दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी आम्ही सेरेंगिटीमध्येच 'इन टू द वाईल्ड' नावाच्या नेचर लॉजमध्ये राहणार होतो. इथे टेंट कॅम्पिंग म्हटलंय पण खरंतर हे ग्लॅम्पिंग होतं. दोन मोठ्या बेडरूम्स, सिटींग रूम, मागे मोठा डेक आणि आजूबाजूला जंगल, अंधार पडल्यावर टेंट मधून बाहेर पडायचं असेल तर वॉकी टॉकी वर कॉल करून कोणालातरी एस्कॉर्ट करायला बोलावून घ्यायचं. आम्ही संध्याकाळी जेवून आमच्या टेंटमध्ये जात असतानाच विचित्र गुरगुरीचे आवाज येत होते, आमच्या सोबत येणारा म्हणाला की हायना/तरस आहेत टेंटच्या आसपास, पण घाबरु नका ते टेन्ट जवळ येणार नाहीत. आत बेड्स फारच कोझी होते आणि दिवसभर प्रवासानं आम्ही फार दमलो होतो त्यामुळे त्यांचा जास्त विचार न करता पटकन झोपून गेलो, दुसऱ्या दिवशी मला जरा लवकरच जाग आली अलार्मची काही गरजच नव्हती कारण बाहेर पक्ष्यांचाच खूप किलबिलाट ऐकू येत होता. मग थोडावेळ डेकवर जाऊन बसले माझी खुडबुड ऐकून शशी पण आला. फारच वेगळं आणि निवांत वातावरण होतं. आम्ही एकमेकांशी न बोलता नुसते शांत बसून राहिलो. थोड ऊन वर आल्यावर पटापट आवरून ब्रेकफास्ट करायला गेलो.
आज आम्ही सेंट्रल सेरेंगेटी मध्ये फिरणार होतो. लॉज मधून निघालो आणि दहा मिनिटात एका ठिकाणी पोचलो जिथे चारपाच लायनेस आणि त्यांचे बछडे पहुडले होते, थोडावेळ त्यांच्या लीला बघून आम्ही तिथून पुढे निघालो.
आमच्या लॉज सारखाचं एक लॉज एका छोट्या टेकडीवर होता आणि तिथून हत्तींचा एक मोठा कळप उतरत खाली येत होता, थोड्यावेळात तो आमच्या दिशेने सरकेल म्हणून आम्ही रस्त्यावर वाट बघत थांबलो पण त्यांनी दिशा बदलली. बेनो म्हणाला दिवसभरात कधीतरी आपल्याला तो कळप जवळून बघायला मिळेल. बेनो इज ऑलवेज राईट! ठीक आहे, असं म्हणून तिथून पुढे जायला लागलो तर एक भला मोठा मेल इंपलांचा कळप दिसला,अजून पुढे गेल्यावर फिमेल इंपलांचा कळप. दिवसभर आम्हाला त्यांचे वेगवेगळे कळप दिसत राहिले, आजचा दिवस इंपलांचा होता बहुतेक.
आम्ही रोज सकाळी आठला निघत होतो आणि दिवसभर प्राण्यांचा माग घेत फिरत होतो. राहायच्या ठिकाणाहून सोबत पॅक लंच मिळत होतं. त्यात फ्रुटी सारखं ड्रिंक, चॉकलेट बार, राईस/पास्ता/सँडविच पैकी एक, काहीतरी फळ आणि नट्स अश्या गोष्टी दिलेल्या असायच्या. आम्ही काही हे लंच संपवू शकत नव्हतो. लंचसाठी पार्कमध्ये ठराविक जागा ठरवून दिल्या आहेत, तिथे पिकनिक टेबल्स, स्वच्छ वॉशरूम्स अशी सगळी सोय आहे. गेम ड्राईव्हवर असताना तुम्ही कुठेही खाली उतरू शकत नाही. दोन पी ब्रेक्सच्या मध्ये कधी कधी दोन अडीच तास जात होते. मला हजार वेळा वाटून गेलं की ट्रेकसाठी आणलेली पी बॉटल सोबत ठेवायला हवी होती म्हणजे गाडीत वापरता आली असती. नंतर नंतर मी बेनोच्या मागे लागून बुश पी ब्रेक्स घ्यायला सुरुवात केली.
आमची गाडी चांगली ऐसपैस होती. सफारीसाठी कस्टममेड अशी ८ सीटर गाडी असते . त्याचं छत वर करता येतं आणि तुम्हाला गाडीत किंवा सीटवर उभं राहून प्राणी व्यवस्थित पाहता येतात. आम्ही ट्रेकवर असतानांच आमचे गाईड म्हणायचे की सफारीला गेल्यावर तुम्हाला आफ्रिकन मसाज मिळेल. पहिल्या दिवशीचा तारांगिरे मधला रोड फार काही खडबडीत नव्हता त्यामुळं आम्हाला वाटलं हे काही एव्हढं वाईट नाही. मात्र सेरेंगीटीमध्ये आम्हाला पुरेपूर आफ्रिकन मसाज मिळत होता. इथे डिसेंबरमध्ये रोज दुपारी जोरदार पाऊस येतो त्यामुळं बरेच ट्रॅक्स चिखलानं भरून गेलेले होते. या गाड्या फोरव्हील ड्राईव्ह असल्यामुळं चिखलातून सहज जात होत्या पण त्यावेळी गाडीला घट्ट धरून बसावं लागत होतं. शिवाय एखाद्या ठिकाणी गाडी अडकलीच तर मदत मिळावी म्हणून दोन तीन गाड्या सोबतच जात होत्या.
इंपालांचे कळप थोडे विरळ झाल्यावर बराच वेळ आम्ही निरुद्देश चाललोय असं वाटत होतं , त्यामुळं एवढ्या खडबडीत रस्त्यावर सुद्धा जरा माझा डोळा लागला. थोड्या वेळातच धक्के फारच वाढले, त्यामुळं उठायालाच लागलं, बेनोला कसलातरी सुगावा लागला होता. तो म्हणे आत्ताच काही सांगत नाही. आपण तिथे जाईपर्यंत ते असतील कि नाही माहित नाही. असो, काहीतरी एकसायटींग असणार एवढं नक्की होतं. गाडी जिथे थांबली तिथे समोरच एका ढिगाऱ्यावर दोन चित्ते टेहाळणी करत होते. जस जश्या जास्त गाड्या यायला लागल्या त्यांनी आपला मुक्काम हलवला आणि गवतात गायब झाले. दोन्ही चित्ते अतिशय रेखीव आणि देखणे होते. आजूबाजूच्या गाड्यांची अजिबात पर्वा न करता सगळ्यांसमोरून अगदी रुबाबात चालत गेले. कसलीही घाई नाही, हे आमचं राज्य आहे अशी सगळ्यांना जाणीव करून देणारी 'चिते की चाल'!
चित्ते पार दिसेनासे झाल्यावर आम्ही तिथून निघालो, थोडावेळ अजून निरुद्देश भटकून मग लंच स्पॉटला गेलो, पूर्णवेळ लंच करताना हिप्पोचे चित्कार(?) ऐकू येत होते, लंच झाल्यावर चालतच एक व्युव्ह पॉईंट होता तिथं गेलो तर नदीत बऱ्याचं हिप्पोन्ची अंघोळ कम झोप चालू होती. बेनो म्हणाला त्यांना कमी दिसतं त्यामुळं ते रात्री बाहेर येऊन चरतात आणि दिवसभर पाण्यात असतात. शिवाय ते फार अग्रेसिव्ह असतात हत्तीसारखी वॉर्निंग वगैरे देत बसत नाहीत सरळ आपल्यावर चालून येतात त्यामुळं ते पाण्याच्या बाहेर असतील तर त्यांच्यापासून लांब राहणंच चांगलं असतं. थोडावेळ त्यांच्या जलक्रीडा बघून आम्ही पुढच्या ड्राइव्हला निघालो.
आज मला आणि काव्याला कंटाळा आल्यासारखं वाटत होतं आणि आमची राहायची जागा मस्त होती तर जरा लवकर जाऊन तिथच आजूबाजूला वेळ घालवायचा असा प्लॅन आम्ही करत होतो. आम्ही परत जात असताना सकाळी दिसलेला हत्तिन्चा कळप जरा लांबच्या लूप मध्ये रस्त्याजवळ चरत होता, जाता जाता तिथे थांबून जाऊ म्हणून बेनोनं गाडी तिकडे वळवली. आम्ही आधी पाहिलेल्या कळपांपेक्षा हा कळप बराच मोठा होता. लहान बाळं, टीनएजर, मावश्या, मामा असा बराच मोठा गोतावळा होता. आमच्या सारख्या अजून काही गाड्या सगळ्या बाजूनं हा कळप बघायला येऊन थांबल्या. त्यातले नवतरुण हत्ती एकमेकांना ढुशा देत चित्कार करत होते आणि काही हत्ती गाड्यांच्या रोखानं आल्यासारखं करून आपली नाराजी दाखवत होते. एवढे अवाढव्य हत्ती गाडीच्या एवढ्या जवळ आल्यानं पुन्हा मला अस्वस्थ वाटत होतं. चला झालं आता निघूया अशी भुणभुण मी करत होते पण गाडीतल्या बाकी मंडळींना त्याचं काही नव्हतं. थोड्यावेळाने तो कळप रस्त्यापासून थोडा आत जायला लागला आणि आम्ही तिथून निघालो.
आता चलो लॉज म्हणत होतोच तेवढ्यात एका ड्रायव्हरने त्याची गाडी हत्तींच्या कळपाजवळ चिखलात रुतली आहे ती बाहेर काढायला मदत कर म्हणून रेडिओवर कॉल केला. बेनोनं आधी एका बाजूनं रोप लावून ती गाडी आमच्या गाडीने काढायचा प्रयत्न केला पण त्या गाडीचं ऑल व्हील ड्राइव्ह फंक्शन नीट चालत नव्हतं त्यामुळं ती गाडी काही जागची हलेना, तिला आमच्या गाडीने पुढून ढकलून मागे सरकावयाचा उपाय पण लागू झाला नाही. आम्ही एक मोठा वेढा मारून त्या गाडीच्या मागच्या बाजूला गेलो. या बाजूलातर अजूनच जास्त चिखल होता, त्या गाडीला दोर नीट बांधता यावा म्हणून बेनो आमची गाडी तिच्या जवळ नेत असतानाच आमची पण गाडी त्या चिखलात रुतून बसली. बेनोनं बराच खटाटोप केला पण गाडी काही जागची हलेना. शेवटी अजून एकाला रेडिओवरून बोलावून घेतलं. त्यानं दोर लावून खेचल्यावर आमची गाडी बाहेर आली. आधी जी गाडी अडकून बसली होती तिला काढायला त्यांनी पार्क रेंजरना बोलावलं होतं, त्याला अजून एक दीड तास लागला असता, तसाही त्यांना आता आमचा काही उपयोग नव्हता, त्यांच्याकडे पाणी वगैरे आहे ना विचारून आम्ही तिथून निघालो.
या सगळ्या गोंधळात आमच्या लवकर लॉजवर परत जायच्या प्लॅनवर पाणी पडलं. तिथे पोचलो तर डिनर थोड्या वेळात सर्व्ह करतोच असं ते लोक म्हणाले मग त्यांच्या, डायनिंग एरियात थोडावेळ घालवून जेवूनच आमच्या टेंटकडे यायला निघालो. अंधार पडल्यामुळे दोन जण आम्हाला टॉर्च घेऊन एस्कॉर्ट करायला आले. टेंटच्या अगदी जवळ आल्यावर टॉर्चच्या उजेडात दोन डोळे चमकले, आमच्या टेंट समोरून दोन हायना त्यांच्यावर टॉर्चचा उजेड पडताच बाजूच्या गवतात पळून गेले. आम्हाला सोडायला आलेल्या मुलांनी टेंट भोवती फिरून अजून कोणते प्राणी टेंट जवळ लपले नाहीत याची खात्री केली आणि आम्ही फायनली आमच्या टेंटमध्ये जाऊन दिवसाची सांगता केली.