.
.
नुकताच म्हणजे ३ डिसेंबर रोजी दुपारी पुण्यात स.प महाविद्यालयाच्या मैदानावर गीता पाठ महायज्ञ झाला. दहा हजाराहून जास्त लोकांनी एका सुरात, एका लयीत गीतेच्या अठरा अध्यायांचे पारायण केले. त्याबद्दलचे माझे चार शब्द.
तिथे मांडवात बसून कार्यक्रम सुरु होण्याची वाट बघताना मनात माझ्या गीता संथा प्रवासाचे विचार मनात घोळत होते. बरोबर ठरलेल्या वेळेला शंखनाद होऊन गीता पठणाला सुरवात झाली. सर्व अध्याय पाठ असलेल्या मंडळींना भगवे कपडे आणि वाचन करणाऱ्यांना पांढरे कपडे असा ड्रेसकोड होता. दहा हजारांपेक्षा जास्त मंडळी एका तालात, एका लयीत, एका उच्चारात अध्याय म्हणत होती. त्यामुळे एका वेळी इतकी जणं म्हंणत असूनही, एकच मोठा आवाज गीता पठण करतो आहे, असं वाटत होतं. हा अनुभव फार वेगळा होता. बरोबर अडीच वाजता पहिला श्लोक म्हटला गेला. नऊ अध्याय झाल्यावर दहा मिनिटांची विश्रांती झाली. पुढचे दहा अध्याय, प्रार्थना वगैरे होऊन कार्यक्रम संपला तेव्हा बरोबर साडेपाच वाजले होते. सार्वजनिक कार्यक्रमात वेळेची शिस्त पाळली गेलेली अभावानेच दिसते. भाषणं, सत्कार, शाली, पुष्पगुच्छ ह्यात वेळ न गेल्यामुळे वेळापत्रक चोख पाळलं गेलं. गीता धर्म मंडळाचे सदस्य आणि इतर स्वयंसेवक ह्यांचं ह्यासाठी अभिनंदन. कार्यक्रम उत्तम झाला. व्यवस्थापन चोख होतं.
घरी परत येताना वाटलं की गीता आपल्याला प्रथम कधी माहिती झाली? एक ऑगस्टला शाळेत टिळक पुण्यतिथी साजरी होत असे. बाईंनी लिहून दिलेली भाषणं पाठ करताना त्यात ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हे आवेशपूर्ण वाक्य असायचं, त्याबरोबर मंडाले येथील तुरुंगात लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला, हा उल्लेख असायचा. बहुधा भगवद्गीतेचा तो माझ्या लहानपणातला पहिला उल्लेख असावा. लोकमान्य टिळकांची भगवद्गीता हातात घेऊन क्रांतिकारक चाफेकर फासावर गेले, हा अजून एक उल्लेख.
आम्ही सातवीत होतो, तेव्हा पुढच्या वर्षीपासून अभ्यासक्रम बदलणार, अशी बातमी आली. तोपर्यंत मराठी (१०० गुण) + इंग्रजी (१०० गुण) + हिंदी (५० गुण) + संस्कृत (५० गुण) असे भाषा विषयांची विभागणी होती. आता संस्कृत (१०० गुण) असा पर्याय उपलब्ध होणार होता. मी कल्याणच्या ओक हायस्कूल शाळेत शिकले. तिथे कुंटे मॅडम संस्कृत शिकवत असत. ‘शंभर मार्कांचं संस्कृत’ ह्या उपलब्ध होऊ घातलेल्या पर्यायामुळे त्यांना फार आनंद झाला. आता आठवीपासून संस्कृत शिकवायचं तर त्याची तयारी मुलांकडून सातवीपासून करन घ्यायला हवी, असं त्यांनी मनावर घेतलं. शाळा भरली, प्रार्थना झाली की त्या आम्हाला रामरक्षा शिकवू लागल्या. आमचे उच्चार स्पष्ट व्हावे, वाणी स्वच्छ व्हावी, हा उद्देश. रामरक्षा शिकवल्यानंतर गीतेचा बारावा, पंधरावा आणि दुसरा अध्याय शिकवला. रोज दोन-दोन श्लोक शिकवायच्या. असं करत आमचे अध्याय कधी पाठ झाले, हे आम्हाला कळलं नाही.
पुढच्या शिक्षणाच्या- धावपळीच्या रेट्यात हे सगळं मागे पडलं. घर-कुटुंब-संसार-व्यवसाय ह्यात बरीच वर्ष उडून गेली. अनपेक्षित रित्या परदेशी वास्तव्य झालं. इथला चालू व्यवसाय बंद करून गेले होते. आरामाचं, शांत आयुष्य खूप वर्षांनी मिळालं होतं. कामाच्या धबडग्यात मागे टाकलेल्या इच्छा पूर्ण करायची सुसंधी होती. माझी एक मैत्रीण भगवद्गीता कंठस्थ करून शृंगेरी श्री शंकराचार्यांचा आशीर्वाद घेऊन आली होती. एक दिवस धीर करून तिला फोन केला आणि मला शिकवशील का? अशी विनंती केली. लगेच आमचा व्हॉट्सऍप कॉलवरचा वर्ग सुरू झाला. पहिले दोन-तीन अध्याय पार पडले. नंतर दोघींचे प्रवास, वैयक्तिक अडचणी ह्यात ते मागे पडलं..
गीता धर्म मंडळाची गीता पठणाची एक विशिष्ट पद्धत आहे.ती पद्धत, त्यातले नियम लक्षात आले आहेत, असं वाटत होतं. शाळेत कुंटे मॅडमनी घेतलेल्या परिश्रमांमुळे जिभेला संस्कृत उच्चारांचं वळण होतं. त्यामुळे उरलेले अध्याय आपले आपल्याला म्हणता येतील, असं वाटत होतं, पण तसं होईना. ते म्हणणं नीट होत नव्हतं. एकदा शिकायला सुरवात केल्यावर मध्येच सोडून देणंही खटकत होतं. एव्हाना मायदेशी परत आले होते. पुण्यात बऱ्याच ठिकाणी गीता वर्ग आहेत. पण कामाच्या गडबडीत त्यांची वेळेची शिस्त पाळणं अवघड होतं. काय करावं? हा विचार करताना आमची शाळा-मैत्रीण स्मिता खेडकर (संख्या कुलकर्णी) हिच्याकडे दुसरी शाळा-मैत्रीण गीता पठण शिकते आहे, अशी बातमी कळली. मग काय, एकदम सोपा रस्ता मिळाला. एव्हाना त्या दोघी चौथ्या अध्यायापर्यंत पोचल्या होत्या. ते फार मनावर न घेता मी लगेच त्यांच्या वर्गात घुसलेच! गीतेचं, गीताईचं आणि अठरा श्लोकी मराठी गीतेचं पुस्तक, एक पेन्सिल, इयरफोन आणि सगळ्यात महत्त्वाचा मोबाईल एवढ्या सामग्री निशी आमचा गीता वर्ग सुरू झाला.
आम्ही शाळेत असल्यापासून आमचा मैत्रिणींचा एक घट्ट ग्रुप आहे. आमच्या ह्या ग्रुपमध्ये तेव्हा बऱ्याच सार्वजनिक साथी येत असत. कल्याण गायन समाजात गाणं शिकणं, सुभाष मैदानात खो-खो खेळायला जाणं, भरतकाम शिकणं, सगळ्यांनी अभ्यासाचा एकच क्लास लावणं असं काहीही. आताही तशीच साथ आली, आणि एक-एक करत आम्ही स्मिताकडून गीतेची संथा घेऊ लागलो. पण तेव्हा सगळ्याजणी कल्याणला राहात होतो. घरं एकमेकीपासून शून्य ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर होती. आता कोणी कल्याणला, कोणी पुण्यात, कोणी थेट अमेरिकेत. त्यामुळे सर्वांच्या वेळा जुळवणे कर्मकठीण. पण मैत्री मुरलेली आणि इच्छा तीव्र. त्यामुळे अशा सगळ्या अडचणीतून मार्ग काढले. अठरा अध्याय म्हणजे ७०० श्लोक. बरेच दिवस नेटाने शिकावं आणि शिकवावं लागतं. त्यातून सगळ्या संसारी बायका. अनित्य अशा संसारातले तापत्रय कोणाला चुकले आहेत? पाहुणे येणे, आजारपण, मुलांच्या परीक्षा, कुटुंबात घडणाऱ्या बऱ्यावाईट घटना अशा एक ना अनेक कारणांमुळे ह्या संथा वर्गात खंड पडायचा. पण मला फार आनंद होतो की कोणी कोणाची साथ सोडली नाही. ‘वेळ लागला तरी चालेल, पण बरोबर शिकूया’ हे शेवटापर्यंत पाळलं गेलं. बालमैत्रिणी असलो, तरी आमच्यात व्हरायटी भरपूर होती. काही अध्यात्मात रस असलेल्या, त्याबद्दलचं बरंच वाचन असणाऱ्या. माझ्यासारख्या काही तो रस्ता न सापडलेल्या. काही ९.३० च्या वर्गाला ९ वाजून २९ मिनिटे आणि साठाव्या सेकंदाला फोन करणाऱ्या तर काही थोडं पुढे-मागे. ही सगळी सर्कस स्मिताने शांतपणे सांभाळली. सगळ्यांच्या अडचणींमधून मार्ग काढत तिने आम्हाला पूर्ण संथा दिली. मला शंभर टक्के खात्री आहे, की ती शिकवत होती, म्हणूनच मी त्या कडेपर्यंत पोचले. दुसऱ्या कोणीही इतका संयम ठेवला नसता. हे अठरा अध्याय शिकताना काय काय प्रकार केले, ते आठवलं तरी गंमत वाटते. बरेच दिवस स्मिता, मी आणि अजून एक मैत्रीण असा वर्ग होता. बऱ्याच वेळा शेतावर जात असताना कार मध्ये बसून मी मोबाईल, इयरफोन, पुस्तक, पेन्सिल असा सरंजाम सांभाळून शिकायचे. महेशला शेजारी बसून कार चालवताना अर्जुन उवाच, श्री भगवान उवाच’ वगैरे ऐकावं लागायचं! कधी मैत्रीण कारमध्ये, कामानिमित्त बाहेरगावी असायची. संथा चालू होती, त्या दरम्यान माझे अमेरिका दौरेही झाले. मग तिथल्या वेळेनुसार वर्गाची वेळ ठरायची. नंतर आमची अमेरिकास्थित मैत्रीण आमच्या बरोबर शिकू लागली. मग अजूनच गंमत! कधी तीन मंडळी भारतात- एक अमेरिकेत. कधी दोन भारतात, एक अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आणि दुसरी पश्चिम किनाऱ्यावर. त्यातून अमेरिकेतल्या ‘डे टाइम सेविंग’ची करमणूक. इतक्या सगळ्या अडथळ्यांमधून मार्ग काढत शेवटच्या श्लोकापर्यंत आलो. तो म्हणताना सगळ्यांचे डोळे पाणावले. घसा भरून आला.
गीता ही प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या मुखातून आल्यामुळे तो कृपाप्रसाद आहे, अशी श्रद्धा आहे. ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे त्याला तो मिळणार. गीतेचा सगळा अर्थ, त्याचं मर्म सामान्य माणसाला कुठून कळणार? पण तरी काळोखात एखादी तेजाची शलाका चमकावी आणि समोरचा रस्ता दिसावा, तसं काहीतरी होतं खरं. जेव्हा भविष्यातल्या काही काळज्या मनाला कुरतडतात, एखादं काम आपल्याकडून होईल ना? अशी चिंता घेरते, तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या ‘निमित्तमात्रं भव सव्यसाचीन’ ह्या सल्ल्याचा आधार वाटतो. तसे तर आपण सगळे अर्जुनच आहोत. घाबरलेले, आपल्या क्षमता न ओळखणारे, भोवतालच्या परिस्थितीमुळे खचून शस्त्र टाकून देणारे. अशा कमकुवत क्षणी परमेश्वरावर सगळा भार टाकून आपण निमित्तापुरतं आहोत, हा दिलासा मिळतो. ‘मला हे जमत नाही, ते करता येत नाही’ असे विचार पिंगा घालू लागले की ‘माणूस स्वतःच स्वतःचा सगळ्यात जवळचा मित्र आणि सगळ्यात वाईट शत्रू असतो’ हे आठवतं. मला आध्यात्मिक वाचनाची, श्रवणाची आवड नाही. जपजाप्य-कर्मकांडात माझा जीव रमत नाही. गीतेत ‘भक्त जे मनापासून अर्पण करेल, ते मला प्रिय आहे’ असं सांगून प्रत्यक्ष भगवंताने माझी सोडवणूक केली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
श्रीकृष्णाचं मिथक माणसाच्या संपूर्ण आयुष्याला पुरून शिवाय दशांगुळं उरलं आहे. त्याचं बालरूप आजही घराघरात नांदतंय, बाळलीला दाखवतं आहे. नंतर सवंगड्यांसोबत तो गाई राखतो, दही-दूध चोरतो. त्याला तुम्ही परमेश्वर, मधुसूदन, भगवंत म्हणा की किस्ना नाहीतर कान्होबा.नाहीतर गोकुळीचा चोर. तो कीर्तनातही दिसतो आणि तमाशातही. तो गोपिकांबरोबर रास रचतो. त्या घनश्याम निळ्याची मोहिनी जगावर आहे. राजसूय यज्ञाच्या वेळी कृष्ण धर्माघरी उष्टी काढतो. युद्ध टळावं म्हणून शिष्टाई करतो. मात्र युद्ध उभं राहिल्यानंतर हतबल झालेल्या अर्जुनाला ‘जिंकलास तर स्वर्गसुख भोग आणि मेलास तर स्वर्गात जाशील’ असं सांगतो आणि मोक्याच्या क्षणी कर्णाला ‘तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ असं सुनावतो. काही युद्ध लढायची आणि काही वेळा रणछोड व्हायचं हा मुत्सद्दीपणा दिसतो. आयुष्यातल्या प्रत्येक युद्धात, प्रत्येक अनुभवात, वस्त्रहरणासारख्या सगळंच पणाला लागलेल्या प्रसंगातही कृष्णाची सावली दिसते. त्याच्या निरनिराळ्या रूपांमधलं एक तरी रूप आपली पाठराखण करत असतं.
हे सगळं करून, कशातच न अडकता निर्ममपणे पुढे जायचा निःसंगपणा कृष्णाला कळला. सगळ्यात असून तो कशातच नव्हता. तो ना गोकुळात अडकला, ना हस्तिनापुरात, ना द्वारकेत. कृष्णाने गीता सांगितली आणि जगून त्याचं उदाहरण आपल्यासमोर ठेवलं. त्यातलं तत्त्व कणभर जरी समजलं तरी आपलंही आयुष्य निळ्या रंगात न्हाऊन निघेल, आपली वाट त्याच्या तेजाने उजळेल, ह्यात शंका नाही.