कॉलेज काळात आणि नंतरही आमचं पडीक असण्याचे ठिकाण म्हणजे चांदणी चौकातील कॅफे कॉफी डे. लग्नानंतर तिकडे जाणं आपोआप थांबलंच. तिथला एक आठवण येणारा आवडीचा पदार्थ म्हणजे कॉर्न स्पिनच सँडविच. इतक्या वर्षांनी अचानक मूड झाला म्हणून करून टाकलं. निळूनेही मिटक्या मारत खाल्लं. (हो, त्याला आता शेवटच्या दाढा सोडून सगळे दात आणि चवी आल्यात ). अगदी सोपी कृती आहे. यासाठी मी पालकाची भाजी चिरताना कपभर चिरलेला पालक फ्रीजमध्ये टाकला होता.
साहित्य:
अमूल बटर - छोटा चमचाभर
लसूण - सहा सात पाकळ्या - बारीक चिरलेल्या.
स्वीटकॉर्न दाणे उकडलेले - एक कप
पालक बारीक चिरलेला - एक ते दीड कप
गव्हाचे पीठ/मैदा - दोन टे स्पू
थंड दूध - साधारण दीड आमटीची वाटी
मीठ, चिली फ्लेक्स, पिझ्झा सिजनिंग - आवडीनुसार
चीज - हवे असल्यास एक क्यूब किसून
कृती:
१. गॅस मध्यम ठेवला. नॉनस्टिक पॅनमध्ये इवलूसं बटर घालून त्यात लसूण परतली. लगेच त्यात मक्याचे दाणे आणि पालक एकामागे एक परतला.
२. पालकाने मरगळून मान टाकल्यावर त्यात गव्हाचे पीठ घालून अर्धा मिनिट परतले.
३. त्यात थोडं थोडं गार दूध घालून घट्ट सॉस होईपर्यंत परतले. (गार दुधामुळे गुठळ्या होत नाहीत.)
४. थोडं घट्ट झाल्यावर त्यात मीठ, चीली फ्लेक्स, ओरेगॅनो किंवा असतील ते पिझ्झा सिझनिंग घालून ढवळले.
५. सॉस घट्ट पण ब्रेडवर पसरता येईल इतपत झाल्यावर गॅस बंद केला.
६. एका ब्रेडवर हे मिश्रण पसरून वर दुसरा ब्रेड घट्ट दाबून बसवा आणि तव्यावर थोडं बटर घालून दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. (हवे असल्यास मिश्रणावर चीज किसून घाला. मी चीज, बटर अगदीच कमी आणि अगदीच गरज पडल्यास वापरते.)
बस, दोन तुकडे करून खायला सुरुवात! ओट्याखाली टपून बसलेला छोटा गब्बू हात पुढे यायच्या आत, ब्रेड भाजायच्या आधीच, कसाबसा फोटो काढला.
कृती मोठी लिहिली असली तरी बारीकशीच आहे आणि मुलांच्या पोटात भाज्या घालायला मस्त आहे.