आता मात्र बसमध्ये गप्पा, चेष्टा मस्करीला उधाण आलं होतं.
आमच्याबरोबर चारही गाईड्स होते. त्यापैके नविन डेहराडूनला उतरुन ऋषिकेशला TTH च्या हेडऑफीसला रिपोर्टीग करणार होते. गुड्डू भाई मध्येच उतरुन काही कामासाठी जाणार होते आणि बाकी दोघे, उमर आणि हरीशभाई परत सांकरी. उमरना हर की दून ला गाईड म्हणून जायचं होतं आणि हरीशभाई पुन्हा एकदा बाली पास !!!! आम्ही ऐकूनच दमलो.

अखेरीस साडेसात वाजता डेहरादुनला पोहोचलो. जिथे पिक अप होता तिथेच ड्रॉप होता. आमचं हॉटेल ( ह्यावेळी दुसरीकडे उतरणार होतो) रस्त्यातच असल्याने आम्ही आधीच उतरलो. जाऊन पहील्यांदा आंघोळी. तब्बल एक आठवडा आंघोळीची गोळी घेतली होती.
रात्री मऊ गादीवर खरं तर झोपच येईना. दुसर्‍या दिवशी बॅक टू पुणे.

ह्या ट्रेकने आम्हाला शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या थकवलं असलं तरी अतीशय समाधानही दिलं. स्टोक करुन तब्बल ६ वर्ष झालेली आहेत, वय ६ वर्षांनी वाढलेलं असलं तरी आपण करु शकतो हा विश्वास दिला.
हा ट्रेक आम्हाला स्टोकपेक्षाही चॅलेंजिंग वाटला. आणि डेहरादूनहुन निघाल्यापासून पुन्हा येईपर्यंत डोळ्यांना निव्वळ मेजवानी. अगदी हिरव्यागार झाडांपासून हिरव्या रंगाचा एक कणही नजरेला न पडणं अशी सगळी रेंज बघायला मिळाली.

कोणत्यातरी एका दिवशी गप्पा मारतांना महेश म्हणाला की हा ट्रेक, ट्रेक कसा असावा ह्याचे सगळे चेक बॉक्सेस टिक करायला देतो, तेव्हा कोणीतरी एक जण जे बोलला ते अगदी पटलं. तो म्हणाला की त्याच्यासाठी ह्याही वर अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे गृप. सगळे इतके मदतीला तत्पर असणारे, वेळा अगदी १०० % पाळणारे. एकानेही एकही दिवस कशाहीबद्दल तक्रार, कुरकुर केली नाही. फार छान कंपनी मिळाली आम्हाला.
आता तर पुढच्या वर्षी कुठे जायचं ह्याच्या चर्चा झडू लागल्या आहेत. ८-१० जण असतील तर TTH कस्टमाइज ट्रेक करुन देतात तेव्हा असं काहीतरी करावं ह्याचे प्लॅन्स सुरु आहेत.

सगळ्याबरोबर मी मनापासून आभारी आहे ती आमचे गाईड्स आणि सपोर्ट स्टाफची. आम्ही कँपवर येऊन हाश हुश करत बसायचो तेव्हा हे लोक टेंट लावणे, स्वयंपाकाला लागणे ह्यात मग्न व्हायचे. जेवणं झाली की आम्ही झोपायला मोकळे तेव्हा ज्या गार पाण्यात हात घालतांना आम्ही दहादा विचार करायचो त्यातच सगळी भांडी स्वच्छ धूऊन दुसर्‍या दिवशीच्या तयारीला लागत. आम्ही सकाळी निघालो की मागचं आवरुन आमच्या आधी पुढच्या कॅम्पवर हजर. त्यांना मनापासून धन्यवाद.
तसेच आणि तितकेच आभार घोड्यांचे आणि बेस कॅम्पहून आमच्या सॅक्स पास ओलांडून खाली जानकीचट्टी पर्यंत आणणार्‍या पोर्टर्सचेही. ह्या सगळ्यांमुळे आमचा संपूर्ण ट्रेक आरामात होऊ शकला.
ह्या व्यतिरीक्तही ज्यांना थॅन्क्यू म्हणायला हवं असे काही जण आहेत, त्यांना मनातच धन्यवाद देते.

पुढच्या वेळी ट्रेक करतांना अजून तयारीने करणार आहे. शिवाय खाली उतरतांना वाटणार्‍या भितीवरही काम करायला हवंय.

एक मात्र नक्की हा ट्रेक मी परत करणार का ?
नक्की करेन. १०००० % करेन.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle