दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३
आता दिवाळी अगदी जवळ आली. पुण्यातले रस्ते आकाशकंदील, रांगोळ्या-रंगाची दुकानं आणि खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी अगदी फुलून गेले आहेत. अशी उत्सवी गर्दी छान वाटते. पण त्यामुळे जिथेतिथे अडकायला होतंय. चौकाचौकात थांबत शेतापर्यंत जायचं म्हणजे संयमाची कसोटी. पुण्यात राहून शेतावर ये-जा करायची, तर ह्या प्रश्नातून सुटका नाही. पण थोडं लवकर निघालं तर ट्रॅफिकचा रेटा थोडा कमी असतो. म्हणून प्रवासाला जाण्याआधी प्लॅनिंग करावं, तसं प्लॅनिंग करून भल्या सकाळी डबा, पाण्याची बाटली वगैरे घेऊन निघालो.
पुण्यातली गजबज आणि शेताजवळच्या खेड्यातलं वातावरण इतकं वेगळं असतं, की दुसऱ्या ग्रहावर गेलो आहोत, असं वाटायला लागतं. तरी पुण्यापासून फार दूर नाहीये. घरून निघाल्यापासून दीड तासात तिथे पोचता येतं. जाताना बंगलोर हायवे. नंतर जुना मुंबई-पुणे रस्ता, तळेगाव औद्योगिक वसाहतीचा रस्ता अशा पायऱ्या उतरत मग खेड्याच्या रस्त्याला लागतो. त्या रस्त्यावर एक प्रचंड मोठी दगडाची खाण आहे. तिथून दगड, खडी वाहून नेणाऱ्या डम्पर, ट्रकची वाहतूक सगळ्या परिसरावर धूळ उडवत अव्याहत चालू असते. ह्या जड वाहनांमुळे रस्त्यात अशक्य मोठ्या आकाराचे खड्डे पडले आहेत. महेश आठवड्यातून तीन-चार वेळा हा प्रवास करतो. त्यामुळे त्याची ह्या खड्ड्यांशी अगदी जवळची ओळख झालेली आहे. शेती आणि शेतावरच्या प्रेमापोटी तो ह्या खड्ड्यातून लीलया मार्ग काढत असतो. हा खाणीचा टप्पा संपला की छान देखणा रस्ता येतो. माळांवरचे रंग ऋतूप्रमाणे बदलतात. पाऊस सुरू झाला की हिरवागार. गौरी-गणपतीच्या आसपास तेरड्याचं साम्राज्य. आता किंचित हिरवा आणि बाकी पिवळा-सोनेरी रंग. रस्त्याजवळ भाताची शेतं आहेत. भात आता कापणीला आलं आहे. काही ठिकाणी मजूर तर काही ठिकाणी यंत्राने कापणी चालू आहे. दिवाळीचं असं काही वेगळं वातावरण अजून दिसत नाहीये.
आज लवकर गेल्यामुळे आम्हाला शाळेत जाणारी मुलं दिसली. आम्ही शाळेत असताना मराठी माध्यमाच्या सगळ्या शाळांमध्ये सर्वसाधारणपणे मुलींचा गणवेश पांढरा-निळा आणि मुलांचा पांढरा-खाकी असायचा. आता हे रंग नाहीसे झाले. आम्हाला दिसलेली जनता हायस्कुलची असावी. मुलींना बेज आणि ब्राऊन सलवार-कमीज-ओढणी आणि मुलांना त्याच रंगसंगतीत अर्ध्या बाह्यांचा शर्ट आणि फुल पॅंट असा गणवेश दिसला. कुठल्यातरी योजनेखाली दप्तरं मिळाली असावी. कारण सगळ्यांच्या पाठीला एकसारखी दप्तरं दिसत होती. काही मुलांना घरचं कोणीतरी दुचाकीवर घेऊन येत होते. जवळपासची चालत, धावत, गप्पा मारत येत होती. लांबच्या मुलांसाठी राज्य परिवहनची बस येते. रस्त्यातल्या लहान-लहान गावात बसची वाट बघत मुलं थांबलेली दिसली. बसच्या आधी शाळेपाशी पोचलेली मुलं शाळेची वेळ होईपर्यंत समोरच्या दुकानातून काही बाही खाऊ घेत गप्पा मारत थांबली होती.
अशी गंमत बघत शेताजवळ पोचलो. आज शेतातला काही भाग नांगरायचा होता. त्यासाठी गावातल्या एका ट्रॅक्टरवाल्या दादांना आधीच सांगून ठेवलं होतं. रस्त्याजवळच्या एका शेतात त्यांचं काम चालू होतं. गाडी बघून ते बोलायला आले. खेड्यातल्या लोकांची आणि शहरी लोकांची बोलायची पद्धत बरीच वेगळी आहे, असं मला नेहमी वाटतं. आपण लोकं सदैव घाईत असल्यासारखं बोलतो. समोरच्या माणसाने पटकन विषयावर येऊन बोलावं अशी अपेक्षा असते. खेड्यातल्या मुलांची नावं, कपडे, केशरचना, मोबाइलचे हँडसेट, करमणुकीची साधनं शहरापेक्षा वेगळी नाहीत. पण आपल्यापेक्षा त्यांचं आयुष्य थोडं निवांत आहे. त्यामुळे संभाषणही निवांत असतं. आता ह्या ट्रॅक्टरवाल्या दादांना ‘दुपारी जेवण करून आपलं काम करायला येतो’ इतकंच सांगायचं होतं. पण संभाषण झालं ‘वरच्या रस्त्याला गाडी बघितली, तेव्हा म्हटलं साहेब आलेले दिसतात. आज म्याडम पण आल्या का? बऱ्याच दिवसांनी आल्या का? पोरगा बराय का? आता ह्या शेताचं काम झालं ही जेवण करतो. नंतर येतो. यंदा पाऊस थांबत थांबत आला, त्याने गवत लै वाढलं. आता नांगरायला हवं. नंतर करा पेरणी’!! दादांना ‘हो, हो. मुलगा बराय.’ वगैरे सांगून आम्ही शेतावर पोचलो. शेतावर गेल्यावर लगेच शेत-फेरीला निघालो. आता इतक्या दिवसात सगळी झाडं ओळखीची झाली आहेत. कुठल्या झाडाचं नक्की काय चालू आहे, ह्याची खबरबात घेणे, हा ह्या फेरीचा उद्देश असतो. चालता चालता नवी झाडं कुठली आणायची, कुठे लावायची ही चर्चा होते. कुठे ड्रीपच्या पाइपांची दुरुस्ती गरजेची आहे, कुठे अजून काही ही उजळणीही होते.
दोन-अडीच वर्षांपूर्वी एका ताईंनी मला पॅशनफ्रूटचं रोप दिलं होतं. अगदी खरं सांगायचं, तर तोपर्यंत मला पॅशनफ्रूट ऐकूनच माहिती होतं. प्रत्यक्ष बघितलं नव्हतं. एका झाडाजवळ पॅशनफ्रूट लावलं. वेल चांगला जगला, त्याला नवीन पानं फुटली. एकदा आमची एक गाय तिथून येताना तिला त्या वेलाची चव घ्यावीशी वाटली, आणि तिने तो बराचसा वेल उडवला! झालं कल्याण. पण त्यातूनही वेल जगला. काही महिन्यांनी दोन-चार फळं दिसू लागली. पावसाचे दिवस होते. झाडाखाली गवत बेसुमार वाढलं होतं. वरून फळं पडली, तर त्या गवतात दिसणारही नाहीत, म्हणून गवत काढायचं ठरलं. मी जोरजोरात गवत उपटत असताना चुकून तो वेलही उपटला!! इतकं वाईट वाटलं. शेतावरच्या मदतनिसाने लगेच खत घालून वेळाची मुळं मातीत रोपली. फळं लवकर पडून गेली पण पुन्हा एकदा वेल जगला. इतके आघात सहन केलेला हा आमचा ‘फायटर पॅशनफ्रूट वेल’ आहे.
जिथे दुपारी नांगरायचं होतं, तिथे बघितलं तर एक लाल बोंडं असलेलं झुडूप दिसलं. ते कशाचं असावं, ह्यावर बराच खल झाला. भेंडीची आणि अंबाडीची पानं दिसायला साधारण सारखीच असतात. त्यामुळे आधी लाल भेंडी आहे, असं वाटलं. पण पाकळ्या खाऊन बघितल्या, तर अगदी कोवळ्या चिंचेची चव. तोवर काही निसर्गप्रेमी व्हॉट्सऍप ग्रुपवर ती अंबाडी आहे, अशी खात्रीची माहिती मिळाली होती. अंबाडीची भाजी घरी सगळ्यांना अगदी प्रिय आहे. पण त्याची बोंडं कधी बघितली नव्हती. ह्या बोंडांपासून सरबत, जॅम करतात तसंच नैसर्गिक रंग तयार करण्यासाठीही ही फुलं वापरतात, अशी माहिती मिळाली. आम्ही तर ह्या बिया लावल्या नव्हत्या. कुठून आल्या कोण जाणे? नेमकी तीच जागा आज नांगरली जाणार होती. मग त्यातली काही रोपं काढून दुसरीकडे लावली. ती जगली, बियाणं मिळालं, तर पुन्हा लावता येईल. पालेभाजी खाता येईल शिवाय नंतर फुलंही मिळतील.
.
शेतावर बरीच चिकूची झाडं आहेत. आता चिकूचा हंगाम सुरू झाला. मागच्यावेळी थोडी फळं उतरवली होती. नीट पिकतात की कसं ह्याची खात्री करून आज एका झाडाचे चिकू उतरवले. किंचित गोड व्हायला लागलेली फळं पक्षी खातात. असे अर्धवट खाल्लेले, टोकरलेले चिकू दिसले, की त्या झाडाची फळं उतरवता येतात. चिकू खूप गोड आहेत. रासायनिक खतं, कीटकनाशकं न वापरल्याने चव छान आहे. साधारण नोव्हेंबर ते मार्च असा हंगाम असतो. पाच महिने विक्री चालू राहते. झाडावरून तोडून खाण्यासारखं फळ नाही. त्यामुळे चोरीची भीती कमी! चिकूच्या फांद्या चिवट असतात. फळ काढताना वाकवल्या तरी तुटत नाहीत. फार पसंत पडलेलं झाड आहे. गेल्या अक्षय्यतृतीयेला काही नवीन रोपं लावली होती. पण जवळच्या माळरानावर वणवा लागला. तो आगीचा लोळ शेतात आला, त्यात बरीच झाडं होरपळली. मोठी झाडं जगली. ही बारकी मात्र बिचारी मारून गेली. फार वाईट वाटलं. पण काही उपयोग नाही. आता पुन्हा लागवड करू.
.
शेतात इथे-तिथे झेंडू आहे. दसऱ्याच्या वेळी ओंजळभरच फुलं मिळाली होती. आता एकेका झाडाला कळ्या-फुलं दिसू लागली आहेत. दिवाळीपर्यंत भरपूर येतील, असं वाटतंय. पपईला फळ आहे. पण अजून रंग बदलला नाहीये. हिरवीगार आहे. किंचित रंग बदलला, तिथल्या भाषेत ‘कवडी पडली’ की उतरवता येतील. रामफळं दिसत आहेत. ती त्यात व्हायला अजून बरेच महिने आहेत. बोराच्या झाडावर तुऱ्यांसारखी फुलं दिसली. केळीला एक घड दिसतोय. मागे निसर्ग वादळात एक अशी घड लागलेली केळ आडवी झाली होती. ह्यावेळी आधीच केळीला बांबूचा आधार दिला आहे.
असं प्रत्येक झाड, रोप त्याचं नशीब घेऊन येतं. कधी गाय खाते तर कधी वादळ चांगल्या वाढलेल्या झाडाला आडवं करतं. उन्हाळ्यात लागलेल्या वणव्यानंतर शेतावर गेले, तेव्हा जळका वास, होरपळलेली झाडं बघून रडू आलं होतं. पण आंब्याच्या झाडांच्या ज्या फांद्यांना आगीची झळ लागली नाही, त्या फांद्यांना आंबे लागले. ज्या फांद्या होरपळल्या, तिथेही कुठेकुठे नवी, तजेलदार, कोवळी पानं दिसू लागली आहेत. निसर्गात भूतकाळ नाही. आहे त्या परिस्थितीत तगायचं, जगायचं, वाढायचं हाच सृष्टीचा नियम.